किरणकवक रोग : ॲक्टिनोमायसीस बोव्हिस या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) उत्पन्न होणाऱ्या रोगाला किरणकवक रोग (ॲक्टिनोमायकोसीस) असे म्हणतात. या कवकाचे तंतू लांब असून त्या तंतूंना फाटे फुटल्यासारखे असतात. कवकांचे गुच्छ साध्या डोळ्यांनीही दिसू शकतात. त्यांचा रंग पिवळट असतो म्हणून त्यांना ‘गंधक कण’ म्हणतात. सूक्ष्मदर्शकाखाली तपासले असता कवकतंतू किरणांसारखे अराकार मांडल्यासारखे दिसतात. प्रत्येक तंतूच्या टोकाला फुगवटी असते व तीत बीजाणू (ला‌क्षणिक प्रजोत्पादक भाग) तयार होतात. बीजाणू हवा व अन्न यांच्याबरोबर शरीरात प्रवेश करतात.

हा रोग संसर्गजन्य असून गुरे, डुकरे व प्रसंगी मानवातही आढळतो. या रोगात चिरकारी (कायम स्वरूपाची) दृढशोथ (दडस सूज) व नाली व्रण (अरुंद, खोल व तोंड लहान असलेले गळू) ही मुख्य लक्षणे असतात. रोगकारक कवक तोंड, दात व गिलायू ग्रंथींच्या (टॉन्सिल्सच्या) गृहिकेत (पोकळीत) नेहमीच असते पण काही कारणाने त्या ठिकाणच्या ऊतकांना (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांना) इजा झाल्यास त्या ऊतकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्यापासून रोगोत्पत्ती होते. उदा., दात उपटल्यानंतर कित्येक वेळा हा रोग दिसतो कारण उपटलेल्या दाताच्या गर्तेत या रोगाची सुरुवात होते. कवकसदृश इतर सूक्ष्मजीवांपेक्षा या सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या प्रजननाला ‌ऑक्सिजन लागत नाही. म्हणून ज्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण कमी असेल तेथेच रोगोद्‌भव होतो. उदा., अप्रसृत (न फुगलेले) फुफ्फुस वा उंडुकामध्ये (मोठ्या आतड्याच्या पहिल्या गोमुखाकार भागामध्ये) या रोगाची सुरुवात होऊ शकते. क्वचित हे कवक रक्तमार्गे गेल्यामुळे यकृत, वृक्क (मूत्रपिंडे), प्लीहा (पानथरी) वगैरे ठिकाणीही रोग होऊ शकतो.

लक्षणे : टणक व दृढ सूज येऊन जबड्याला ठणका लागतो. मूळ इजा झाल्यापासून दहा-बारा दिवसांनी ही सूज दिसू लागते. हळूहळू सूज वाढत जाऊन त्या ठिकाणी पू उत्पन्न होऊन विद्रधी (गळू) तयार होतो. तो फुटून त्यातून पू वाहू लागतो. असे अनेक विद्रधी आजूबाजूस होऊन फुटतात त्यामुळे जबड्याच्या आसपास अनेक नाली व्रण होऊन त्यांतून पू येत राहतो. या भोवतीची त्वचा निळसर लाल असून तिचा शोफ (द्रवयुक्त सूज) आलेला असतो.

फुफ्फुसांच्या खालच्या खंडांत सूज येऊन परिफुफ्फुस (फुफ्फुसावरील पातळ आवरण) व छातीच्या त्वचेवर वरच्यासारखे नाली व्रण होतात. सुरुवातीस ताप, खोकला, अशक्तता एवढीच लक्षणे असल्यामुळे क्षयाचा संशय येतो पण छातीच्या त्वचेला सूज येऊन विद्रधी व नाली व्रण आल्यावर संशय रहात नाही.

पोटात आंत्रपुच्छ (मोठ्या आतड्याच्या सुरुवातीस असलेला शेपटीसारखा आतड्याचा बंद भाग, ॲपेंडिक्स), उंडुक वगैरे भागांतही हा रोग होतो त्यावेळी सुरुवातीस कर्करोग, क्षय किंवा अमीबाजन्य विकार (अमीबिॲसीस) या रोगांचा संशय येतो व कित्येक वेळा त्या रोगाकरिता पोट उघडल्यानंतरच निश्चित निदान होते.

निदान : विद्रधी आणि नाली व्रण यांतून जाणाऱ्या पूवात पिवळट, पांढरट रंगाचे ‘गंधक कण’ दिसतात व त्यांमध्ये रोगकारक कवचे सापडतात. सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास त्यांमध्ये कवकतंतू दिसल्यावर रोगनिदान निश्चित होते. या सूक्ष्मजीवाचे प्रजनन विशिष्ट माध्यम व अवातजीवी (ऑक्सिजनविरहित वातावरण) पद्धतीचा अवलंब करून करता येते.

चिकित्सा : प्रतिजैव औषधांपैकी (अँटिबायॉटिक) टेट्रासायक्लीन व पेनिसिलीन ही औषधे अत्यंत गुणकारी ठरली असून त्यांचा वापर सुरू केल्याबरोबरच सुधारणा दिसू लागते मात्र ही औषधे फार दिवस द्यावी लागतात. टेट्रासायक्लीन पोटात देता येण्यासारखे असल्यामुळे वारंवार द्याव्या लागणार्‍या पेनिसिलिनाच्या अंत:क्षेपणापेक्षा (इंजेक्शनापेक्षा) त्याच्या गोळ्यांचा उपयोग जास्त श्रेयस्कर आहे.

शस्त्रक्रिया करून ग्रस्त भागातील पू वाट काढून बाहेर पडल्यास त्वरित गुण येतो. पूर्वी पोटॅशियम आयोडाइड, क्ष-किरण प्रयोग वगैरे उपचार करीत, पण आता त्याचा उपयोग करण्यात येत नाही.

कापडी, रा. सी.

पशूंतील किरणकवक रोग : या रोगाची कवके चाऱ्यातून जनावरांच्या तोंडात जातात व जबड्यातील लहान जखमांतून आत प्रवेश मिळवितात. जनावराचे दुधाचे दात पडून कायम दात येतात. तेव्हा कडक धान्यामुळे जबड्यात लहान जखमा होतात आणि अशा जागी कवकांना शरीरात प्रवेश करण्यास सुलभ होते. या कवकांमुळे जबड्याच्या हाडावर कठीण सूज येते व ती पसरून त्यात पू होतो. अशी सूज जबड्याच्या खालील गळ्याजवळील हाडावर येते. कधीकधी रोगकारक कवके, जीभ, घसा, फुफ्फुस, कास वगैरे भागांत पसरून अपाय करतात.

लक्षणे : अडीच ते पाच वर्षे वयाच्या जनावरात रोगप्रादुर्भाव होतो. जबड्यातील शेवटच्या दाढा असतात तेथे वरच्या किंवा खालच्या भागात प्रथम घट्ट सूज येते, ती पसरते व दुखरी होते. जनावराला वैरण खाण्यास ‌त्रास पडतो. तोंड उघडून पाहिल्यास आतील भाग सुजलेला आढळतो. काही दिवसांनंतर सूज आलेला भाग फुटून त्यातून घट्ट पिवळसर पू बाहेर येतो. जबड्याच्या हाडावरील सूज वाढत जाऊन गळ्याचा व कानाखालील भाग व्यापला जातो. हाडावरील त्वचेवर व मांसल भागावर अशीच टणक दुखरी सूज येते व नंतर ती अनेक ठिकाणी फुटून लहान लहान छिद्रांमार्फत घट्ट पू बाहेर पडतो. तो पिवळसर असून त्यात असंख्य लहान बारीक टणक कण आढळतात. टणक भाग विशिष्ट चाकूने नीट कापून काढता येत नाहीच पण क्वचित कापून टाकला तरीही लवकरच पुन:पुन्हा तसाच वाढतो. यातील पू सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासला तर त्यात रोगकारक कवके आढळतात.

जनावराच्या जिभेवर सूज आली तर तो भाग टणक होतो. जीभ सुजल्यामुळे जनावर चारा खाऊ शकत नाही, तोंडातून लाळ गळते जिभेचा भाग दाताखाली व पुढे तोंडाबाहेर येतो. कासेला रोग झाला म्हणजे टणक सूज येऊन दूध बंद होते. इतर अवयवांवर सूज आली तर जनावर अशक्त होते.

किरणकवक रोगासारखाच दुसरा रोग ॲक्टिनोबॅसिलस लिग्नेरसी या दंडाणूमुळे (कांड्याच्या आकाराच्या सूक्ष्मजंतूमुळे) जनावरांना होतो, पण ह्यात जबड्याच्या हाडाऐवजी जबड्याखालील व गळ्याजवळील लसीका ग्रंथी [लसीका पेशींचा परिवेष्ठित पुंजका, → लसीका ‌तंत्र] व जवळच्या मांसल भागावर (मानेवर) सूज येते. ही सूज फुटून, पू वाहून गेल्यानंतर जखमा होतात. पू तपासला असता विशिष्ट जंतू आढळतात.

चिकित्सा : टणक सुजलेला भाग पूर्णपणे कापून काढला म्हणजे जखम बरी होते. पुष्कळ वेळा कापल्यानंतरही पूर्ण बरे होण्यास काही काळ लागतो किंवा रोग पुन्हा उद्‌भवतो पण मांसल भागावरच्या पू असलेल्या गाठी कापून पूर्ण बऱ्या होतात. सुजलेला भाग पूर्ण कापून त्या जखमेत टिंक्चर आयोडिनाचा बोळा ठेवतात. फुटलेली गळवे ल्युगॉल्स आयोडिनाने वारंवार साफ करतात. पोटात पोटॅशियम आयोडाइड दिल्याने रोग बरा होण्यास मदत होते. आतील भाग ग्रस्त झालेले असल्यास पोटॅशियम आयोडाइडाची अंत:क्षेपणे देतात. स्ट्रेप्टोमायसीन, पेनिसिलीन व सल्फाडायझीन ही औषधे गुणकारी आहेत.

पहा : कवकसंसर्ग रोग.

खळदकर, त्रिं. रं.