बर्फावरील खेळ : बर्फावरून घसरत खेळावयाचे खेळ. त्यात स्केटिंग, स्कीइंग, टोबॉगनिंग, बॉब्‌स्लेडिंग, बर्फावरील हॉकी इ. खेळ मोडतात. पर्वतमय बर्फाळ देशांत-उदा., नॉर्वे, ऑस्ट्रिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, अमेरिका, कॅनडा इ. – हे खेळ लोकप्रिय आहेत. भारतात काश्मीरमध्ये बर्फावरील काही खेळ खेळले जातात.

प्राचीन काळापासून बर्फाळ प्रदेशात बर्फावरील शिवाशिवी, बर्फाच्या चेंडूचे खेळ, बर्फाचे किल्ले वा घरे यांसारशे प्राथमिक क्रीडाप्रकार रूढ आहेत. पुढे काही खास तांत्रिक साधने निर्माण होत गेली व बर्फावरून धावण्या-घसरण्याच्या व उड्डाणांच्या स्पर्धा, विविध नृत्यप्रकार, हॉकीसारखे खेळ, विविध प्रकारच्या गाड्यांच्या शर्यती असे अधिक कौशल्यपूर्ण प्रकार स्पर्धात्मक पातळीवर खेळले जाऊ लागले. हे खेळ आता नियमबद्ध व संघटित स्वरूपात खेळले जातात. त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या असून त्यांच्यामार्फत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या जातात.

बर्फावरील हॉकी : एक अटीतटीचे द्दश्य

बर्फावरून चालण्यापेक्षा घसरणे अधिक सोपे व जलद असते. यासाठी मानवनिर्मित कृत्रिम साधनांचा वापर फार प्राचीन काळापासून होत आला. उदा., बर्फ-बुटांचा (स्नो शू) आद्य ओबडधोबड प्रकार एस्किमो व नॉर्थ अमेरिकन-इंडियन लोक वापरत असत. ‘स्की’ (बर्फावरून घसरण्यासाठी बुटाखाली जोडावयाची सपाट, लांब लाकडी पट्टी) तर सु. ४,०००-५,००० वर्षापूर्वीपासून अस्तिवात असाव्यात. स्कीनंतर ‘स्केट’ चा (बर्फावरून घसरता यावे म्हणून बुटाला तळाशी बसवलेली पोलादी पट्टी) शोध लागला. दोहोंचा उगम स्कँडिनेव्हियातच झाला. स्केटिंगची सुरूवात इ. स. पू. सु १००० मध्ये झाली असावी. अनेकविध हालचालींना सोयीस्कर अशा पोलादी स्केट आधुनिक काळात दिसून येतात.

जगातील समृद्ध देशांत लहानमोठी कृत्रिम बर्फांगणे (स्केटिंग रिंक) बनवून त्यांवर बर्फावरील खेळ बाराही महिने खेळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पहिले कृत्रिम बर्फांगण- ‘ग्लॅसिॲरियम’– जॉन गॅमगी याने चेल्सी, लंडन येथे १८७६ मध्ये बनवले. ते छोटे व खासगी होते. तथापि १८७७ मध्ये मँचेस्टर येथे पहिले मोठे सार्वजनिक कृत्रिम बर्फांगण तयार करण्यात आले. आता यूरोप-अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांतून अशी कृत्रिम बर्फांगणे तयार करण्यात आली आहेत.

हे खेळ हिवाळी खेळांच्या (विंटर गेम्स) प्रकारात मोडतात. १९०८ मध्ये फिगर स्केटिंग व १९२० मध्ये बर्फावरील हॉकी या अंतर्गेही (इमडोअर) खेळांचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आला होता. तथापि ऑलिंपिक क्रीडासामने सामान्यतः उन्हाळ्यातच भरत असल्याने या खेळांना अधिक मोठ्या प्रमाणात वाव देता येणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑलिंपिकचे हिवाळी सत्र १९२४ मध्ये फ्रान्समधील शामॉनी येथे भरवण्यात येऊन, त्यात बर्फावरील विविध स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा अंतर्भाव करण्यात आला. तेव्हापासून झालेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे स्थळ व वर्ष पुढीलप्रमाणे : सेंट मरिट्स (स्वित्झर्लंड, १९२८), लेक प्लॅसिड (अमेरिका, १९३२), गार्मिश पार्टनकिर्शन (प.जर्मनी, १९३६), सेंट मरिट्स (१९४८), ऑस्लो (नॉर्वे, १९५२), कार्तीना दांपेस्ता (इटली, १९५६), स्व्कॉ व्हॅली (अमेरिका, १९६०), इन्सब्रुक (ऑस्ट्रिया, १९६४), ग्रनॉबल (फ्रान्स, १९६८), साप्पोरो (जपान, १९७२), इन्सब्रुक (१९७६) व लेक प्लॅसिड (१९८०). या स्पर्धांमध्ये सामान्यतः पुढील क्रीडाप्रकारांचा समावेश होतो : (१) आल्पाइन स्कीइंग-ही स्पर्धा डाउनहिल, स्लालोम व जायंट स्लालोम या तीन गटांमध्ये घेतली जाते, (२) बर्फावरील हॉकी, (३) स्की जंपिंग, (४) स्पीड स्केटिंग, (५) टोबॉगनिंग , (६) बॉब्‌स्लेड़िंग, (७) बायथलॉन व (८) फिगर स्केटिंग.


बर्फावरील खेळांच्या प्रमुख प्रकारांचा परिचय पुढे थोडक्यात करून दिला आहे :

स्केटिंग :तळाशी पोलादी पट्टी बसवलेले विशिष्ट बूट घालून बर्फांवरून घसरण्याचा खेळ. स्पीड स्केटिंग, फिगर स्केटिंग, फ्री स्केटिंग, पेअर स्केटिंग असे विविध कौशल्ययुक्त प्रकार तसेच स्केटिंगच्या साहाय्याने केले जाणारे वॉल्ट्स, बॅले इ. नृत्यप्रकार ह्यात अंतर्भूत होतात. [⟶स्केटिंग].

स्कीइंग :हिमशिखरावरून स्कीच्या साहाय्याने खाली घसरत येण्याचा चित्तथरारक खेळ. स्की म्हणजे लाकूड, धातू वा प्लॅस्टिक यांपासून बनवलेल्या लांब, अरुंद व पातळ पट्‌ट्टया. त्या सु. २ मी. (६ १/२ फुट) लांब, ८ ते १० सेंमी. (३ ते ४ इंच) रुंद व १.९० सेंमी. (३/४ इंच) जाड असतात. स्की बुटाला घट्ट बांधण्यासाठी तिच्या मध्यभागी धातूच्या वा चामड्याच्या बंधनाची (बाइंडिंग) सोय असते. स्की बर्फावरून सर्‌कन घसरावी, म्हणून तिच्या तळाला मेण घासतात. खेळाडूला वेग वाढविण्यासाठी, तोल सांभाळण्यासाठी तसेच वळण घेण्यासाठी दोन्ही हातांत काठ्या घ्यावा लागतात. त्या काठीला वरच्या बाजूला धरण्यासाठी  चामड्याची मूठ असेत व काठी बर्फामध्ये रुतू नये, म्हणून तळाला १० सेंमी. (४ इंच) व्यासाची धातूची चकती असते. त्याखेरीज जाड बूट, हातमोजे, कानटोपी अशी गारठ्यापासून संरक्षण करणारी साधने वापरावी लागतात. स्कीइंगचे स्थूल मानाने दोन सर्वसाधारण प्रकार पाडता येतील : स्पर्धात्मक व रंजनात्मक. हौशी किंवा नवशिक्या खेळाडूंनी केवळ मनोरंजनार्थ एक छंद म्हणून केलेले स्कीइंग हे अ-स्पर्धात्मक असते. त्यातला सर्वमान्य प्रकार म्हणजे हिमावरून (स्नो) घसरत सरळ खाली येणे हा होय. खेळाडू वळणे न घेता वा वेग कमी न करता जेव्हा सरळ खाली घसरत येतो, तेव्हा त्या क्रियेस ‘शूसिंग’ असे म्हणतात. हिमावरून वेगाने खाली घसरताना तोल सांभाळणे फार महत्वाचे असते. त्यासाठी गुडघ्यांत वाकून शरीराचा भार पुढे झुकता ठेवावा लागतो. घसरताना दोन्ही स्की परस्परांना भिडवून पण एक स्की दुसरीच्या किंचित पुढे अशी ठेवाली लागते. स्कीइंगमध्ये थांबणे व वळणे या क्रिया अवघड आणि कौशल्यपूर्ण मानल्या जातात. थांबण्याच्या वेळी परस्परसन्निध व समांतर असलेल्या स्की मागच्या बाजूने फाकवून त्यांची पुढची टोके एकमेकांशी जुळवून घ्यावी लागतात. त्यासाठी खेळाडू आपल्या टाचा फाकवून व चवडे एकमेकांजवळ आणून स्कीची पुढील टोके परस्परांशी जुळवतो. त्यावेळी त्याचा आकार इंग्रजी ‘व्ही’ अक्षराप्रमाणे होतो. या क्रियेस ‘स्टेमिंग’ असे म्हणतात. वळताना ही स्टेमिंगची क्रिया अगोदर करावी लागते. तदनंतर ज्या बाजूला वळावयाचे, त्या पायावर सर्व भार टाकून दुसऱ्या बाजूची स्की पुढे सरकवावी लागते. ज्या पायावर भार पडतो त्या स्कीचा वेग मंदावतो, तसेच दुसऱ्या स्कीने पहिलीशी कोन केल्यामुळे ती वर्तुळातच फिरते आणि अशा रीतीने वळण पूर्ण होते. ह्यास ‘स्टेम टर्न’ म्हणतात. याखेरिज ‘टेली मार्क’ व ‘क्रिश्चियानिया’ अशाहीदोन वळणक्रिया असतात. टेली मार्कमध्ये स्की न फाकवता ज्या बाजूस वळावयाचे त्याच्या विरुद्ध बाजूची स्की अगदी पुढे सरकवली जाते व सर्व भार त्याच स्कीवर टाकून दुसरी स्की शक्य तितकी पाठीमागे नेऊन तीवर मुळीच भार न देता ती पहिलीमागून ओढत न्यायची असते. मग पुढे नेलेल्या स्कीला जोराचा हेलकावा देऊन जिकडे वळावयाचे तिकडे तिचे टोक करावयाचे व पाठीमागील स्की नुसती येऊ द्यावयाची. ही क्रिया करताना स्कीवर गुडघे जवळजवळ टेकावे लागतात. क्रिश्चियानियामध्ये दोन्ही स्की समांतर ठेवून शरीरीच्या हेलकाव्याने त्या एकदम वळवावयाच्या असतात.

फिगर स्केटिंग प्रसिध्द रशियन स्वी खेळाडू इरिना रॉड्नीना, अल्यीक्सांद्र झाइत्सेव्हच्या समवेत. स्कीइंग : एक गतिमान अवस्था

उंचावरून खाली घसरता येऊ लागले, की डोंगरावर चढण्याचाही सराव करावा लागतो. त्यासाठी हातातील काठ्यांचा आधारादाखल फार उपयोग होतो. स्पर्धात्मक स्कीइंगमध्ये दोन गट पडतात : (१) आल्पाइन : यात ‘डाउनहिल’ व ‘स्लालोम’ हे प्रकार अंतर्भूत होतात. (२) नॉर्डिक : यात स्की-उड्डाणे व क्षेत्रपार (क्रॉस कंट्री) शर्यती येतात.

आल्पाइन: डाउनहिल शर्यतीत सु. ४६० ते ७६२ मी. (१,५०० ते २,५०० फुट) उंचीच्या बर्फाच्या कड्यावरून सरळ व जास्तीत जास्त वेगाने खाली घसरत यावयाचे असते. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये हा उताराचा मार्ग साधारण दोन ते तीन हजार फुट असतो. वाटेत झुडपे, बर्फाची टेकाडे यांसारखे अडथळेही असतात. तरीही पहिल्या दर्जाच्या स्पर्धकाचा वेग ताशी सु. ८०.४६ किमी. (५० मैल) पर्यंतही असू शकतो. ऑलिंपिक स्पर्धक साधारणतः ही शर्यत सरासरी एका मिनिटात पूर्ण करू शकतो. स्लालोम या प्रकारात सु. १२० ते २१० मी. (४०० ते ७०० फुट) डोंगराचा उतार पार करावयाचा असतो. मात्र मार्गात काही निशाणांच्या जोड्या उभारलेल्या असतात. त्यांना ‘गेट्स’ (दारे) म्हणतात. या सर्व दारांतून स्पर्धकाला जावे लागते. एखादे दार विसरल्यास स्पर्धकाला पुन्हा वर चढावे लागते. या दारांमुळे स्पर्धेचा मार्ग नागमोडी वळणावर होतो. त्यामुळे स्पर्धकाचे तंत्र, वेगनियंत्रणकौशल्य अशा गुणांची कसोटीच लागते. ‘जायंट स्लालोम’ या प्रकारात मार्गाचा एकूण पल्ला खूपच जास्त म्हणजे सु. ३०० ते ३९६ मी. (१,००० ते १,३०० फुट) असतो. बाकी स्पर्धेचे सर्व स्वरूप स्लालोमप्रमाणेच असते.


नॉर्डिक :स्की उड्डाणे (जंपिंग) हा प्रकार अतिशय साहसपूर्ण व चित्तथराराक मानला जातो. ऑलिंपिकमध्ये या स्पर्धेसाठी ‘टेकडी’ (हिल किंवा टॉवर) उभारली जाते. तिला ३३ अंशाचा कोन करून काँक्रीटची घसरगुंडी असते. तिची उंची ८३ मी. (२७० फुट) असते. सध्या ८३ व ७० मी उंचीच्या अशा दोन गटांच्या स्पर्धा होतात. तसेच या प्रकारात विविध हिमशिखरांवरून सु. १५० मी. (५०० फुट) पेक्षाही जास्त उंचीवरून उड्या मारून खेळाडूंनी आपल्या साहसाचे दर्शन घडवले आहे. तसेच त्यावेळी त्यांचा वेगही ताशी सु. १२०.७० किमी.(७५ मैल) इतका असतो. क्षेत्रपार शर्यतीत स्पर्धकांची कुवत, सहनशक्ती व सर्वांगीण तंत्रकौशल्य यांचीच परीक्षा होते. या शर्यतमार्गामध्ये नैसर्गिक बर्फभूमी, चढ-उतार, सपाटी यांचा अंतर्भाव होतो. मार्गात कृत्रिम अडथळे नसतात, तथापि झाडेझुडपे, खाचखळगे, खडबडीत मार्ग यांमुळे स्पर्धकापुढे आव्हाने निर्माण होतात. हिवाळी ऑलिंपिकमध्ये ‘बायथलॉन’ हा क्रीडाप्रकार समाविष्ट असून त्यात क्षेत्रपार शर्यत व बंदूक-नेमबाजी यांची संमिश्र स्पर्धा होते. या खेळात स्पर्धकाला २० किमी. अंतर हातात बंदूक घेऊन आणि २० फेरींना पुरेल एवढा दारूगोळा घेऊनच स्कीइंग करावे लागते. या मार्गात प्रत्येकी ४, ८, १२ , १६ किमी. अंतरावर प्रत्येक वेळी बंदुकीच्या ५ गोळ्या माराव्या लागतात. नेम मारावयाच्या लक्ष्याचे (टार्गेट) अंतर १००, १५०, २०० व २५० मी. वर असते. नेम चुकल्यास प्रत्येकी २ मिनिटे त्याला लागणाऱ्या एकूण वेळात वाढवली जातात. ऑलिंपिक स्पर्धक सामान्यतः १ तास २० मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करू शकतो.

स्कीइंगचा उगम बर्फावरील प्रवासाचे एक साधन म्हणून सु. ५,००० वर्षांपूर्वी झाला. मध्ययुगात त्याचा उपयोग युद्धतंत्रामध्येही करण्यात आला. उदा., नॉर्वे व स्वीडन यांच्यामधील ऑस्लोचे युद्ध (सु.१२००). सोळाव्या शतकाच्या अखेरीस त्याचा मध्य यूरोपमध्ये प्रसार झाला. एक सुसंघटित क्रीडाप्रकार म्हणून स्कीइंगचा विकास नॉर्वेमध्ये एकोणिसाव्या शतकात झाला. नॉर्वेचा तो राष्ट्रीय खेळ मानला जातो. १९२४ मध्ये ‘फेडरेशन इंटरनॅशनल द स्की’ ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली, तिची २६ सदस्य-राष्ट्रे आहेत.

बर्फावरील हॉकी :साधारणपणे ५६ ते ६१ मी. (१८४ ते २०० फुट) लांब व २६ ते ३० मी (८५ ते ९८ फुट) रुंद अशा खास तयार केलेल्या बर्फ-मैदानावर (रिंक) हा खेळ खेळला जातो. त्याच्या चारी बाजूंस १.०६ ते १.२२ मी. (३१/२ फुट ते ४फुट ) उंचीच्या लाकडी फळ्या असतात. गोलाची लोखंडी जाळी १.२२ मी. (४ फुट) उंच व १.८३ मी. (६ फुट) रूंद असते. गोल-रेषेला समांतर अशा दोन रेषा मैदानात काढून मैदानाचे तीन विभाग (झोन) पाडले जातात. त्यांस बचाव, मध्य व आक्रमण विभाग असे म्हणतात. या खेळात चेंडू ऐवजी २.५४ सेंमी (१ इंच) जाड व ७.६२ सेंमी. (३ इंच) व्यासाचे भरीव रबरी कडे वापरतात. त्यास ‘पक’ असे म्हणतात. यातील काठी (स्टिक) हॉकीप्रमाणेच असते. खेळाडू पायात स्केट घालत असल्याने हा खेळ विलक्षण गतिमान होतो. प्रत्येक संघात सहा खेळाडू व काही जादा बदली खेळाडू असतात. सहा खेळाडूंची रचना एक गोलरक्षक, एक मध्यवर्ती, दोन पिछाडी, दोन आघाडी अशी असते. खेळाडू जाड संरक्षक पॅड्स वापरतात. या खेळातही मैदानाच्या दोन्ही टोकांना असलेल्या जाळ्यांमध्ये पक मारून गोल करण्याचा प्रयत्न हॉकीप्रमाणेच केला जातो. सामन्यात प्रत्येकी २० मिनिटांचे तीन डाव असतात . दोन डावांमध्ये दहा मिनिटांची विश्रांती असते.

हा खेळ कॅनडामध्ये १८७० च्या दशकात उगम पावला व नंतर अमेरिकेत पसरला. कॅनडाचा तो राष्ट्रीय खेळ मानला जातो. चेकोस्लोव्हाकिया, स्वीडन, रशिया अशा अन्य देशांतही तो लोकप्रिय ठरला आहे. ‘नॅशनल हॉकी लीग’ (एन्. एच्. एल्.स्थापनावर्ष १९१७) आणि ‘वर्ल्ड हॉकी असोसिएशन’ (डब्ल्यू. एच्. ए. स्थापना वर्ष १९७१) या दोन प्रमुख व्यावसायिक संघटना अमेरिका व कॅनडा येथे आहेत. [⟶ हॉकी].

टोबॉगनिंग व बॉब्‌स्लेडिंग :बर्फावरील घसरगाड्यांच्या शर्यती. बर्फावरून मालाची वाहतूक करण्यासाठी चाके असलेल्या गाड्यांचा उपयोग होत नाही. कारण चाके बर्फामध्ये रुततात. म्हणून विशिष्ट घसरगाड्या (स्ले, किंवा स्लेज, किंवा स्लेड) वापरतात. त्यांना चाकांऐवजी तळाला स्कीप्रमाणे फळ्या लावलेल्या असतात. या घसरगाड्यांसाठी बर्फमय पर्वतांच्या उतारांवर खास धावमार्ग (रन) तयार केलेला असतो. त्यास वळणे असतात. त्यामुळे वरपासून खाली वेगाने येण्यासाठी खास कौशल्य लागते. अन्यथा वळणावर गाडी उलटण्याचा संभव असतो. ज्या बाजूला वळावयाचे, त्या बाजूला पाय टेकून घर्षण निर्माण केले म्हणजे त्या बाजूचा वेग कमी होतो व गाडी त्याच बाजूला वळते. काही गाड्यांमध्ये वळण्यासाठी खास वेगनियंत्रक (ब्रेक) असतात ते बर्फामध्ये घुसवून वळता अगर थांबता येते. धावमार्गांच्या बाजूने बर्फाची एक भिंत तयार केलेली असते, त्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या घसरगाड्या उडून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत.

‘बॉब्‌स्लेड’ किंवा ‘बॉब्‌स्ले’ ही चाके नसलेली, बर्फावरून वेगाने घसरणारी वैशिष्टयपूर्ण गाडी असते. ती पोलादी सांगाड्याची , घसरत्या धावा (रनर्स) असलेली व उघडी असते आणि तिच्यात दोन वा चार माणसे बसू शकतात. दोघांपैकी एकजण चालकाचे व दुसरा बर्फामध्ये पोलादी दंताळे खुपसून वेगनियंत्रणाचे काम करतो. दोन माणसांची घसरगाडी २.७ मी. (९ फुट) लांबीची व १५९ किग्रॅ वजनाची असते. तर चार माणसांची घसरगाडी २३० किग्रॅ. वजनाची व ३.५ मी. (११ फुट, ७ इंच) लांबीची असते. ही घसरलगाडी ताशी सु. १४० किमी. (९० मैल) वेगाने जाऊ शकते. १८९० मध्ये दोघा अमेरिकनांनी बॉब्‌स्लेडिंग हा प्रकार शोधून काढला. त्याच्या ऑलिंपिक शर्यतीचा मार्ग १,५०६.३५ मी. लांब असून, त्यात एकूण १३ वळणे असतात. शिवाय दोन नागमोडी वळणे असतात. ही शर्यत खूपच साहसपूर्ण व चित्तथरारक असते. ‘टोबॉगन’ हे वाहन साधारण बॉब्‌स्लेडप्रमाणेच असते. ते कठीण लाकडापासून तयार करतात व त्याचा तळभाग सपाट व गुळगुळीत असतो. त्याची पुढची टोके मागील बाजूस वळलेली असतात. त्याची लांबी सु. १.८ ते २.४ मी. (६ ते ८ फुट), रुंदी सु. ४६ सेंमी (११/२ फुट) व वजन २० किग्रॅ असते. त्यावर चार माणसे बसू शकतात. टोबॉगनचा वेग ताशी ९८ किमी. (६१ मैल) पेक्षाही अधिक असू शकतो. त्याचा ऑलिंपिक शर्यतीचा मार्ग १ ते २ हजार मी. इतका असतो. गाडीच्या तळाला मेण लावलेले असते. फार प्राचीन काळापासून बर्फमय प्रदेशातील वाहतुकीचे एक साधन म्हणून टोबॉगनचा वापर होत आला आहे. स्कीइंगपूर्वी, तसेच प्राचीन, ऑलिंपिकच्या काळातही हा खेळ होता. टोबॉगन हे बॉब्‌स्लेडचे पूर्वकालीन, जनक वाहन होय.


कर्लिंग :सपाट बर्फांगणावर खेळवयाचा एक खेळ. प्रत्येकी चार खेळाडू असलेल्या दोन संघांत तो खेळला जाते. खेळाचे मैदान ४५ मी. (१४६ फुट) लांब व ४.३ मी. (१४ फुट) रुंद असते. या मैदानाच्या एका टोकाकडून १७.२ किग्रॅ (३८ पौंड) वजनाचा एक दगड गोळा घसरत जाईल, अशा रीतीने सोडावयाचा असतो. तो दुसऱ्या टोकाला असलेल्या लक्ष्याच्या-म्हणजे ३.७मी. (१२ फुट) आखीव रिंगणच्या-दिशेने सोडावयाचा असतो. त्यास ‘हाउस’ म्हणतात. तो रिंगणाच्या जवळपास जेथे थांबेल त्यावरून गुण मिळतात. हे लक्ष्य ३८ मी. (१२६ फुट) अंतरावर असते. प्रत्येक खेळाडू दोन दगडी गोळे लक्ष्याच्या दिशेने सोडतो. बर्फामध्ये पाय घट्ट रोवून उभे राहता यावे, म्हणून खेळाडू तळाला खिळे असलेल्या धातुच्या पट्‌ट्यांचा वापर करतात. या खेळाचे आणखी एक वैशिष्टय असे की, खेळाडूने दगडी गोळा घरंगळत सोडल्यावर तो लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाही असे दिसताच त्याच्या संघातील उर्वरित खेळाडू वाटेतील बर्फ झाडून साफ करतात त्यामुळे बर्फाचा पृष्ठभाग सपाट व गुळगुळीत होतो व दगडी गोळा अधिक वेगाने पुढे सरकतो. तज्ञांच्या मते या झाडण्यामुळे तो १.८ ते ३ मी. (६ ते १० फुट) इतका पुढे जाऊ शकतो. स्कॉटलंडचा हा प्रमुख हिवाळी खेळ असून, तिथे तो सोळाव्या शतकापासून खेळला जात होता. कॅनडा व अमेरिकेच्या काही भागांतही तो लोकप्रिय आहे.

बर्फावरील नौकाशर्यती :बर्फावरून वेगाने घसरतील अशा लहान लहान नौका वा शीडजहाजे खास तयार केली जातात. त्या जास्तीत जास्त ताशी सु. २६२ किमी. (१६३ मैल) वेगाने जाऊ शकतात मात्र त्यांचा सरासरी वेग ताशी सु. १६० किमी. (१०० मैल) असतो. अमेरिकेच्या उत्तर भागात बर्फाच्या नद्या-सरोवरांतून नौकानयन करण्याचा छंद अतिशय लोकप्रिय ठरला आहे.

बर्फावरील वॉल्ट्स, बॅले इ. विविध नृत्यप्रकार, जलद व लयबद्ध हालचाली, रंजनप्रकार-‘आइस शो’, ’आइस कार्निव्हल’,’ आइस फॉलीज’ इ.-सादर करणारे खेळाडूंचे संघ १९१५ पासून आहेत. फिगर स्केटिंगमधूनच हे नृत्यप्रकार उगम पावले.

भारतात बर्फावरील खेळ अद्याप प्राथमिक अवस्थेतच आहेत. काश्मीरमध्ये हिवाळ्यात स्केटिंग-स्कीइंगचे काही प्रकर खेळले जातात. गुलमर्ग येथे स्कीइंगचे मोठे केंद्र निर्माण करण्याची योजना आहे. तेथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कीइंग अँड माउंटेनिअरिंग’ ही संस्था स्थापण्यात आली असून, तिच्यामार्फत स्कीइंगचे प्रशिक्षण दिले जाते.

संदर्भ : 1. Bass, H. International Encyclopaedia of Winter Sports, London, 1971.

            2. Brown, Harry, Ice Hockey Skating, Bloomington, 1972.

            3. Kamper. E. Encyclopaedia of the Olympic Winter Games, 1976.

            4. Scharff, Robert &amp Others, Ed. Skt Magazine’s Encyclopedia of Skling, New York, 1970.

            5. Welsh, R. Beginner’s Guide to Curling, London, 1969.

           6. करंदीकर(मुजुमदार), द.चिं. व्यायामज्ञानकोश, खंड  ६ वा, वडोदे, १९४२.  

           7. जोगदेव, हेमंत, ऑलिंपिक, पुणे, १९७६.

नातू, मो. ना इनामदार, श्री. दे.