व्हेस्टोस्लिफर, व्हेस्टो मेल्व्हिन : (११ नोव्हेंबर १८७५—८ नोव्हेंबर १९६९). अमेरिकन ज्योतिर्विद. त्यांनी १९१२—२५ या काळात सर्पिल दीर्घिकांच्या अरीय ( दृष्टिरेषेतील ) वेगांचे व जलदपणे होणार्‍या अक्षीय परिभ्रमणाचे पद्धतशीर निरीक्षण केले. या निरीक्षणांतून विश्वाच्या उत्पत्तीविषयीच्या प्रसरणशील विश्व या सिद्धांताला पुष्टी देणारा पहिला निरीक्षणात्मक पुरावा उपलब्ध झाला. त्यांनी दीर्घिकांच्या ज्योतिष-शास्त्रीय अध्ययनात मोठी प्रगती घडवून आणली. [⟶ दीर्घिका].

स्लिफर यांचा जन्म मलबेरी ( ॲरिझोना, अमेरिका ) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. इंडियाना विद्यापीठात अध्ययन करून त्यांनी १९०१ मध्ये खगोलीय यामिकी व ज्योतिषशास्त्र या विषयांतील बी.ए. पदवी मिळविली. त्याच वर्षी पर्सीव्हल लोएल यांच्या सल्ल्यानुसार फ्लॅगस्टॅफ ( ॲरिझोना ) येथील लोएल वेधशाळेत ते लोएल यांचे साहाय्यक झाले. मात्र, पुढील अध्ययनासाठी अधूनमधून स्लिफर इंडियाना विद्यापीठात जात असत. त्यांनी या विद्यापीठाची एम्.ए. (१९०३) आणि या वेधशाळेतील संशोधनाद्वारे पीएच्.डी. (१९०९) या पदव्या संपादन केल्या.

लोएल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करताना स्लिफर यांनी तेथे वर्णपटवैज्ञानिक सुविधा उभारून त्यांच्या तंत्रांमध्ये मूलभूत सुधारणा केल्या. १९१५ पर्यंत त्यांनी लोएल यांच्या हाताखाली काम केले. स्लिफर यांचे प्रशासकीय कौशल्य लक्षात घेऊन लोएल यांनी त्यांना वेधशाळेचे सहसंचालक केले (१९१५). लोएल यांच्या निधनानंतर स्लिफर या वेधशाळेचे १९१६ मध्ये कार्यकारी संचालक व १९२६ मध्ये संचालक झाले. १९५२ पर्यंत स्लिफर या पदावर कार्यरत होते.

सुरुवातीस लोएल यांच्या मार्गदर्शनाखाली स्लिफर यांनी स्वतः उभारलेला वर्णपटलेखक वापरून मंगळावरील पाणी व ऑक्सिजन यांच्या अस्तित्वाचा पुरावा शोधण्याचे आणि शुक्रावरील दिवसाचा कालावधी मोजण्याचे काम केले. १९०५ ०७ दरम्यान स्लिफर यांनी मंगळावरील जीवसृष्टी ( विशेषतः हरितद्रव्य ) शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

स्लिफर यांनी खगोलीय वर्णपटविज्ञानात व्यापक प्रमाणावर सखोल संशोधन केले व त्यातील तंत्रे परिपूर्ण केली [⟶ वर्णपटविज्ञान]. त्यांनी विशेषतः ग्रहांची वातावरणे व अक्षीय परिभ्रमण काल, विसरित (पसरलेल्या) अभ्रिका व आंतरतारकीय माध्यम आणि सर्पिल दीर्घिकांचे अरीय वेग यांविषयी संशोधन केले. त्यांच्या संशोधनामुळे मंगळ, गुरू, शनी, प्रजापती (युरेनस) या ग्रहांचे अक्षीय परिभ्रमण काल ठरविता आले. उदा., १९१२ मध्ये प्रजापतीच्या वर्णपटांचे विश्लेषण करून त्यांनी त्या ग्रहाचा अक्षीय परिभ्रमण काल १०.८ तास असल्याचे सुचविले होते. १९१२ मध्ये त्यांना कृत्तिका तारकासमूहातील विसरित अभ्रिका-मय भागात गडद (वा कृष्ण) रेषायुक्त वर्णपट आढळला. त्यावरून त्यांनी अशा अभ्रिका लगतच्या तार्‍यांच्या परावर्तित प्रकाशाने चकाकत असतात, असे दाखविले. त्यांनी गुरू, शनी व वरुण (नेपच्यून) या ग्रहांच्या वर्णपटातील गडद शोषण पट्ट शोधून काढले. त्यावरून त्या ग्रहांच्या वातावरणांमधील काही रासायनिक घटकांची ओळख पटली. तसेच रात्रीच्या आकाशाच्या वर्णपटांतील तेजस्वी रेषा व पट्ट यांचे संशोधन करून त्यांनी रात्रीच्या आकाशातील तेजस्वी प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) व त्याच्या तीव्रतेत होणारे बदल शोधून काढले. १९०८ मध्ये त्यांनी पृथ्वी व तारे यांच्या दरम्यान वायू असल्याचा पुरावा दिला. तसेच आंतरतारकीय अवकाशात कॅल्शियम व सोडियम ही मूलद्रव्ये विखुरलेली असल्याचे त्यांनी दाखवून दिले (१९१२). अशा रीतीने आंतरतारकीय अवकाशात वायू व कणमय द्रव्य (धूलिकण) असल्याचा पुरावा देणारे ते पहिले ज्योतिर्विद आहेत. यामुळे ग्रह व तारे यांच्याव्यतिरिक्त इतरत्र द्रव्य असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनाचा १९२०—३३ दरम्यानच्या आंतरतारकीय द्रव्यावरील संशोधनावर प्रभाव पडलेला दिसतो. यांशिवाय त्यांनी गोलाकार तारकागुच्छांचे अरीय वेग ठरविणे, धूमकेतू व ध्रुवीय प्रकाश यांचे वर्णपटवैज्ञानिक अध्ययन करणे इ. कामेही केली.

स्लिफर यांनी देवयानी ( अँड्रोमेडा ) तारकासमूहातील अभ्रिका म्हणून ओळखण्यात येणार्‍या दीर्घिकेचा वर्णपटवैज्ञानिक अभ्यास करून ती सूर्याकडे सेकंदाला सु. ३०० किमी. या माध्य वेगाने येत असल्याचा निष्कर्ष काढला. हा त्या काळात माहीत असलेला सर्वाधिक अरीय वेग होता. १९१४ पर्यंत त्यांनी चौदा सर्पिल दीर्घिकांचे वेध घेऊन निरीक्षण केले. यांपैकी बहुसंख्य दीर्घिका सूर्यापासून उच्च गतीने दूर जात असल्याचे त्यांनी शोधून काढले. अशा रीतीने आकाशगंगेबाहेरच्या दीर्घिकांच्या वेगांचे अनुसंधान करणारे १९१४ पर्यंत ते पहिलेच ज्योतिर्विद होते. शिवाय त्यांनी या दीर्घिका आकाशगंगेच्या बाहेर असाव्यात असे म्हटले होते. त्यांनी या दीर्घिकांचे अक्षीय परिभ्रमण वेग मोजले व ते काहीशे किमी. असल्याचे त्यांना आढळले. या वेगमापनाच्या आधारे एडविन पॉवेल हबल यांनी १९२९ मध्ये प्रथम दीर्घिकांची अंतरे व त्यांचे दूर जाण्याचे वेग यांच्यात परस्परसंबंध असल्याचे सूचित केले. स्लिफर यांच्या संशोधनामुळे दीर्घिकांच्या गती आणि विश्वोत्पत्तीविषयीचा प्रसरणशील विश्व हा सिद्धांत यांविषयीच्या सखोल संशोधनाचा मार्ग खुला झाला. सर्पिल दीर्घिकांचे अक्षीय परिभ्रमण वेग काढण्यासाठी वापरलेले तंत्र त्यांनी ग्रहांच्या अक्षीय परिभ्रमण कालाच्या मापनासाठी वापरले.

स्लिफर यांना त्यांच्या संशोधनकार्यामुळे पुढील अनेक मानसन्मान लाभले : ॲरिझोना (१९२३), इंडियाना (१९२९), टोराँटो (१९३५) व नॉर्दर्न ॲरिझोना (१९६५) या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या पॅरिस ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ललांद पारितोषिक (१९१९), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ड्रेपर सुवर्ण पदक (१९२२), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९३३), ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ पॅसिफिकचे ब्रूस पदक (१९३५). यांशिवाय ते इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या कमिशन ऑन नेब्युली ( क्र.२८) चे अध्यक्ष (१९२५ व १९२८), अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे उपाध्यक्ष (१९३०), अमेरिकन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे उपाध्यक्ष (१९३३) तसेच अमेरिकन सोसायटी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ फ्रान्स, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी यांचे ते सदस्यही होते.

स्लिफर यांचे फ्लॅगस्टॅफ येथे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.