केळकर, नरसिंह चिंतामण : (२४ ऑगस्ट १८७२–१४ ऑक्टोबर १९४७). एक श्रेष्ठ मराठी साहित्यिक, संपादक व राजकारणी नेते. जन्म सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब ह्या गावी. मिरज, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे राहून बी.ए. एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण घेतले. १८९५ साली सातारा येथे त्यांनी वकिलीस प्रारंभ केला. तथापि १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी, त्यांनी काढलेल्या वकिलीच्या वर्गाचे शिक्षक व मराठा ह्या पत्राचे संपादक म्हणून पुण्यास आले. काही थोडा कालावधी सोडल्यास मराठ्याचे संपादकत्व १९१८ पर्यंत केळकरांकडेच होते. टिळक तुरुंगवासात असल्यामुळे १८९७ पासून मराठ्याबरोबरच केसरीचेही संपादन ते करू लागले.टिळक सुटून आल्यानंतरकेसरीचे संपादन पुन्हा टिळकांकडे गेले (१८९९). त्यानंतर वेळोवेळी त्यांनी केसरीचे संपादन केले (१९१० ते १९१८, १९२० ते १९२७ व १९२९ ते १९३१). १९२८ मध्ये एका वर्षासाठी केसरीचे संपादकत्व त्यांनी सोडले होते. १९२९ च्या जानेवारीत ते त्यांनी पुन्हा हाती घेतले. १९०८ साली टिळकांना झालेल्या शिक्षेच्या संदर्भात व ‘द टिळक केस’ ह्या लेखाबद्दल दंड व १४ दिवसांची कैद भोगली. त्यांच्याकडून माफी लिहून घेण्यात आली. १९१२ व १९१८ मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अनुक्रमे उपाध्यक्ष व अध्यक्ष होते.

साहित्यसम्राट केळकर

१९१८ मध्ये काँग्रेस व होमरूल लीग ह्यांच्यातर्फे विलायतेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे चिटणीस म्हणून त्यांची निवड झाली. १९१९ मध्ये त्यांना विलायतयात्रा घडली. विलायतेत असताना ब्रिटिश इंडिया काँग्रेस कमिटीच्या इंडिया ह्या पत्राचे संपादन त्यांनी केले. १९२० मध्ये सोलापूर येथे भरलेल्या काँग्रेस आणि होमरूल लीग ह्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त प्रांतिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. ह्याच वर्षी त्यांनी तीन लक्ष रूपयांचा टिळक पर्स फंड जमवून टिळकांना अर्पण केला. १९२१ मध्ये बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. स्वराज्य पक्षातर्फे १९२३ मध्ये त्यांची कायदेमंडळावर निवड झाली. १९२४ मध्ये वरिष्ठ कोर्टाच्या बेअदबीचा त्यांच्यावर खटला झाला व त्यात ५,२०० रु. दंड त्यांना द्यावा लागला. १९२७ मध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. बडोदे वाङ्‍मय परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते (१९३१). ह्याच वर्षी उज्जैन येथे भरलेल्या मध्य भारतीय कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.

१९३५ ते १९४७ ह्या काळात सह्याद्रि मासिकाचे ते संपादक होते. अनेक संस्थांचे अध्यक्षपद, अनेक ग्रंथांना प्रस्तावना, अनेक सभांच्या अध्यक्षपदावरून केलेली महत्त्वपूर्ण भाषणे ही केळकरांच्या कर्तृत्वाची सर्वपरिचित अंगे होत. महाराष्ट्रीय समाजाच्या जवळजवळ ४०–४५ वर्षांच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनात एक महनीय स्थान केळकरांना हळूहळू प्राप्त होत गेले. या काळाचा विचार करता, केळकर ही केवळ व्यक्ती नव्हती, तर लोकांच्या आदरास व विश्वासास पात्र झालेली संस्था होती असे म्हणावे लागते. केसरी  मराठा  ह्या पत्रांचे वेळोवेळी संपादन करून त्यांनी टिळकांशी सहकार्य केलेच परंतु त्यांच्या राजकीय चळवळींनाही मनःपूर्वक सहकार्य दिले. तथापि टिळकांच्या इतके राजकीय वातावरण तापविण्याची शक्ती वाणीत व लेखणीत असूनही ते टिळकांच्या पावलांवर पाऊल टाकून चालले नाहीत. राजकारणात जहाल आणि नेमस्त ह्या दोन टोकांना टाळून मध्यम भूमिका त्यांनी स्वीकारली. त्या दोन्ही प्रवृत्तींबद्दल त्यांना सहानुभूती होती. टिळकांनंतर महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीमध्ये ते सामील झाले. त्या वेळी काँग्रेसच्या कार्यकारिणीचेही ते सभासद झाले परंतु असहकारितेचे आंदोलन गांधींनी मागे घेतल्यानंतर सुधारणा राबवाव्या व कायदेमंडळात शिरून ब्रिटिश राजनीतीच्या विरुद्ध लढावे, ह्या हेतूने स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षात ते गेले. १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला परंतु तो मनापासून घेतला नाही. १९२१ ते १९४७ पर्यंतच्या गांधीयुगात त्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीच्या प्रादेशिक वा अखिल भारतीय नेतृत्वामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले नाही.

‘साहित्यसम्राट’ म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या जवळजवळ १५,००० च्या आसपास आहे. समग्र केळकर वाङ्‍मय ह्या ग्रंथमालेचे बारा खंड आहेत (१९३८). त्यानंतरचा खंड केळकरांची निबंधमाला (सह्याद्रि खंड) ह्या नावाने प्रसिद्ध आहे. नाटक, कादंबरी, लघुकथा, कविता, निबंध, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा ह्या सर्वच वाङ्‍मयक्षेत्रांत त्यांनी लेखन केलेले असून इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र इ. विषयांच्या क्षेत्रांतही त्यांच्या लेखणीने संचार केला आहे. दहा नाटके, आठ कादंबऱ्या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि ३०–४० विवेचनात्मक ग्रंथ ही त्यांची साहित्यसंपदा. नाट्यवाङ्‍मयाच्या क्षेत्रात तोतयाचे बंड (१९१३) आणि कृष्णार्जुनयुद्ध (१९१५) ही त्यांची दोन नाटके विशेष उल्लेखनीय होत. त्यांनी लिहिलेल्या चरित्रांत लो. टिळक यांचे चरित्र  (३ खंड – पूर्वार्ध, सन १८९९ अखेर, १९२३ उत्तरार्ध, १८९९ ते १९१४, १९२८ उत्तरार्ध, १९१४ ते १९२०, १९२८) अधिक महत्त्वपूर्ण आहे. गतगोष्टी (१९३९) हा त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ. त्यांच्या विवेचनात्मक ग्रंथांपैकी सुभाषित आणि विनोद  (१९०८), मराठे व इंग्रज (मराठेशाहीचे शतसांवत्सरिक वाङ्‍मय श्राद्ध) (१९१८), राज्यशास्त्र  (१९३२), भारतीय तत्त्वज्ञान  (१९३४) आणि हास्यविनोदमीमांसा (१९३७) हे विशेष प्रसिद्ध आहेत. अनेक साहित्यसंस्थांच्या अध्यक्षपदांवरून त्यांनी भाषणे केली आणि वाङ्‍मयविषयक प्रश्नांची चर्चा करणारे काही अभ्यासलेख व ग्रंथपरीक्षणे लिहिली. ह्यांतून व उपर्युक्त सुभाषित आणि विनोदहास्यविनोदमीमांसा ह्या ग्रंथांतून त्यांचा वाङ्‍मयविचार व्यक्त झाला असून तो लक्षणीय आहे.

वाङ्‍मय म्हणजे काय, वाङ्‍मयानंदाचे स्वरूप काय, कलेचा हेतू व तिचे फल एक की भिन्न, वाङ्‍मयातून प्रकट होणारे सत्य व शास्त्रीय सत्य ह्यांतील फरक काय, अलंकार व रस ह्यांचा परस्परसंबंध काय, नवे वाङ्‍मय का व केव्हा निर्माण होते, वाङ्‍मयाच्या संदर्भात अश्लीलतेचा अर्थ काय, वास्तववाद व ध्येयवाद यांतील भेद काय, विनोद व काव्य ह्यांचे नाते काय, हास्याची कारणे कोणती, उपमेचे निर्णायक गमक काय, गद्य व पद्य आणि पद्य व काव्य ह्यांच्या परस्परसंबंधांचे स्वरूप काय, काव्याचे वर्गीकरण कसे करावे, नाटकातील पदे कशी असावीत, वाङ्‍मयीन टीका म्हणजे काय, आठवणी व आख्यायिका ह्यांत कोणता फरक असतो इ. अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांची चर्चा केळकरांनी केली आहे. मराठी वाचकांना आणि लेखकांना वाङ्‍मयचर्चेची गोडी लावण्यात केळकरांचा वाटा फार मोठा आहे. सर्व ज्ञानशाखांबद्दल दुर्दम्य कुतूहल, तज्जन्य बहुश्रुतता, लेखनक्रीडेची हौस, युक्तिवादांची आवड, सूक्ष्म विनोदबुद्धी, जे आपल्या लक्षात आले ते इतरांना समजावून सांगण्याची इच्छा व हातोटी, लेखनात उपमितीचा सुयोग्य उपयोग करण्याचे कौशल्य आणि प्रसन्न भाषाशैली ह्यांमुळे केळकरांना उत्तम साधले ते निबंधलेखन. ते नेहमीच अत्यंत वाचनीय ठरले. ललितलेखन करण्याचा त्यांनी उत्साहाने प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यांचे जे लेखन विशेष लक्षात राहते ते विवेचनात्मक, निरूपणात्मक, युक्तिवादात्मक, स्पष्टीकरणात्मक आणि विचारक्रीडात्मक आहे. ह्या लेखांत मात्र ते विलक्षण गोडवा आणि लालित्य निर्माण करू शकले. केळकरांचे साहित्यसम्राटपद ह्याच लेखनावर मुख्यतः अधिष्ठित आहे. पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : १, कुळकर्णी, वा. ल. न. चिं. केळकर वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९७३.

२. केळकर-वाढदिवस – मंडळ, केळकर, आवृ, दुसरी, पुणे १९३२.

३. जोशी, न. मो. संपा. कै. तात्यासाहेब केळकर विविधदर्शन, मुंबई, १९४८.

कुळकर्णी, वा. ल.