चंद्रशेखर : (२९ जाने.१८७१—१७ मार्च १९३७). मराठी कवी. संपूर्ण नाव चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे . जन्म नासिक येथे. शिक्षण नासिक, बडोदे व पुणे येथे. बडोद्याला वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदे संस्थानाचे ते राजकवी झाले.

चंद्रशेखर

चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशी कविता त्यांनी लिहिली. इंग्रजी कवितेचे वाचनमनन त्यांनी केलेले असले, तरी तिच्यातील स्वच्छंदतावादी संप्रदायाचे त्यांना आकर्षण नव्हते मात्र मिल्टनसारखा विदग्ध, व्यासंगी कवी त्यांना जवळचा वाटत होता. कवितेतून आत्मलेखन करणे त्यांना मान्य नव्हते. कवितेने ज्ञान आणि रस ह्यांचा एकात्म अनुभव द्यावा, अशी त्यांची काव्यविषयक भूमिका होती आणि ह्या भूमिकेतून त्यांनी काव्यकलेची आजीव आणि निष्ठापूर्वक उपासना केली. पंडीत कवींचे अलीकडच्या काळातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी, असे त्यांना यथार्थपणे म्हटले जाते. ‘गोदागौरव’ आणि ‘कविता-रति’ ह्या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कविता. ‘गोदागौरवा’चे नादमाधुर्य जयदेवाच्या गीतगोविंदाची स्मृती करून देते. ह्या दोन्ही कवितांतील— विशेषतः ‘कविता-रति’ मधील –आत्मपरता चंद्रशेखरांच्या कवितेत अपवादभूत आणि म्हणून विशेष लक्षणीय आहे. कवी म्हणून त्यांची कीर्ती प्रामुख्याने चंद्रिका (१९३२) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहावर अधिष्ठित आहे. ह्या संग्रहास लाभलेल्या यशामुळेच बडोदे संस्थानाचे राजकविपद त्यांना मिळाले.

त्यांनी काही उत्कृष्ट रूपांतरेही केली. मिल्टनच्या इल् पेन्सरोझो  आणि ल’ आलेग्रो  ह्या काव्यांची अनुक्रमे ‘चिंतोपंत उदास’ आणि ‘रंगराव हर्षे’ ह्या नावांनी त्यांनी केलेली रूपांतरे, तसेच ‘काय हो चमत्कार’ हे एका इंग्रजी बॅलडचे रूपांतर ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरतात.

ह्यांशिवाय ‘उगडं गुपित्’ व किस्मतपूरचा जमीनदार (१९३६) ही स्वतंत्र कथाकाव्ये त्यांनी लिहिली असली, तरी ती फारशी मान्यता पावली नाहीत.

जोग, रा. श्री.