मॅराथॉन ऑलिंपिक स्पर्धा लागोपाठ दोनदा जिंकणारा इथिओपियाचा अबेबे बिकिला टोकिओ ऑलिंपिक, १९६४.मॅराथॉन शर्यत : धावण्याची, अतिलांब पल्ल्याची, आधुनिक शर्यत. यात स्पर्धकाला सु. ४२,१९५ मी. (२६ मैल, ३८५ यार्ड) इतके अंतर धावावे लागते. अथेन्स येथील पहिल्या अर्वाचीन ऑलिंपिक स्पर्धेत (१८९६) या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीचा प्रथम प्रवेश झाला. तथापि मॅराथॉन शर्यतीची मूळ कल्पना फार जुनी आहे. इ. स. पू. ४९० च्या सुमारास, ग्रीकांनी पर्शियनांवर मिळवलेल्या विजयाची वार्ता सांगण्यासाठी फायडिपिडीझ हा ग्रीक सैनिक मॅराथॉन ते अथेन्स हे सु. २५ मैल (४० किमी.) अंतर धावत गेला. त्यात अतिश्रमाने त्याचा मृत्यू ओढवला. त्या असामान्य धावपटू सैनिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे भरलेल्या पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेत मॅराथॉन ते अथेन्स अशी धावण्याची शर्यत ठेवण्यात आली. तिलाच मॅराथॉन स्पर्धा असे नाव पडले. पुढे दर ऑलिंपिक स्पर्धेत अशी लांब अंतराचीशर्यत भरू लागली. १९२४ साली या स्पर्धेचे अंतर ४२,१९५ मी. असे सर्वसंमत करण्यात आले. तथापि प्रत्यक्ष अंतराच्या बाबतीत दर वेळी थोडाफार फरक पडत गेला आहे. तसेच मार्गाचे प्रमाणीकरण झाले नसल्याने व कमीअधिक खडतरपणामुळे मॅराथॉन शर्यत पुरी करण्याच्या वेळेबाबतच्या उच्चांकांची, ‘इंटरनॅशनल अमॅच्युअर ॲथ्‌लेटिक फेडरेशन’तर्फे अधिकृतरीत्या नोंद ठेवली जात नाही. शर्यतीची सुरुवात व शेवट फक्त मैदानात होतो उर्वरित अंतर धावपटूला रस्त्यावरून धावावे लागते. पूर्वी अशाच तऱ्हेची एक प्रदीर्घ अंतराची धावण्याची शर्यत प्राचीन ऑलिंपिकमध्येही भरत असावी, असे मानले जाते.

पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेत मॅराथॉन शर्यत ठेवण्यात आली, ती मीशेल ब्रेआल या फ्रेंच व्यक्तीच्या प्रेरणेने, त्याने स्वतः या शर्यतीसाठी एक स्वतंत्र विजेतेपद ठेवले. योगायोग असा की, त्या वर्षीच्या शर्यतीतील विजेता (१८९६) स्पिरीदॉन लूइस हा धावपटू ग्रीस देशाचाच नागरिक होता. त्याने २ तास, ५८ मिनिटे आणि ५० सेकंद एवढ्या वेळेत ही स्पर्धा जिंकली. पुढे पळण्याच्या तंत्रात सुधारणा होत गेल्याने ही स्पर्धा पुरी करण्यास लागणारा वेळ कालांतराने कमी कमी होत गेला. १९७२ साली म्यूनिक येथील ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या फ्रँक शॉर्टरने ही स्पर्धा पुरी करण्यास केवळ २ तास, १२ मिनिटे आणि १९·८ सेकंद इतकाच अवधी घेतला. १९०८ साली लंडनला झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील मॅराथॉन शर्यत फार चित्तथरारक झाली. ही शर्यत पहायला अडीच ते तीन लाख प्रेक्षक मार्गावर हजर होते. या शर्यतीत इटलीच्या दोरांदो प्येत्री या धावपटूने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. शेफर्ड बुश हा धावपटू क्रीडागारात प्रवेश करतेवेळी प्येत्री हाच आघाडीवर होता पण विलक्षण दमछाक झाल्यामुळे तो मध्येच कोसळला व प्रेक्षकांच्या मदतीने तो अंतिम रेषेपर्यंत पोहोचला. त्यामुळे प्येत्रीच्या नावाने जयघोष झाला खरा पण नियमाप्रमाणे तो स्पर्धेतून बाद झालेला होता. त्यामुळे प्रेक्षकांची फार निराशा झाली. स्पर्धेचा अधिकृत विजेता धावपटू अमेरिकेचा जॉन हेझ हा ठरला. त्याला सुवर्णपदक मिळाले पण अलेक्झांड्रा राणीने प्येत्रीला एक खास सुवर्णचषक बहाल करून त्याचा सन्मान केला. आजवरच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुढील मॅराथॉन धावपटूंची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे: १९५२ साली झेकोस्लोव्हाकियाच्या एमील झॅटोपेकने ५,००० व १०,००० मी. अंतरांच्या शर्यती तर जिंकल्याच पण मॅराथॉन शर्यतीतही तो सर्वप्रथम आला. इथिओपियाच्या अबेबे बिकिलाने (१९६० व १९६४) व पूर्व जर्मनीच्या व्हाल्डेमार सीअरपिन्स्कीने (१९७६ व १९८०) लागोपाठ दोनदा ऑलिंपिक मॅराथॉन स्पर्धा जिंकण्याचे विक्रम केले. मॅराथॉनच्या ऑलिंपिक स्पर्धांतला जागतिक विक्रम पोर्तुगालच्या कार्लूश लोपेसच्या नावावर मोडतो. त्याने लॉस अँजेल्सच्या ऑलिंपिक स्पर्धांत (१९८४) मॅराथॉनचे अंतर २ तास, ९ मिनिटे, २१ सेकंद या वेळात पार केले.

मॅराथॉन शर्यतीतला आजतागायतचा जागतिक उच्चांक अमेरिकेच्या आल्बेर्तो सालाझारचा असून त्याने मॅराथॉनचे अंतर २ तास, ८ मिनिटे, १३ सेकंद इतक्या कमी वेळात तोडले (१९८१). पण हे सर्व उच्चांक अनधिकृतरीत्या नोंदले गेलेले आहेत.

आशियाई क्रीडास्पर्धांतही मॅराथॉन शर्यतीचा समावेश झालेला असून, १९५१ मध्ये नव्या दिल्लीत झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धांत भारताचा छोटासिंग हा धावपटू विजयी ठरला होता (२तास, ४२ मिनिटे, ५८·६ सेकंद). त्यानंतर १९७८ साली जपानच्या मिनेतेरू साकामोतोने २ तास, १५ मिनिटे व २९·७ सेकंद इतक्या वेळात शर्यत जिंकली.

मॅराथॉन स्पर्धांत या १९८४ पूर्वी फक्त पुरुषांपुरत्याच मर्यादित होत्या पण लॉस अँजेल्सच्या ऑलिंपिक स्पर्धात १९८४ मध्ये प्रथमच स्त्री खेळाडूंसाठीही मॅराथॉन स्पर्धा भरवण्यात आली व त्यात अमेरिकेच्या जोन बेनॉइटने २ तास २४ मिनिटे, ५२ सेकंद एवढ्या वेळात मॅराथॉनचे अंतर पार करून सुवर्णपदक जिंकले.

मॅराथॉन स्पर्धेत भाग घेणाऱ्या धावपटूजवळ काटकपणा, सहनशक्ती, सुदृढ शरीरयष्टी, दमछाक होऊ न देता दीर्घ अंतर पळण्याची क्षमता व पळण्याचे बिनचूक तंत्र असावे लागते. एका अर्थाने ही भगीरथ स्पर्धा किंवा साहस-शर्यतच म्हणता येईल. ती अत्यंत रोमहर्षक होते, त्यामुळेच ऑलिंपिक स्पर्धेत ती फार वैशिष्ट्यपूर्ण व लोकप्रिय ठरली आहे.

संदर्भ : १. जोगदेव, हेमंत, ऑलेंपिक, पुणे, १९७६.

            २. भागवत, राम ॲथलेटिक्स, पुणे, १९७८.

पंडित, बाळ ज.