आषाढ : (शुचि). हिंदू कालगणनेप्रमाणे चवथा महिना. यातील पौर्णिमेस पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्रास चंद्र असतो म्हणून याला आषाढ हे नाव पडले. सूर्य मिथुन राशीत असताना आषाढास सुरुवात होते. कर्कसंक्रांत आषाढात असते. या महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा भर असतो. शुद्ध एकादशीपासून विष्णूच्या शयनास प्रारंभ होतो म्हणून हिला शयनी एकादशी म्हणतात. या दिवशी पंढरपुरास मोठी यात्रा भरते. येथून चातुर्मास सुरू होतो. शुद्ध प्रतिपदेस कालिदासस्मृतिदिन पाळतात. या महिन्यात मूळ नक्षत्री चंद्र असतो त्या दिवशी बेंदूर, पौर्णिमेस व्यासपूजा, अमावास्येस दीपपूजा, तसेच अधिक आषाढात कोकिळाव्रत इत्यादींमुळे आषाढाचे महत्त्व आहे. सूर्य मिथुन राशीत असला, तर अशा मिथुन –आषाढात शुद्ध दशमीपर्यत विवाहाचे मुहूर्त असतात.

ठाकूर, अना.