हाल्डन केफर हार्टलाइनहार्टलाइन, हाल्डन केफर : (२२ डिसेंबर १९०३–१७ मार्च १९८३). अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिक. दृष्टीबद्दलच्या तंत्रिका-शरीरक्रियात्मक यंत्रणेसंबंधी संशोधनकार्य केल्याबद्दल त्यांना १९६७ सालचे वैद्यक अथवा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक जॉर्ज वॉल्ड आणि रांगनार आर्थर ग्रानीट यांच्यासमवेत विभागून मिळाले.

 

हार्टलाइन यांचा जन्म ब्लुम्सबर्ग (अ.सं.सं.) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्टेट नॉर्मल स्कूलमध्ये झाले. त्यांनी ईस्टन (पेनसिल्व्हेनिया) येथील लाफायेत महाविद्यालयात अध्ययन केले व १९२३ मध्ये बी.एस्सी. पदवी मिळविली. नॅशनल रिसर्च कौन्सिलचे सभासद (फेलो) असताना त्यांनी दृक्पटल विद्युत् शरीरक्रिया-विज्ञानाचा अभ्यास केला आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठ (बॉल्टिमोर) येथून एम्.डी. पदवी संपादन केली (१९२७). ते न्यूयॉर्क सिटीयेथील कॉर्नेल मेडिकल कॉलेजमध्ये शरीरक्रियाविज्ञानाचे सहप्राध्यापकहोते (१९४०-४१). तसेच ते १९४९ मध्ये जॉन हॉपकिन्स विद्यापीठात जीवभौतिकी विभागाचे अध्यक्ष आणि प्राध्यापक, तर १९५३ मध्येन्यूयॉर्क सिटी येथील रॉकफेलर विद्यापीठात तंत्रिका-शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले.

 

हार्टलाइन यांनी काही संधिपाद, मृदुकाय आणि पृष्ठवंशी प्राण्यांच्या दृक्पटलांमध्ये विद्युत् प्रतिसाद मिळतात, असे शोधून काढले. या प्राण्यांची दृष्टिमान प्रणाली मानवापेक्षा साधी व अभ्यास करण्यास सोपी असते. हार्टलाइन यांनी सी. डी. स्नायडर यांच्या आयंटहोव्हेन वीजप्रवाहमापकाचा [→आयंटहोव्हेन, व्हिलेम] वापर करून प्रकाशग्रहण व दृक्‌संवेदन यांचा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी बेडूक, ससा व मांजर यांच्या दृक्पटलात प्रकाशामुळे होणारे विद्युत् वर्चसातील बदल मोजून त्यांचे आरेखन करण्याचे तंत्र आत्मसात केले. त्यांनी नालाकृती खेकड्याच्या( लिम्युलस पॉलिफेमस) डोळ्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी प्रयोगामध्ये टोकदार सूक्ष्म विद्युत् अग्र वापरून फक्त एकाच तंत्रिका कोशिकेतील प्रतिसादांची प्रथम नोंद केली. डोळ्यातील ग्राही कोशिका एकमेकींशी अशा प्रकारे जोडलेल्या असतात की, जेव्हा एक कोशिका उद्दीपित होते तेव्हा इतर कोशिका उदासीन असतात, असे त्यांना आढळून आले. हे साधन वापरून त्यांनी रंगदृष्टीविषयी बरीच माहिती मिळविली. त्यांनी दृक्पटलातील तंत्रिका तंतू आणि प्रकाशग्राही कोशिका यांच्या कार्याची तपशीलवार माहिती मांडली आणि दृक्पटलीय यंत्रणा दृश्य माहितीचे एकात्मीकरण कसे घडवून आणते हे दाखवून दिले. हार्टलाइन यांनी माणसाच्या डोळ्यातील रात्रीच्या वेळी दिसण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचाही अभ्यास केला.

 

हार्टलाइन यांना विल्यम हॉवेल पुरस्कार (१९२७), हॉवर्ड क्रॉस्बीवॉरेन पदक (१९४८), आल्बेर्ट मायकेलसन पुरस्कार (१९६४), लाइटहाउस पुरस्कार (१९६९) यांसारखे अनेक पुरस्कार व मानसन्मान मिळाले. ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफआर्ट्स अँड सायन्सेस, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, अमेरिकन फिजिऑलॉजिकल सोसायटी इ. संस्थांचे सदस्य होते. तसेच ते रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेचे परदेशी सदस्य होते.

 

हार्टलाइन यांचे फॉलस्टन (अमेरिका) येथे निधन झाले.

 

एरंडे, कांचन