कोलते, विष्णू भिकाजी : (२२ जून १९०८– ). एक मान्यवर मराठी ग्रंथकार आणि महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक व संपादक. जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या मलकापूर तालुक्यातील नरवेल ह्या गावी. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मलकापूर व खामगाव येथे. नागपूर विद्यापीठाचे बी.ए. (१९२९) आणि एम्. ए. (१९३१). एम्. ए. च्या परीक्षेत मराठीत सर्वप्रथम आल्याबद्दल बेहरे पारितोषिक व सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांतील प्रथम क्रमांकाबद्दल मलक सुवर्णपद मिळाले. १९३१ साली ते एल्ए‌ल्‌. बी. ही झाले. तेव्हापासून १९६६ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते सरकारी महाविद्यालयांतून मराठीचे प्राध्यापक होते. १९४८ मध्ये महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानासंबंधी लिहिलेल्या प्रबंधावर त्यांस डॉक्टरेट मिळाली. १९५६ ते १९६६ ह्या काळात ते प्राचार्य होते. त्यानंतर नागपूर विद्यापीठाचे ते कुलगुरू होते (१९६६–७२). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाचे ते सदस्य आहेत.

कोलते ह्यांनी कवी म्हणून साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. लव्हाळी  हा त्यांचा काव्यसंग्रह  (१९३३). तथापि त्यांचा खरा पिंड संशोधकाचा असून महानुभावीय साहित्य हे त्यांच्या संशोधनाचे खास क्षेत्र होय. भास्करभट्ट बोरीकर : चरित्र व काव्यविवेचन (१९३५), महानुभाव तत्त्वज्ञान (१९४५), महानुभावांचा आचारधर्म (१९४८), श्रीचक्रधरचरित्र (१९५२) व महानुभाव संशोधन (१९६२) हे त्यांचे महानुभाव पंथाविषयीचे ग्रंथ त्यांच्या गाढ व्यासंगाचे व विवेचकतेचे निदर्शक आहेत. महानुभाव साहित्यातील केशवराज सूरिकृत मूर्तिप्रकाश (१९६२), दामोदर पंडित विरचित वछाहरण (१९५३), नरेंद्रविरचित रुक्मिणीस्वयंवर (१९४०), भास्करभट्ट बोरीकरकृत उद्धवगीता (१९३५) आणि शिशुपालवध (१९६०), मुनिव्यासकृत स्थानपोथी (१९५०), महिंद्रभट्ट किंवा म्हाइंभटकृत गोविंदप्रभुचरित्र (१९४४) आणि यथामूल पद्धतीने मुद्रित झालेले रवळो व्यासाचे सह्याद्रिवर्णन (१९६४) ही त्यांची साक्षेपी संपादने पाठचिकित्सापद्धतीने तयार केलेली आहेत. ‘चक्रधर आणि ज्ञानेश्वर’ (१९५०), ‘महानुभावांचे अवैदिकत्व’ यांसारखे त्यांचे स्फुटलेखनही लक्षणीय आहे. साहित्यसंचार (१९६५) आणि प्राचीन मराठी साहित्य संशोधन (१९६८) ह्या ग्रंथांतून त्यांचे अनुक्रमे अर्वाचीन व प्राचीन साहित्यासंबंधीचे स्फुटलेखन संकलित झालेले आहे. शिलालेखताम्रपटांच्या वाचनातही त्यांना गती आहे. विदर्भ साहित्य संमेलनाच्या गोंदिया येथील अधिवेशनाचे (१९४८) आणि महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या भोपाळ येथील अधिवेशनाचे (१९६७) ते अध्यक्ष होते.

संदर्भ: आष्टीकर, मधुकर, संपा.डॉ. कोलते गौरव ग्रंथ, अमरावती, १९६९. 

अदवंत, म. ना.