रुग्ण परिचर्या: रुग्णाच्या सर्व गरजा तत्परतेने, काळजीपूर्वक व शास्त्राधारित पद्धतीने पूर्ण करण्याला ‘रुग्णपरिचर्या’ म्हणतात. रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या स्त्रीला नर्स हा इंग्रजी भाषेतील शब्द रूढ झालेला आहे. अनादिकालापासून प्रत्येक स्त्रीला तिच्या कुटुंबातील कुणातरी आजारी व्यक्तीची परिचर्या करण्याचा प्रसंग आलेलाच असतो. आजारी व्यक्तीची योग्य ती काळजी घेऊन, वैद्याने योजिलेल्या उपचारांचा त्याला सर्व प्रकारे फायदा मिळवून देणे हा रुग्णपरिचर्येचा प्रमुख उद्देश असतो. रुग्णपरिचर्येत कोणकोणती कामे समाविष्ट आहेत हे इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेस या संस्थेने आपल्या नियमावलीत थोडक्यात पुढीलप्रमाणे दिले आहे. 

 

रुग्णपरिचारिकेने रुग्णाची सेवा करणे, त्याच्या सामाजिक व आध्यात्मिक परिसराची तो रोगमुक्त होण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी घेणे, तसेच शिक्षणाने व स्वतःच्या उदाहरणाने आजारी न पडण्याचे आणि प्रकृतिस्वास्थ टिकविण्याचे महत्त्व पटविणे हे रुग्णपरिचारिकेचे कार्य असते. वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थविषयक सेवा करताना इतर आरोग्यासंबंधीच्या सेवांबरोबर सहसंयोजन साधणे जरूर असते. मानवाची सेवा करणे हे रुग्णपरिचारिकेचे आद्य कर्तव्य असते, किंबहुना हा व्यवसायच त्यावर अवलंबून असतो. रुग्णपरिचर्येची गरज जागतिक स्वरूपाची आहे. व्यावसायिक परिचर्येच्या आड देश, जात, वर्ण, राजकीय किंवा सामाजिक स्थान येऊ शकत नाहीत. 

                 

इतिहास : आजाऱ्याला जरूरीच्या वेळी मदत करणे हे मानवी समाजाच्या निर्मितीपासूनच प्रचलित आहे. मध्ययुगात चर्चशी निगडित मठवासिनी स्त्रियाच रुग्णपरिचारिकेचे काम करीत. हॉतेल द्यू या पॅरिसमधील रुग्णालयात ऑगस्टेनियन भगिनी स्वयंपाक करणे, जेवण देणे, आंघोळ घालणे, कपडे शिवणे या कामांशिवाय रुग्णाची नखे व केस कापणे, बस्ती देणे व वैद्याने सांगितल्याप्रमाणे औषधी देणे ही रुग्णसेवेची कामे करीत. १५०० ते १८६० या काळात चर्चशी संबंधित व रुग्णपरचर्येशी निगडित अशा दोन संस्था निर्माण झाल्या : (१) सेंट व्हिनसेंट द पॉल यांनी १६३४ मध्ये स्थापन केलेली ‘सिस्टर्स ऑफ चॅरिटी’आणि (२) १८३६ मध्ये ल्यूथरन चर्चचे जर्मन धर्मगुरू टेओडोर फ्लीडनर यांनी स्थापन केलेली डिकॉनेसेसिस संप्रदाय संस्था. 

                 

आधुनिक चर्चशी संबंधित नसलेली रुग्णपरिचर्या प्रस्थापित होण्यापूर्वी अठराव्या शतकात वैद्य रुग्णपरिचारकाचे काम अतिशय कमी दर्जाचे मानीत व हे काम करणाऱ्या स्त्रीला मोलकरणीपेक्षा अधिक किंमत नव्हती. याउलट भारतात ⇨चरकांनी रुग्णपरिचारिकेचे महत्त्व केव्हाच ओळखले होते. रुग्णशुश्रूषा करणारी व्यक्ती कशी असावी याविषयी त्यांनी लिहिले आहे : अशी व्यक्ती ‘चागल्या वर्तणुकीची, अतिपावन, हुषार, हरहुन्नरी, दयाळू, उत्तम स्वयंपाकी, रुग्णाला आंघोळ घालू शकणारी, त्याला उचलू शकणारी, जरुर तेव्हा हातापायांचे मर्दन करू शकणारी व चालावयास मदत करू शकणारी, रुग्णशय्या नीटनेटकी ठेवणारी, तत्पर, आजाऱ्याशी कसे वागावे हे जाणणारी, कोणत्याही कामाबद्दल नाखुशी न दाखविणारी असावी.’

                 

जुन्या बॅबिलोनियन लिखाणातून व ईजिप्तमधील पपायरसावरील लेखांतून, तसेच ⇨हिपोक्राटीझ या ग्रीक वैद्यांच्या लिखाणातूनही अशाच प्रकारचे उल्लेख आहेत. 

                 

रुग्णपरिचर्या हा वैद्यकाचा महत्त्वाचा घटक असल्याने अनादिकालापासून ज्ञात असल्याची नोंद भारतीय इतिहासात आढळते. सुश्रुतांनी वैद्यकाचे चार आधारस्तंभ सांगितले आहेत : (१) वैद्य, (२) रुग्ण, (३) औषधे व (४) रुग्णपरिचारिका. चरकांनी रुग्णपरिचारिकेची अभिलक्षणे अशी सांगितली आहेत : ‘औषधे तयार करण्याचे किंवा त्यांचे मिश्रण तयार करता येण्याचे ज्ञान असावे हुषार, रुग्णसमर्पित व कायावाचामने करून शुद्ध असावी’.

                 

वाग्भटांच्या अष्टांगहृदय या ग्रंथात रुग्णसेवेचा उल्लेख शस्त्रक्रिया व व्रगोपचार यांच्या संदर्भात आला आहे. वात्स्यायन यांच्या ⇨कामसूत्र या ग्रंथात गृह-व्यवस्थापन करणाऱ्या स्त्रीने घरातील रुग्णाची काळजी कशी घ्यावी यासंबंधी सूचना आहेत. भारतात रुग्णसेवा ही सर्व सेवांमध्ये श्रेष्ठ मानली गेली आहे. 

                 

सर्वसाधारणपणे रुग्णपरिचर्येचा इतिहास तीन काळांत विभागता येतो : (१) फ्लॉरेन्स नाइटिंगेलपूर्व. (२) नाइटिंगेल यांचा काळ १८६०−१९०० आणि (३) दोन महायुद्धांमधील व आधुनिक काळ. 

                 

यूरोपात रुग्णपरिचर्येचा उगम दोन स्थानांपासून झाला : (१) धार्मिक व सामाजिक आणि (२) शास्त्रीय प्रगती. धार्मिक उगमाबद्दल काही गोष्टी उल्लेखनीय आहेत. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या काही प्रमुख स्त्रियांचा त्यात वाटा आहे. सेंट पॉल यांची मैत्रिण फीबी (इ. स. ६०) अनेकांना मदत करी. तिच्या काळापासून रुग्णसेवा हा ख्रिश्चन धर्मातील दयाभावाचा एक मानला जाऊ लागला. सेंट फॅबिओला या रोम येथील सरदार घराण्यातील स्त्रीने आपले घर रुग्णालय म्हणून वापरण्याकरिता देऊन टाकले होते. 

                 

आधुनिक व शस्त्राधारित रुग्णपरिचर्येची सुरुवात एकोणीसाव्या शतकात झाली, याला ⇨फ्लॉरेन्स नाइटिंगेल या बुद्धिमान परंतु सर्वसामान्य स्त्रीची प्रेरणा व अविरत प्रयत्न कारणीभूत झाले. तिच्या कुटुंबाची मानवहितवादी मते, तिचे शास्त्र, गणित आणि राजकीय अर्थशास्त्र यांतील थोडेबहुत शिक्षण एवढेच तिचे भांडवल होते. रुग्णपरिचर्येत सुधारणा होण्याची अत्यंत गरज असल्याचे ठाम मत झाल्यामुळे तिने इतर देशांतील चालू पद्धतींचा विशेष अभ्यास केला व त्याविषयी बरेचसे लेखनही केले. १८५४ मध्ये ब्रिटनच्या युद्धमंत्र्यांनीनाइटिंगेल यांना रशियातील क्रिमियात युद्धभूमीवर पाठवले. तेथील मैलावाहिन्यांचा अभाव, कपड्यांच्या स्वच्छतेचा अभाव, अव्यवस्थित वैद्यकीय सेवा व रुग्णपरिचर्येचा अभाव, यांमुळे सैनिकांचे मृत्यूप्रमाण ५० टक्क्यांच्या वर गेले होते. बरोबर आणलेल्या रुग्णपरिचारिकांच्या मदतीने त्यांनी खूपच सुधारणा करून हे प्रमाण दोन टक्क्यांवर आणले. त्यामुळे एकूण लष्करी वैद्यकीय सेवाच सुधारली व रुग्णपरिचर्येचे महत्त्व सिद्ध झाले. नाइटिंगेल यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश जनतेने ४४,००० पौंडांची रक्कम त्यांना देणगी म्हणून दिली. त्यांनी ती रक्कम सेंट टॉमस रुग्णपरिचर्येचे शिक्षण देणारी शाळा सुरू करण्याकरिता देऊन टाकली. १५ जून १८६० रोजी पंधरा शिकाऊ उमेदवार घेऊन ही शाळा सुरू झाली व आधुनिक रुग्णपरिचर्येचा आरंभ झाला. 

                 

एकोणिसाव्या शतकांच्या शेवटास इंग्रजी भाषा बोलणाऱ्याबहुतेक देशांतून नाइटिंगेल पद्धतीवर आधारित शिक्षणक्रम सुरू झाले. त्यानंतर चीन, जपान व भारत या देशांतून मिशनऱ्यांनीही असाच प्रारंभ केला. न्यूयॉर्कमधील बेल्व्ह्यूरुग्णालयात पहिली रुग्णपरिचर्या शाळा मे १८७३ मध्ये सुरू झाली. 


         

नाइटिंगेल पद्धतीच्या शाळा सुरू होण्यापूर्वी रुग्णपरिचर्या हा अगदी उपेक्षणीय व्यवसाय समजला जात होता. नाइटिंगेल यांनी ही परिस्थिती पूर्णपणे बदलण्याचा निर्धार केला होता. रुग्णपरिचर्या हा एक केवळ पूर्ण स्वतंत्र व्यवसायच नसून या पेशाकरिता सद्‌सद्‌विवेक    , समर्पण व व्यथित मानवजातीसंबंधी अनुकंपा हे गुणही आवश्यक असतात. लायक, कार्यक्षम व प्रशिक्षित स्त्रियांनीच करण्यास योग्य असा हा व्यवसाय आहे, असे त्यांचे ठाम मत होते. विशिष्ट प्रशिक्षित परिचारिकांनीच रुग्णपरिचर्या करावी, तसेच वैद्य व परिचारिका यांचे संबंध पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचेच असावेत, रुग्णालये व रुग्णपरिचर्याशाळा स्वतंत्र असाव्यात, शाळांचे व्य वस्थापन शिक्षित रुग्णपरिचारिकांनी करावे आणि वैद्यकीय शिक्षणाकरिता वैद्यांची मदत घ्यावी, अशी नाइटिंगेल यांची एकूण धारणा होती. 

                 

नाइटिंगेल प्रस्थापित शाळा सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्षांच्या काळातच रुग्णपरिचर्येत इंग्लंडमध्ये क्रांतीकारक बदल झाले. अशिक्षित, गरीब व अत्यप्त पगारावर काम करणाऱ्या बंदिगृहातील स्त्रियांऐवजी आता चांगल्या स्त्रिया या व्यवसायाकडे वळू लागल्या. वैद्यकशास्त्राच्या प्रगतीबरोबरच रुग्णपरिचर्या हेही एक प्रगत शास्त्र बनले. हाच बदल हळूहळू इतर देशांतूनही झाला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रुग्णपरिचारिका संघटित झाल्या. १८८७ मध्ये एथेल गॉर्डन फेनविक यांनी ब्रिटिश नर्सेस ॲसोसिएशन स्थापना केली. त्यांचाच प्रयत्नाने १८९९ मध्ये इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेस ही संस्था स्थापना झाली आणि अमेरिका, फिनलंड, डेन्मार्क, कॅनडा इ. देशांतील रुग्णपरिचारिका संस्था या संस्थेच्या सभासद झाल्या. 

                 

रुग्णपरिचर्या संस्थांच्या शाखा सतत वाढत गेल्या व एकूण रुग्णपरिचारिकांची संख्याही वाढत गेली. अमेरिकेत नॅशनल लीग ऑफ नर्सिंग एज्युकेशन (१८८३) व नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर पब्लिक हेल्थ नर्सिंग (१९१२) या संस्थांच्या कार्यामुळे रुग्णपरिचर्येत प्रगती होण्यास मदत झाली. ब्रिटनमध्ये कॉलेज ऑफ नर्सिगमुळे रुग्णपरिचर्येच्या तंत्रात व ज्ञानात प्रगती झाली. १९१२ पावेतो अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड व इतर काही देशांतील रुग्णपरिचारिकांनी घरी रुग्णपरिचर्या करण्यास प्रारंभ केला आणि बालकल्याण, शालेय रुग्णपरिचर्या व क्षयरोगाचे निर्मूलन यांसारख्या विशेष आरोग्य कार्यक्रमांतही भाग घेतला. 

                 

अमेरिकेतील यादवी युद्धात तेथील रुग्णालयांतील परिस्थिती ही नाइटिंगेल यांच्या आगमनापूर्वीच्या क्रिमियातील परिस्थितीइतकीच धक्कादायक होता. स्पॅनिश-अमेरिकन युद्धामध्ये लष्करी रुग्णपरिचर्येची आवश्यकता जाणवल्यावरच १९०३ मध्ये नाविक रुग्णपरिचर्या पथकाची स्थापना झाली. ब्रिटनमध्ये १९०७ साली प्रादेशिक सेना रुग्णपरिचर्या सेवा सुरू करण्यात आली. कॅनडानेच प्रथम १९०४ मध्ये लष्करी दलांत रुग्णपरिचारिकांना राजादेश (कमिशन) देण्यास प्रारंभ केला. अमेरिकेत पहिल्या महायुद्धानंतर अस्थायी व १९४७ मध्ये स्थायी राजादेश परिचारिकांना देण्यात येऊ लागला. 

                 

दोन महायुद्धानंतर अनेक राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांनी अव्यवसायिक स्वयंसेवी व्यक्तींना रुग्णपरिचर्येचे शिक्षण देण्यासाठी शाळा स्थापन केल्या. रुग्णपरिचरिकांना व्यावसायिक प्रसिक्षण देण्यावर अधिकाधिक भर देण्यात आला. आधुनिक काळात वैज्ञानिक प्रशिक्षणावर आणि विशिष्टीकरणावर भर देण्यात येत आहे. 

                 

रुग्णपरिचर्या या व्यवसायाकडे स्त्रिया अधिक प्रमाणात वळलेल्या आढळतात, कारण स्वाभाविकपणेच त्यांच्यात सहानूभूती व लोकांची सेवा करण्याचा नित्य सराव हे गुण असतात. यांखेरीज बारीकसारीक तपशीलाकडे लक्ष पुरविण्याची रुग्णपरिचर्येत आवश्यक असणारी क्षमताही स्त्रियांत असते. 

रुग्णपरिचारिकांचे वर्गीकरण व रुग्णपरिचर्या शिक्षणक्रम : रुग्णपरिचारिकांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी करता येते. पाश्चात्त्य देशांतून रुग्णपरिचर्या अतिशय प्रगत झाल्यामुळे तसेच व्यवसाय म्हणूनही त्यास मान व प्राधान्य मिळत गेल्यामुळे रुग्णपरिचारिकांच्या वर्गीकरणाच्या प्रकारांतही वाढ झाली. 

                 

वर्गीकरण समजण्यापूर्वी रुग्णपरिचर्या शिक्षणक्रमाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. १८२७ ते १९१२ या काळात होऊन गेलेले सुप्रसिद्ध शस्त्रक्रियाविशारद लॉर्ड लिस्टर हे शस्त्रक्रियेकरिता लागणारी उपकरणे व मलपपट्ट्या स्वःतच निर्जंतुक करीत आणि शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णाची पट्टी स्वतःच बांधीत. नाइटिंगेल पद्धतीच्या शाळा सुरू झाल्यानंतरही रुग्णपरिचारिकांकडे अगदी जुजबीकामेच (उदा., रुग्णशय्येची देखभाल वगैरे) सोपविली जात परंतु शस्त्रक्रियेतील प्रगतीबरोबरच रुग्णाची पूर्वतयारी, शस्त्रक्रियागृहाची देखभाल, उपकरणांची पूर्वतयारी ही कामे रुग्णपरिचारिकांकडे सोपविण्यात आली. रुग्णकक्षाची देखभाल, रुग्णाच्या तापाची नोंद ठेवणे, वेळोवेळी औषधे देऊन त्यांची नोंद ठेवणे इ. कामेही रुग्णपरिचारिकांकडे देण्यात आल्यामुळे सुरुवातीला केवळएकच वर्षाचा असलेला शिक्षण काळ वाढवून तीनचार वर्षांचा करण्यात आला. संबंधित विषयावरील व्याख्याने व रुग्णशय्येजवळ प्रात्यक्षिकासहित शिकवणे सुरू झाले. शिक्षणक्रमांत प्राथमिक शरीर व शरिरक्रियाविज्ञानाचाही अंतर्भाव झाला. 

                 

सुरुवातीची काही वर्षे काही शाळा निघाल्यानंतरही शिक्षणक्रमात एकसूत्रता नव्हती. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास शिक्षणक्रम प्रमाणित करण्याची आवश्यकता भासल्यामुळे रुग्णपरिचारिकांनी संघटित मागणी करून तसा कायदाच करावा व त्याचे पालन होते किंवा नाही यावर लक्ष द्यावे, अशी सूचना केली. 


      

आ. १. रुग्णपरिचारिकांचा अभ्यास वर्ग : बाहुलीचा रुग्ण म्हणून उपयोग करुन शिक्षक शिकवीत आहेत.पहिल्या महायुद्धात अनेक अशिक्षित स्त्रियाच रूग्णपरिचारिकांची उणीव भरून काढू लागल्यामुळे वरील मागणीस पुष्टी मिळाली. १९१६ मध्ये ब्रिटनमध्ये रॉयल कॉलेज ऑफ नर्सिंगची स्थापना झाली. १९१९ मध्ये एथेल फेनविक यांच्यांमुळे रुग्णपरिचारिका नोंदणी कायदा संमत झाला व या कायद्यानुसार जनरल नर्सिंग कौन्सिलची स्थापना झाली. यात सोळा रुग्णपरिचारिकांशिवाय इतर नऊ सभासद होते. मान्य शाळांतून प्रमाणित शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या रुग्णपरिचारिकांची नोंदणी हे कौन्सिल करीत असे. १९२५ नंतर विशिष्ट परीक्षा पास झाल्यावरच नोंदणी करण्याची पद्धत सुरू झाली. १९४९ मध्ये नवा नोंदणी कायदा सुरू झाला व तेथूनच वर्गीकरणास सुरुवात झाली. कारण नोंदणी पुस्तकातच (१) सर्वसामान्य रुग्णपरिचारिका, (२) बालरुग्ण परिचारिका, (३) मनोरुग्णपरिचारिका आणि (४) ज्वररुग्णपरिचारिका असे चार वर्ग पाडण्यात आले. 

                 

रुग्णपरिचारिकांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (१) कायद्याप्रमाणे : (अ) नोंदणीकृत, (आ) परवानाधारक व्यावसायिक, (इ) परवानारहित मदतनीस, (२) शिक्षणाप्रमाणे : (अ) व्यवसाय शिक्षित (आ) तंत्र शिक्षित, (इ) उच्च व्यवसाय शिक्षित. (३) कार्यानुरुप : (अ) संस्था, (आ) समाज, (इ) शिक्षण, (ई) संशोधन, (उ) वृत्तपत्रव्यवसाय (४) जबाबदारीनुसार : (अ) परिसेविका (सिस्टर) रुग्णकक्षा देखभाल प्रमुख), (आ) परिसेविकेची प्रमुख मदतनीस, (इ) पाठनिर्देशक (ट्यूटर), (ई) प्रशासक, (५) कार्यस्थळानुसार: (अ) रुग्णालयीन, (आ) सार्वजनिक आरोग्य संस्थांतृन कार्य करणाऱ्या). 

                 

यांशिवाय वैद्यकाच्या प्रगतीबरोबरच शस्त्रक्रियागृहात काम करणारी, अतिदक्षता विभागात काम करणारी अशा खास शिक्षित रुग्णपरिचारिका तयार केल्या गेल्या व त्यामुळे (१) सामान्य व (२) विशेषज्ञ असे दोन वर्ग तयार झाले. वरीलप्रमाणे वर्गीकरण करता आले, तरी बहुसंख्य रुग्णपरिचारिका रुग्णल्यातूनच काम करतात. 

                 

रुग्णपरिचर्या शिक्षणाचा दर्जा त्या त्या देशातील शिक्षणाच्या प्रगती वर अवलंबून असणे अपरिहार्य आहे. अमेरिका व इतर काही देशांतून कमीत कमी माध्यमिक विद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय रुग्णपरिचर्या शिक्षण शाळेत प्रवेश दिला जात नाही. अमेरिकन शाळांतून ४५ % शिक्षक रुग्णपरिचर्येतील ‘मास्ट पदवीधारक’ आहेत. 

                 

बहुतेक देशांतून सरकारी आरोग्य खात्यात रुग्णपरिचारिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, यूगोस्लाव्हिया या देशांमध्ये सार्वजनिक आरोग्यविषयक रुग्णपरिचारिका अधिक आहेत. काही मागासलेल्या देशांतून अंतर्भागात एकच रुग्ण परिचारिका ही सर्व प्रकारची वैद्यकीय मदत करणारी व्यक्ती असते. 

                 

भारत : भारतीय रुग्णपरिचारिकेच्या व्याख्येत पुढील चार प्रकारांच्या सेवांचा समावेश केला आहे : (१) रुग्णपरिचारिका अथवा मराठीत रुढ झालेला शब्द ‘नर्रा’, (२) सुईण (प्रसूती सुलभ करणारी मदतनीस स्त्री), (३) साहाय्यक रुग्णपरिचारिका व सुईण आणि (४) स्वास्थ्यचर अथवा आरोग्य प्रचारक. 

                 

भारतात आधुनिक रुग्णपरिचर्येची सुरुवात मद्रास येये १८५४ मध्ये बाळंतपणाच्या रुग्णालयात सुईणींना शिक्षण देण्यापासून झाली परंतु ही व्यवस्था फारशी समाधानकारक नसल्यामुळे बंद पडली. १८५९ मध्ये बंगाल सरकारने रुग्णपरिचर्या शिक्षणास मान्यता दिली आणि कलकत्त्यास एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. १९७१ मध्ये मद्रास येथे व नंतर सर्व देशभर सरकारी आणि काही खाजगी रुग्णालयांतून अशी प्रशिक्षण केंद्रे स्थापन झाली. बहुतेक ठिकाणी शिक्षणक्रम पाश्चात्त्य देशांतील शिक्षणक्रमाप्रमाणेच होता. 

                 

इ. स. १८८५ मध्ये लॉर्ड डफरिन यांच्या पत्नी हिंदुस्थानात येण्यापूर्वी राणी व्हिक्टोरियास भेटावयास गेल्या असताना तेथील स्त्रियांना वैद्यकीय मदत मिळण्याची काहीतरी व्यवस्था करण्याची सूचना राणीने केली. त्या हिंदुस्थानात आल्यानंतर काऊंटेस ऑफ डफरिन फंड स्थापन झाला. या फंडाच्या मदतीने १८८६ मध्ये मुंबईतील कामा रुग्णालयात रुग्णपरिचारिकांच्या व सुईणींच्या प्रशिक्षणाकरिता पहिली शाळा सुरू झाली. 

                 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मद्रास, व बंगालया प्रांतातून पुष्कळ शाळांमध्ये रुग्णपरिचर्या शिक्षण मिळू लागले. सुरुवातीस भारतीय स्त्रिया या शिक्षणाविषयी उदासीन होत्या. बहुतांश युरोपियन व अँग्लो-इंडियन स्त्रियाच हे शिक्षण घेत. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या स्त्रियांचा बहुसंख्य भरणा या व्यवसायात झाला. पुष्कळ वर्षे उच्चवर्णीयभारतीय स्त्रियांना हा व्यवसाय हीन दर्जाचा वाटे तसेच फक्त अकाली वैधव्य प्राप्त झालेल्या हिंदू स्त्रिया प्रथम रुग्णपरिचर्येकडे वळल्या. भारतातील स्त्री-शिक्षणाच्या प्रगतीबरोबरच या परिस्थितीत पुढे बदल होत गेले. 

                 

पहिल्या महायुद्धामुळे या क्षेत्रात भारतीय लष्करी रुग्णपरिचर्येचे नवे दालन उघडले. लष्करी व मुलकी गरज भागव्यण्याकरिता लेडी रीडिंग हेल्थ स्कूल १९१८ मध्ये दिल्ली येथे सुरू करण्यात आले. तसेच विसाव्या शतकाच्या प्रारंभी पुरुषांना रुग्णपरिचर्येचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली. 

                 

इ. स. १९२०−४० या काळात या क्षेत्रात मोठी प्रगती झाली. १९३० मध्ये अनुभवी व भारतीय रुग्णपरिचारिकांना इंग्लंडमध्ये खास शिक्षणाकरिता पाठविण्यात आले. परिसेविका−पाठनिर्देशक व रुग्णालय व्यवस्थापन हे विषय लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ नसिंग या संस्थेत शिकवण्यात येत. कालांतराने १९४१ मध्ये दिल्ली येथे पदव्युत्तर कॉलेज ऑफ नर्सिंग स्थापन झाले व १९४३ मध्ये रुग्णपरिचर्या व्यवस्थापन शाळा सुरू झाली. 

                 

इ. स. १९४६ मध्ये त्या वेळच्या हिंदुस्थान सरकारने सर जोसेफ भोर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात रुग्णपरिचर्या व्यवसायातील अनेक उणिवा दाखवून काही सूचना केल्या. त्यांतील शिक्षणविषयक सूचनांच्या अनुषंगाने दिल्ली विद्यापीठाने बी. एस्‌सी . (ऑनर्स) पदवी अभ्यासक्रम सुरू केला व त्याच वर्षी मद्रास विद्यापीठाने वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजात पदवी अभ्यासक्रम सुरू केला.     


         

इ. स. १९४७ नंतर स्वातंत्र्योत्तर काळात या क्षेत्रात झालेली प्रगती कोष्टक क्र. १ वरुन स्पष्ट होते. 

                 

संपूर्ण भारतात १९६४ मध्ये पदव्युत्तर रुग्णपरिचर्येचे शिक्षण देणाऱ्याएकून वीस संस्था होत्या. त्यांतील फक्त महाराष्ट्रातच  

कोष्टक क्र. १. भारतातील मान्यताप्राप्त रुग्णपरिचर्या शिक्षण संस्थांची संख्या 

मान्यता प्राप्त वर्षे                     संस्थाची संख्या      काला अखेर

                                                                               संस्थाची संख्या

१९०० पूर्वी                                 २                            २

१९००-४०                              १०२                        १०४

१९४१-४६                              ३७                         १४१

१९४७-५०                              ३४                         १७५

१९५१-५५                                 ७                         २४२

१९५६-६०                              १५०                        ३९२

१९६१-६४                                 ७१                        ४६३

दहा संस्था होत्या. त्याच वर्षी सार्वजनिक क्षेत्रात एकूण सर्व प्रकरच्या रुग्णपरिकांची संख्या ५३,४५३ होती आणि त्यांत १२,५२७ पुरूष रुग्णपरिचारकांचा समावेश होता. खाजगी क्षेत्रात एकूण संख्या १२,६४६ होती व त्यात ३,८४२ पुरूष होते. एकूणामध्ये ३४·४% रुग्णपरिचारका औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशा महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या राज्यांतूनच होत्या. १९६४ मध्ये महाराष्ट्रात रुग्णपरिचारिका/ वैद्य गुणोत्तर अनुक्रमे १०,५११ १३,७६७ व १:१ होते, तर प. बंगालच्या बाबतीत हे आकडे अनुक्रमे ५,०८८ १८,६६५ व १:४ असे होते. रुग्णपरिचारिका/वैद्य गुणोत्तर ३:१ म्हणजे तीन रुग्णपरिचारिका व एक डॉक्टर हे सर्वसाधारणपणे योग्य प्रमाण समजले जाते पण भारतात ते १:१ इतपत फक्त तमिळनाडूत व महाराष्ट्रात आढळते.

आ. २. रुग्णपरिचारिकेच्या दैनंदिन कर्तव्यांपैकी एक : रुग्णाची नाडी तपासून नोंद करणे.रुग्णपरिचारिकांची कर्तव्ये : ही कर्तव्ये रुग्णपरिचारिकांच्या सेवेच्या प्रकाराप्रमाणे खाली दिली आहेत.

               

रुग्णपरिचारिका अथवा नर्स : (१) रुग्णांची व अपंगांची काळजीपूर्वक कसबी देखभाल करणे. (२) रुग्णव त्यांच्या कुंटूबियांचा  स्वास्थ्य-शिक्षण बनणे. (३) रुग्णाच्या शारीरिक व मानसिक बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांची इतर स्वास्थ्य-संघ सभासदांना विशेषकरून वैद्याला जाणीव करून देणे. (४) साहाय्यक शिकाऊ विद्यार्थ्यांना शिकवणे. (५) रुग्णसेवेबद्दल इतर सहकाऱ्यांबरोबरील विचारविनीमयात सहभागी होणे. (६) उत्तम स्वास्थ्याकरिता परिसर योग्य बनविणे.

आ. ३. शिकाऊ रुग्णपरिचारिका बालरुग्णाची सेवा करताना.सुईण : (१) गर्भारणीची प्रसवपूर्व काळजी घेणे विशेषकरून पोषण व भावनिक परिणांमाकडे लक्ष देणे. (२) प्राकृतिक प्रसूतीच्या पूर्ण संपूर्ण मदत करणे. (३) प्रसवपूर्ण प्रसूतीच्या वेळी व प्रसवोत्तर वैद्यकीय मदतीची गरज ओळखणे. (४) वैद्यकीय मदत येण्यापूर्वी तातडीचा सोपा उपाय योजणे. (५) मातेची प्रसवोत्तर काळजी घेणे. (६) नवजात अर्भकाची योग्य काळजी घेणे. (७) योग्य त्या नोंदी ठेवणे.

              आ. ४. रुग्णपरिचारिका−विशेष काम : औद्योगिक रुग्णपरिचारिका रुग्णावर प्रथमोपचार करताना. साहाय्यक रुग्णपरिचारिका व सुईण : (१) वैद्यकीय अधिकाऱ्यास जबाबदारी राहून रुग्णपरिचारिका व स्वास्थ्यचर यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली काम करणे. (२) स्थानिक दायांच्या (अशिक्षित सुईणींच्या) कामावर देखरेख करणे. (३) सर्व जन्मांची नोंद करवणे. अर्भकांची वेळेवर रोगप्रतिबंधक लस टोचण्यावर लक्ष ठेवून नोंद ठेवणे. (४) माता-बालसंगोपन केंद्र स्थापणे. (५) सर्व निवासी रुग्णांच्या सेवेस मदत करणे. (६) केंद्रातील सर्व उपकरणांची देखभाल करणे. (७) केंद्राबाहेर रुग्णाच्या घरी जाऊन प्रसवपूर्व तपासणी करणे. (८) वर्षांतून निदान शंभर प्राकृतिक प्रसवपूर्व तपासणी करणे. (८) वर्षांतून निदान शंभर प्राकृतिक प्रसूतिच्या वेळी रुग्णाच्या घरी हजर राहणे. (९) शालेय वयापूर्वीच मुलामुलींच्या घरी वर्षांतून एकवेळ भेट देऊन त्यांच्या शारिरीक स्वास्थ्याकडे लक्ष देणे. (१०) नवजात अर्भकाची वर्षांतून तीन वेळा भेट घेऊन देखभाल करणे. (११) रुग्णास वैद्यकीय मदत मिळविण्यास मदत करणे.


स्वास्थ्यचर अथवा आरोग्य प्रचारक : (१) प्रसवपूर्व परिचर्या, मुले व माता, क्षयरोग, स्त्रीरोग, कुटुंबनियोजन इत्यादींकरिता उपकेंद्रे स्थापणे. (२) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व रुग्णपरिचर्या पर्यवेक्षक यांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. (३) संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधात्मक उपायांत सर्वतोपरी सहभागी होणे. (४) आरोग्यासंबंधी सर्व नोंदी ठेवणे.

आ. ५. रुग्णपरिचारिका शस्त्रक्रियाविशारदांना शस्त्रक्रियागृहात मदत करताना.निरनिराळ्या देशांत रुग्णपरिचर्या निरनिराळ्या प्रकारांची आहे. आरोग्य प्रचारक पूर्ण शिक्षित रुग्णपरिचारिका असूनआ. ६ रुग्णपरिचारिका−विशेष काम : अतिदक्षता विभागातील इलेक्ट्रॉनीय उपकरणांकडे विशेष लक्ष पुरविणे. सुईणशास्त्र व सार्वजनिक आरोग्य या दोन्हीमध्ये पारंगत असतात. भारतात सुईणशास्त्र पारंगताना  आ. ७. रुग्णपरिचारिका-विशेष काम : (अ) हाताने पट्टी गुंडाळणे (आ) यंत्राणे पट्टी गुंडाळणे.सहा महिने ते एक वर्ष अधिक शिक्षण घेतल्यानंतर आरोग्य प्रचारक म्हणून प्रमाणपत्र मिळते.

        

पुरुष रुग्णपरिचारिकांना विशिष्ट क्षेत्रातून काम द्यावे अशी कल्पना आहे. मनोरुग्णालये, शस्त्रक्रियागृहे, लष्करी रुग्णालये, अपंग पुनर्वसनआ. ८. रुग्णपरिचारिका-विशेष काम: निरनिराळ्या प्रकारच्या पट्ट्या बांधणे : (अ) जबड्याला आधार देणारी पट्टी (आ) खांद्याला इजा झाल्यास बांधावयाची पट्टी. केंद्र, गुप्तरोग चिकित्सा केंद्र इ. ठिकाणी पुरूष रुग्णपरिचारिक असावेत परंतु इतरत्र रुग्णपरिचर्या हे स्त्रियांचे क्षेत्र असावे. तातडीच्या वेळी रुग्णास उचलून नेणे किंवा ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेणे अशी मेहनतीची कामे पुरूष नर्स अधिक सहज करू शकतात.

आ.९. रुग्णपरिचारिका पक्षाघाताच्या रुग्णास चालावयास शिकविताना

               


कोष्टक क्र. २. विविध राज्यांतील रुग्णपरिचर्या कर्मचाऱ्यांची विभागणी (१९६४)

राज्य

रुग्णपरिचारिका

सुईणी

साहाय्यक रुग्ण- परिचारिका-सुईणी

आरोग्य प्रचारक

आंध्र प्रदेश

३,४८८

२,०४३

१,६१२

४३२

आसाम

१,०७८

४०१

६३९

उत्तर प्रदेश

२,८३७

१,४७७

९२१

५७०

ओरिसा

५९३

१७५

३५८

कर्नाटक

२,२७३

५४२

४५८

५३

केरळ

८५५

४५१

४५३

६०

गुजरात

१,२०४

६०२

१,१५९

१०७

गोवा

३०

२१

जम्मू व काश्मीर

६२

२९

५३

तामिळनाडू

५,५५०

५,१०५

९६६

३३९

त्रिपुरा

१३३

दिल्ली      

५३९

२२४

२६

२३७

नागालँड

५२

२४

पंजाब

१,६२४

७००

१,६५२

३७२

पश्चिम बंगाल

४,३१६

१,९८८

१,३६९

३५०

पाँडिचेरी

२९

१२

बिहार

१,६८६

४९२

८४१

१८०

मणिपूर

१२९

मध्य प्रदेश

१,७१०

८९४

१,४२५

१२७

महाराष्ट्र

८,९१६

३,८१७

१, ६१७

२८३

राजस्थान

१,९१६

२२६

५५२

२०

हिमाचल प्रदेश

४४

१०

११४

१७

इतर

८०

एकूण ….

३८,५००  

१९,२०४  

१४,५३३

३,१३०

भारतातील स्वातंत्र्योत्तर प्रगती : १९४८ च्या सुमारास रुग्णपरिचारिका व लोकसंख्या यांचे गुणोत्तर १ : ३०,००० होते. १९६२ मध्ये ते १ : ३०,००० झाले. इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या गणनेप्रमाणे १९६९ मध्ये ५६,७०० रुग्णपरिचारिका होत्या व लोकसंख्या ५३.७ कोटी होती, तसेच गुणोत्तर १ : ९,५०० होते. लक्ष्मणस्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली १९६१ मध्ये नेमलेल्या स्वास्थ्य सर्वेक्षण व नियोजन आयोगाने पाच रुग्णशय्यांकरिता एक नर्स हा आदर्श मानला होता. लोकसंख्या व रुग्णपरिचारिका यांचे प्रमाण १९७१ मध्ये १ : ५,००० १९८१ मध्ये १ : २,००० आणि १९९१ मध्ये १ : १,७०० असे लक्ष्य सुचविले होते.

काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीमुळे रुग्णपरिचर्या शिक्षणातही प्रगती झाली. विद्यावेतन, उमेदवारी वेतन, शिक्षणोपयोगी उपकरणे व शिक्षक वगैरे स्वरूपांत ही मदत मिळाली. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ या संघटनांचा यात प्रमुख भाग होता. जागतिक आरोग्य संघटनेने ४८ रुग्णपरिचारिकांना विद्यावेतन देऊन परदेशातून शिक्षण देऊन आणले.

पुरूष रुग्णपरिचारिकांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. १९६४ मधील विविध राज्यांतील रुग्णपरिचर्या कर्मचाऱ्यांची विभागणी कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे.

 

भारतातील रुग्णलयांतून रुग्णपरिचारिकांची संख्या जरूरीपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे आहेत त्या रुग्णपरिचारिकांवर बराच ताण पडतो. भारताप्रमाणेच इतर अनेक देशांतूनही रुग्णपरिचारिकांची कमतरता आहे. कोष्टक क्र. ३ मध्ये काही देशांतील लोकसंख्या आणि रुग्णपरिचारिका यांची १९६७ साली असलेली गुणोत्तरे तुलनेसाठी दिलेली आहेत. 

कोष्टक क्र. ३. काही देशांतील लोकसंख्या व रुग्ण-परिचारिकांची संख्या यांची गुणोत्तरे (१९६७).

देश

लोकसंख्या व रुग्णपरिचारिंकाची संख्या यांचे गुणोत्तर

ऑस्ट्रेलिया

१७० : १

आयलँड

१९० : १

स्वीडन

१९० : १

डेन्मार्क

५०: १

झेकोस्लोव्हाकिया

२७०: १

नॉर्वे

३१० : १

रशिया

३३० : १

अमेरिकाची संयुक्त संस्थाने

३४०: १

ग्रीनलंड

३५० : १

जमेका

३५०: १

कॅनडा

३६०: १

बेल्जियम

४२०: १

फिनलंड

३८०: १

स्वित्झर्लंड

३९०: १

हंगेरी

४००: १

पश्चिम जर्मनी

४५०: १

रुग्णपरिचारिकांच्या संख्येत योग्य प्रमाणात सुधारणा न होण्याची अनेक कारणे आहेत. भारतात या व्यवसायाला कनिष्ठ दर्जा दिला जातो. त्यामुळे चांगल्या घरंदाज घराण्यातील स्त्रिया तिकडे वळत नाहीत. धार्मिक गैरसमजुतीही कारणीभूत आहेत. बहुसंख्येने ख्रिश्चन मुली हा व्यवसाय आनंदाने स्वीकारतात व त्यात केरळ प्रांतीय अधिक आहेत. केवळ गरिबीमुळेच अधिक मुलींना हा व्यवसाय पत्करावा लागतो. दर्जाशिवाय वेतन व इतर सुविधाही चांगल्या नाहीत. १९७० नंतर अनेक रुग्णपरिचारिका परदेशांत नोकरीकरिता जात आहेत. पुरुष रुग्णपरिचारिक तर अत्यल्प आहेत. १९६८ च्या एका पहाणीनुसार एकूण ४,२७८ नोंदणीकृत पुरुष परिचारक होते व महाराष्ट्रात फक्त ७३५ होते. मुंबईच्या प्रसिद्ध व मोठ्या जे. जे. रुग्णालयात त्यांपैकी केवळ दोनच पुरुष परिचारक होते. 

 

या व्यवसायाकडे योग्य प्रशिक्षित स्त्रिया आकृष्ट होण्याकरिता अनेक उपाय योजण्यात येत आहेत. वेतन व सुविधांमध्ये वारंवार सुधारणा केल्या जात आहेत. लष्करी रुग्णपरिचर्येसारखी नवी क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत.

पुरुष परिचारिकांची संख्या वाढविण्याकरिता अधिक प्रलोभनांची आवश्यकता आहे. उत्तम परिचारिका वैद्याची जागा घेऊ शकते. भारतासारख्या देशात जेथे वैद्यसंख्याच अपुरी आहे, तिथे अधिकाधिक रुग्णपरिचारिकांची नितांत गरज आहे.

पहा : रुग्णालय वैद्यकीय शिक्षण.

संदर्भ : 1. Bullough, V. L. Bullough, B. The Emergence of Modern Nursing, New York, 1969.

    2. Davis, F. The Nursing Profession, New York, 1966.

    3. Pearce, E. A. General Text-book of Nursing, London, 1960.

    4. Stewart, I. M. Austen, A. L. A History of Nursing, New York, 1962.

    5. St. John Ambulance Association (India), Nursing, New Delhi, 1960.

                                                             

भालेराव, य. त्र्यं.