आ. १. रोहिणी आकुंचन-प्रसरणजन्य लाट

नाडी : हृदयाच्या प्रत्येक स्पंदाबरोबर शरीरातील प्रत्येक रोहिणीत राहून राहून होणाऱ्या आकारबदलाला नाडी म्हणतात. शरीरातील ज्या ज्या ठिकणी रोहिणी त्वचेच्या खालीच असते, त्या त्या ठिकाणी विशेषेकरून अस्थीसारखा कठीण भाग तिच्या मागे असल्यास, हा बदल तपासणाऱ्यांच्या बोटांना जाणवतो. सर्वसाधारणपणे दोन्ही मनगाटांतील बहिःप्रकोष्ठिका-रोहिणी सहज तपासता येत असल्यामुळे नाडीचा अधिक जवळचा संबंध याच रोहिणीशी जोडला गेला आहे. मानेतील ग्रीवा-रोहिणी, भुजेतील भुज-रोहिणी, जांघेतील ऊरु-रोहिणी, उदर गुहेतील महारोहिणी, पावलावरील पद-अभिपृष्ठ-रोहिणी यांमध्येही नाडी लागते.

हृदयाच्या डाव्या निलयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर काही रक्त महारोहिणीत फेकले जाते. यामुळे महारोहिणी आणि तिच्या सर्व शाखांतील भित्तींतील स्‍नायुतंतूंमुळे तसेच भित्तीच्या लवचिकपणामुळे त्यांच्यातून एक आकुंचन-प्रसरणाची लाट पसरते आणि त्यांनतर अवकाशिकेतून (रोहिणीच्या पोकळीतून) रक्तप्रवाहाची लाट जाते. स्‍नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे उद्‌भवणाऱ्या लाटेचा वेग दर सेकंदास ६ ते ९ मी. असून तो रक्ताच्या लाटेच्या वेगापेक्षा दीडपटीने अधिक असतो. म्हणून नाडी म्हणजे प्रत्यक्ष रक्तप्रवाहाची लाट नसून निलयातून फेकल्या गेलेल्या रक्तामुळे महारोहिणीच्या भित्तीला बसलेल्या धक्क्यापासून उत्पन्न झालेली भित्ती आकुंचन-प्रसरणजन्य लाटच असते. नाडीचा व रक्तप्रवाहाचा संबंध नसून ती स्वतंत्र लाट असते, हे पुढील प्रयोगावरून सहज लक्षात येते. एखादी रोहिणी बंधनाने घट्ट बांधल्यास तीमधील नाडी रक्तप्रवाह नाही म्हणून लागावयाची थांबत नाही. आ. १ मध्ये नाडीची लाट कशी जाते हे दाखविले आहे.

नाडीपरीक्षा : इतर यांत्रिक साधनांच्या अभावी (उदा., श्रवण यंत्र–स्टेथॉस्कोप) शतकानुशतके नाडीपरीक्षा हीच रुग्णपरीक्षेचे प्रमुख साधन झाली होती. भारतातील काही वैद्यकीय पद्धतींत नाडीच्या गतीचे भेद कल्पून नाडीपरीक्षेवरून रोगनिदान करण्यात येते.

पाश्चात्त्य वैद्यकात नाडीपरीक्षा करताना (१) परिदर्शन (डोळ्यांनी निरीक्षण करणे), (२) परिस्पर्शन (बोटांनी चाचपडून तपासणे), (३) श्रवणयंत्रातून श्रवण करणे आणि (४) स्पंदनालेखयंत्र वापरून मिळालेल्या आलेखाचा अभ्यास करणे या सर्वांचा समावेश होतो. यांपैकी फक्त स्पंदनालेखयंत्र सर्रास वापरात नसले, तरी वरील इतर तीन मार्गांनी हृदय आणि रुधिराभिसरण तंत्राविषयी बरीच माहिती सर्वसाधारणपणे डॉक्टर मिळवू शकतो.

आ. २. नाडी परिस्पर्शन

परिदर्शन : विशिष्ट रोहिण्यांचे मार्ग त्वचेखालून म्हणजेच शरीराच्या पृष्ठभागाजवळून विशिष्ट ठिकाणी जातात. या ठिकाणांचे डोळ्यांनी निरीक्षण करतात. कृश व्यक्तीत रोहिणीस्पंदन डोळ्यांना स्पष्ट दिसू शकते. सर्व प्रमुख परिसरीय रोहिण्यांचे मार्ग तपासतात. काही रोगांचा अंदाज स्पंदन निरीक्षणावरून बांधता येतो. उदा., महारोहिणी प्रत्यावहन (महारोहिणीत फेकल्या गेलेल्या रक्तापैकी काही रक्त परत निलयात उतरणे) या विकृतीत जोरदार व हिसकायुक्त रोहिणीस्पंदन दिसते. याला कॉरिगान यांची खूण (डी. जे. कॉरिगान या आयरिश शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. रोहिणी काठिण्य ही विकृती भुजातील भुज-रोहिणीच्या वक्रतेवरून ओळखता येते.

परिस्पर्शन : मनगटाच्या तळाशी पुढील बाजूस आंगठ्याच्या बुडख्याच्या जरा वर, तपासणारा आपल्या उजव्या हाताच्या तीन किंवा दोन बोटांनी चाचपून ही परीक्षा करतो.

या तपासणीवरून हृदयाच्या निलयाचा जोर, त्याच्या आकुंचनांची संख्या, नियमितपणा इत्यादींचा अंदाज बांधता येतो. एका मिनिटात बोटाला लागणारी स्पंदने मोजून गती मोजता येते. सामान्यपणे निरोगी व्यक्तीत नाडीचे ठोके दर मिनिटास ७२ ते ८० असतात. बालकांत व स्त्रियांत ते अधिक असतात. मनोभावना, शारीरिक हालचाल आणि काही विकृती (उदा., ज्वर, क्षय वगैरे) गतीच्या बदलास कारणीभूत होतात. मनगटावर ठेवलेल्या बोटांपैकी नाडी बंद करण्यासाठी तर्जनीला लागणाऱ्या दाबावरून रक्तदाब ढोबळपणे ठरविता येतो. आतील रक्तप्रवाह दाबाने बंद केल्यानंतर खालील अस्थीवर दाबून रोहिणी वळविल्यास तिच्या भित्तीच्या कठीणपणाची कल्पना येते.

श्रवण : श्रवणयंत्रातून मोठ्या रोहिण्यांमधील रक्तप्रवाहाच्या आवाजातील बदल ऐकता येतात. महारोहिणी परावर्तन या विकृतीत ऊरु-रोहिणीवर श्रवणयंत्राने ऐकल्यास विशिष्ट आवाज ऐकू येतात.

आ. ३. डजन यांचे स्पंदनालेखयंत्र

स्पंदनालेखयंत्र : नाडीच्या स्पंदनाचा आलेख मिळविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या या उपकरणाचा शोध ई. जे. मारे या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांनी १८८५ मध्ये लावला. या यंत्रात नंतर पुष्कळांनी सुधारणा केल्या.

या आलेखातील चढ, उतार आणि खळगे हे विशिष्ट नावांनी ओळखले जातात. या आलेखावरून हृदयाची क्रिया व रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाह यांविषयी कल्पना करता येते. बोटांच्या स्पर्शज्ञानावरून नाडीतील फरक समजण्यास अनुभवाची गरज असते परंतु आलेखाच्या फरकावरून नवशिक्या विद्यार्थ्यासही पुष्कळ गोष्टी समजू शकतात.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन : ज्यातून शारीर द्रव पदार्थ वाहतात असा शारीर गोल, पोकळ नळीसारखा वहनमार्ग. रोहिणी, शिरा ही रोगातील दोष, रोग व त्यातील स्थिती प्रकट करते. ही बहुधा मनगटावर पाहिली जाते.

पाहण्याची रीती : तिच्यावर मधली तीन बोटे ठेवावी. हृदयाकडील बाजूला तर्जनी असावी, तिन्ही बोटांचा दाब समान असावा, नाडीचा हात अधर धरावा. वाहत्या नाडीचा आकार व बोटांच्या दाबाने वहनाला अडथळा येत असल्यामुळे बोटांना बसलेला धक्का कळतो. प्रथम नाडी स्वतः कशी आहे ते पहावे. ती पुष्ट, भरदार व व्यवस्थित वाहणारी उष्ण असली तर ती बलवान आहे, तिच्यावरून शरीरही बलवान समजावे. ती तारेसारखी कडक, बारीक, सूक्ष्म प्रवाही वाटली तर ती अशक्त व वातल समजावी, शरीरही तसे समजावे. नाडी उष्ण व वेगाने वाहत असेल तर ज्वर समजावा, असे अनेक सूक्ष्म भाव ती दाखवते. त्या छटा अभ्यासाव्या लागतात.

दोषदर्शन : तीन बोटांना तीन दोष कळतात. तर्जनी, मध्यमा व अनामिका यांना जे धक्के लागतात ते अनुक्रमे कफ, पित्त, वाताचे असतात. वातज द्रव्ये सर्वांत लघु, सूक्ष्म व तरल असतात पित्तज द्रव्ये वात द्रव्यांपेक्षा स्थूल, गुरू व अतरल असतात आणि कफज द्रव्ये सर्वांत जड, स्थूल व स्थिर असतात. ही तीन प्रकारची द्रव्ये नाडीतून सतत वाहत असतात. दाबाने कफज द्रवाची गती सर्वांत अधिक अडवली जाते. त्यांचा धक्का तर्जनीला लागतो. त्यातून पित्तज आणि वातज द्रव्ये सुटतात. दुसऱ्या बोटाच्या दाबात पित्तज द्रव्ये अडवली जातात. त्यांचा धक्का मध्यमेला लागतो व त्यांतून वातज द्रव्ये सुटतात व त्यांचा धक्का अनामिकेला लागतो अशी कल्पना आहे. वय, दिवस, रात्र व जेवण यांच्या आरंभ, मध्य व शेवटच्या कालात क्रमाने कफ, पित्त, वात शरीरात अधिक प्रमाणात वाढतात. त्यामुळे ते नाडीतूनही अधिक प्रमाणात त्या त्या वेळी वाहतात. जो दोष अधिक प्रमाणात वाहतो तो दोष अधिक जोराचा धक्का देतो. धक्क्याच्या तरतम जोरावरून दोषांचे तरतमत्त्व ओळखावे. कोणता दोष अधिक आहे ते पहावे. जो दोष अधिक असेल त्या दोषाचा धक्का अधिक लागेल. त्या दोषाची ती नाडी समजावी. कफाची नाडी असेल, तर कफ दोष शरीरात अधिक आहे असे समजावे. त्याचे कारण वरीलप्रमाणे वयादी आहेत की अन्य आहेत, हेही पहावे लागते.

वरील कारणांपेक्षा देशकाल, प्रकृती व आहारविहार ही दोषोत्पादक कारणे आहेत. या कारणांचा विचारही करावा लागतो. कोणती कारणे आहेत ते पहावे लागते.

पुष्कळ वेळा दोन दोन दोष अधिक असतात. तीन दोषही एकदम प्रकुपित होतात. दोन दोष अधिक असताना दोन त्या त्या दोन बोटांना व तीन दोष झाले असता तिन्ही बोटांना जोराचे धक्के बसतात.

विकाराचा विचार करताना दोषाचे मुख्यतः तीन वर्ग पाडावे लागतात : (१) रोगकर आहारविहारजन्य दोष, (२) त्यांना उपबृंहक (पूरक) देश, काल, रात्र, दिवस व जेवण जन्य दोष व (३) पायाभूत प्रकृती आणि वयोजन्य दोष. हे दोष विचारात घेऊन चिकित्स्य दोष निश्चित करून त्यांचा क्रम ठरवावा लागतो. हे दोषच रोगाला प्राधान्याने कारण असतात.

नाडीत ज्ञात झालेल्या दोषांची चिन्हे शारीरावर निर्माण झालेली असतात. त्या त्या दोषांच्या स्थानांचा विचार करून ती ज्ञात करून घ्यावी लागतात.

मल, मूत्र, जिव्हा, दृष्टी, स्पर्श, आकृती यांच्या चिन्हांचा व नाडीदोषाचा मेळ घालून रोग व त्याच्या अवस्था ठरवाव्या लागतात.

पटवर्धन, शुभदा अ.