पेंडसे, श्रीपाद नारायण : (५ जानेवारी १९१३ – ). श्रेष्ठ मराठी कादंबरीकार. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी ह्या गावी. इयत्ता तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण कोकणात, दापोली येथे. नंतर बी. एस्‌सी. पर्यंतचे मुंबईस. काही काळ (१९३३ — ४२) ते शिक्षक होते. पुढे मुबंईच्या बेस्ट ह्या परिवहनसंस्थेत ते नोकरी करू लागले आणि उप-जनसंपर्क अधिकारी ह्या पदावरून १९६८ मध्ये निवृत्त झाले. खडकावरील हिरवळ (१९४१) हे पेंडसे ह्यांचे पहिले पुस्तक. त्यात त्यांनी लिहिलेली शब्दचित्रे संगृहीत केलेली आहेत. अशा शब्दचित्रात्मक लेखनाकडून नंतर ते कादंबरीकडे वळले. एल्गार (१९४९) ह्या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला जाणत्या रसिकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हद्दपार (१९५०) गारंबीचा बापू (१९५२), हत्या (१९५४), यशोदा (१९५७), कलंदर (१९५९), रथचक्र (१९६२), लव्हाळी (१९६६) आणि ऑक्टोपस (१९७२) अशा नऊ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. एल्गारपासून कलंदरपर्यंतच्या सहा कादंबऱ्यांत साखरपेंडी, दापोली, मुर्डी, गारंबी, हर्णै, दुर्गेश्वर इ. गावांच्या-यांपैकी गारंबी हे प्रत्यक्षातील आसूदवरून सुचलेले आणि साखरपेंडी, दुर्गेश्वर अनुक्रमे आंजर्ले आणि मुरुड या गावांवरून सुचलेली ठिकाणे आहेत –परिसरातील कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी प्रभावीपणे चित्रित केल्यामुळे प्रादेशिक कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. कादंबरीद्वारा अभिव्यक्त होणाऱ्या जीवनानुभूतीची एक अपरिहार्य गरज म्हणूनच त्या परिसराचे चित्रण त्यांच्या कादंबरीत आले त्यामुळे व्यक्ती व तिच्या भोवतालचा प्रदेश ह्यांच्यातील अपरिहार्य नात्याची जाणीव त्यातून व्यक्त झाली. घटना-प्रसंग, निवेदन, संवाद, भाषाशैली ह्यांसारख्या कादंबरीच्या घटकांची वेगवेगळी जाणीव ठेवून कांदबरीत केल्या जाणाऱ्या कृत्रिम सजावटीचे तंत्र पेंडसे ह्यांनी स्वीकारले नाही त्यांच्या प्रत्येक कादंबरीतील जीवनानुभव सहज-स्वाभाविकपणे रूपास येत गेला त्यामुळे कादंबरीच्या रूपाची एक वेगळी, अधिक परिपक्व जाणीव जोपासणारे कादंबरीकार म्हणूनही ते ख्याती पावले.

रथचक्र, लव्हाळी आणि ऑक्टोपस ह्या तीन कादंबऱ्या, पेंडशांच्या कादंबरीने घेतलेल्या वेगळ्या वळणाच्या द्योतक आहेत. साधू बनून परागंदा झालेल्या नवऱ्याचा संसार सांभाळणाऱ्या एका सामान्य स्त्रीचे भावजीवन आणि तिचा जीवनसंघर्ष रथचक्रात प्रत्ययकारीपणे साकारलेला आहे. ह्या कादंबरीला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले (१९६४). लव्हाळी ही कादंबरी एका सामान्य कारकुनाच्या रोजनिशीच्या स्वरूपात अवतरलेली आहे. जागतिक महायुद्धासारखी महान घटना घडत असताना त्याच्या जीवनात कोणत्या घडामोडी होत होत्या व त्या महान घटनेने त्याच्या जीवनाला कितपत स्पर्श केला, ह्याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ऑक्टोपस ह्या कादंबरीत, संवाद व पत्रे ह्यांच्या साहाय्याने पूर्ण आशय पेलण्याचा प्रयोग त्यांनी करून पहिला आहे. फडके—खांडेकर युगानंतरची नवी मराठी कादंबरी प्रामुख्याने पेंडसे ह्यांच्या कादंबऱ्यांतून प्रकटली. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन, स्वतःला तीव्रतेने जाणवलेली अनुभवसृष्टी त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून प्रामाणिकपणे उभी केल्यामुळे हरिभाऊंच्या परंपरेशी पेंडसे ह्यांच्या कादंबरीलेखनाचा सांधा सहजपणे जुळला. आपल्या अनुभवांचे रंगरूपही त्यांनी बारकाईने न्याहाळून आणि समजावून घेतले होते. विशिष्ट प्रदेशात आणि वातावरणात माणसांची मने आणि जीवने कसकसे रंग धारण करतात, ह्यासंबंधीच्या शोधातून आणि आकलनातून जन्माला आल्यामुळे पेंडशांच्या कादंबरीला मोठे बळ लाभलेले आहे. तथापि कल्पनारम्यता आणि स्वप्नरंजन ह्यांचा मोह त्यांनाही पूर्णत: टाळता आलेला नाही, अशी टीकाही त्यांच्या कादंबऱ्यांवर झालेली आहे. पेंडशांनी नाट्यलेखनही केलेले आहे. राजे मास्तर (१९६४), यशोदा (१९६५), गारंबीचा बापू (१९६५), असं झालं आणि उजाडलं (१९६९) ही त्यांची नाटके त्यांच्या अनुक्रमे हद्दपार,यशोदा, गारंबीचा बापू आणि लव्हाळी ह्या कादंबऱ्यांची नाट्यरूपे असून महापूर (१९६१), संमूसांच्या चाळीत (१९६७), चक्रव्यूह (१९७०) अशी काही स्वतंत्र नाटकेही त्यांनी लिहिली आहेत. जुम्मन (१९६६) हा त्यांचा कथासंग्रह.

श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस हे त्यांचे आत्मचरित्र १९७४ मध्ये प्रसिद्ध झाले. आपल्या जीवननिष्ठांचा आणि जीवनातील घटनांचा अन्वयार्थ लावण्याची डोळस चिंतनशीलता ह्या आत्मचरित्रात आढळून येते. लेखक म्हणून अनेक सन्मान पेंडसे ह्यांना लाभलेले आहेत. हद्दपार, हत्या, कलंदर ह्या कादंबऱ्यांना व संमूसांच्या चाळीत आणि चक्रव्यूह ह्या नाटकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. अन्य भाषांतून पेंडसे ह्यांचे साहित्य अनुवादित झालेले आहे. गारंबीचा बापू गुजराती, हिंदी व इंग्रजी ह्या भाषांतून हद्दपार गुजराती व इंग्रजीमधून रथचक्र गुजराती व हिंदी मधून आणि हत्या व कलंदर गुजरातीतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. रॉकफेलर फाउंडेशनच्या लेखकांकरिता असलेल्या ‘प्रवास शिष्यवृत्ती’ – करिता फाउंडेशन्‌ने १९५५ मध्ये त्यांची निवड केली होती. ही शिष्यवृत्ती मिळविणारे पेंडसे हे मराठीतील (आणि भारतातीलही) पहिले साहित्यिक. एकूण १५ महिन्यांच्या या शिष्यवृत्तीच्या काळात इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, पश्चिम, जर्मनी, अमेरिका, जपान, फिलिपीन्स, श्रीलंका आदी देशांत ते गेले आणि अनेक परदेशी साहित्यिकांशी त्यांनी विचारविनिमय केला.

मोहरीर, लता