लल्ल : (इ. स. सहावे किंवा सातवे शतक). भारतीय ज्योतिर्विद. यांनी ज्योतिषशास्त्रविषयक ग्रंथ लिहिले आहेत. यांची चरित्रविषयक माहिती विशेष उपलब्ध नसल्यामुळे यांच्या काळाविषयी काही मतभेद आहेत, हे त्रिविक्रमभट्टांचे पुत्र असून हे पहिल्या आर्यभटांचे शिष्य असावेत, असे काहींचे मत आहे. मात्र शं. बा.दीक्षित यांच्या मते यांचा काळ आर्यभटांनंतरचा आहे. लल्ल दक्षिण भारतीय असावेत. धी वृद्धितंत्र हा ग्रहगणित ग्रंथ व रत्नकोश हा मुहूर्तग्रंथ त्यांनी लिहिला असून या रत्नकोशाच्या आधारे श्रीपतींनी नंतर रत्नमाला हा ग्रंथ लिहिला. सुधाकर द्विवेदी यांनी घी वृद्धितंत्र हा ग्रंथ शोधून काढून १८८६ मध्ये छापला होता. पाटीगणित हा लल्लांचा एक ग्रंथ असावा असे भास्कराचार्यांच्या गोलाध्यावरून दिसते. भास्कराचार्यांनी सिद्धांत शिरोमणि ग्रंथ लिहून लल्लांच्या सिद्धांतांचे खंडन केले आहे. बीजगणित व जातक यांवरही लल्लांनी ग्रंथ लिहिले असावेत. लल्ल स्वतः वेध घेणारे संशोधक होते व त्यांच्या वेध घेण्याच्या यंत्राचे नाव गोलबंध होते. पीठ व पाणघड्याळ या उपकरणांची वर्णने त्यांच्या ग्रंथात आली असून यष्टियंत्राने रवि-चंद्र अंतर व त्यावरून तिथी काढण्याची रीत दिलेली आहे. लल्लांनी वातावरणाची उंची १२ योजने ( सु. ९६ किमी.) तर रेवती भोग ३५९° मानला होता. त्यांनी त्रिकोणमितीची काही सूत्रे दिली होती व पायची (π ) किंमत ३.१४१६ एवढी मानली होती. मात्र त्यांच्या ग्रंथामध्ये अयन गतीचा उल्लेख आलेला नाही.

ठाकूर, अ. ना.