कार्ल बॉश

बॉश (बोश), कार्ल : (२७ ऑगस्ट १८७४ – २६ एप्रिल १९४०). जर्मन औद्योगिक रसायनशास्त्रज्ञ. उच्च दाबाला अमोनियाचे संश्लेषण (घटक मूलद्रव्यांपासून इच्छित संयुगाची, येथे अमोनियाची, निर्मिती) करणारी ‘हाबर-बॉश पद्धती’ त्यांनी विकसित केली. उच्च दाबाच्या साहाय्याने रासायनिक विक्रिया घडवून आणण्याच्या पद्धतींचा शोध लावून त्यांचा विकास केल्याबद्दल त्यांना १९३१ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक ⇨फ्रीड्रिख बेर्गिउस यांच्याबरोबर विभागून देण्यात आले. त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण कोलोन (जर्मनी) येथे झाले. १८९६ साली ते लाइपसिक विद्यापीठात दाखल झाले व तेथे १८९६ साली ते लाईपसिक विद्यापीठात दाखल झाले व तेथे १८९६ साली त्यांनी कार्बनी रसायनशास्त्रातील पीएच्.डी. पदवी संपादन केली. १८९९ साली बाडीश ॲनिलिन अँड सोडाफॅब्रिक (BASF)कंपनीत दाखल झाल्यावर त्यांनी नायट्रोजन व हायड्रोजन यांच्या संयोगाद्वारे अमोनिया निर्माण करण्याच्या पद्धतीविषयी संशोधन सुरू केले. पुढे या कंपनीचे रूपांतर आय्. जी. फार्बेन या कंपनीत झाले व १९३५ साली ते या नव्या कंपनीचे अध्यक्ष झाले. तेथे असतानाच उच्च दाब व योग्य उत्प्रेरक (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) यांचा वापर करून त्यांनी केवळ प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या ‘हाबर पद्धती’चे मोठ्या प्रमाणावर अमोनियानिर्मिती करणाऱ्या पद्धतीत रूपांतर करण्यात यश मिळविले [⟶ अमोनिया]. यासाठी त्यांनी २० हजारांहून जास्त प्रयोग केले. ही पद्धती १९११ पासून प्रत्यक्ष वापरात आली व तिच्यामुळे इतर रासायनिक पदार्थांच्या (उदा., खते, नायट्रिक अम्ल, मिथेनॉल इ.) उद्योगधंद्यांना चांगलीच गती प्राप्त झाली. १९१५ साली एक मोठे कृषिप्रयोग क्षेत्र उभारून तेथे त्यांनी जमिनीची सुपीकता, कार्बनी व अकार्बनी खते आणि त्यांचा वनस्पतींच्या वाढीवर होणारा परिणाम वगैरे विषयांचे संशोधन केले. हवेतील नायट्रोजनाचे स्थिर संयुगात रूपांतर करून जीव त्याचा कसा वापर करून घेतात, याचाही त्यानी अभ्यास केला. उच्च दाबाला पाण्याची वाफ व पाणवायू (हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण) यांचे मिश्रण योग्य उत्प्रेरकावरून पाठवून हायड्रोजन निर्माण करण्याची पद्धतीही त्यांनी शोधून काढली, तिला ‘वॉश पद्धती’ म्हणतात. अमोनियम कार्बामेटापासून यूरिया मिळविण्याचा, तसेच कृत्रिम रबर बनविण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. ते हायड्लबर्ग येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.