व्हॉइट, कार्ल फोन : (३१ ऑक्टोबर १८३१ – ३१ जानेवारी १९०८). जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक. त्यांनी मानवासहित सस्तन प्राण्यांमधील एकूण चयापचयाचे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचे) निश्चित मापन केले व त्यामुळे चयापचयाचे क्रियाविज्ञान प्रस्थापित होण्यास मदत झाली. त्यांचे संशोधन पोषणासंबंधात महत्त्वाचे मानले जाते.
व्हाईट यांचा जन्म जर्मनीतील आम्बेर्ग (बव्हेरिया) येथे झाला. म्युनिक विद्यापीठात प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ ⇨ युस्टुस फोन लीबिक व ⇨ फ्रिड्रिख व्हलर यांच्या अध्यापनाचा त्यांना लाभ घडला. म्युनिक विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे ते प्राध्यापक होते (१८६३-१९०८).
बदलत्या परिस्थितीत प्राण्यांमध्ये प्रथिने, मेद व कार्बोहायड्रेटे यांचा वापर व नामशेष कसा होतो हे निश्चित करण्यासाठी योजलेल्या प्रयोगांत ते सहभागी झाले होते. १८६२ मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ माक्स फोन पेटनकोफर यांच्या सहकार्याने त्यांनी ‘श्वसन कोठी’ तयार केली. तिचा उपयोग मानवातील पोषण व चयापचय यांवरील संशोधनास झाला. व्हॉइट यांनी विश्रांती, काम व उपवास या तिन्ही अवस्थांमधील प्राण्यांच्या चयापचयावर अधिक संशोधन केले. त्यांनी प्राण्याचे अन्नग्रहण व उत्सर्जन, ऑक्सिजनचा वापर आणि कार्बन डाय-ऑक्साइड व उष्णतानिर्मिती यांची अचूक मापने केली. अकरा वर्षांच्या अनेक प्रयोगानंतर त्यांनी माणसाच्या ऊर्जेच्या गरजांसंबंधी (कॅलरीमध्ये ऊर्जा किती घेतली जाते याबाबत) अचूक मापन केले. ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम सजीव प्राण्यांना कसा लागू पडतो. हे त्यांनी सप्रयोग दाखविले. चयापचय क्रिया ही कोशिकांत (पेशींत) घडवून आणली जाते त्यामुळे कोशिका हा चयापचय क्रियेचा घटक आहे, रक्त हा नाही, ही संकल्पना रुजविण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. प्राण्याची ऑक्सिजनाची गरज हा चयापचय क्रियेचा परिणाम असतो. ती चयापचयाचे कारण नसते, असे त्यांनी दाखविले. कार्बन डाय-ऑक्साइडाची निर्मिती ही स्नायूंच्या कार्यत्वरेच्या प्रमाणात असते. शरीराची प्रथिनाची गरज ही ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांच्या) संघटित द्रव्यमानानुसार ठरते, तर मेद व कार्बोहायड्रेट यांची गरज शारीरिक कष्टाचे किती काम केले त्यानुसार ठरते इ. गोष्टी त्यांनी संशोधनातून उघड केल्या.
व्हॉइट यांनी मनुष्य व इतर प्राण्यांच्या चयापचयांसंबंधी अनेक पाठ्यपुस्तके लिहिली. ते म्युनिक येथे मरण पावले.
जमदाडे, ज. वि.