सादोव्हीनू, मीहाईल : (५ नोव्हेंबर १८८०–१९ ऑक्टोबर १९६१). रूमानियन कादंबरीकार आणि कथाकार. त्यांचा जन्म पास्कानी (प. मॉल्डेव्हिया) येथे झाला. वडिलांचे नाव अलेक्सांद्र सादोव्हिनू व आईचे प्रॉफिरा. शाळकरी विद्यार्थी असतानाच एम्. एस्. कोब्यूझ ह्या नावाने त्याने लेखन करावयास सुरुवात केली. श्रेष्ठ रशियन कादंबरीकार ⇨फ्यॉडर डॉस्टोव्हस्की ह्याच्या कादंबऱ्यांनी त्याला भारून टाकले होते तथापि पुढे ⇨लीओ टॉलस्टॉय हा त्याला सर्वश्रेष्ठ साहित्यिक वाटू लागला.

सादोव्हीनूचे कथा-कादंबऱ्यांचे लेखन विपुल आहे. आरंभी त्याच्यावर स्वच्छंदतावादाचा प्रभाव होता तथापि पुढे तो वास्तववादाकडे वळला. त्याच्या कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखांपेक्षा त्यांना लाभलेली निसर्गाची पार्श्वभूमी त्याने अधिक प्रत्ययकारीपणे चित्रित केली आहे. आपली भूमी, तिथल्या चालीरीती आणि तिथल्या परंपरा ह्यांच्या अतूट धाग्यांनी परस्परांशी बांधलेल्या साध्या, सामान्य माणसांची जीवने त्याने आपल्या कथा-कादंबऱ्यांतून उभी केली. आपल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांतून गतकाल जिवंतपणे उभा करण्याचे त्याचे सामर्थ्यही मोठे होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वोत्कृष्ट गद्यलेखक म्हणून त्याची ख्याती आहे. Povestiri (१९०४), Dumbrava Minunata (१९२६) ह्या त्याच्या काही निर्देशनीय कथा. त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांत Baltagul (१९३०), Izvorul Alb (१९३६) आणि Mifraea Cocor ह्यांचा समावेश होतो.

रूमानियन अकादेमीचा तो सदस्य होता. १९२४ साली त्याला साहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

बूखारेस्ट येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.