रिंग-टेनिस : एक क्रीडाप्रकार. हा खेळ ‘टेनिकॉइट’ या नावानेही ओळखला जातो. टेनिकॉइट हा खेळ डेक टेनिस व डेक कॉइट्स या ⇨बोटीवरील खेळांच्या (डेकगेम्स) एकत्रीकरणाने तयार झाला आहे. हे खेळ जहाजावरील दीर्घकाळ चालणाऱ्या संथ प्रवासात फारच उपयुक्त असत. हे खेळ कमी जागेत व कमी साहित्यासह खेळले जात. ‘कॉइट’ ही किंचित धार असलेली लोखंडी गोल कडी समोरील बाजूच्या खुंटावर अडकविण्याची एक शर्यतच असे. प्राचीन ग्रीक काळातही ह्या खेळाचे मूळ सापडते. इंग्लंडमध्ये तिसऱ्या एडवर्डच्या (१३२७−७७) काळात हा खेळ रूढ असल्याने आढळते. पण टेनिसचे व कॉइटचे आधुनिक रूप असलेला रिंग-टेनिस हा खेळ जहाजांवरती अनेक वर्षे खेळला जात आहे.

रिंग-टेनिसचे एकेरी, दुहेरी व संमिश्र सामने होतात. मैदानाच्या मध्यभागी जाळे त्याच्या दोन्हीकडे एक-एक (एकेरी) वा दोन दोन (दुहेरी) खेळाडू मर्यादित मैदान कर्णात्मन रेषेत आरंभखेळी (सर्व्हिस) इ. बाबतींत या खेळाचे टेनिस खेळाची साधर्म्य असल्यामुळे रिंग−टेनिस हा खेळ एक प्रकारे टेनिस कुळातील आहे.

खेळाचे एकेरीसाठी असलेले मैदान १२·१९ मी. (४० फुट) × २·७४ मी. (९ फुट) असते व दुहेरीसाठी १२·१९ मी.× ५·४८ मी (१८ फुट) असते. मैदानात जाळे मधोमधो व १·५२ मी. (५ फुट) वा १·६७ मी. (५ १/२ फुट) (६ फुट) उंचीवर असते. जाळ्याची उंची ०·४५ मी. (१ १/२ फुट) असते. जाळ्याच्या दोन्ही बाजूंस प्रत्येक ०·९१ मी. (३’) बाजूपट्टे (लॉबी) असतात. यांत पडलेले रिंग नियमबाह्य मानतात. दुहेरीच्या सामन्यांसाठी दोन्ही बाजूंना मध्यभागी रेषा असून, क्रीडांगणाचे ५·१८ मी. (१७’) × २·७४ मी. असे आरंभखेळीचे आयत असतात. आरंभखेळी करणारा दुहेरी सामन्यात क्रीडींगणाबाहेरून समोरच्या आरंभखेळीच्या आयतात कर्णात्मक दिशेने आरंभखेळी करतो.

या खेळात वापरली जाणारी ‘रिंग’ एक रबरी गोल कडी असते. ती बहुधा स्पंजची असते. तिची जाडी २·१० सेंमी. (१ १/४”)असते. तिचा व्यास १७·७ सेंमी. (७) असून, वजन १९८·४५ ते २५५·१५ ग्रॅ. (७ ते ९ औंस) असते.

एका डावात १५ गुण असतात. ज्याचे १५ गुण आधी होतील, तो विजयी होतो. विजयी होतो. विजयी होणाऱ्याचे हारणाऱ्यापेक्षा किमान दोन गुण तरी अधिक असावे लागतात (जसे की, १५−१३ किंवा १७−१५ इ.). सामन्यात प्रत्येक १५ गुणांचे तीन डाव खेळाचे जातात त्यातील दोन डाव जिंकणारा विजयी ठरतो. जो आरंभखेळी करतो, त्याचेच फक्त गुण मोजले जातात. प्रतिस्पर्धी खेळाडूला रिंग घेता आली नाही, नियमानुसार ती क्रिडांगणात पडली, वा परत करण्यास वेळ लागला, किंवा त्याने फेकलेली रिंग क्रिडांगणाच्या बाहेर गेली, तर आरंखेळी करणाराला एक गुण मिळतो. त्याच्याकडून रिंग पडली, किंवा नियमानुसार परत केली गेली नाही, तर समोरच्या प्रतिपक्षास आरंभखेळी मिळते व त्याची गुणमोजणी सुरू होते. रिंग फेकताना, ती हातात येतात त्वरीत परत फेकावी लागते त्यात दिरंगाई चालत नाही. रिंग घेवून एकही पाऊल चालता वा पळता येत नाही. रिंग घेतली असेल, त्यापेक्षा ६” (१५ सेंमी.) तरी वर उचलून परत करावी लागते. वरील नियम न पाळल्यास तो नियमदोष (फाउल) ठरतो आणि प्रतिस्पर्ध्याला गुण मिळतो. रिंगणी फेक अतिकंप होत, कडमडत जाणारी (व्हॉव्हल) नसावी. रिंग मारल्याप्रमाणे फेकता येत नाही. या खेळात खेळाडूच्या चापल्याची, तीक्ष्ण दृष्टीची व जागरूकतेची कसोटीच लागते. प्रतिपक्षाला हुलकावणी देण्यासाठी खेळाडूस मनगटाची कौशल्यपूर्ण हालचाल जमली पाहिजे. स्वतःन चुकता प्रतिपक्षास चुका करायला लावल्यामुळे खेळाडूला सामन्यात यश मिळण्याचा जास्त संभव असतो.

हा खेळ सामान्यतः आतरंशालेय व आंतरमहाविद्यालयीन पातळ्यावर खेळला जातो. त्याच्या राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होत नाहीत. घरगुती स्वरूपात अत्यंत कमी जागेत-घराच्या अंगणातही आणि कमी सांधनांनिशी (फक्त रिंग व जाळे) हा खेळ खेळता येत असल्याने, तो आबालवृद्धांनाही प्रिय आहे.

आलेगावकर, प. म.