बॉल्टिमोर, डेव्हिड : (७ मार्च १९१८- ). अमेरिकन विषाणुशास्त्रज्ञ. त्यांनी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचे विषाणुजन्य (व्हायरसापासून निर्माण झालेले) एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिन) शोधून काढले. ⇨रेनातो दलबेक्को व ⇨हॉर्वर्ड मार्टिन टेमिन यांच्याबरोबर बॉल्टिमोर यांनाही १९७५ चे वैद्यकाचे वा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. अर्बुद-विषाणू (नवीन पेशींच्या वाढीमुळे निर्माण होणारी व शरीरास निरुपयोगी असणारी गाठ म्हणजे अर्बुद तयार होण्यास कारणीभूत असणारे विषाणू) व पोषक पेशीतील जननिक सामग्री [⟶ आनुवंशिकी] यांच्यातील आंतरक्रियांसंबंधी या तिघांनी लावलेल्या शोधांबद्दल हे पारितोषिक देण्यात आले. तिघांच्या कार्यामुळे मानवास होणाऱ्या ठराविक अर्बुदांना कारणीभूत होणारे विषाणू शोधून काढण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच अशा प्रकारचे संभाव्य संबंध अभ्यासू शकणारे तंत्र उपलब्ध झाले. दलबेक्को यांच्या कार्यामुळे इतर दोघांच्या संधोधनाचा पाया घातला गेला. टेमिन यांनीही स्वतंत्रपणे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेन एंझाइम शोधून काढले. ज्याची जननिक सामग्री रिबोन्यूक्लिइक (आरएनए) अम्ल [⟶ न्यक्लिइक अम्ले] असते, असा विषाणू या एंझाइमामुळे स्वतःची डीएनए (डिऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल) नक्कल निर्माण करू शकतो. तिघांनी स्वतंत्रपणे काम केले असले, तरी विषाणू व कर्करोग यासंबंधीचे त्यांचे कार्य सारखे आहे. मारक अर्बुदांच्या निर्मितीशी विषाणूंचा संबंध असतो असे दिसून आलेले नसले, तरी या तिघांच्या संशोधनाने शेवटी तसे सिद्ध होईल, असे नोबेल समितीला वाटले होते. कारण अशा संभाव्य संबंधाचा अभ्यास करण्याची तंत्रे तिघांच्या शोधांमुळे उपलब्ध झाल्याने वरील शक्यता पडताळून पाहण्याला आधार मिळाला आहे.

बॉल्टीमोर यांचा जन्म न्यूयॉर्कला झाला. स्वार्थमॉर महाविद्यालयात बी.एस्. (१९६०), मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (केंब्रिज) मध्ये एम्.एस्. व रॉकफेलर विद्यापीठात पीएच्.डी. (१९६४) या पदव्या त्यांनी मिळविल्या. एक वर्ष ते ॲल्बर्ट आइन्स्टाइन कॉलेज ऑफ मेडिसीन येथे होते. नंतर त्यांनी ला हॉइया येथील साल्क इन्स्टिट्यूटमध्ये दलबेक्को यांच्या हाताखाली संशोधन केले (१९६५-६८). तेथे त्यांनी पोलिओ-विषाणूच्या विश्लेषणास सुरुवात केली. तेथून १९६८ साली ते परत मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत साहाय्यक प्राध्यापक म्हणून आले व तेथे त्यांनी अर्बुद-विषाणूचा अभ्यास केला. १९७२ सालापासून ते तेथील सेंटर फॉर कॅन्सर रिसर्चमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

आरएनए प्राणि-विषाणूचे जीवरसायनशास्त्र आणि आनुवंशिकी यांसंबंधीचे त्यांचे संशोधन मूलभूत असून त्यांनी शोधून काढलेल्या एंझाइमामुळे आरएनए अर्बुद-विषाणूचे सखोल निरीक्षण करण्याची सोय झाली. तसेच या एंझाइमामुळे जननिक वा आनुवंशिक वृत्त पुढे कसे नेले जाते अथवा ते डीएनएमधून आरएनएमध्ये कसे जाते, हे त्यांनी दाखविले आहे. हे आधीच्या सिद्धांताविरुद्ध आहे कारण हे वृत्त न्यूक्लिइक अम्ल (डिएनए) ते न्यूक्लिइक अम्ल (आरएनए) ते प्रथिन असे जाते, असा पूर्वीचा सिद्धांत होता. मात्र बॉल्टिमोर व टेमिन यांच्या मते हे वृत्त प्रथिन ते न्यूक्लिइक अम्ल असे नेले जाते. या दोघांनी स्वतंत्रपणे केलेले संशोधन नेचर या नियतकालिकाच्या एकाच (२७ जून १९७०) अंकात प्रसिद्ध झालेले आहे.

बॉल्टिमोर यांना एली लिली पुरस्कार (१९७१), अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे सूक्ष्मजीवविज्ञानाचे संशोधन प्राध्यापकपद (आजन्म, १९७३), यू. एस. स्टील फाउंडेशन पुरस्कार वगैरे बहुमान मिळाले आहेत.

ठाकूर, अ. ना.