कोचर (कोखर), एमिल टेओडोर: (२५ ऑगस्ट १८४१–२७ जुलै १९१७). स्विस शस्त्रवैद्य. वैद्यक व शरीरक्रियाविज्ञान या विषयांचे १९०९ सालचे नोबेल पारितोषिक विजेते व शस्त्रक्रियेच्या समस्यांमध्ये प्रायोगिक व शरीरक्रियावैज्ञानिक तत्त्वांचा वापर करणारे अग्रणी. त्यांचा जन्म बर्न (स्वित्झर्लंड)येथे झाला. १८६५ मध्ये बर्न विद्यापीठाची एम्. डी. पदवी संपादन केल्यानंतर बर्लिन, पॅरिस, लंडन आणि व्हिएन्ना येथे त्यांचे शिक्षण झाले. १८७२ मध्ये ते बर्न येथे नैदानिक शस्त्रक्रियेचे प्राध्यापक झाले व ४५ वर्षे तेथील शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख होते.

त्यांनी गलगंड विकाराकरिता अवटू ग्रंथीवर (श्वासनालाच्या पुढे व दोन्ही बाजूंस असणाऱ्या ग्रंथींवर) १८७८ मध्ये पहिली शस्त्रक्रिया केली. ही ग्रंथी शरीरातून काढून टाकल्यामुळे होणाऱ्या विकाराचे त्यांनी सविस्तर वर्णन करून त्यात सर्वांगावर येणाऱ्या घट्ट सुजेबद्दलही विवरण केले. त्यामुळे ⇨अंतःस्त्रावी ग्रंथीच्या अभ्यासास चालना मिळाली. अवटू ग्रंथीचे शरीरक्रियात्मक कार्य, विकृती आणि तीवरील शस्त्रक्रिया यांसंबंधीचा त्यांचा अभ्यास फार प्रसिद्ध असून त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. मध्यंतरी १८८१ मध्ये लंडन येथील आंतरराष्ट्रीय वैद्यकीय काँग्रेसला उपस्थित असताना त्यांना निर्जंतुकतेविषयी माहिती मिळाली व या प्रणालीचा त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये प्रथम पुरस्कार केला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण निर्जंतुकतेवर भर दिला. १९१२ पर्यंत त्यांनी अवटू ग्रंथीवर ५,००० शस्त्रक्रिया केल्या व त्यामुळे ही अवघड शस्त्रक्रिया पुष्कळशी बिनधोक झाली. त्यांनी निर्जंतुकतेच्या तत्त्वाचा वापर केल्यामुळे या शस्त्रक्रियांतील मृत्यु-प्रमाण केवळ ४·५ टक्केच होते. निखळलेला खांदा बसविण्याची त्यांची पद्धती, तसेच जठर, फुप्फुस, पित्ताशय, जीभ, मस्तिष्क तंत्रिका (मेंदूपासून निघणारे प्रमुख मज्जातंतू), अंतर्गळ (हार्निया) यांवरील शस्त्रक्रियेच्या जुन्या पद्धतींऐवजी नव्या किंवा सुधारलेल्या पद्धती प्रचारात आणण्याच्या कार्याबद्दल ते प्रख्यात होते. त्यांनी शस्त्रक्रियेत पुष्कळ नवीन तंत्रे, उपकरणे व साधने यांची योजना केली. शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारे काही चिमटे आणि छेद आजही त्यांच्याच नावाने ओळखले जातात. त्यांच्या Chirurgische Operationslehre (१८९२) या ग्रंथाच्या पुष्कळ आवृत्त्या निघाल्या आहेत व त्याचे अनेक भाषांत अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. ते बर्न येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.