स्यूस्यूक्यी ( ची ) आँगसान : ( १९ जून १९४५ ). म्यानमार ( ब्रह्मदेश ) मधील लोकशाही लढ्यातील एक निर्भीड कार्यकर्ती आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाची म्यानमारमधील पहिली मानकरी (१९९१). तिचा जन्म क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर व म्यानमारचा शिल्पकार–राष्ट्रपिता आँग सान आणि खिन क्यी या दांपत्यापोटी रंगून येथे झाला. आँग सानचा खून झाला, त्या वेळी ती दोन वर्षांची होती.पुढे तिचा सांभाळ तिच्या आईनेच केला. स्यू क्यीचे मूळ गाव माग्वे जिल्ह्यातील नॉटमॉक असून तिचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. नंतर तिच्या आईची भारतात राजदूत म्हणून नियुक्ती झाली (१९६०). त्या वेळी स्यू क्यीने दिल्लीत शिक्षण घेतले (१९६०—६४). त्यानंतर रंगून विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात रुजू झाली. तेथे तिने बी.ए. ही पदवी तीन विषयांत ( तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र ) संपादन केली (१९६४ड्ढ६७). तेथील प्राध्यापक मायकेल एरिस याच्याशी तिचा परिचय होऊन त्याची परिणती त्यांच्या विवाहात झाली (१९७२). त्यांना अलेक्झांडर व किम हे दोन मुलगे आहेत.

स्यू क्यी प्रथमपासूनच राज-कारणापासून अलिप्त राहिली. आपला संसार भला आणि आपण भले, अशी तिची स्त्रीसुलभ सर्वसाधारण धारणा होती तथापि ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध आपल्या वडिलांनी दिलेली प्रखर झुंज तिच्या स्मरणात होती. तिची आई आजारी पडताच ती १९८८ मध्ये तिच्या शुश्रूषेसाठी म्यानमारमध्ये आली तथापि तिच्या आईचे निधन झाले ( २७ डिसेंबर १९८८ ). या वेळी स्यू नागरिक बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडताना पाहून तिच्यातील क्रांतिकारक भावना उफाळून आल्या आणि तिने ने विनच्या लष्करी शासनास प्रतिकार करण्याचे व लोकशाहीची पुनःस्थापना करण्याचे व्रत अंगीकारले. नेमक्या याच सुमारास ने विनच्या लष्करी हुकूमशाहीविरुद्ध किरकोळ उठावांना प्रारंभ झाला होता. तिने या उठावांत स्वतःला बिनधास्त झोकून दिले आणि म्यानमारच्या लोकशाहीप्रेमी नागरिकांत हुकूमशाहीविरुद्ध प्रतिकार करण्याची ऊर्मी निर्माण केली. त्यांनी नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी ( एन्एल्डी ) नावाच्या पक्षाची स्थापना करून जनमत जागृत केले आणि मे १९९० च्या सार्वत्रिक निवडणुकांत बहुमत मिळविले परंतु लष्करी शासनाने नवीन संविधान बनविण्याचे निमित्त करून या निवडणुकीच्या निकालांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तिच्या ह्या कार्याचा उचित गौरव नोबेल समितीने तिला शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन केला (१९९१). ने विन शासनाने तिला हे बहुचर्चित व सन्मान्य पारितोषिक घेण्यास जाऊ दिले नाही. तत्पूर्वी स्यू क्यीला लष्करी शासनाने रंगून शहराजवळील इन्या सरोवराकाठी जुलै १९८९ मध्ये नजरकैदेत ठेवले. तिची मुक्तता १० जुलै १९९५ रोजी झाली. दरम्यान तिने एन्एल्डीद्वारे हुकूमशाही शासनास विरोध सुरू केला. परिणामतः सप्टेंबर २००० मध्ये तिला कैद करून स्थान-बद्धतेत ठेवले व मे २००२ ला सोडले. पुन्हा २००३ मध्ये अटक करून नजरकैदेत ठेवले. तरीसुद्धा स्यू क्यीने महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग व नेल्सन मंडेला यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अहिंसात्मक मार्गाने लोकशाही व मानवी हक्क यांसाठी आपला लढा चालूच ठेवला तथापि तिची १३ नोव्हेंबर २०१० रोजी स्थानबद्धतेतून बिनशर्त सुटका झाली. त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत एन्एल्डी पक्षाने बहुमत प्राप्त केले. स्यू क्यी निवडून आली आणि २ मे २०१२ रोजी तिचा संसदसदस्य अध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण विधी झाला. सध्या तिच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व आले आहे (२०१४).

स्यू क्यीला नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. त्यांपैकी राफ्तो पारितोषिक (१९९०), यूरोपियन संसदेकडून साखॅरोव्ह पारितोषिक (१९९१), आंतरराष्ट्रीय सीमॉन बोलीव्हार पारितोषिक (१९९२), भारताकडून जवाहरलाल नेहरू पारितोषिक (१९९३), अमेरिकन प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल (२००७), दक्षिण आफ्रिके-कडून महात्मा गांधी पुरस्कार (२००८) इ. प्रतिष्ठेचे व महत्त्वाचे होत.

संदर्भ : 1. Wintle, Justin, Perfect Hostage : A Life of Aung San Suu Kyi, London, 2007.

. नवांगुळ, प्रभा, राजबंदिनी : आँग सान स्यू ची हिचं चरित्र, पुणे, २०११.

देशपांडे, सु. र.