आयकेन् डोर्फ, योझेफफोन: (१० मार्च १७८८ – २६ नोव्हेंबर १८५७). जर्मन स्वच्छंदतावादी कवी आणि कादंबरीकार. सायलीशियात एका जहागीरदाराच्या घराण्यात जन्म. शिक्षण हायडलबर्ग, बर्लिन आणि व्हिएन्ना येथे. याच ठिकाणी त्याची फ्रीड्रिक श्लेगेल, डोरोटेआ श्लेगेल, गरेस इ. स्वच्छंदतावाद्यांशी मैत्री झाली. त्याच्या भावकवितांतून जन्मभूमीविषयी जिव्हाळा, निसर्गप्रेम, अतृप्त प्रीती आणि अज्ञाताची ओढ दिसून येते. तसेच त्यांत गेयता आणि भाषेचा सुडौलपणा यांचा सुंदर मिलाफ आढळतो. Aus dem Leben eines Taugenichts (१८२६, इं. भा. द हॅपी गो लकी, १८८९), Das Marmorbild (१८२६, इं. भा. द मार्बल स्टॅच्यू, १९२७) या त्याच्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या होत.

नेपोलियनविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात तो सैन्याधिकारी होता. तसेच प्रशियन शासकीय अधिकारी आणि शिक्षण-मंत्रालयाचा सदस्य म्हणूनही त्याने काम केले. नाइसी येथे तो मरण पावला.

कुलकर्णी, बा. भी.