पाल – २ : या सरपटणाऱ्या, मांसाहारी प्राण्याचा समावेश स्क्वॅमेटा गणाच्या गेक्कोनिडी कुलात होतो. या कुलात सु. ३०० जाती आहेत. पालीचा प्रसार सर्व जगभर झालेला असून उष्ण प्रदेशात ती कोठेही आढळते. तसेच ती अती दूर अशा महासागरी बेटांवरही आढळते. अगदी भिन्न परिस्थितींत राहण्यासाठी तिचे अनुकूलन झालेले असते. भारतात हेमिडॅक्टिलस  वंशातील पाली सामान्यतः आढळतात. हेमिडॅक्टिलस ब्रूकाय  हे सामान्य पालीचे शास्त्रीय नाव आहे. तसेच लाल पाल (हे. मॅक्युलॅटस ) द. भारत, महाराष्ट्र व गुजरात येथे आढळते. प्रशादची पाल (हे. प्रशादाय ) उत्तर कारवारमध्ये आढळते. लगामवाली पाल (हे. फ्रेनॅटस ) द. भारत व बंगालमध्ये आढळते. हे. फ्लॅव्हिव्हिरिडिस  ही जाती महाराष्ट्र, गुजरात व उ. भारतात सर्रास आढळते. हे. लेशेनॉल्टाय  ही जाती भारतात सर्वत्र झाडांवर आढळते. जाड शेपटीची पाल (यूब्लेफॅरीस हार्डविकाय ) बंगाल, बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व तमिळनाडूत आढळते. गेक्को गेक्को ही सामान्य जाती बिहार, बंगाल व अंदमान बेटांवर आढळते.

                      पाल व तिच्या पायाचा तळवा त्यांच्या आवाजावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. पालीच्या ओरडण्याला चुकचुकणे म्हणतात. पाल लहान, सामान्यतः निशाचर असून तिची लांबी ३५ सेंमी. पेक्षा जास्त नसते. तिची कातडी मऊ, शरीर धडधाकट, डोके मोठे व पाय कृश असतात. तिचे डोळे मोठे असून उठून दिसतात. डोळ्याला उघडमीट करणारी पापणी नसते पण एका       पारदर्शक आच्छादनाने त्याचे संरक्षण होते व ते बहुधा बदल झालेले निमेषक पटल [→  डोळा] असावे. ती लहान प्राणी व विशेषेकरून कीटक खाते. जीभ संवेदनाक्षम असून भक्ष्य पकडण्याच्या कामी तिची मदत होते.

पालीच्या बोटांचे परिवर्तन झालेले असून त्यामुळे तिला भिंतीवर चढता व पळता येते. बोटांची टोके किंवा तळ पसरट झालेले असतात. त्यांची खालची बाजू आडव्या पट्टांनी आच्छाद लेली असते व त्या पट्टांची रचना भिन्न वंशांत निरनिराळी असते. प्रत्येक पट्टाभोवती असंख्य, बारीक केसांसारख्या वाढी असून त्यांमुळे सर्व तळ मखमली दिसतो.

पालीने एखाद्या पृष्ठभागावर पाय टेकले म्हणजे दाबाने आडवे पट्ट फाकतात व त्यांच्या मध्ये असलेली हवा निघून जाऊन निर्वात जागा (पोकळ्या) तयार होतात. पट्टाभोवतील वाढी पृष्ठभागावर घट्ट दाबून बसतात. अशा तऱ्हेने पाल पृष्ठभागावर पकड घेते आणि तिला गुळगुळीत किंवा उभ्या पृष्ठभागावरून जलद हालचाली करता येतात. ती काचेवरून व पटईवरूनही पळू शकते.

पालीच्या नख्या चांगल्या विकास पावलेल्या असून त्यांना आवरण असते. त्या आवरणात ओढून घेता येतात. नैर्ऋत्य मध्य आफ्रिकेत आढळणाऱ्या पामेटोगेक्को  वंशातील पालीच्या पायाचे उल्लेखनीय परिवर्तन झालेले असते. हिच्या पायाला चिकटून राहण्याकरिता रचना नसते परंतु बोटांमध्ये पडदे असतात व त्यामुळे तिला भुसभुशीत वाळूत चालता येते व अंशतः बिळे करता येतात.

पालीची शेपटी बहुधा लांब व निमुळती होत गेलेली किंवा आखूड व बोथट गोलाकार असते. एका जातीत (जिम्नोडॅक्टिलस प्लॅटियुरस ) तर ती पानाच्या आकाराची असते. काही जातींत शेपटीचा उपयोग चरबी साठवून ठेवण्याचा अवयव म्हणून होतो. शेपटी सहज तुटणारी असते व काही कारणांनी ती तुटल्यास तिच्या जागी नवी शेपटी उत्पन्न होते. कातडी मऊ व नाजूक असते आणि तिच्यात सूक्ष्म कण असतात. कणांच्या मधून बऱ्याच वेळा मोठ्या गाठी असतात. पालीचा रंग पिवळसर करडा, तपकिरी व मळकट पांढरा असतो. मॅलॅगॅसीतील फेल्सुमा  वंशातील पाल चकचकीत हिरव्या रंगाची असून दिनचर आहे. पाल पांढरी व काहीशी कठीण कवचाची अंडी घालते. ती सुरक्षित जागी घातलेली असतात, पण नंतर मात्र त्यांची काहीही काळजी घेतली जात नाही.

गेक्को गेक्को  ही जात नारिंगी ठिपके असलेली, सर्वांत आक्रमक व सु. ३५ सेंमी. लांब असते. तिचे मूलस्थान आग्नेय आशिया आहे. उडणारी पाल (टायकोझून होमॅलोसेफॅलम ) २० सेंमी. लांब असून ती वृक्षवासी आहे. तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना कातडीच्या घड्या असून त्या उघडून ती उडी मारते व हवेत घसरत जाते. पाल सामान्यतः अनाक्रमक असते. मात्र काही ठिकाणी ती विषारी असल्याचा गैरसमज आहे. बहुधा त्याचे कारण म्हणजे ती भेसूर व भयंकर दिसते हे असावे. तसे पाहता ती कीटक खात असल्यामुळे मानवाला फारच उपयुक्त ठरली आहे.

जमदाडे, ज.वि.