फ्रीडेल (फ्रीदेल), शार्ल : (१२ मार्च १८३२ – २० एप्रिल १८९९). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व खनिजवैज्ञानिक. फ्रीडेल-क्राफ्ट्स या महत्त्वाच्या रासायनिक विक्रियेचा शोध लावणाऱ्या दोघांपैकी हे एक होत [⟶ फ्रीडेल-क्राफ्ट्स विक्रिया]. त्यांचा जन्म स्ट्रॅसबर्ग येथे झाला. सॉर्‌बॉन (पॅरिस विद्यापीठ) येथे गणित व विज्ञान यांचे अध्ययन करतांना त्याना खनिजवैज्ञानाची गोडी लागली व १८५६ मध्ये एकोल दे माइन्स संस्थेत खनिजसंग्राहक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८७१ साली त्यांनी अध्यापनास सुरुवात केली. १८७६ साली ते पॅरिस विद्यापीठात खनिजविज्ञानाचे आणि १८८६ मध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १८९२ साली पॅरिस विद्यापीठात त्यांनी रसायनशास्त्राचा खास विभाग सुरू केला. ते फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य (१८७८) व सॉर्‌बॉन येथील संशोधन प्रयोगशाळेचे संचालकही (१८८४-८९) होते.

फ्रीडेल यांनी खनिजविज्ञान व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांत संशोधन केले. त्यांनी स्फटिकांसंबंधीचे विविध स्थिरांक निश्चित केले आणि स्फटिकांच्या उत्ताप विद्युतीय (तापविल्यास स्फटिकाचे विद्युतीकरण होण्याच्या) गुणधर्माचा अभ्यास केला. ई. ई. सारासीन यांच्या सहकार्याने त्यांनी कृत्रिम खनिजे बनविली (१८७९-८७) व नंतर कृत्रिम हिरे बनविण्याचेही प्रयत्न केले. जेम्स मेसन क्राफ्ट्स यांच्या सहकार्याने १८७७ साली त्यांनी शोधून काढलेली फ्रीडेलक्राफ्ट् विक्रिया हे त्यांचे रसायनशास्त्रातील महत्त्वाचे संशोधन कार्य होय. या विक्रियेने अनेक महत्त्वाची संयुगे बनविता येत असल्याने तिचा विविध उद्योगधंद्यांमध्ये उपयोग होतो. त्यांनी कार्बन व सिलिकॉन यांची संयुगे प्रथम बनविली (१८६३). यामुळे सिलिकोनांच्या प्रगतीचा पाया घातला गेला. त्यांनी कीटोने व आल्डिहाइडे या कार्बनी संयुगांविषयी संशोधन केले. त्यांनी प्राथमिक व द्वितीयक अल्कोहॉलांचा [⟶ अल्कोहॉल ] शोध लावला (१८६२) तसेच त्यांनी आर्. डी, दा सिल्व्हा यांच्या मदतीने प्रोपिलिनापासून ग्लिसरिनाची निर्मिती केली (१८७१).

त्यांनी रसायनशास्त्र व खनिजविज्ञान या विषयांतील काही पुस्तकांच्या संपादनास मदत केली काही पुस्तके लिहिली व रसायनशास्त्रविषयक एक नियतकालिक सुरू केले. ते माॅतोबां येथे मरण पावले.

धुमाळ, रा. रा.