प्लीहा: (पानथरी). उदरगृहेत (उदराच्या पोकळीत) जठराच्या डाव्या बाजूस डाव्या वृक्काच्या (मूत्रपिंडाच्या) वर, मध्यपटल (उदरगुहा व वक्षीय गुहा यांना विभागणारे स्नायुमय पटल) आणि जठरबुघ्न (जठरागमी द्वारापासून डावीकडे वर मध्यपटलाच्या कमानीला भिडलेला घुमटाकार भाग) यांच्या मधे असलेल्या रक्ताभिसरण तंत्राशी (संस्थेशी) संबंधित असलेल्या अवयवाला ’प्लीहा’ म्हणतात. सर्वसाधारण भाषेत प्लीहेचा उल्लेख ’पानथरी’ असाही करतात. प्रौढावस्थेत सर्वसाधारणपणे मुठीच्या आकाराचा असलेला हा अवयव मऊ व ठिसूळ आणि गडद जांभळसर रंगाचा असून त्याचा आकार चतुःपृष्ठक(चार त्रिकोणी पृष्ठे असलेल्या घनाकृतीसारखा) असतो. सामान्यतःप्लीहेचे वजन १५० ते २०० ग्रॅ. असून लांबी १२ सेंमी., रुंदी ७ सेंमी. व जाडी ३-४ सेंमी. असते. उदरगुहेतील यकृत व वृक्क या मोठ्या अवयवांप्रमाणे प्लीहेलाही तिच्यापासून उत्पन्न होणारा स्त्राव वाहून नेणारी वाहिनी (वाहक नलिका) नसते. यामुळे तिचा समावेश पुष्कळ वेळा वाहिनीविहीन ग्रंथींमध्ये[⟶ अंतःस्त्रावीग्रंथि ] करतात.

इतिहास: प्लीहेबद्दलची जिज्ञासा २,००० वर्षीपूर्वीपासून जागृत झाली असावी, शास्त्रीय व इतर जुन्या लेखांतून प्लीहेचा उल्लेख अनेक शतकांपासून आढळतो. गेलेन (इ. स. १३१-२०१) या ग्रीक वैद्यांनी’अती गूढ अवयव’ असा प्लीहेबद्दल उल्लेख केला आहे. आनंद, राग या भावना आणि पळण्याचा वेग यांचा प्लीहेशी संबंध असल्याचे प्रतिपादण्यात आले आहे. प्लेटो (इ.स.पू. ४२७-३४७) व ॲरिटीअस(इ.स. पहिले शतक) यांनी प्लीहा ’काळे रक्त किंवा काळे पित्त गाळणारा’ अवयव असल्याची कल्पना मांडली होती. सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या ॲन्ड्र्यू बोर्ड नावाच्या मठवासी वैद्यांनी प्लीहेबद्दल ’ती माणसाला आनंदी बनवून हसावयास लावते परंतु प्लीहेत अडथळा उत्पन्न झाल्यास औदासिन्य उत्पन्न होते’ असे म्हटले आहे.

मार्चेल्लो मालपीगी (१६२८-९४) या इटालियन शरीररचनाशास्त्रज्ञांनी प्लीहेच्या सूक्ष्मदर्शकीय रचनेचे प्रथम वर्णन केले व त्यांनीच हा अवयव रक्ताभिसरण तंत्राशी संबंधित असल्याचे दाखवून दिले. माथिस, बार्बेट, क्लार्क व जी. बी. मोर्गान्ये या शास्त्रज्ञांनी कुत्र्यावरील प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रियेच्या परिणामांचा अभ्यास करून निरनिराळ्या वेळी त्याविषयी माहिती प्रसिद्ध केली. प्रत्येकाने असे दाखवून दिले की, हा अवयव निरोगी जीवनास अनावश्यक आहे. नेमकी हीच गोष्ट ॲरिस्टॉटल (इ.स. पू. ३८४-३२२) या ग्रीक शास्त्रज्ञांनी कित्येक शतकांपूर्वी प्रतिपादिली होती.

काही शतकांपूर्वी लष्करी शस्त्रक्रियाविशारदांनी मानवातील प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रिया केल्या होत्या पण त्या सर्व प्लीहेच्या आघातजन्य विकृतीकरिताच होत्या. क्विटेनबॉम यांनी १८२६ मध्ये व स्पेन्सर वेल्स यांनी १८७६ मध्ये आघातविरहित रोगावरील इलाज म्हणून प्लीहा-उच्छेदनाचा प्रथम उपयोग केला. त्यानंतर गंभीर रक्तस्त्राव व सूक्ष्मजंतू संक्रामणामुळे रोगी दगावण्याच्या भीतीने ही शस्त्रक्रिया करणे जवळ जवळ पुढील पस्तीस वर्षे बंद होते. शस्त्रक्रियाविज्ञानाच्या प्रगतीनंतर ही शस्त्रक्रिया करण्यास पुन्हा सुरूवात झाली. आधुनिक काळात ती अनेक विकृतींवरील इलाज म्हणून केली जाते व एक निर्धोक शस्त्रक्रिया म्हणून गणली जाते. आज रक्तासंबंधीच्या काही रोगांवर प्लीहाउच्छेदन शस्त्रक्रिया एक उपयुक्त व निर्धोक शस्त्रक्रिया म्हणून मान्य झाली आहे. १९२१ मध्ये प्रसिद्ध शस्त्रक्रियाविशारद बी. जी. ए. मोयनिहॅन यांनी या शस्त्रक्रियेसंबंधी सखोल व विस्तृत माहिती लिहून ठेवली आहे.

सर्वसाधारण वर्णन : प्लीहेस मध्यपटलाकडील व अंतस्त्यांकडील (उदरातील अवयवांकडील) असे दोन पृष्ठभाग, ऊर्ध्व व अधःस्थ(वरची व खालची) अशा दोन कडा आणि अग्र व पश्च (पुढचे व मागचे) अशी दोन टोके असतात. मध्यपटल पृष्ठभाग बहिर्गोल असतो व तो मध्यपटलाच्या उदरगुहीय पृष्ठभागाशी संलग्न असतो. यामुळे श्वसनक्रियेच्या वेळी मध्यपटलाबरोबरच प्लीहेची हालचाल होणे अपरिहार्य असते. मध्यपटलाच्यावर म्हणजे त्याच्या फुप्फुसावरण पृष्ठभागाशी संबंधित डाव्या फुप्फुसाचा तळाचा भाग, त्यावरील फुप्फुसावरण आणि डावीकडील नववी, दहावी व अकरावी या फासळ्या असतात. प्लीहा डाव्या अकराव्या फासळीशी जवळजवळ समांतर असते. अंतस्त्य पृष्ठभागावर जठर डावे वृक्क (मूत्रपिंड), ⇨ अग्निपिंडपुच्छ व बृहदांत्र (मोठे आतडे) यांच्या सान्निध्यामुळे उमटलेले कमीजास्त खोलगट ठसे असतात. अंतस्त्यांच्या नावांवरून या ठशांना जठरांकन, वृक्कांकन, अग्निपिंडांकन व बृहदांत्रांकन अशी नावे दिली आहेत. जठरांकनाशी जठर पश्व भित्ती, वृक्कांकनाशी डाव्या वृक्काचा वरचा आणि अग्रपृष्ठभाग, अग्निपिंडांकनाशी अग्निपिंड पुच्छ व बृहदांत्रांकनाशी डावा बृहदांत्र बाक संलग्न असतात.


आ.१. प्लीहा व तिचा अंतस्त्य पृष्ठभाग : (१) वरचे टोक, (२) ऊर्ध्वस्थ अथवा अग्र कडा (दोन खोबणी), (३) खालचे टोके, (४) अधःस्थ अथवा पश्च कडा, (५) जठरांकन, (६) बृहदांत्रांकन, (७) अग्निपिंडांकन, (८) वृक्कांकन, (९) रक्तवाहिन्या, (१०) नाभिका.जठरांकनाच्या पश्च भागात एक अनियमित स्वरूपाची खाच असते, तिला ’नाभिका’ म्हणतात. नाभिकेतून रक्तवाहिन्या, तंत्रिका (मज्जातंतू) व लसीका वाहिन्या (रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या नलिका) प्लीहेच्या मगजात (मऊ, लिबलिबीत पेशीसमूहात) शिरतात. ऊर्ध्व अथवा वरची कडा खालच्या कडेपेक्षा काहीशी अग्र बाजूस येत असल्यामुळे तिला अग्र कडा व खालचीला पश्च कडा असेही म्हणतात. अग्र कडा स्पष्ट असून तिच्यावर एक किंवा दोन खोबणी असतात. मध्यपटल पृष्ठभाग आणि वृक्कांकन यांच्यामध्ये पश्च कडा असते. प्लीहेचे पश्व टोक बोथट व गोलसर असून कशेरूकदंडाकडे (पाठीच्या कण्याकडे) असते. अग्र टोक चापट आकाराचे असून त्यावर बृहदांत्राचा डावा बाक टेकलेला असतो.

प्लीहेचा बहुतांश पृष्ठभाग पर्युदराने (उदरगुहेत भित्तींच्या आतील बाजूवर आणि तीमधील अंतस्त्यांवर कमीजास्त प्रमाणात पसरलेल्या पातळ अस्तरासारख्या पटलाने) वेष्टिलेला असतो व तिच्या संपुटास (तंतुमय आवरणास) पर्युदर घट्ट चिकटलेले असते. प्लीहा काहीशा सैल बंधांनी जठर व पश्च उदर भित्तीला जखडलेली असते. हे बंध पर्युदराच्या घड्यांचे बनलेले असतात व त्यांना ’जठर-प्लीहा बंध’ आणि ’प्लीहा-वृक्क बंध’ आशी नावे आहेत.

रचना : मानवी प्लीहा तंतुमय ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा-पेशींचा-समूह) व प्रत्यास्थ (लवचिक) तंतू मिळून झालेल्या थरांनी बनलेल्या संपुटात वेष्टिलेली असते. संपुटात अत्यल्प स्नायू ऊतकही विखुरलेले असते. संपुटापासून मगजामध्ये जाणाऱ्या अनेक प्रपट्टिका (मगजाचे छोटे छोटे भाग पाडणारे तंत्वात्मक बंध) विखुरलेल्या असतात. मगजाच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीत काही भाग पांढरा किंवा करडा-पांढरा व काही भाग तांबडा दिसतो. पांढरा भाग वसाभ (स्निग्ध पदार्थांसारखे) ऊतक असून ते रोहिण्यांच्या भोवती आवरणासारखे पसरलेले असते. रोहिणिकांभोवती त्यांचे केशवाहिन्यांत (सूक्ष्म रोहिण्या व सूक्ष्म नीला यांना जोडणाऱ्या सूक्ष्म नलिकांत) विभाजन होईपर्यंत हा वसाकोशिकांचा थर असतो. काही ठिकाणी हा थर विस्तार पावतो आणि तेथे वसापुटके बनतात. या पुटकांना ’मालपीगीय पुटके’ (मालपीगी या शरीरचनाशास्त्रज्ञांच्या नावावरून) म्हणतात. प्रत्येक पुटकाचा व्यास ०·२५ ते १·० मिमी. एवढा असतो. ताज्या प्लीहाच्छेदाच्या पृष्ठभागावर ही पुटके अर्धपारदर्शक पांढऱ्या टिंबाप्रमाणे विखुरलेली दिसतात. मालपीगीय पुटके वसाकोशिका निर्माण करणारी केंद्रे असतात व त्यांमध्ये लसीका वाहिन्या नसतात. पुटकात तयार होणाऱ्या वसाकोशिका अमीबीय गतीने [⟶ अमीबा] तांबड्या भागात शिरतात व तेथे त्यांची वृद्धी होते. वाढत्या वयाबरोबर या पुटकांची अपपुष्टी होते व वृद्धावस्थेत त्यांचा अभावही संभवतो. तांबडा भाग छोट्या छोट्या नीला कोटरिकांचा (अशुद्ध रक्ताने भरलेल्या पोकळ्यांचा) बनलेला असल्यामुळे तांबडा दिसतो. या भागातच कोशिकारचनेपासून बनलेले रज्जू विखुरलेले असतात व त्यांना ’प्लीहारज्जु’ किंवा ’बिलरोट रज्जू’ (सी.ए.टी. बिलरोट या शस्त्रक्रियाविशारदांच्या नावावरून) म्हणतात. हे रज्जू रक्तातील कोशिका व पुष्कळ महाभक्षी कोशिका (सूक्ष्मजीव व इतर बाह्य कण यांचे भक्षण करणाऱ्या मोठ्या कोशिका) मिळून बनलेले असतात. महाभक्षी कोशिकांच्या विपुलतेमुळेच प्लीहेला ⇨जालिका-अंतःस्तरीयतंत्रामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. तांबड्या व पांढऱ्या मगजाचे प्रमाण सारखे नसते व ते सूक्ष्मजंतू संक्रामण, विषबाधा वगैरे शारीरिक विकृतीप्रमाणे बदलते.

 आ.२. प्लीहेची स्थूल अंतर्रचना : (१) प्लीहा संपुट, (२) प्रपट्टिका, (३) प्लीहा मगज, (४) प्लीहेत शिरणाऱ्या व तिच्यातून बाहेर पडणाऱ्या रक्तवाहिन्या.प्लीहेचा  रक्तपुरवठा  व तीमधील  रक्ताभिसरण : प्लीहेला शुद्ध रक्त पुरवठा करणाऱ्या रोहिणीला प्लीहा रोहिणी म्हणतात व ती उदरगुहीय महारोहिणीच्या उदरगुहीय रोहिणीची शाखा असते. नाभिकेजवळ प्लीहा रोहिणीच्या पाच-सहा शाखा होतात व त्या खाचेतून आत शिरतात. त्यांच्या   उपशाखांमार्फत संपूर्ण प्लीहा मगजाला रक्तपुरवठा होतो. अशुद्ध रक्त नाभिकेवाटे बाहेर पडणाऱ्या पाच-सहा नीलांच्या संयोगामुळे बनणाऱ्या प्लीहा नीलेतून वाहून नेले जाते. प्लीहा नीला व ऊर्ध्व आंत्रबंध नीला मिळून प्रवेशिका नीला बनते [⟶ रक्ताभिसरण तंत्र]. अशा प्रकारे प्लीहेतील अशुद्ध रक्त या नीलेमार्फत यकृतातील रक्ताभिसरणात मिसळते.

प्लीहेतील रक्तपुरवठ्याचे वैशिष्ट्य असे आहे की, रोहिणिका पातळ भित्ती असलेल्या कोटरिकांत रक्त आणून सोडतात. तेथून रक्त छोट्या नीलांद्वारे गोळा केले जाते. या कोटरिका विस्फारणक्षम असल्यामुळे पुष्कळसे रक्त त्यांत सामावू शकते. खालच्या दर्जाच्या प्राण्यांमध्ये प्लीहा संपुटात भरपूर अरेखित(ज्यांच्यावर रेखा नाहीत असे, अनिच्छावर्ती) स्नायू ऊतक असते व तंत्रिका उद्दीपनामुळे प्लीहेची जोरदार आकुंचने होऊ शकतात. याउलट जरूर तेव्हा संपुट शिथिल बनून रक्तसाठा पुष्कळ वाढू शकतो. प्लीहेची रक्तसाठा कमीजास्त करण्याची ही क्षमता खालच्या दर्जाच्या प्राण्यांमध्ये महत्त्वाची असते. व्यायाम किंवा इतर शारीरिक ताण वाढल्यास प्लीहेच्या आकुंचनामुळे तीमधील रक्त सर्वसाधारण रक्ताभिसरणात ढकलले जाते. त्यामुळे रक्ताभिसरणातील तांबड्या कोशिकांची वाढीव संख्या अधिक ऑक्सिजनाचा पुरवठा करते. तांबड्या कोशिकांची ही वाढ विशिष्ट उपकरणाने मोजता येते व ती ३ ते ४% वाढल्याचे आढळते.


आ.३. प्लीहेतील कार्यात्मक रक्ताभिसरण : (१) प्लीहा संपुट, (२) रोहिणी, (३) नीला, (४) नीला कोटरिका, (५) मगज, (६) केशवाहिन्या.

प्लीहेतील सूक्ष्म रक्ताभिसरणाबद्दल निरनिराळे सिद्धांत मांडले जातात.’बंदिस्त रक्ताभिसरण’ सिद्धांतात रक्त फक्त वाहिन्यांतूनच फिरते व त्याचा वाहिनीबाह्य ऊतकाशी संबंध येत नाही, म्हणजेच रोहिणिकांच्या केशवाहिन्या व नीला केशवाहिन्या यांच्या अवकाशिका (पोकळ्या) एकमेकींस जोडलेल्या असतात. ‘अनावृत रक्ताभिसरण’ सिद्धांतात रोहिणिका केशवाहिन्यांतील रक्त सरळ तांबड्या मगजाच्या जाळ्यात पसरते. हे सिद्धांत प्लीहेच्या तांबड्या कोशिकांची निवड, साठा इ. कार्याशी संबंधित आहेत.

प्लीहेतील नीला कोटरिका सापेक्षतःआकाराने मोठ्या व जटिल (गुंतागुंतीच्या) असून त्यांची संख्याही बरीच असते. तांबडा मगज प्रामुख्याने या कोटरिकांचा बनलेला असतो. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली कोटरिकांच्या भित्तीतील दोन कोशिकांमध्ये फट असल्याचे दिसते. अशा पुष्कळशा फटींतून रक्त मगजात जाऊ येऊ शकते व एका कोटरिकेतून संलग्न कोटरिकेत प्रवेश करू शकते. कोटरिकांतील रक्त छोट्या छोट्या नीला केशवाहिन्यांतून प्लीहा नीलेकडे वाहून नेले जाते.

कार्य: प्लीहेच्या कार्याविषयी संपूर्ण ज्ञान अजून प्राप्त झालेले नाही. ती प्रामुख्याने कोशिकाभक्षण, कोशिकानिर्मिती, तांबड्या कोशिकांचा संचय व प्रतिरक्षा (रोगप्रतिकार) यांत भाग घेते. सर्वसाधारणपणे तिच्या कार्यात खाली वर्णन केलेल्या गोष्टींचा समावेश होतो.

कोशिकाभक्षण: प्लीहेतील महाभक्षी कोशिका जालिका-अंतःस्तरीयतंत्राचा महत्त्वाचा भाग असून त्या मृत कोशिकांचे अवशेष, जीर्ण तांबड्या कोशिकांच्या अपघटनातून (घटक द्रव्ये अलग होण्याच्या क्रियेतून) तयार होणारे पदार्थ, जीर्ण बिंबाणू (रक्त साखळण्याच्या क्रियेशी व तीत तयार होणारी रक्ताची गुठळी आकुंचित करण्याच्या क्रियेशी संबंधित असलेल्या वर्तुळाकार वा दीर्घवर्तुळाकार सूक्ष्म तबकड्या), जीर्ण श्वेत कोशिका, सूक्ष्मजंतू व सूक्ष्मजीव (उदा., हिवतापाचे परजीवी म्हणजे दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे जीव) यांसारख्या टाकाऊ पदार्थांचे भक्षण करतात. महाभक्षी कोशिका निरनिराळ्या प्रकारच्या असून त्यांची क्रियाशीलता कमीजास्त असते. जीर्ण तांबड्या कोशिका जेव्हा प्लीहेच्या रक्ताभिसरणात येतात तेव्हा त्यांचे वसाभ वेष्टन अधिक दुर्बल बनते व सूक्ष्म केशवाहिन्यांच्या अवकाशिकेतून चेंबटून जाताना त्या फुटतात. जीर्ण तांबड्या कोशिकांच्या अपघटनाच्या सर्व अवस्था प्लीहेतील महाभक्षी कोशिकांतून आढळतात. अपघटनाच्या शेवटी ⇨पित्तारुणतयार होते व ते प्लीहा नीलेद्वारे यकृताकडे वाहून नेले जाते. अपघटनात मुक्त झालेले लोह, अस्थिमज्जेत (लांब हाडांच्या अंतर्भागातील पोकळ जागेतील मऊ पदार्थात) अधिकांश प्रमाणात नव्या तांबड्या कोशिकांच्या उत्पादनात वापरले जाते.

कोशिकानिर्मिती : गर्भावस्थेत, अर्भकावस्थेत व शैशवावस्थेत प्लीहा तांबड्या व श्वेत कोशिकांची निर्मिती करते. जन्मानंतर तांबड्या कोशिकांच्या उत्पादनाचे कार्य अस्थिमज्जा कार्यान्वित होताच थांबते. काही विकृतींत उदा., नवजात रक्तकोशिकाजनकाधिक्य (नवजात अर्भकामध्ये तांबड्या कोशिका ज्यापासून तयार होतात त्या जनक कोशिकांच्या संख्येत वाढ होणारी, तसेच रक्तविलयजन्य-तांबड्या कोशिकांतील हीमोग्लोबिन हे ऑक्सिजनवाहक रंगद्रव्य अलग होण्याच्या क्रियेमुळे उद्‌भवणारा – रक्तक्षय व गंभीर कावीळ असणारी विकृती), प्लीहा तांबड्या कोशिकांच्या उत्पादनाचे कार्य जन्मानंतरही चालूच ठेवते. या विकृतीत गर्भावस्थेत रक्तरसातील अपसामान्य प्रतिपिंडामुळे [⟶ प्रतिपिंड] तांबड्या कोशिकांचा फार मोठ्या प्रमाणावर नाश होतो. म्हणून प्लीहेला नेहमीपेक्षा दसपटीने त्यांचे उत्पादन वाढवावे लागते व ते कार्य जन्मानंतर काही आठवडे चालू ठेवावे लागते. श्वेत कोशिका उत्पादन प्रौढावस्थेतही चालूच असते. एककेंद्रकी (कोशिकेतील क्रियांवर नियंत्रण ठेवणारा एकच गोलसर पुंज असलेल्या) कोशिकांचे उत्पादन मालपीगीय पुटकांत होते. पांढऱ्या मगजात प्रतिरक्षाक्षम श्वेत कोशिकांचे उत्पादन होते.

तांबड्या कोशिकांचा राखीव संचय करणे: समुद्रसपाटीपासून फार उंच प्रदेशात गेल्यास रक्तस्त्रावामुळे किंवा कार्बन मोनॉक्साइडाच्या विषबाधेमुळे उत्पन्न होणारी ऑक्सिजन-न्यूनता प्लीहेच्या आकुंचनास चेतना देते व त्यामुळे तीमधील निरुद्योगी परंतु सुस्थितीत असलेल्या तांबड्या कोशिका रक्ताभिसरणात ढकलल्या जातात व रक्ताची ऑक्सिजन वहनक्षमता वाढते. ही प्रतिक्रिया कुत्रा व मांजर या प्राण्यांत उपयुक्त असते कारण त्यांच्या एकूण रक्त घनफळापैकी १५ ते ३०% भाग प्लीहेत असतो. 


लोह चयापचय व लोह संचय : जीर्ण तांबड्या कोशिकांचा नाश करणे हे प्लीहेचे प्रमुख कार्य असल्यामुळे प्लीहा लोह चयापचयात (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींत) व संचयात भाग घेते. प्लीहेचा उल्लेख तांबड्या कोशिकांचे ’स्मशान’ असाही करतात. जेव्हा या कोशिकांचा प्रमाणापेक्षा जादा नाश होतो तेव्हा प्लीहेतील हीमोसिडेरीन या लोहयुक्त रंगद्रव्याचे प्रमाण वाढते. प्राकृतिक (सर्वसामान्य) अवस्थेतही प्लीहेत २०% लोह असलेल्या फेरिटीन नावाच्या प्रथिनाचा साठा असतो. स्तनपान करावयाच्या अर्भकावस्थेत हा लोहाचा साठा उपयुक्त असतो कारण दुधात लोह अत्यल्प प्रमाणात असते.

बाह्य पदार्थाचा भक्षिकोशिकाक्रियेने नाश करणे: प्लीहेतील जालिका-अंतःस्तरीयकोशिका या क्रियेने रक्तातून बाह्य पदार्थ काढून घेतात. वसादुष्पुष्टी (वसाभ पदार्थांचे सदोष पोषण होणे) या विकृतीत रक्तातील अपसामान्य वसाभ पदार्थ प्लीहेतील या क्रियेने काढून घेतल्यामुळे प्लीहावृद्धी होते.

प्रतिरक्षात्मक कार्य: प्लीहा प्रतिपिंड उत्पादनात भाग घेते. प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रिया करण्यात आलेली मुले प्राकृतिक अवस्थेतील (प्लीहा शाबूत असलेल्या) मुलांपेक्षा तीव्र संसर्गजन्य रोगांना अल्प प्रतिरोध करू शकतात. तीव्र प्रतिरक्षा चेतना मिळाली असता प्लीहेतील महाभक्षी कोशिकांची वृद्धी होते, लसीका कोशिकांचे [⟶ लसीका तंत्र] उत्पादन वाढते व प्रतिपिंडोत्पादक प्लाविका कोशिकांची (रूपांतरित लसीकाभ कोशिकांची) संस्था वाढते. अनेक तीव्र व चिरकारी (दीर्घकालीन) संक्रामणजन्य विकृतींत प्लीहावृद्धी आढळते.

हॉर्मोन उत्पादनाद्वारे अस्थिमज्जेच्या कार्यावर नियंत्रण करणे अस्थिमज्जेतील श्वेत कोशिका व बिंबाणू यांच्या उत्पादनावर प्लीहा विशिष्ट हॉर्मोनाद्वारे (उत्तेजक स्त्रावाद्वारे) नियंत्रण करीत असावी, असा अल्पसा पुरावा उपलब्ध आहे. विल्यम दामेश्क (१९००-६९) या शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे बिंबाणु-न्यूनताजन्य नीलारुणी रोग (त्वचेखाली जागजागी रक्तस्त्राव होणारी विकृती) या हॉर्मोनाच्या विकृत उत्पादनामुळे होत असावा.

 आ. ४. बोटांनी चाचपून प्लीहेची तपासणीकाही विकृती : प्लीहावृद्धी: प्राकृतिक अवस्थेत पोट बोटांनी डाव्या बरगडीखाली चाचपडून पाहिल्यास प्लीहा बोटास लागत नाही. तशी ती लागल्यास प्लीहावृद्धी झाली असे म्हणतात. अनेक रोगांमध्ये प्लीहावृद्धी हे एक लक्षण असते. याकरिता संपूर्ण शारीरिक तपासणीमध्ये प्लीहावृद्धी आहे किंवा नाही हे ठरवणे अत्यावश्यक असून अशी तपासणी निदानास उपयुक्त असते.

 प्लीहावृद्धीच्या कारणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (अ) सूक्ष्मजंतू संक्रामण: (१) तीव्र संक्रामण : जंतुविषरक्तता (सूक्ष्मजंतू व त्यांच्यापासून तयार होणारी विषे यांचा रक्तात मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाल्यामुळे उद्‌भवणारी मारक अवस्था), आंत्रज्वर (टायफॉइड ज्वर), व्हायरसजन्य यकृतशोथ (यकृताची दाहयुक्त सूज), प्लेग, कंगुक्षय (क्षयरोगजंतूंमुळे फुप्फुसावर किंवा मस्तिष्कावरणावर-मेंदूच्या आवरणावर-राळ्याच्या दाण्याएवढ्या क्षयपीटिका तयार होणारा रोग) वगैरे. (२) चिरकारी संक्रामण: हिवताप, ⇨ काळा आजार. (आ) रक्तासंबंधीच्या विकृती: रक्तविलयनजन्य रक्तक्षय, लोहन्यूनताजन्य रक्तक्षय, रक्तार्बुद करणाऱ्या इंद्रियांचा एक मारक रोग), बहुरक्तकोशिकारक्तता (रक्तातील तांबड्या कोशिकांच्या संख्येत वाढ होणे). (इ) रक्ताभिसरणांसंबंधीचे रोग : रक्ताधिक्ययुक्त हृद्‌निष्फलता (ऊतकांना रक्तपुरवठा करण्याच्या हृदयाच्या कार्यात दीर्घकाल बिघाड होणे), प्रवेशिका नीलेतील अतिरक्तदाब. (ई) ऊतक अंतःसंचरणजन्यरोग: ग्रंथिक रोग (लसीका ग्रंथी, त्वचा, फुप्फुस व अस्थी यांमध्ये क्षयपीटिका सद्दश गुलिका उत्पन्न होणारी अज्ञातहेतुक विकृती), वसा-चयापचयजन्य विकृती (उदा., गौचर रोग-पी.सी.ई. गौचर या फ्रेंच वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या-या रोगामध्ये जालिका-अंतःस्तरीय कोशिकांची अतिवृद्धी होऊन प्लीहावृद्धी होते). (उ) इतर काही विकृती: लसीका मांसार्बुद (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेली लसीकाभ ऊतकयुक्त गाठ), द्रवार्बुद (द्रवयुक्त गाठ), हॉजकीन रोग [टॉमस हॉजकीन या इंग्रज वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा लसीका तंत्राचा विकार ⟶ लसीका तंत्र].

प्लीहावृद्धीतील आकारमानावरून काही रोगांच्या निदानास मदत होते. अती प्लीहावृद्धी चिरकारी हिवताप किंवा काळा आजार दर्शविते. अस्थिमज्जाभ रक्तार्बुद या विकृतीत प्लीहेचे वजन ६,००० ते ८,००० ग्रॅ. पर्यंत वाढते व संपूर्ण उदरगुहा प्लीहेने व्यापली जाते. 


प्लीहा विदारण: औद्यौगिक किंवा वाहतुकीत उद्‌भवणाऱ्या अपघातात अनेक वेळा प्लीहा विदारणाचा (फाटण्याचा) संभव असतो. पोटावर मारलेला गुद्दा किंवा डाव्या पाठीत खालच्या बरगड्यांजवळ बसलेला ठोसा आघातजन्य विदारणास कारणीभूत असू शकतो. उष्ण कटिबंधी प्रदेशातून जिथे हिवतापाचे प्रमाण अधिक असते तिथे प्लीहा विदारणाचे प्रमाण अधिक आढळते. पुष्कळ वेळा हे विदारण आघातविरहित व आपोआप झाल्याचेही आढळते. सांसर्गिक एककेंद्रकी कोशिकाधिक्य अथवा ग्रंथिक ज्वर या विकृतींत प्लीहावृद्धी अल्प असूनही प्लीहेची आपोआप विदारणाची अनुकूलता अधिक असते. या विकृतीत अनेक वेळा प्लीहा विदारण मृत्यूचे तत्कालीन कारण असते. प्लीहा विदारणाचे रोगी सर्वसाधारणपणे तीन गटांत विभागता येतात. (अ) रक्तस्त्रावजन्य अवसादातच (सार्वदेहिक प्रतिक्षोभातच) जलद मृत्युमुखी पडणारे: यामध्ये प्लीहेच्या रक्तवाहिन्या नाभिकेच्या आसपास तुटलेल्या असतात व रोगी वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच दगावतो. (आ) सुरुवातीस अवसाद, काही काळ अवसादातून बरे होण्याची लक्षणे दिसणे व नंतर प्लीहा विदारणाची लक्षणे दिसणे. (इ) सुरुवातीच्या अवसादानंतर रोगी पूर्ण बरा होतो व कालांतराने कधीकधी दोन आठवडे किंवा त्याहून जास्त काळानंतर गंभीर उदरगुहीय रक्तस्त्रावाची लक्षणे उद्‌भवणे.

प्लीहा विदारणाची शंका असल्यास उदरच्छेदन व प्लीह-उच्छेदन शस्त्रक्रिया करतात. या शस्त्रक्रियेत रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे रक्ताधान किंवा आत्म-रक्ताधान (रोग्याच्या उदरगुहेतील रक्तस्त्रावामुळे साचलेले रक्त परत त्याच्या रक्ताभिसरणातून देणे) उपयुक्त असते.

प्लीहाउच्छेदन शस्त्रक्रिया व तिचे परिणाम : प्लीहेचा काही भाग शस्त्रक्रियेत काढून टाकल्यास त्या भागाचे पुनर्जनन घडून येते. काही रोगांमध्ये संपूर्ण प्लीहा काढून टाकणे उपयुक्त असते उदा., बिंबाणु-न्यूनताजन्य नीलरुणी रोग, द्रवार्बुद. संपूर्ण प्लीहा काढल्यानंतर कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत. ती जालिका-अंतःस्तरीय तंत्राचा एक भाग असल्यामुळे तिच्या अभावात तंत्राचे इतर भाग तिचे कार्य करू शकतात. तरीदेखील फार लहानपणीच प्लीहा-उच्छेदन केल्यास शरीरात प्रतिरक्षा तयार होण्याची गती मंदावते व परिणामी सूक्ष्मजंतुजन्य शोथविकाराबाबतची ग्रहणशीलता वाढते. याकरिता तीन वर्ष वयाखालील मुलात ही शस्त्रक्रिया जीवनावश्यक असल्यासच करतात. प्रौढ वयात प्लीहा-उच्छेदनानंतर काही महिने टिकणारा सौम्य रक्तक्षय उत्पन्न होतो. काही दिवसांतच रक्तातील बहुकेंद्रकी कोशिका, अरुणकर्षी (इओसीन नावाच्या गुलाबी रंजकाने सुलभपणे अभिरंजित करता येणाऱ्या) कोशिका व बिंबाणू यांच्या संख्येत वाढ होते परंतु हा परिणाम अल्पकाळ टिकणारा असून हळूहळू कमी होतो.

खालच्या दर्जाच्या पृष्ठवंशी प्राण्यांतील प्लीहा: कुत्रा व मांजर यांसारख्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत प्लीहा हा महत्त्वाचा अवयव असतो. कारण त्यांच्या शरीरातील एकूण रक्त घनफळाचा १५ ते ३०% भाग प्लीहेत असतो. याशिवाय त्यांच्या प्लीहा संपुटात स्नायू ऊतक भरपूर प्रमाणात असल्यामुळे तिची जोरदार आकुंचने होऊ शकतात. काही प्राण्यांमध्ये प्लीहा ऊतकाचे पुंजके वसाभ गोळ्याप्रमाणे आंत्रमार्गाच्या भित्तीत विखुरलेले असतात व ते प्रमुख रक्तोत्पादक अवयवाचे कार्य करतात. काही उभयचर (पाण्यात व जमिनीवरही राहणाऱ्या) प्राण्यांत व बहुतेक वरच्या दर्जाच्या प्राण्यांत अस्थिमज्जा रक्तोत्पादनाचे कार्य प्रौढावस्थेत करू लागते. त्यानंतर प्लीहा प्रामुख्याने लसीका कोशिकांचे उत्पादन व इतर कार्य करते.

कोणत्याही पृष्ठवंशी प्राण्यातील प्लीहा हा अवयव जीवनावश्यक नाही करण तिची कार्ये इतर अवयव करू शकतात.

पहा : जालिका-अंतःस्तरीय तंत्र रक्ताभिसरण तंत्र.

संदर्भ 1. Guyton, A.C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.

           2. Houssay, B. A. and others, Human Physiology, Tokyo. 1955.

           3. Rains, A. J. H. Ritchie, H. D. Bailey and Love’s Short Practice of Surgery, London, 1977.

           4. Warwick, R, Williams, P. L., Gray’s Anatomy, Edinburgh, 1975.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.