खरूज : त्वचेच्या सर्वांत बाहेरच्या थरामध्ये ‘संधिपाद’ (आर्थ्रोपोडा) संघातील एका परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या) किडीच्या संसर्गामुळे होणाऱ्या विकाराला ‘खरुज’ असे म्हणतात. या किडीला ॲकॅरस (अथवा सारकॉप्टिस) स्केबिआय असे नाव असून त्याची मादीच त्वचेत घुसून हा विकार उत्पन्न करते.

आ. १. खरजेची कीड (सारकॉप्टिस) नर व मादी

या किडीची मादी साध्या डोळ्यांनी जेमतेम दिसेल अशी ०·४-०·५ मिमी. लांब असून ती कासवाच्या आकाराची असते. तिच्या तोंडाकडच्या भागाजवळ प्रत्येक बाजूस दोन असे एकूण चार पाय असून त्या पायांच्या टोकांशी चूषके (घट्ट धरण्यासाठी असलेले अवयव) असतात. या चूषकांमुळे ही कीड त्वचेत बिलगून राहू शकते. मादीच्या मागच्या भागातही प्रत्येक बाजूस दोन असे एकूण चार पाय असून त्या पायांच्या शेवटी केसासारखे लांब रोम (राठ केस) असतात.  

त्वचेच्या बाहेर नर आणि मादी यांचा संयोग झाल्यानंतर मादी त्वचेच्या वरच्या शृंगी थरात घुसते. नर बाहेरच मरतो. त्वचेत घुसल्यानंतर मादी एकावेळी सु. ३० अंडी घालते. त्या अंड्यांपासून डिंभ (अळ्या) तयार होतात आणि त्या डिंभांचेच पुढे नर व मादी तयार होतात असे या किडीचे जीवनचक्र आहे.

या किडीचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्यास त्यांचा निकट संबंध असणे हे प्रमुख कारण आहे. म्हणून एका घरातील अनेक व्यक्तींमध्ये हा विकार एकाच वेळी दिसतो. विशेषतः लहान मुलांत आणि अस्वच्छ वस्तीमध्ये खरूज अधिक प्रमाणात दिसून येते.

लक्षणे : मादी त्वचेत घुसल्यानंतर सु. २०–२२ दिवसांनी त्या जागी खाज सुटू लागणे हे पहिले लक्षण असते. हातापायांच्या बोटांची बेचके, काख, कोपरांची आतली बाजू, मनगट व हाताची मागची बाजू येथे खरजेचे फोड दिसतात. त्या जागी केसासारखी बारीक पांढरट रेघ दिसते. त्या रेघेच्या शेवटच्या टोकाशी काळसर असा उंचवटा दिसतो. या उंचवट्याच्या तळाशी ह्या किडीची मादी व तिच्यापासून उत्पन्न झालेली पिले असून ती पिले आजूबाजूच्या त्वचेत घुसून तेथे अशीच विकृती उत्पन्न करतात. उत्तम उजेडात व विवर्धक (मोठ्या प्रतिमा देणाऱ्या) भिंगाच्या साहाय्याने पाहिल्यास ही रेघ आणि रेघेच्या टोकाशी असलेली कीड स्पष्ट दिसते तीक्ष्ण सुईने ती कीड काढून सूक्ष्मदर्शकाने पाहिल्यास निदान स्पष्ट होते. त्वचेमध्ये पूयजनक (पू निर्माण करणाऱ्या) जंतूंचा संसर्ग झाल्यास त्या जागी फोड येऊन त्यात पू साठल्यासारखा दिसतो. खाज अतिशय सुटू लागते. ही खाज रात्रीच्या वेळी अधिक असते. जंतुसंसर्ग झाल्यास काखेतील लसीका ग्रंथी (रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या लसीका वाहिन्यांच्या मार्गावर असलेले लसीका पेशींचे परिवेष्टित पुंजके) सुजून मोठ्या होतात.

वेळीच योग्य उपचार न झाल्यास हा विकार अनियमित काळपर्यंत राहू शकतो. एकाच वेळी घरातील अनेक व्यक्तींमध्ये हा विकार होत असल्यामुळे त्याबद्दलची चिकित्सा एकाच वेळी सर्व व्यक्तींवर करावी लागते.

खाज सुटणे हेच प्रमुख लक्षण असल्याने अंगावर पित्त उठणे, उवांचा संसर्ग यांपासून निदान करण्यासाठी वर दिल्याप्रमाणे सूक्ष्मदर्शकाचे साहाय्य घ्यावे लागते.


चिकित्सा : १० टक्के गंधक असलेले मलम अथवा २५ टक्के बेंझिल बेंझोएटाचा विद्राव खरजेच्या किडींना मारक असतो म्हणून त्याचा उपयोग करतात. एका घरातील सर्व व्यक्तींना लागोपाठ तीन दिवस हा विद्राव सर्वांगावर फासल्यास व चोळल्यास सर्व कीड मरते. त्वचेचा कोणताही भाग वगळता कामा नये. त्वचेला लागून असलेले कपडे तीन दिवस उकळल्यास अथवा स्वच्छ धुवून इस्त्री केल्यास कपड्यांतील कीड मरून विकार कायमचा बरा होतो.      

               

ढमढेरे, वा. रा.

आयुर्वेदीय चिकित्सा : खरूज ओली असली, तर तिला पामा असे म्हणतात. हा कुष्ठाचा प्रकार आहे. कुष्ठाची सर्व देहशुद्धी व शामक चिकित्सा करावी. नागरमोथा, गुळवेल इ. चूर्ण सर्वांगाला तेल लावून खरजेच्या फोडावर लावावे म्हणजे खरूज नाहीशी होते. उदयभास्कर रस पोटातून द्यावा. कडूनिंबाच्या काढ्याने फोड धुवून कडूनिंबाच्या पाल्याची चटणी फोडांवर लावावी. 

                       जोशी, वेणीमाधवशास्त्री

पशूंतील खरूज : त्वचेवर वाढणाऱ्या परजीवींमुळे प्राण्यांतही हा विकार संभवतो. रोगदूषित त्वचेवर अत्यंत कंड सुटते म्हणून त्याला खाज, कंडू किंवा लूत अशीही नावे आहेत. रोगाचे परजीवी सोरॉप्टिस, सारकॉप्टिस व कोरिऑप्टिस अशा तीन प्रजातींचे असून सर्व पाळीव प्राण्यांत सर्वसाधारणपणे आढळतात. त्यांची वाढ झपाट्याने होते व सात ते अकरा दिवसांत डिंभ, कोश अवस्थांतून जाऊन प्रौढ झाल्यावर दहा ते चौदा दिवसांच्या अंतराने अंडी घालतात. सारकॉप्टिस परजीवी त्वचेच्या वरच्या थरांत घुसून बसतात म्हणून त्यांच्यावर इलाज करणे कठीण असते. ते घोड्यात पातळ त्वचा असलेल्या जागी, गाई, म्हशी व मेंढ्यांत डोक्यावरील व मानेवरील त्वचेत रुतून बसतात. त्या ठिकाणचे केस झडतात. जागेवर चट्टे दिसतात, भयंकर कंड सुटते व जनावर अस्वस्थ बनते. काही दिवसांनी त्वचा कठीण होते व त्या ठिकाणी वळ्या पडलेल्या दिसतात, नंतर सर्व शरीरावर रोगाचा प्रसार होतो.

आ. २. सोरॉप्टिस - नर व मादी

सोरॉप्टिस त्वचेच्या वरच्या भागास चावतात, त्यामुळे कंड सुटते व त्वचेतून लस वाहू लागते. लस कोरडी होऊन खपली धरते आणि तेथे रोगाचे परजीवी वास्तव्य करतात. घोड्यात ते मणक्याच्या बाजूला, गाई-बैलांत मानेवर व मेंढीत सर्व शरीरावर दिसून येतात.

कोरिऑप्टिस प्रकारचे गाई-बैलांत व घोड्यांत विशेषतः पायांवर व शेपटीच्या मुळापाशी सापडतात. तेथे पुष्कळ खाज सुटते. रोगी जनावर बेचैन होते व पायांनी रोगग्रस्त भाग खाजविण्याचा प्रयत्न करते व त्यामुळे व्रण होतात. रोगाचे परजीवी मनुष्यात तसेच इतर प्राण्यांत संसर्गामुळे प्रसार करणारे असल्यामुळे उपचार करताना अत्यंत दक्षता बाळगतात. रोगी जनावर निराळे ठेवतात

आ. ३. कोरिऑप्टिस - नर व मादी

.

सारकॉप्टिसमुळे खरूज झालेल्यांसाठी गंधकाच्या मलमाऐवजी गॅमेक्झिनाची पूड विशेष उपयोगात आणतात. गाई-म्हशी व मेंढ्या यांना खास तयार केलेल्या हौदातील जंतुनाशक औषधीयुक्त पाण्याने धुऊन काढतात. ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पुन्हा धुऊन काढण्यामुळे अधिक फायदा होतो व कित्येक वेळा तसे करणे आवश्यकही ठरते. 

गद्रे, य. त्र्यं.