बलुचिथेरियम : स्तनी वर्गातील पेरिसोडॅक्टिला गणाच्या (विषमखुरी गणाच्या)  र्हिनोसेरॅटिडी  कुलातील  एक  महाकाय  विलुप्त प्राणी. ऑलिगोसीन (सु. ३.५ — २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळाच्या सुरूवातीस हे प्राणी उदयास आले व मायोसीन (सु. २ — १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळाच्या सुरूवातीपर्यंत हे पृथ्वीवर विपुल प्रमाणात पसरलेले होते.

उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, यूरोप, आशिया व आफ्रिका या प्रदेशांत बलुचिथेरियम अस्तित्वात होते. आशिया खंडात हे सर्वांत जास्त प्रमाणात होते. बलुचिस्तानामध्ये याचे अवशेष सर्वप्रथम (१९११) सापडल्यामुळे त्याला ‘बलुचिस्तानातील श्र्वापद’ या अर्थाचे बलुचिथेरियम हे नाव दिले गेले.

बलुचिथेरियम : (तुलनेसाठी १.८ मी. उंचीच्या मानवाची आकृती काढली आहे).

बलुचिथेरियम आकारमानाने सर्वांत मोठा स्तनी प्राणी होय. त्याच्या शरीराची डोक्यापासून शेपटीपर्यंत लांबी सु. ४.५ मी. व खांद्याजवळ  उंची  सु.  ३  ते  ६  मी.  होती.  शरीर  मजबूत, पाय जाड  व  खांबासारखे, कातडी  जाड  व  राठ, शेपूट  आखूड, अगदी लहान कान असे याचे सर्वसाधारण वर्णन करता येईल. याला गेंड्यांप्रमाणे शिंग नव्हते. वरचा जबडा खालच्याच्या किंचित पुढे आलेला आणि वरचा ओठ खालच्या ओठावर लोंबलेला होता. पाने खुडून खाण्यासाठी त्याला याचा उपयोग होत असावा. भरपूर उंचीमुळे मोठ्या झाडांची कोवळी पाने याला सहज खाता येत असत. अवाढव्य आकारमानामुळे शत्रूंपासून संरक्षण मिळालेला हा एक शांत वृत्तीचा प्राणी होता, असा निष्कर्ष काढता येतो.

बलुचिथेरियमापासून पुढे र्हि नोसेरॉसांची (गेंड्यांची) उत्पत्ती झाल्याने यांना र्हि‍नोसेरॉसांचे पूर्वज म्हटले जाते. इतक्या प्रचंड प्रमाणावर विखुरलेले हे प्राणी समूळ नाहीसे कसे झाले, हा शास्त्रज्ञांपुढे पडलेला एक प्रश्र्नच आहे. याच्या स्पष्टीकरणार्थ पुढील काही कारणे दिली जातात. त्यांच्या शरीराच्या वाढीला मानाने त्यांचे तोंड व जबडा यांची वाढ फारच कमी झालेली दिसते. त्यामुळे स्वतःला पुरेल इतके अन्न न मिळाल्यामुळे हे नष्ट झाले असावेत. काळाच्या ओघात त्यांच्या वंशजांचे आकारमान लहान होऊ लागले व त्यांच्या मेंदूचा थोड्या फार प्रमाणात विकास झाला. या लहान आकारमानाच्या प्राण्यांसमोर जीवनकलहात निर्बुद्ध ठरल्यामुळे हे लुप्त झाले. त्सेत्से माश्यांसारख्या कीटकांमुळे पसरलेल्या साथीच्या रोगांना हे बळी पडले. त्यांचे अन्न असलेल्या मऊ वनस्पती क्रमविकासात (उत्क्रांतीत) कठीण बनल्याने त्यांचे दात झिजून भुकेमुळे हे प्राणी लुप्त झाले.

वरील चारींपैकी कुठल्याही स्पष्टीकरणाला सबळ शास्त्रीय पुरावा नाही परंतु शास्त्रज्ञांनी त्यांच्या अवशेषांवरील खुणांवरून  व झिजलेल्या दातांवरून काढलेली हा अनुमाने आहेत. यांपैकी कुठल्यातरी एका किंवा अधिक कारणांमुळे पृथ्वीवरील हे सर्वांत महाकाय स्तनी प्राणी मायोसीनच्या सुरूवातीस नामशेष झाले.

जोशी, लीना