मोटारसायकल: हे दोन किंवा तीन चाकी वाहन असून ते सामान्यतः पोलादी नळ्यांच्या सांगाड्यावर बसविलेल्या व हवेने थंड होणाऱ्या पेट्रोल एंजिनाने पुरविलेल्या शक्तीवर चालते. या वाहनात ⇨ सायकलव ⇨

अंतर्ज्वलन-एंजिनयांच्या तत्त्वांचे एकत्रीकरण केलेले आहे.‘मोटारसायकल’ या संज्ञेत एंजिनाच्या दट्‌ट्यांचे विस्थापन ५० घ. सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मोपेडपासून ते १,२०० घ. सेंमी. पर्यंत विस्थापन असलेल्या अनेक सिलिंडरी वाहनांचा समावेश होतो. याच संज्ञेत ५० ते २५० घ. सेंमी. व मोपेड या वाहनांसंबंधीची माहिती ‘स्कूटर’ या स्वतंत्र नोंदीत दिलेली आहे.

इतिहास:साधी सायकल पायाने चालविण्याचे श्रम वाचविण्यासाठी प्रथम सायकलीवर लहानसे पेट्रोल एंजिन बसवून त्या एंजिनाच्या साहाय्याने सायकल चालविण्याचा पद्धत सुरू झाली. ब्रिटनमध्ये एडवर्ड बटलर यांनी १८८४ मध्ये एंजिन बसविलेली पहिली तीन चाकी मोटारसायकल तयार केली. मोटारसायकलीच्या शोधाचे श्रेय सामान्यतः जर्मनीतील गोटलीप डाइमलर यांना देण्यात येते. त्यांनी तयार केलेली पहिली दोन चाकी मोटारसायकल १८८५ मध्ये प्रत्यक्ष व्यवहारात आली. पहिली व्यवहार्य एंजिने व मोटारसायकली फ्रेंच व बेल्जियन तंत्रज्ञांनी अभिकल्पित केल्या (आराखडे तयार केले) आणि त्यानंतर ब्रिटिश, जर्मन, इटालियन व अमेरिकन तंत्रज्ञांनी हे काम केले. मोटारसायकलींची निर्मिती व उपयोग यांत विसाव्या शतकाच्या पहिल्या ३० वर्षांत एकसारखी वाढ होत गेली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत महत्त्वाच्या टपालाची ने-आण, व्याप्त प्रदेशांतील रस्त्यांवर गस्त घालणे, युद्धसामग्रीवाहक वाहनांचे संरक्षण वगैरे लष्करी उपयोगांसाठी मोटारसायकलींचा व्यापक प्रमाणावर वापर करण्यात आला. 

दुसऱ्या महायुद्धानंतर मोटारसायकलींच्या निर्मितीच्या उद्योगाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला. ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रान्स व बेल्जियम हे मोटारसायकलींचे प्रमुख निर्यातदार देश होते. १९६५ च्या सुमारास जपानच्या शक्तीचलित दुचाकी वाहनांचे वार्षिक उत्पादन १६ लक्षांपर्यंत पोहोचले व याबाबतीत जपान हा देश जगातील सर्वांत मोठा उत्पादक म्हणून गणला जाऊ लागला (१९८४ मध्ये जागतिक एकूण दुचाकी वाहनांच्या उत्पादनांपैकी ७०%उत्पादन जपानमध्ये झाले). १९७३ मध्ये खनिज तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने मोठ्या मोटारगाड्यांऐवजी शक्तीचलित दुचाकी वाहनआ. १. ५०० घ. सेंमी. क्षमतेच्या मोटारसायकलीतील प्रमुख भाग : (१) पुढचे टायर, (२) पूर्ण रुंदीच्या तुंब्यातील आतून प्रसरण पावणारा गतिरोधक, (३) धक्काशोषक बसविलेला पुढचा चिमटा, (४) पुढचा चिखलरक्षक (मडगार्ड), (५) पुढचा मुख्य दिवा, (६) दिशानियंत्रण शीर्ष, (७) इंधन टाकी, (८) मांडीकरिता आधार, (९) एंजिन, (१०) निष्कासन (इंधनातील जळालेले वायू बाहेर टाकणारी नळी), (११) चिरचुंबकी जनित्र, (१२) मध्यवर्ती स्टँड, (१३) मागे बसणाऱ्या माणसाला पाय ठेवण्यासाठी योजना, (१४) कारब्युरेटर, (१५) दुहेरी बैठक, (१६) वंगण तेलाची टाकी, (१७) साखळी रक्षक, (१८) मागील बाजूचा स्प्रिंगेचा धक्काशोषक, (१९) मागील चाकाचा तुंबा (त्याच्या पलीकडील बाजूस साखळीचे दंतचक्र असते) (२०) ध्वनिशामक, (२१) मागील चिखलरक्षक, (२२) क्रमांकदर्शक मागील पट्टी (दिव्यासह). वापरण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आणि त्यामुळे या वाहनांच्या निर्मितीला फार मोठी चालना मिळाली. मोटारसायकल हे व्यक्तिगत शक्तिचलित वाहतुकीचे कमी खर्चाचे, विश्वसनीय आणि सुखदायी साधन असल्याने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही तिची लोकप्रियता (विशेषतः तरुणांमध्ये) अधिकाधिक वाढत आहे. मोटारसायकलींच्या विविध प्रकारच्या शर्यतींमुळेही त्यांच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली आहे [→मोटारसायकल शर्यती].  

भारतात १९५० पासून मोटारसायकलींच्या निर्मितीस प्रारंभ झाला. १९५५ मध्ये भारतात फक्त ४१९ मोटारसायकली तयार झाल्या. तर १९७५ मध्ये ही संस्था ६९,७३४ आणि १९८३ मध्ये १,५६,२५४ पर्यंत पोहचली. मोटारसायकलींच्या उत्पादनात १९८० मध्ये १६·७%, १९८१ मध्ये  ८·३% १९८२ मध्ये १७·१% आणि  १९८३ मध्ये २१·३% वाढ झाली. १९८४ मध्ये एनफिल्ट ऑटो, एस्कॉर्ट्‍स, आयडीयल जावा. बजाज ऑटो, इंड-सुझुकी व मॅजेस्टीक ऑटो या सहा कंपन्या भारतात निरनिराळ्या परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने मोटारसायकलींची निर्मिती करीत होत्या.  

विकास:मोटारसायकलीच्या विकासाच्या सुरुवातीच्आ. २. मोटारसायकलीचे नियंत्रण करण्याची हँडलवरील साधने : (१) क्लच तरफ, (२) डावीकडील मूठ, (३) प्रज्वलन तरफ, (४) कर्ण्याची कळ, (५) आँपिअरमापक (विद्युत् प्रवाहमापक), (६) वेगदर्शक (७) दिव्याचा स्विच, (८) एंजिनाचा वेग बदलण्याची मूठ, (९) पुढच्या गतिरोधकाची तरफ. या काळात अभिकल्पानुसार एंजिनाच्या जागा निरनिराळी असे. १९१७ च्या सुमारास एंजिनाची सर्वांत व्यवहार्य जागा कमी उंचीवर पण मध्यवर्ती असल्याचे अभिकल्पांच्या लक्षात आले. पुढे एंजिन दोन नलिकांच्या पाळण्यासारख्या रचनेत किंवा सांगाड्यात लांब बोल्टांनी व पट्‌ट्यांनी जोडण्यात येऊ लागले. सांगडा वितळजोडकामाने (वेल्डिंगने) वा झाळकामाने जोडलेल्या पोलादी नळ्यांचा करण्यात आला.

सुरुवातीच्या एक-सिलिंडरी मोटारसायकली विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही प्रचारात राहिल्या. २५० घ. सेंमी. पेक्षा जास्त क्षमतेच्या बहुतेक नमुन्यांत (मॉडेल्समध्ये) चार-धावांचे एंजिन वापरित. त्यात झडपा वापरलेल्या होत्या व दट्ट्यांची संपीडन (इंधन मिश्रणावर दाब देणारी) धाव फक्त एकाच दिशेत असे. २५० घ. सेंमी. पेक्षा कमी क्षमतेच्या बऱ्याचशा मोटारसायकलींत दोन-धावांचे व दोन्ही धावांत संपीडन होणारे एंजिन वापरीत. यूरोपात एंजिनाची क्षमता दट्ट्याने विस्थापित केलेल्या घन सेंटीमीटर घनफळाच्या रूपात मोजण्यात येते, तर अमेरिकेत व इतर काही देशांत ती अश्वशक्तीच्या रूपात मोजतात. १९६० नंतरच्या दशकात मोटारसायकलींच्या एंजिनांची क्षमता सायकलला जोडवायाच्या एंजिनाच्या २५ घ. सेंमी. पासून दोन वा चार सिलिंडरी नमुन्यांकरिता १,००० घ. सें पर्यंत पोहचली. बहुसिलिंडरी एंजिने खात्रीशीरपणे सुरळीत काम करतात, असे दिसून आले आहे.  


पेट्रोल इंधन व हवा यांचे मिश्रण करणाऱ्या ⇨ कारब्युरेटरामध्ये आणि हे मिश्रण प्रज्वलित करण्याच्या पद्धतीत मोठ्या सुधारणा झाल्या. कारब्युरेटर हे इंधन व हवा यांचे प्रमाण अचूकपणे मोजून त्यांचे मिश्रण करणारे आटोपशीर व विश्वसनीय उपकरण बनले. प्राथमिक स्वरूपाच्या नलिका प्रज्वलन पद्धतीची चिरचुंबकी जनित्राने (मॅग्नेटोने) किंवा⇨ प्रवर्तन वेटोळ्याने विद्युत्‌ निर्मिती करून इंधन प्रज्वलीत करण्याच्या पद्धतीने घेतली.

एंजिनाची शक्ती मागील चाकाला प्रेषित करण्यासाठी प्रथमतः पट्‌ट्याचा वापर करीत व आता बहुतेक मोटारसायकलींत पोलादी साखळीचा उपयोग करण्यात आला. वेग बदलण्याकरिता दंतचक्र (गिअर) पेटीचा (लहान नमुन्यांकरिता दोन व तीन वेगांच्या पेटीचा व मोठ्या नमुन्यांकरिता चार वेगांच्या पेटीचा) वापर होऊ लागला.  

संधारणाच्या दृष्टीने (वाहनाचा वरचा भाग गतिमान भागावर तोलून धरण्याच्या व धक्के कमी करण्याच्या दृष्टीने) सुरुवातीस पुढच्या चाकाच्या चिमट्यात आणि त्यानंतर मागील चाकाच्याही चिमट्यात स्प्रिंगांचा उपयोग करण्यात आला. या पद्धतीची जागा पुढे संपीडित (दाबाखालील) द्रवाच्या द्वारे धक्काशोषण करण्याच्या पद्धतीने घेतली [→धक्काशोषक].  

गतिरोधकाच्या (ब्रेकच्या) प्रधीकरिता (चाकाच्या कडेवर दाब देणाऱ्या दंडगोलाकरिता) नवनविन धातू व अधिक परिणामकारक प्रतिघर्धक अस्तरे उपलब्ध झाल्याने मोटारसायकलींच्या गतिरोधनात सुधारणा झाल्या [→गतिरोधक]. पुढे सर्व प्रकारच्या गतिरोधकांची जागा आतून प्रसरण पावणाऱ्या गतिरोधकांनी घेतली. सुधारलेल्या ⇨ क्लचामुळे व इंधन पुरवठ्याच्या यंत्रणेच्या अधिक सूक्ष्म जुळणीमुळे एंजिनाच्या नियंत्रणातही सुधारणा झाली.

हल्ली प्रचारात असलेली मोटारसायकल हे अगदी थोड्या जागेत बसविलेल्या उत्तम बनावटीच्या यंत्राचे एक चांगले उदाहरण आहे. मोटारसायकलचे एकूण वजन ५० किग्रॅ. पासून २०० किग्रॅ. पर्यंत असते आणि ते एकंदर शक्तीच्या मानाने पुष्कळच कमी असते.  

सर्वसाधारण रचना:मोटारसायकलीत वापरण्यात येणारे एक-सिलिंडरी एंजिन साधारणतः उभ्या पातळीत बसवितात. दोन-सिलिंडरी एंजिनात सिलिंडर उभ्या पातळीत व समांतर आणि एकमेकांच्या जवळ किंवा एकमेकांना ९०°कोन करून किंवा आडव्या पातळीत एकमेकांच्या विरुद्ध दिशेत बसवितात.  

एंजिनाचा वेग ७५० ते ५,००० फेरे/मिनिट पर्यंत बदलता येतो. हा वेग बराच असल्याने तो सरळ मागील चाकाला देणे फार गैर सोयीचे होते. म्हणून एंजिन व मागचे चाक यांच्यामध्ये वेग बदलण्याची दंतचक्र पेटी बसविलेली असते. या पेटीतील दंतचक्रांच्या जोड्या बदलून मोटारसायकलचा वेग पाहिजे तसा बदलता येतो. हे काम उजव्या पायाने (किंवा काहि मोटारसायकलींत डाव्या पायाने) करता येईल, अशी एकंदर रचना केलेली असते. दंतचक्र पेटीने वेग बदलताना एंजिन आणि दंतचक्र पेटी यांचा सरळ संबंध तात्पुरता तोडावा लागतो आणि त्यासाठी क्लचची योजना केलेली असते. हा क्लच सैल करण्यासाठी डाव्या हातानेच दाबावयाची असते. एंजिनाचा वेग कमीजास्त करण्यासाठी हँडलच्या उजव्या बाजूकडील मुठीमध्येच सोय केलेली असते. ही मूठ फिरवून एंजिनाचा वेग कमीजास्त करता येतो. 

मोटारसायकलीचा वेग कमी करण्यासाठी दोन स्वतंत्र गतिरोधक बसविलेले असतात. पुढच्या चाकाच्या तुंब्यामधील गतिरोधक कार्यान्वित करण्यासाठी उजव्या मुठीजवळच एक स्वतंत्र तरफ बसविलेली असते. मागील चाकाच्या तुंब्यातील गतिरोधक कार्यन्वित करण्यासाठी डाव्या (किंवा उजव्या) बाजूस पायाने दाबावयाची स्वतंत्र तरफ असते.

आ. ३. मोटारसायकलच्या दंतचक्र पेटीतील वेग बदलण्याच्या जागा

एंजिन सुरू करताना ते फिरविण्यासाठी उजव्या पायाने चालविण्यासाठी आरंभक (स्टार्टर) तरफ दंतचक्र पेटीला जोडलेली असते. एंजिनातील इंधन प्रज्वलनासाठी विजेची ठिणगी पुरवण्याकरिता चिरचुंबकी जनित्र किंवा प्रवर्तन वेटोळे वापरतात. एंजिनाला आणि दिवे व भोंगा (हॉर्न) यांना लागणारा विद्युत् प्रवाह पुरविण्यासाठी विद्युत् घटमाला वापरतात. ही घटमाला प्रभारित करण्यासाठी एक स्वतंत्र जनित्र एंजिनाला जोडलेले असते.

मोटारसायकलीची एकंदर रचना आ. १ मध्ये दाखविली आहे. मोटारसायकलचे नियंत्रण करण्याची साधने हँडलवरच बसविलेली असतात व ती आ. २ मध्ये दाखविली आहेत. दंतचक्र बदलण्याची तरफ वेग कमी करताना कोठे सरकावयाची व वेग वाढविण्याकरिता कोठे सरकावयाची असते ते आ. ३ मध्ये दाखविले आहे. 

मोटारसायकल चालविणे, तिच्यातील सर्व साधनांचा वापर करणे व मोटारसायकल रस्त्यावरून सुखरूप नेणे या गोष्टी मुद्दाम शिकाव्या लागतात. मोटारसायकल चालविण्यासाठी योग्य परवाना मिळवावा लागतो. साध्या मोटारसायकलवर एक जादा इसम मागच्या बाजूस बसवून नेता येतो. तीन चाकी मोटारसायकलीला एका बाजूस सोईस्कर अशी खुर्चीसारखी बैठक (साइड कार) बसवून दुसऱ्या इसमास आरामात बसवून नेता येते. 

पहा: अंतर्ज्वलन-एंजिन स्कूटर 

संदर्भ: 1. Educational Productions Ltd.,Know The Game: Motorcycling, London, 1960.

             2. Hough, R. Setright, L. J. K. A History of the World’s Motorcycles, London, 1966. 

ओक, वा. रा. भदे, व. ग.