मार्व्हल, अँड्रू : (३१ मार्च १६२१–१८ ऑगस्ट १६७८). इंग्रज कवी. विनीस्टेड, यॉर्कशर येथे जन्मला. १६३९ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून तो बी. ए. झाला. त्यानंतर काही काळ त्याने अध्यापन केले. मार्व्हल हा राजकीय जाणीव असलेला कवी. ऑलिव्हर क्रॉम्वेल ह्याच्या कॉमनवेल्थ सरकारला त्याचा आरंभी विरोध असला, तरी पुढे तो क्रॉम्वेलचा चाहता झाला, ‘… हॉरिशिअन ओड अपॉन क्रॉम्वेल्स रिटर्न फ्रॉम आयर्लंड’ (१६५०) ही त्याची कविता त्या दृष्टीने लक्षणीय आहे. क्रॉम्वेलचा पाल्य विल्यम डटन ह्याचा शिक्षक म्हणूनही त्याने काही काळ काम केले (१६५३–५७). १६५७ मध्ये परराष्ट्र कार्यालयात तो विख्यात इंग्रज कवी जॉन मिल्टन ह्याचा लॅटिन सेक्रेटरी म्हणून काम पाहू लागला. १६५९ साली इंग्लंडच्या पार्लमेंटवर सदस्य म्हणून तो निवडला गेला. सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्या त्याने कार्यक्षमतेने सांभाळल्या. १६६० मध्ये इंग्लंडमध्ये राजसत्तेची पुनःस्थापना होऊन दुसरा चार्ल्स राजपदी बसल्यावर मार्व्हल उपरोधप्रचुर राजकीय कवितांच्या लेखनाकडे वळला आणि त्यांतून राजा, त्याचे मंत्री आदींवर त्याने टीका केली. लंडन येथे तो निधन पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात सापडलेल्या त्याच्या कवितांच्या हस्तलिखितावरून त्याच्या कविता १६८१ मध्ये पहिल्यांदा संग्रहरूप झाल्या.

मार्व्हलच्या हयातीत कवी म्हणून नव्हे, तर एक राजकीय व्यक्ती म्हणून त्याला अधिक प्रसिद्ध मिळाली. एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ ललितनिबंधकार चार्ल्स लँब ह्याने मार्व्हलच्या कवितेची प्रशंसा केली. सतराव्या शतकातील मेटॅफिजिकल (मीमांसक) कवींच्या परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण कवी म्हणून त्याचे स्थान विसाव्या शतकातील कवींनी आणि समीक्षकांनी मान्य केले आहे. त्या दृष्टीने ‘टू हिज कॉथ मिस्ट्रेस’ सारखे त्याचे भावकाव्य उल्लेखनीय होय. संवेदना आणि विचार ह्यांतील द्वैत नष्ट होऊन सहजतेने आणि तर्कशुद्ध पद्धतीने एक कलात्मक युती साधली जाणे, ह्या तर्कशुद्धतेला तर्कशास्त्रातील संविधानाचे स्वरूप चपखलपणे प्राप्त होणे, ही मीमांसक कवितेची वैशिष्ट्ये त्यात आढळतात. भिन्न भिन्न अनुभूती प्रतिमांच्या साहाय्याने एकत्र आणताना मार्व्हल त्यांत फारशी क्लिष्टता येऊ देत नाही. उलट रचनेची सफाई, चमकदारपणा तसेच भावनांचा हळुवारपणा त्याच्या कवितेतून प्रत्ययास येतो. एक प्यूरिटन असूनही धर्मभावनेला फारसे महत्त्व न देता, मानवी जीवनातील निखळ आनंदाचा उद्‌घोष त्याने केला, हे त्याचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. निसर्गालाही त्याने महत्व दिले. त्याच्या कवितेतून आढळणाऱ्या निसर्गप्रेमाचे स्वरूप पाहता, तो विख्यात निसर्गपूजक इंग्रज कवी विल्यम वर्ड्‌स्वर्थ ह्याचा त्याचप्रमाणे पंचेंद्रियांनी निसर्गसौंदर्याचा आनंद उपभोगण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे जॉन कीट्‌स ह्या इंग्रज कवीचा पूर्वसूरी ठरतो.

त्याच्या उपरोधप्रचुर राजकीय कवितांमध्ये ‘लास्ट इन्स्ट्रक्शन्स टू अ पेंटर’ ही विशेष उल्लेखनीय होय. तत्कालीन दरबारी जीवनातील भ्रष्टाचारावर ह्या कवितेतून त्याने कठोर प्रहार केले आहेत. त्याच्या उपरोधप्रचुर राजकीय कविता १६८९ मध्ये पोएम्स ऑन अफेअर्स ऑफ स्टेट ह्या शीर्षकाने संगृहीत झाल्या. अनुभूतीतील विविध घटकांना साधणारे एक विधायक कलातत्त्व म्हणून त्याने उपरोधाचा उपयोग केला, हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य.

संदर्भ : 1. Bradbrook, M. C. Lloyd, Thomas, Andrew Marvell, Cambridge, 1940.

             2. Eliot, T. S. The Metaphysical Poets, 1921.

             3. Legouis, P. Andre Marvell, Poets, Purieaine, Patriote, Paris, 1928, (English Translation-1965).

             4. Margoliouth, H. M. Ed. The Poems and Letters of Andrew Marvell, 2 Vols., Oxford, 1927.

             5. Press, John. Andrew Marvell, London, 1958.

भागवत, अ. के.