एमीनेस्कू मीहाईल : (? जानेवारी १८५० – ? जून १८८९). श्रेष्ठ रूमानियन कवी. जन्म मॉल्डेव्हियातील बॉटॉशान येथे. शिक्षण बर्लिन आणि व्हिएन्ना या विद्यापीठांत. तो पदवीधर मात्र झाला नाही. १८७७ ते १८८३ या काळात बूकारेस्टमधील Timpul ह्या वर्तमानपत्राच्या संपादकांपैकी तो एक होता. Covnorbiri Literare ह्या यासी येथील नियतकालिकात प्रसिद्ध झालेली त्याची ‘Venerea Si Madona’ (इं. शी. व्हीनस अँड द मॅडोना) ही कविता विशेष गाजली. वयाच्या तेहतिसाव्या वर्षापासून त्याला वेडाचे झटके येऊ लागले. पुढे यासी विद्यापीठात तो १८८६ पर्यंत साहाय्यक ग्रंथपाल होता. त्यानंतर काही वर्षांनी बूकारेस्ट येथे त्याचा अंत झाला.

त्याने सु. साठ कविता लिहिल्या आहेत. रूमानियन कवितेच्या आशय-अभिव्यक्तीत त्याने फार मोठे परिवर्तन घडवून आणले. आधुनिक रूमानियन कवितेचा तो जनक होय. प्रतिभासंपन्न अभिव्यक्ती आणि सखोल चिंतन ही त्याच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. एमीनेस्कू हा आदर्शाची स्वप्‍ने पाहणारा अत्यंत संवेदनक्षम कवी होता. ही वृत्ती आणि प्रत्यक्ष लौकिक परिसर यांतील विसंवादाच्या जाणीवेने त्याच्या काव्यात साहजिकपणेच नैराश्य अवतरले. उच्च दर्जाची प्रतिभा आणि श्रेष्ठ विचार हे महान कवीचे गुण त्याच्यात होते. विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत रूमानियन कवितेवर त्याचा प्रभाव प्रकर्षाने होता. काव्याखेरीज Geniu Pustiu ही कादंबरी आणि काही कथाही त्याने लिहिल्या. ‘Sarmanul Dionis’ आणि ‘Cesara’ या त्याच्या तत्त्वचिंतनात्मक कथा विशेष प्रसिद्ध आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात भारतीय तत्त्वज्ञानाने तो प्रभावित झाला होता. संस्कृतचे एक व्याकरण त्याने लिहिले आणि कांटच्या काही लेखनाचा रूमानियन भाषेत अनुवाद केला. त्याच्या कथा-कवितांपैकी अनेकांचा अनुवाद इंग्रजी, इटालियन, फ्रेंच आणि जर्मन भाषांतून झाला आहे. राजकारण, समाजशास्त्र, विज्ञान इ. विषयांवरही त्याने महत्त्वपूर्ण लेखन केले.

कुलकर्णी, अ. र.