आ.१.फर–१ : हे स्कँडिनेव्हियातील नाव प्रथम स्कॉच पाइन (लॅ. पायनस सिल्व्हेस्ट्रिस) या वृक्षाला दिले होते [⟶ पाइन] परंतु हल्ली पायनेसी कुलातील ॲबीस (इ. सिल्व्हर फर) व स्यूडोत्सुगा (इं. डग्लस फर) या दोन वंशांतील जातींकरिता वापरतात. हे सर्व शंकुमंत वृक्ष असून त्यांची सर्वसामान्य लक्षणे ⇨ कॉनिफेरेलीझ या गणात व प्रकटबीज वनस्पतींत [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] वर्णिल्याप्रमाणे आहेत. फरच्या (ॲबीसच्या) सु. २५–४० जाती (जे. सी. विलिस व एच्. सांतापाव यांच्या मते ५०) असून त्यांचा प्रसार मुख्यतः मध्य व द. यूरोपचा डोंगराळ भाग, उ. हिमालय व उ. अमेरिका येथे आहे. भारतात याच्या सहा जाती आढळतात. हे उंच व सदापर्णी वृक्ष समात्र व पिरॅमिडासारखे किंवा शंकूच्या आकाराचे असून फांद्या दाट, जमिनीशी समांतर व मंडलित असून त्यांची टोके वरच्या दिशेकडे वळलेली असतात. जुन्या वृक्षाची साल भेगाळ परंतु कोवळेपणी ती गुळगुळीत असून तिच्यात रेझीन व बाल्समाच्या (लॅकर, व्हार्निश इत्यादींकरिता उपयुक्त असणाऱ्या पिवळसर पदार्थाच्या) गाठी असतात. पाने साधी, बिनदेठाची, अरुंद, लांबट, काहीशी पसरट व बोथट टोकाची असतात खोड व शाखा यांवर (दीर्घ प्ररोह) ती सर्वत्र मुक्तपणे विखुरलेली असतात व ती सर्व एका सपाट पातळीत राहतात ती गळून पडल्यावर वाटोळे वण राहतात. शंकू उभे, लांबट व चितीय असून ते वर्ष संपण्यापूर्वी पिकून त्यांचे खवले गळून पडतात व उरलेले दांडे काट्यांसारखे मागे राहतात. शंकू मोठे, स्वतंत्र आणि पाइन वृक्षातल्याप्रमाणे असतात. स्त्री-शंकू भडक रंगी असले, तरी वायुपरागित [⟶ परागण] असून प्रत्येकात छदे आणि अनेक पातळ मोठी गोलसर शल्क (खवले) अथवा गुरुबीजुकपर्णे व त्या प्रत्येकावर सपक्ष (पंखधारी) बियांची जोडी बनते. पुं-शंकूत अनेक छदे व केसरदले (लघुबीजुकपर्णे) असतात.

हिमालयात फरच्या चार (काहींच्या मते दोन) जाती आढळतात. एक जाती (ॲबीस वेबियाना) सिक्कीम व भूतान येथे २,७९०–४,०३० मी. उंचीवर आढळते हिला पू. हिमालयी सिल्व्हर फर म्हणतात. या वृक्षाची पाने खालून रुपेरी असतात. सुकी पाने वायुनाशी, कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी), दीपक (भूक वाढविणारी), पोष्टिक व स्तंभक (आकुंचन करणारी) असतात. पानांचा रस पाळीच्या तापावर देतात. त्यात बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल असते. स्वस्त प्रकारच्या शिसपेन्सिलींसाठी याचे लाकूड वापरतात. पानांना उ. भारतात तालीसपत्र म्हणतात.

आ. २. फर (ॲ. नॉर्डमॅनियाना) : शंकू व पाने. हिमालयातील दुसरी जाती (ॲ. पिण्ड्रो हिं. पालुदार इं. हिमालयन सिल्व्हर फर) सु. ४५–६० मी. उंच सदापर्णी वृक्ष असून त्याचा घेर २·५० – ४·२० मी. असतो. मुख्यतः प. हिमालयात (अफगाणिस्तान ते नेपाळ) सु. २,२५०–३,६०० मी. उंचीपर्यंत आढळतो. कधीकधी तो ⇨स्प्रूस (पिसिया मोरिंडा) अथवा ⇨देवदार (सीड्रस डेओडारा) किंवा कैल (पायनस एक्सेल्सा) यांच्याबरोबर वाढलेला दिसतो. हजारा, धौला, धार (कांग्रा) आणि कुमाऊँ ह्या ठिकाणी त्याची वने आहेत. ह्या वृक्षांना थंड व ओलसर परिस्थिती मानवते तसेच खोल सकस जमिनीत (विशेषतः भरपूर उंचीवर असलेली ) त्यांची चांगली वाढ होते. याचे लाकूड प्रथम पिवळट पांढरे असते पण नंतर ते फिकट होत जाते. ते फार हलके व मध्यम पोताचे असते. ते सामान्यपणे स्प्रूसप्रमाणे असून त्यात रेझीन-नलिका नसतात [⟶ वाहिकांच्या अरीय भित्तीवर अनुलिप्त खाचांची एक रांग असते ⟶ प्रकाष्ठ]. लाकडावर उभ्या चिरा दिसतात आणि ते कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व वाळवीला टिकाऊ नसते. ते नरम असल्याने कापण्यास व रंधण्यास सोपे जाते पण त्यात मधून मधून गाठी आढळतात. खोकी, साध्या पेट्या, फळांच्या पेट्या, फळ्या, छताकरिता व तक्तपोशीकरिता वापरीत असलेले फलक, छपरांचे पातळ तक्ते, पाण्याच्या टाक्या, रेल्वेचे शिळेपाट (स्लीपर), हलके सुटसुटीत सजावटी सामान इत्यादींकरिता फरचे लाकूड वापरतात तसेच त्यापासून कागदाकरिता लगदा आणि विमानांचे काही भागही बनविता येतात. पंजाबातील टेकड्या, काश्मीर आणि तेहरी-गढवाल या भागांतून याचा भरपूर पुरवठा होतो सु. ३०,००० टन वार्षिक उत्पादन शक्य असल्याचे नमूद आहे. पानातून २·५% बाष्पनशील तेल मिळते, त्याला टर्पेटाइनाचा उग्र वास येतो परंतु त्याला व्यापारी महत्त्व नाही, कारण ते पुरेसे मिळणे कठीण असून त्याची किंमतही अधिक असते.

सिल्व्हर फर : (लॅ. ॲबीस आल्बा). हा वृक्ष सु. ४५ मी. उंच वाढतो तो द. व मध्य यूरोपात आढळतो. पाने वरून हिरवी असून खालच्या बाजूस दोन रुपेरी रेषा असतात. आशियात तो कॉकेशस व उरल पर्वतांत आढळतो द. आल्प्सवर सु. १,२४० मी. उंचीवर त्याची घनदाट जंगले आहेत. उ. अमेरिकेच्या पूर्व भागात त्याची बागांतून लागवड करतात. ग्रेट ब्रिटनमध्ये सतराव्या शतकाच्या आरंभापासून त्याचा प्रवेश झाला असला, तरी निसर्गतः बी रुजून नवी झाडे फारशी झाली नाहीत. या वृक्षापासून टर्पेंटाइन मिळते.

फरच्या दहा जाती अमेरिकेत आहेत व त्यांतील बाल्सम फर (लॅ. ॲबीस बाल्समिया) सर्वपरिचित आहे त्यापासून कॅनडा बाल्सम हे उपयुक्त टर्पेंटाइन मिळते. स्यूडोत्सुगा वंशात एकूण ७ जाती असून त्यांचा प्रसार पॅसिफिक बेटे, उ. अमेरिकेत आणि पू. आशियात आहे. यांची पाने सपाट असून त्यात दोन पार्श्विक (बाजूच्या) रेझीन-नलिका असतात (ॲबीसप्रमाणे). शंकू लोंबते असून त्यांत चिरस्थायी (कायम राहणारी) शल्क असतात (ॲबीसमध्ये ती बियांबरोबर पडून जातात). वॉशिंग्टनमधल्या डगल्स फरची (स्यूडोत्सुगा डग्लसी ) उंची १०२ मी. असून तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच वृक्ष आहे. बहुतेक सर्व फर वृक्षांचे लाकूड हलके, मऊ व ठिसूळ असते पण टिकाऊ नसते. खोकी, पेट्या, प्लायवुड, कागदाचा लगदा, लाकडी ओंडके इत्यादींकरिता ते वापरतात. या झाडांपासून रेझीन व टर्पेंटाइन मिळतात मावा कीड व तांबेरा रोग यांपासून त्यांना उपद्रव होतो मात्र डग्लस फरचे लाकूड मजबूत, जड व टिकाऊ असते.

पहा : पाइन बाल्सम फर स्प्रूस हेमलॉक.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, Delhi, 1948.

2. Harder, R. and Others Trans. Bell, P. Coombe, D. Strasburger’s Textbook of Botany, London, 1965.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.