स्वामरडाम, यान : (बाप्तिस्मा १२ फेब्रुवारी १६३७-१५ फेब्रुवारी १६८०). डच निसर्गवैज्ञानिक, जीवशास्त्रज्ञ, तत्कालीन सर्वोत्कृष्ट अभिजात सूक्ष्मदर्शकीय निरीक्षक. त्यांनी प्रथमच तांबड्या रक्त कोशिकांचे वर्णन केले (१६५८).

स्वामरडाम यांचा ॲम्स्टरडॅम येथे ⇨ बाप्तिस्मा झाला. त्यांचे वडील औषधे तयार करून विकीत व ते निसर्गवेत्तेही होते. त्यांच्याजवळ दुर्मिळ व कुतूहलजनक वस्तूंचे संग्रहालय होते. स्वामरडाम यांनी आपल्या वडिलांना संग्रहालयात मदत करीत असताना आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. १६६७ मध्ये त्यांनी लायडन विद्यापीठातून वैद्यकाची पदवी संपादन केली, परंतु वैद्यक व्यवसायाकडे त्यांचे विशेष लक्ष नव्हते. ते सूक्ष्मदर्शकीय संशोधनाच्या आद्यप्रवर्तकांपैकी एक होत. त्यांनी कीटकांच्या अनेेक जातींच्या जीवनचक्रांचा व शरीररचनांचा तुलनात्मक अभ्यास केला आणि रूपांतरणानुसार त्यांचे चार प्रमुख विभागांत वर्गीकरण केले. हे वर्गीकरण कमी-अधिक प्रमाणात आधुनिक पद्धतीत तसेच ठेवण्यात आले आहे. त्यांनी माशी व मध-माशीच्या आंतर शारीराची बारीकसारीक व तप-शीलवार माहिती जमविली.

यान स्वामरडाम

बेडकाच्या अंडांच्या विदलनाचे निरीक्षण केले आणि भैकेर (टॅडपोल) व प्रौढ बेडकाच्या शरीर रचनेचा अभ्यास केला. त्यांनी रेनियर द ग्राफ (१६७२) यांच्याप्रमाणे सस्तन प्राण्यांच्या अंडाशय पुटकांचे वर्णन केले व अंतःक्षेपणाची सुधारलेली तंत्रे शोधून काढली. ह्यामुळे त्यांना मानवी शरीररचनेच्या अध्ययनात मदत झाली. त्यांनी लसीका वाहिन्यांमधील झडपांचा शोध लावला (१६६४). उत्तम शोधक प्रयोगांच्या साहाय्याने त्यांनी असे दाखवून दिले की, आकुंचन क्रियेमध्ये स्नायूंच्या आकारात बदल होतो परंतु त्यांच्या आकारमानात बदल होत नाही. हे संशोधन ग्रीक वैद्य गेलेन यांच्या सिद्धांताच्या म्हणजे स्नायूंची हालचाल होण्यासाठी तंत्रिकांमधून द्रायू वाहतो याच्या विरुद्ध होते.

त्यांनी १६६७-७३ या काळात कीटकविज्ञानामध्ये प्रचंड परिश्रम घेऊन Historion insectrorum generalis (१६६९ इं. भा. ‘ए जनरल हिस्टरी ऑफ इन्सेक्टस’) आणि Byble der Natuure (१७३७-३८ इं. भा. ‘द बायबल ऑफ नेचर’) हे ग्रंथ प्रकाशित केले. या ग्रंथांमध्ये त्यांनी केलेल्या संशोधनकाऱ्यात कीटकाचा मेंदू व तंत्रिका तंत्र यासंबंधी ⇨ मार्चेल्लो मालपीगी यांच्या संकल्पनांमध्ये सुधारणा दाखविल्या. तसेच कीटक रूपांतरणासंबंधी ⇨ विल्यम हार्वी यांनी केलेल्या असंगत अर्थस्पष्टीकरणाला विरोध दर्शविला. वडिलांनी आर्थिक मदत करण्याचे नाकारल्यानंतर स्वामरडाम यांना हालअपेष्टांचा सामना करावा लागला. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना नैराश्याचे झटके येऊ लागले, त्यापासून आराम मिळावा म्हणून ते धार्मिक गुरू आंत्वानेत बूरिग्नो शिष्य झाले.

स्वामरडाम यांचे ॲम्स्टरडॅम येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.