ॲनॅकाँडा : दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, पेरू आणि गियानामधील दलदलीचा प्रदेश आणि नद्या यांत आढळणारा पाण-अजगर. अमेरिकेत आढळणारा हा सर्वांत मोठा साप होय. जगातील सर्वांत मोठ्या रेटिक्युलेटेड (जालमय) अजगराच्या इतकाच हा जवळजवळ मोठा आहे. पूर्वीच्या प्रवाशांनी याची लांबी आणि भक्ष्यग्रहणशक्ती यांविषयी अतिरंजित वर्णने केलेली आढळतात. पण आजपर्यंत आढळलेला मोठ्यांत मोठा ॲनॅकाँडा ९ मीटरांपेक्षा जास्त नाही. हा सर्प सहसा मनुष्यावर हल्ला करीत नाही, तरी पण तद्देशीय इंडियन लोक याला फारच घाबरतात. हा विषारी नाही. याचा रंग तपकिरी हिरवा असून पाठीवर मोठे, काळे, अंडाकृती ठिपके असतात. पोटाकडचा भाग पांढुरका असून त्यावर काळे ठिपके असतात. डोके लांबट, चपटे आणि मानेपासून स्पष्टपणे निराळे असते. ॲनॅकाँडा आपले भक्ष्य रात्री पकडतो. पक्षी आणि इतर प्राण्यांवर तो आपली उपजीविका करतो. प्राणी सबंध गिळल्यानंतर आपल्या अंगाची घट्ट वेटोळी करून तो गिळलेले प्राणी चिरडून मारतो. ⇨केमन जातीच्या मगरी हे याचे नेहमीचे खाद्य आहे. ॲनॅकाँडा बहुधा पाण्यात पडून राहतो. त्याचे सगळे शरीर पाण्याखाली आणि डोक्याचा थोडासा भाग पाण्यावर असतो. या स्थितीत तो आपले भक्ष्य टेहळीत असतो. मादीला दर वर्षी २०–४० पिल्ले होतात. ती सु. ९० सेंमी. लांब असतात. उपजल्याबरोबर ती स्वतंत्रपणे राहू लागतात.

पहा : अजगर.

कर्वे, ज. नी.