गॉथिक कला : (सु. ११५० — १४००). ‘गॉथिक’ ही संज्ञा प्रबोधनकालीन कलावंतांनी मध्ययुगीन वास्तुकलेच्या एका प्रकाराला उद्देशून वापरली. हा वास्तुप्रकार त्यांच्या दृष्टीने प्राकृतिक ( बार्बरिक ) होता. तो त्यांना रोमन साम्राज्यकालीन अभिजात कलेची जागा घेणाऱ्या गॉथ जमातीच्या कलेसारखा वाटला. जेव्हा एकोणिसाव्या शतकातील स्वच्छंदतावादी लेखकांना गॉथिक कलेविषयी आस्था वाटून ते तिचे कौतुक करू लागले, तेव्हा ‘गॉथिक’ या संज्ञेतील निंदाव्यंजकता नष्ट झाली. प्रारंभीच्या काळात गॉथिक ही संज्ञा केवळ वास्तुकलेपुरतीच मर्यादित होती. पुढे ती तत्कालीन मूर्तिकला, चित्रकला, अलंकरण आदी प्रकारांना अनुलक्षूनही वापरली जाऊ लागली.

  

वास्तुकला : गॉथिक शैलीचा उगम बाराव्या शतकाच्या मध्यास फ्रान्सच्या उत्तरमध्य भागात झाला. कॅथीड्रल्स ह्याच प्रारंभीच्या गॉथिक वास्तू असल्याने, ही शैली धर्माशी विशेषत्वाने निगडित होती. पुढील काळात ती इंग्लंड, स्पेन, जर्मनी व इटली या देशांत पसरली. त्यातूनच हळूहळू आंतरराष्ट्रीय गॉथिक शैली विकास पावली. मात्र सोळाव्या शतकात जोमाने पुढे आलेल्या प्रबोधनकालीन शैलीपुढे ती निष्प्रभ ठरली.

  

ह्या नव्या वास्तुशैलीचे सारभूत वैशिष्ट्य म्हणजे आडव्या कमानींचा वापर करून चर्चचा घुमट उभारणे, हे होय. सडसडीत स्तंभ व निरुंद तीर यांच्या साहाय्याने दगडाची परांची उभारण्यात येत असे. गोलाकार कमानींऐवजी साग्र कमानींवर (पॉइंटेड आर्च) वास्तुकारांचा भर असे. त्याचे कारणही स्पष्ट होते. दोन स्तंभांतील अंतर निमगोल कमानींनी सांधले असता, घुमट ठराविक उंचीपेक्षा जास्त वर चढविता येत नाही तिथे अनेकदा साग्र कमानींची योजना अधिक उपयुक्त ठरत असे. बांधकामाच्या सोईच्या दृष्टीने ही कमान हवी तशी पसरट वा टोकदारही ठेवता येत असे. तथापि केवळ स्तंभ कमानींचा बाह्य भार सावरू शकत नसल्याने दोन्ही बाजूंच्या कमानदार पाख्यांमध्ये बाहेरून टेकू किंवा धिरे बांधत असत. परंतु उंच मध्यदालनासाठी मात्र पाख्यांना व छपरांना जोडून धिरे बांधावे लागत. वास्तुकारांनी ह्या कमानधिऱ्यांचा वापर गॉथिक घुमटाच्या परांचीला पूर्णत्व देण्यासाठी, तसेच वास्तुरचनेला घाट देण्यासाठी केला.

  

ह्या वास्तूंच्या अंतर्भागांत दारेखिडक्यांविरहीत भिंती (ब्लँक वॉल) किंवा अवजड स्तंभ नसत. हे अंतर्भाग निरुंद स्तंभदंड व तीर यांनी गजबजून गेल्यासारखे भासत. तसेच खिडक्यादेखील वेलबुट्ट्यांनी (ट्रेसरी ) संपूर्ण आच्छादलेल्या असत. 

  

खिडक्यांमध्ये शिशांच्या पट्ट्यांच्या साहाय्याने काचेचे चमकदार तुकडे बसवत असत. हळूहळू ह्या सुट्या काचतुकड्यांचा आकार वाढत गेला व त्यांवर ख्रिस्ती पुराणांतील कथाप्रसंग चितारले जाऊ लागले. ह्या रंगीत चित्रकाचांनी सजलेल्या खिडक्या प्रकाशातील चित्रांप्रमाणे दिसत. सुरुवातीला घुमट व बहिर्भागही रंगविण्यात येत असत. खिडक्यांतून परावर्तित होणाऱ्या रंगीत प्रकाशामुळे कलात्मकतेचे उद्दिष्टही साधले जात असे. तसेच त्यामुळे ह्या सौंदर्याचे चिंतन करणाऱ्या साधकाला जडसृष्टीच्या पलीकडे असलेल्या गूढाचे आकलन होणे शक्य झाले. 

  

फ्रान्समध्ये ११८० ते १२७० या कालावधीत ऐशींहून जास्त कॅथीड्रलच्या वास्तू बांधल्या गेल्या. तत्कालीन धर्मप्रवणतेतूनच अशा भव्य वास्तू साकार झाल्या. ह्या कॅथीड्रल-वास्तूंमध्ये पॅरिस येथील ‘नोत्र दाम’ हे सर्वांत विख्यात आहे. त्याचा दर्शनी भाग कलापूर्ण असून, द्वारमंडपांची रचना हलकीफुलकी आणि आकर्षक आहे. शार्त्र येथील कॅथीड्रलमध्ये मनोरे उभारण्याच्या परस्परविरोधी शैली आढळून येतात. ह्या भव्य वास्तूचे बांधकाम पूर्ण होण्यास तीनशे वर्षांहून अधिक कालावधी लागला, हेच याचे कारण असावे. रीम्झच्या कॅथीड्रलचा उत्तुंग दर्शनी भाग, ही तर जागतिक वास्तुकलेतील एक महान सिद्धी मानली जाते. तेराव्या शतकातच बहुतांशी बांधून पूर्ण झालेले आम्यें येथील कॅथीड्रल त्याच्या भव्य शिल्पविभूषित प्रवेशद्वारांबद्दल विख्यात आहे.

  

इंग्लंडमधील गॉथिक कलेवर फ्रेंच वास्तुशैलीची छाप असली, तरी तिचा विकास काहीसा स्वतंत्रपणे झाला. तेथील कॅथीड्रल—वास्तूंची मध्यदालने अरुंद असून, ती फ्रेंच कॅथीड्रलांच्या मध्यदालनांइतकी उंचही नव्हती. तेथे उंचीपेक्षा पसरटपणावर अधिक भर होता. आम्यें येथील कॅथीड्रलशी तुलना करता सॅलिस्‌बरीचे कॅथीड्रल खूपच लहान वाटते. कँटरबरीचे कॅथीड्रल हे फ्रेंच वास्तुविशारदाने उभारले असल्याने, त्यावर फ्रेंच गॉथिक शैलीची छाप सहज दिसून येते.

  

जर्मनीमध्ये फ्रेंच गॉथिक शैलीचा वापर तेथील स्थानिक गरजांनुसार करण्यात आला. आम्यें कॅथीड्रलच्या सर्वसाधारण रचनाकल्पास अनुसरून कोलोन्या कॅथीड्रलची रचना झाली परंतु त्यातील विपुल अलंकरण हे फ्रेंच गॉथिक कॅथीड्रलच्या साध्या सफाईदार रचनेच्या पलीकडेच होते.

  

इटालियन वास्तुविशारदांनी आपल्या वास्तुकल्पांमध्ये प्रशस्तपणावर अधिक भर दिला. त्यांचे वास्तुविषयक तपशील गॉथिक वळणाचे असले, तरी त्यामागील चैतन्यतत्त्व अभिजात आहे.

  

मूर्तिकला : गॉथिक मूर्तिकला ही वास्तुकलेच्या निकट सान्निध्यातच अवतरली व तिच्या रचनाकल्पाचे एक अविभाज्य अंग बनली. आद्य गॉथिक शिल्पाचा उत्कृष्ट नमुना शार्त्र कॅथीड्रलच्या राजद्वारामध्ये पहावयास मिळतो. तेथील पवित्र व्यक्तींच्या उभ्या मूर्तींतून एका उदात्त शांतवृत्तीचा प्रत्यय येतो. ११९४ नंतरच्या शिल्पांतून मात्र कथा साकार होऊ लागल्या. कलेतील मानवीपणावर भर देणारी भूमिका निर्माण झाली. 

  

तेराव्या शतकातील मूर्तिकलेचे आम्यें हे मुख्य केंद्र बनले. तेथील कॅथीड्रलच्या दर्शनी भागाच्या मध्य द्वारावर स्वर्गाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या ख्रिस्ताची मूर्ती — Le Beau Dieu — आहे. तिचे भाव सौम्य व शांत आहेत. त्या ठिकाणी काही लौकिक विषयांची अभिव्यक्तीही — उदा., महिन्यांची प्रातिनिधिक शिल्पे — आढळते. रीम्झ कॅथीड्रलमधील शिल्पांमध्ये खूपच वैविध्य व विमुक्तता दिसून येते. त्या दृष्टीने पश्चिम द्वारावरीलॲनन्सिएशन शिल्पसमूह लक्षणीय आहे.

  

जर्मनीतील स्ट्रॅसबर्ग कॅथीड्रलमधील शिल्पनिर्मितीत शिल्पकाराचा स्वतंत्र दृष्टिकोन विशेषत्वाने प्रत्ययास येतो. वस्त्रांच्या घड्यांखाली झाकलेली देहरचना आविष्कृत करणारी, मूर्तिशिल्पाची अभिजात कला मध्यंतरी लोप पावली होती ती त्यांनी पुनरुज्जीवित केली. दक्षिण दालनाच्या द्वारमंडपातील डेथ ऑफ द व्हर्जीन (चौदावे शतक ) हे शिल्प हृदयस्पर्शी आहे. नाऊम्बुर्क येथील पश्चिम गायनपीठावरील (क्वायर) संस्थापकांची जोमयुक्त शिल्पे जणू दगडातील जिवंतपणाचाच प्रत्यय घडवितात.

  

ह्या कालखंडातील प्रमुख शिल्पकार क्लाउस स्लूटर (मृत्यू १४०६) हा होय. तो मूळचा डच असून, बर्गंडीच्या दरबारात काम करीत होता. त्याने शिल्पिलेल्या व्यक्तिप्रतिमांमध्ये मानवी चैतन्य व नाट्यमयता हे गुण दिसून येतात. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातील निकॉला पिसानो ( सु १२१५ — सु. १२७७ ) या इटालियन शिल्पकाराने फ्रेंच कारागिरांचाच कित्ता गिरवला. पीसा येथील कॅथीड्रलच्या बाप्तिस्मागृहामध्ये त्याने संगमरवरी उत्थित शिल्पे कोरली ( सु. १२६० ). त्यांत एकाच चौकटीमध्ये विविध कथा एकत्र गुंफण्याची मध्ययुगीन धाटणी अनुसरलेली दिसते. मात्र त्याचबरोबर वस्त्रांतील अवगुंठित देहरचना अभिव्यक्त करण्याची प्राचीनांची कलाही त्याला अवगत होती, हेही दिसून येते. ह्यांमुळेच त्याच्या व्यक्तिप्रतिमा अधिक भारदस्त व अस्सल भासू लागतात.

  


चित्रकला : चित्रकाच  हा गॉथिक चित्रकलेचाच एक आविष्कार होता. वास्तूच्या अंतर्भागाच्या घडणीतील तो एक आदर्श पूरक घटक होता. आद्य गॉथिक खिडक्यांचा एक उत्तम संच शार्त्र कॅथीड्रलमध्ये पहावयास मिळतो. चित्रकाचांच्या ह्या खिडक्यांमुळे भिंतीवर भित्तिलेपचित्रे किंवा कुट्टिमचित्रे ह्यांसाठी पुरेशी जागाच उरत नसे. ह्या चित्रकाचांच्या झळाळीचे दर्शन तत्कालीन फ्रेंच हस्तलिखितांच्या सजावटीतून पुन्हा एकवार घडते. ह्या सजावटीत सोनेरी रंगाच्या पार्श्वभूमीवर उठावदार अशा तांबड्या व निळ्या रंगांचा वापर केला आहे. लघुचित्रण क्षेत्रातील एक श्रेष्ठ कलावंत झां फ्यूसेल (सु. १३०० — सु. १३५५) याने ग्रंथसजावटीची एक नवी शैली रूढ केली. तीत ग्रंथांतर्गत मजकुराभोवती पाने, फुले, पक्षी, कीटक यांच्या अलंकरणाने युक्त अशी झगझगीत रंगीत चौकट चितारली जात असे. पॉल, हेर्मान व यान ह्या लिम्बर्ख बंधूंनी बेरीच्या ड्यूककरिता रंगविलेल्या Les Tres Riches Heures du Duc de Berry (१४१३—१६) ह्या ग्रंथात गॉथिक चित्रकलेचे उत्कृष्ट नमुने आढळतात. त्यांत दरबारी जीवनातील दृश्ये व निसर्गचित्र पहावयास मिळतात.

  

तत्कालीन चौकटचित्रणात (पॅनेल पेंटिंग) नाजुक तपशिलाविषयीची आस्था दिसून येते. विल्टन डिप्टिक  हे या प्रकारातील आद्य उदाहरण होय. हे द्विपुटचित्र चौदाव्या शतकाच्या अखेरीस एका अज्ञात चित्रकाराने काढले ( सु. १३९५ ). कोलोन्या येथे पंधराव्या शतकात श्टेफान लोक्नर याने वेदिचित्रांची मालिका रंगवली ( सु. १४४२ – ५१). मॅडोना इन द रोझ आर्बर  हे त्यांपैकीच एक विख्यात चित्र असून त्यातील कांतिमानता व गोडवा विलोभनीय आहे.  

  

कनिष्ठ कला : गॉथिक काळातही कारागिरीचा वापर चर्चवास्तूच्या सुशोभनासाठीच होत राहिला. वेदींच्या सजावटीसाठी जे चित्रमय विणकाम करण्यात येत असे त्याचा परमोत्कर्ष इंग्लंड व फ्लॉरेन्स येथे आढळून येतो. फ्रान्समधील लिमोझ येथे तांब्याचा मुलामा दिलेली भांडी तयार होत असत. त्यांवरील अलंकरणामध्ये ख्रिस्तजीवनातील प्रसंग चित्रित केलेले असत आणि त्यांच्या झाकणांवर क्रॉसचे रेखांकन असे. ही पात्रे चर्चमधील उपासनेचे जणू एक अविभाज्य अंगच होती. तत्कालीन कोरीव हस्तिदंती द्विपुटचित्रे ही व्यक्तिगत आध्यात्मिक साधनेसाठी वापरली जात असत. अशा प्रकारच्या मोठ्या हस्तिदंती रचनांतून ख्रिस्तजीवनाचे चित्रण आढळते. त्यांतील अगदी धाग्यासारखा बारीक कापलेला हस्तिदंत एखाद्या रेशीमपट्टीप्रमाणे नाजुक, मुलायम दिसतो मात्र त्यातून साकार झालेले कथाप्रसंग ठसठशीत व आकलनक्षम आहेत.

  

चित्रकारांनी पुरविलेल्या आकृतिबंधांच्या आधाराने विणकर चित्रजवनिकांचे विणकाम करीत. ही कारागिरी फ्रान्स व फ्लँडर्स या ठिकाणी समृद्धीस पोहोचली. चित्रजवनिकांचा वापर सजावटीमध्ये करण्यात आला. त्याचप्रमाणे धार्मिक उत्सवांतूनही त्या प्रदर्शित झाल्या. चौदाव्या शतकातील फ्रेंच चित्रजवनिकांचा एक महत्त्वपूर्ण उपलब्ध नमुना म्हणजे गूढाविर्भाव ( अपॉकॅलिप्स ) दृश्ये विणलेले पडदे होत. हे पडदे अँजर्झच्या कॅथीड्रलमध्ये धार्मिक उत्सवांच्या वेळी टांगण्यात येत असत. 

  

उत्तरकालीन गॉथिक कला : तेराव्या शतकाच्या अखेरील इटली हे कलेचे प्रमुख केंद्र बनले. तेथील नगरांचा बायझंटिन साम्राज्याशी निकटचा संपर्क असल्याने, त्यांच्या कित्येक कलाकृती बायझंटिन प्रेरणेतून निर्माण झाल्या. तेथील कलावंतांनी हळूहळू गॉथिक शिल्पातल्या सजीव मानवमूर्ती चित्रकलेत रूपांतरित करण्यास प्रारंभ केला. फ्लॉरेन्सचा चित्रकार ⇨जॉत्तो दी बोंदोने ( सु. १२६७ — १३३७ ) याच्या उदयाबरोबरच कलेचे एक नवे युग सुरू झाले. नव्या चित्रशैलीचे आणखी एक केंद्र सिएना येथे निर्माण झाले. तेथील कॅथीड्रलमध्ये दूत्चो दी ब्वॉनीन्सेन्या ( सु. १२५५ —१३१९ ) या चित्रकाराने ९२ चौकटींची वेदिचित्रमाला रंगवली. सीमोने मार्तीनी ( सु. १२८४ — १३४४ ) याच्या ॲनन्सिएशन  (१३३३) या चित्रातून एक प्रकारचे गूढ चैतन्य व्यक्त होते. तथापि या दोघांच्याही चित्रणात जॉत्तोच्या चित्रणातील भव्यतेचा प्रत्यय येत नाही. जॉत्तोच्या भित्तीलेपचित्रांतील चैतन्य व भव्यता हे गुण पुढेही, आद्य प्रबोधनकालीन कलेचा उदय होईपर्यंत, अभावानेच प्रकटले. [→ इटलीतील कला]. 

  

गॉथिक कलेचे पुनरुज्जीवन : अठराव्या शतकात गॉथिक वास्तुप्रकार व अलंकरण यांविषयी कलाक्षेत्रात आकर्षण निर्माण झाले, त्याला अनुलक्षून ‘रिव्हाइव्हल’ (पुनरुज्जीवन) ही संज्ञा वापरली जाते. स्वच्छंदतावादी संप्रदायाच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचाच तो एक भाग होता. हॉरिस वॉलपोलने इंग्लंडमध्ये गॉथिकच्या पुनरुज्जीवनास चालना दिली व त्यास अनुसरून ग्रामीण भागांतील हवेल्यांतून कृत्रिम गॉथिक ‘अवशेषां’ची रचना करण्याचा जणू प्रघातच निर्माण झाला. एकोणिसाव्या शतकामध्ये चर्चवास्तूंच्या तसेच सार्वजनिक वास्तूंच्या बांधकामांतही गॉथिक शैलीचे अनुकरण केले जाऊ लागले. 

  

संदर्भ : 1. Focillon Henri Trans. King, Donald, The Art of the West in the Middle Ages, 2 Vols.,        London, 1963.

           2. Harvey, J. H. The Gothic World, 1100—1600, London, 1950.

मेहता, कुमुद (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)


डेथ ऑफ द व्हर्जिन (चौदावे शतक ) रीम्झ कॅथीड्रल (१२२१) — दर्शनी भागशार्त्र कॅथीड्रल, ११९४

'हेड ऑफ ख्राइस्ट' (१३९५-९९) — क्लाउस स्लूटर

रीम्झ कॅथीड्रल (१२२१) — अंतर्दालन

'ॲनन्सिएशन' (१३३३) — सीमोने मार्तीनी.'Les Tres Riches Heures du Duc de Berry' ह्या ग्रंथातील 'ऑक्टोबर' सजावट (१४१३—१६) — लिम्बर्ख बंधू.

चित्रकाच : हार्प वाजविणारा राजा डेव्हीड, शार्त्र कॅथीड्रल, १३ वे शतक.

'विल्टन डिप्टिक' (सु. १३९५) — चित्रकार अज्ञात