मोगल कला : (१६ वे १८ वे शतक). मूळ भारतीय कलेवर पर्शियन (इराणी) कलेचा प्रभाव पडून वेगळी कलाशैली निर्माण झाली ती मोगल शैली म्हणून ओळखली जाते. मोगलपूर्व सुलतानशाहीच्या काळात लघुचित्रांची निर्मिती होत होती. त्यांत तत्कालीन लोककला व जैन लघुचित्रशैली यांचा विशेष प्रभाव पडलेला दिसत होता. परंतु तरीही त्यातून विशिष्ट अशी एक कलाशैली प्रतीत होत नव्हती. पर्शियन कलावंतांच्या भारतात येण्याने या मूळ भारतीय शैलीला वैशिष्ट्यपूर्ण असे एक वळण मिळाले. त्यातून मोगल कलाशैली निर्माण झाली. भारताचा पहिला मोगल बादशहा बाबर व नंतरचा हुमायून यांनी भारतात येताना आपल्याबरोबर काही चांगले पर्शियन चित्रकार आणले होते. त्यात मीर सईद अली व ⇨ अब्दुस् समद ख्वाजा हे श्रेष्ठ पर्शियन चित्रकार होते. बाबर हा रसिक व कलाप्रेमी होता. त्याला संगीत, चित्र, शिल्प, वास्तू आदी कलांची फार आवड होती. हुमायूनही कलाप्रेमी होता. काबूलमध्ये असताना चित्रकलेचे थोडेबहुत शिक्षण त्याने घेतले होते. या दोन्ही राजांना कलेविषयी अपार प्रेम असूनही राज्य स्थिर करण्याच्या उलाढालीत कलाविकासाकडे फारसे लक्ष पुरविता आले नाही. परंतु हुमायूनचा मुलगा अकबर याने पर्शियन व भारतीय कलावंतांना एकत्र राजाश्रय देऊन त्यांच्याकडून उदंड कलानिर्मिती करवून घेतली. अशा प्रकारे अकबराच्या काळात (कार. १५३०–१६०५) प्रथम मोगल कलेचा पाया घातला गेला. अकबर राजा म्हणून फार मोठ्या योग्यतेचा होताच पण खरा रसिक व कलाप्रेमीही होता. काबूलमध्ये वडिलांबरोबर असताना चित्रकलेचे थोडेबहूत शिक्षण त्याने घेतले होते, असे म्हटले जाते. मात्र प्रसिद्ध कलासमीक्षक कार्ल खंडालवाला या मताशी सहमत नाहीत. अकबराने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकीर्दीत कलानिर्मितीस खूपच प्रोत्साहन दिले. शंभराहून अधिक चित्रकार त्याच्या  दरबारी होते. त्याच्या दरबारात अबुल-हसन, मन्सूर, फर्रूख बेग यांसारखे मुस्लिम चित्रकार होते, तसेच केसव, दसवंत, बसावन, बिशनदास यांसारखे हिंदू चित्रकारही होते. अकबराने ग्रंथसजावटीला विशेष प्रोत्साहन दिले. त्याने आपल्या कारकीर्दीत चोवीस हजारांहून अधिक हस्तलिखित ग्रंथ चित्रबद्ध करवून घेतले. अकबर हा कलेप्रमाणेच ज्ञानाचाही उपासक होता. शाहनामा, अकबरनामा, राजमामा (महाभारताचा अनुवाद), आयारदानिश (पंचतंत्राचा अनुवाद), रामायण, महाभारत, हरिवंश इ. ग्रंथ त्याच्या संग्रही होते. एवढेच नव्हे तर, योगवासिष्ठ या तत्त्वज्ञानपर ग्रंथातील काही बोधप्रद कथांवरही त्याने चित्रे रंगवून घेतली होती. त्यांपैकी ‘कर्कटी राक्षसी रात्रीच्या प्रहरी प्रश्न विचारून राजाची कसोटी घेत आहे’ अशा आशायाचे चित्र हे त्या काळातील एक कलादृष्ट्या दुर्मिळ महत्त्वाचे चित्र आहे. या चित्रातील अंधुक हिरवट, निळसर, करड्या रंगांचा वापर अतिशय खुबीने केलेला आहे. चित्रातील रात्रीचे शांत पण गूढरम्य वातावरण आशयघन आहे.

अकबराच्या काळातील चित्रे मुख्यतः चार प्रकारांतून काढली गेली : (१) ‘हमझानामा’, ‘शाहनामा’ यांसारख्या खास पर्शियन विषयांवर काढलेली चित्रे : यात पंचतंत्रातील अद्‌भुत गोष्टींवर चित्रे काढलेली असत. पर्शियन पौराणिक कथांवरील चित्रेही त्यात असत. या चित्रांतून पर्शियन संस्कृतीचे व कलेचे दर्शन घडते. (२) ‘अकबरनामा’, ‘बाबरनामा’ यांसारख्या ऐतिहासिक विषयांवर काढलेली चित्रे : बाबर, अकबर, जहांगीर या मोगल सम्राटांच्या पराक्रमांचे, शौर्याचे वर्णन करणारे ग्रंथ लिहिले जात. त्यांतील ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण केले जाई. उदा., बाबर व त्याचे सैन्य गंगा नदी पार करून जात असतानाचे दृश्य. हे बाबरनामामधील उत्कृष्ट चित्र आहे. पुढच्या पिढीला मागील पिढीच्या पराक्रमाचे दर्शन घडवावे, असा हेतू त्यामागे होता. (३) रामायण, महाभारत, हरिवंश यांसारख्या महाकाव्यांवर आधारित चित्रे. प्राचीन महाकाव्यांतून मानवी जीवनाची, स्वभावांची विविध अंगे गोचर झाली आहेत, ह्याची जाण अकबराला होती. रामायणातले काही ह्रदयस्पर्शी प्रसंग त्याने चित्रित करून घेतले आहेत तसेच महाभारतातील जगड्व्याळ अशा जीवनसंघर्षाचे दर्शन घडविणारे युद्धाचे प्रसंगही. अकबराच्या या धार्मिक विषयांमध्ये ख्रिस्ताचे जीवन हाही एक विषय आहे. ही चित्रे मात्र अगदी साधारण प्रतीची वाटतात. (४) वेगवेगळ्या लोकोत्तर पुरुषांची व्यक्तिचित्रे : अकबराला व्यक्तिचित्रणामध्ये फार रुची होती. तो स्वतः चित्रकारासमोर बसून आपले चित्र काढून घेई. आपली वेगवेगळ्या प्रकारची अशी खूप व्यक्तिचित्रे त्याने रंगवून घेतली आहेत. त्याच्या एका व्यक्तिचित्रात शिरोभागी ख्रिस्ताच्या क्रूसाचे चित्र काढलेले आढळते. यावरून त्याला ख्रिस्ताबद्दल नितांत आदर असावा, असे वाटते. इतर महत्त्वाच्या व्यक्तींनाही तो आग्रहाने बसवून त्यांची चित्रे काढून घेई. मात्र त्याने व्यक्तिचित्रांपेक्षाही जास्त प्रोत्साहन दिले, ते ग्रंथसजावटीच्या चित्रांना. या ग्रंथसजावटीच्या कामात एकाच चित्रावर अनेक चित्रकार काम करीत. एकाने सुलेखन केले, तर दुसरा आखणी करी. तिसरा आरेखन, तर चौथा रंगलेपन अशा पद्धतीने चित्र संयुक्तीरीत्या पूर्ण होत असे. पर्शियन चित्रकार निसर्गचित्रण उत्कृष्ट करीत तर भारतीय चित्रकार व्यक्तिचित्रण आणि स्वभावरेखन उत्कृष्ट करीत. ज्या चित्रकाराचे ज्या चित्रांगावर प्रभूत्व असे, ते ते अंग त्या त्या चित्रकाराकडून पूर्ण करून घेतले जाई. दरबारातील कारकून चित्राच्या मागील बाजूस चित्रकारांची नावे लिहून ठेवत. ग्रंथसजावटीतील ही चित्रे लेखनातील वर्णन चित्रबद्ध करायच्या हेतूनेच काढलेली असत. त्या चित्रासंबंधीचे ⇨ सुलेखन चित्रावरच केलेले असायचे परंतु हे सुलेखन चित्राचाच एक भाग म्हणून पाहिले जाई. हे सुलेखन लयदार व एकसंध असल्याने चित्राचा तोल जराही बिघडत नसे. परंतु चित्र म्हणून बघायचे झाल्यास अकबरकालीन चित्रे प्राथमिक अवस्थेतील वाटतात. चित्रनिर्मितीचा हेतूच केवळ ग्रंथसजावटीकरिता असल्याने त्यातून खास कलागुणांची अपेक्षा धरता येत नाही. या चित्रात वस्तु-आकारांची गर्दी झालेली दिसते. चित्राच्या लयबद्ध संघटनेकडे पुरेसे लक्ष दिलेले दिसत नाही. तसेच रंगसंगती पुढील काळाच्या तुलनेने पाहता काहीशी भडक वाटते शिवाय ती संवादीही वाटत नाही. अर्थात यालाही अपवाद म्हणून काही चांगली चित्रे आढळतात. उदा., कर्कटी राक्षसीच्या गोष्टीवरील चित्र. पुढेपुढे चित्रावरील सुलेखन कमी होत गेले. जहांगीर, शाहजहान यांच्या काळात सुलेखन पूर्णपणे लोप पावून, स्वतंत्र लघुचित्रनिर्मितीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.


अकबराच्या काळात प्रामुख्याने ग्रंथसजावटीकरिता चित्रण झाले, तर जहांगीरच्या काळात (कार. १६०५–२७) स्वतंत्रपणे चित्रविषय घेऊन चित्रण झाले. जहांगीर हा खऱ्या अर्थाने कलाप्रेमी व सौंदर्यप्रेमी राजा होता. राजमहालाच्या ऐश्वर्यापेक्षाही निसर्गाच्या सहवासातच तो जास्त रमला. निसर्गातील पशुपक्षी, पानेफुले यांचे त्याला विलक्षण वेड होते. निसर्गात जे जे सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण दिसेल त्याचे स्वतंत्रपणे चित्रण करवून तो ते आपल्या संग्रहात ठेवी. नुसत्या गुलाबपुष्पांचेच दीडशेहून अधिक प्रकार त्याच्या संग्रहात आढळतात. शिकारीला जाताना चित्रकारांचा एक ताफाच तो आपल्याबरोबर घेऊन जाई व आपल्याला आवडलेल्या पशुपक्ष्यांची, पानाफुलांची चित्रणे करवून घेई. आपण स्वतः शिकार करत असतानाची कित्येक चित्रे त्याने काढून घेतली आहेत. जहांगीरकालीन चित्रांतून खूप वेगवेगळे विषय येतात. जहांगीरने आपली प्रणयचित्रेही काढून घेतली होती. नूरजहानला आलिंगन देत असतानाच्या चित्रात सम्राटाचा गर्व दिसत नाही, तर त्यात प्रेमी युगुलांची निखळ भावमुद्रा दिसते. अकबर व शाहजहान या दोघांना मात्र आपली अशी प्रेमविषयावरील चित्रे काढून घेतल्याचे आढळत नाही. बघताक्षणीच जे जे मनाला हेलावून सोडते ते ते सुंदरच असते, मग त्यात रूढ अर्थाने कुरूपता असो की भयानकता, या स्वच्छंदतावाद्यांच्या वृत्तीने सौंदर्याचा आस्वाद घेणारा जहांगीर हा खराच मोठा रसिक होता, असे म्हणावे लागेल, मृत्यूशय्येवर पडलेल्या इनायतखानाला मुद्दाम दरबारात आणून त्याचे चित्र जहांगीरने काढून घेतले होते. हे चित्र वरवर पहाता कुरूप वाटते परंतु भावप्रकटीकरणाच्या दृष्टीने ते अत्यंत प्रभावी आहे. या चित्रातील मोकळ्या अवकाशात अस्थिपंजर झालेले खानाचे शरीर मृत्यूची भयानकता दर्शविते. त्यातील मोकळा अवकाश मृत्यूची क्रूर सावलीच घेऊन येतोय, असा भास होत रहातो. एकाच वेळी कारुण्य व मृत्यूची भयानकता आपल्याला हेलावून सोडते. प्राण्यांच्या झुंजींच्या विषयावरही जहांगीरने अनेक चित्रे काढून घेतली होती. उंटांची झुंज हे त्याच्या संग्रहातील एक अप्रतिम चित्र आहे. या चित्रात उंटासारख्या मंद व ओबडधोबड प्राण्यालाही पर्शियन वळणाच्या लयदार रेषांनी चपळ व रेखीव बनवले आहे. अशा प्रकारे स्वतंत्रपणे काढलेल्या पशुपक्ष्यांच्या चित्रांभोवती चौकटीत पानाफुलांची आलंकारिक किनार काढायची, ही प्रथाही पर्शियन कलाशैलीकडून मोगल कलेला मिळाली. जहांगीरला उत्तमोत्तम चित्रांचा संग्रह करून ठेवण्याची विलक्षण आवड होती. व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज व नंतर फ्रेंच, इंग्रज व्यापारी मोगल दरबारात येत तेव्हा उत्तम पाश्चात्त्य चित्रकारांच्या कलाकृती तो आवर्जून विकत घेई. या व्यापाऱ्यांमार्फत मोगल लघुचित्रेही पश्चिमेत जाऊन पोहोचली असावीत. कारण प्रसिद्ध बरोककालीन चित्रकार रेम्ब्रँट याने काही मोगल लघुचित्रांवरून फार सुंदर रेखाटने केलेली आढळतात.अशाच प्रकारे पाश्चात्त्य कलाशैलीचा प्रभावही नंतरच्या मोगल चित्रांवर पडलेला दिसतो. सफाई व वास्तवतेकडे लक्ष वेधले गेल्याने थोडासा उठावाचा उपयोग करून चित्रवस्तूमध्ये त्रिमितीचा किंचितसा भास दाखवण्याचा प्रयत्न होऊ लागला. यथादर्शनात्मक परिणामातून जवळच्या वस्तू मोठ्या व दूरच्या वस्तू लहान दाखवल्या जाऊ लागल्या. जहांगीरच्या काळातील चित्रे ही अकबरकालीन चित्रांपेक्षा खूपच प्रगत वाटतात. त्यांतील चित्रविषयांची मांडणी व रंगसंगती आकर्षक आहे. चित्राच्या विशुद्ध मूल्यांचे भान त्यांत ठेवलेले दिसून येते. भारतात इतर ज्या लघुचित्रशैली होऊन गेल्या, त्यांत रंगलेपन व रेखांकन सपाट व चित्र द्विमितीय वाटेल, अशा प्रकारे केलेले आढळते. मोगल लघुचित्रशैलीत मात्र रंगानेच थोडासा उठाव आणून चित्राचा झोक वास्तववादी चित्रणाकडे नेलेला दिसतो. हे वैशिष्ट्य मुख्यतः जहांगीर व शाहजहान यांच्या काळातील चित्रांत दिसून येते. जहांगीरचा काळ हा मोगल कलेचा सुवर्णकाळ होता.

शाहजहानच्या काळात (कार. १६२८–१६५८) नव्याने असे काही सुरू झाले नाही परंतु अकबर व जहांगीर यांनी कलाक्षेत्रात ज्या प्रथा निर्माण केल्या, त्यांना अधिक चांगले व समृद्ध रूप प्राप्त झाले. चित्रविषयात नावीन्य तर होतेच परंतु चित्राच्या घडणीतही नावीन्य आले. शाहजहानच्या काळातील चित्रे ही, चित्र म्हणून कलादृष्ट्या पूर्ण विकसित झालेली वाटतात. चित्रातील वस्तु-आकार एकाचवेळी वस्तुभान म्हणूनही येतात व सौंदर्यभान होऊनही येतात. चित्रातील वस्तु-आकार हे आशयानुरूप संघटित करून त्याला योग्य अशा रंगसंगतीची जोड दिलेली दिसते. ज्या गोष्टीकडे मुख्यतः रसिकाचे लक्ष वेधावयाचे आहे त्या गोष्टीला प्राधान्य व इतरांना त्या प्रमाणात गौणत्व दिले जावे, अशीच रचना चित्रात केलेली आढळते. उदा., राजपुत्र मुराद व नझर मुहम्मद यांच्या भेटीचे चित्र. मोकळ्या मैदानावर एक खास शामियाना उभारला आहे व त्यात मुराद आणि नझर मुहम्मद एकमेकांची भेट घेत आहेत. दोन्ही बाजूंना त्यांचे-त्यांचे सुभेदार उभे आहेत. मागे मोकळ्या मैदानात मोगलांची छावणी व बाजूला पाण्याचा तलाव, त्याही मागे डोंगर व आकाश असे दृश्य आहे. या चित्रात शामियान्याचा मागे पांढऱ्या रंगाचा जो पट्टा दाखवला आहे, त्यामुळे प्रेक्षकाचे लक्ष एकदम राजपुत्र व नझर मुहम्मद यांच्या भेटीकडे जाते व तिथेच स्थिर होते. चित्रकाराला नेमके जे प्रामुख्याने दाखवायचे आहे, ते येथे साध्य झाले आहे. पुष्कळशा चित्रांतील पांढरा रंग अशा विविध प्रकारे चित्राच्या आशयाला समृद्ध करतो. शाहजहान हरिणांची शिकार करत असतानाचे एक चित्र तर अप्रतिम आहे. या चित्रात यथादर्शनीय परिणाम उत्कृष्ट साधला आहे. रंगसंगती अतिशय लक्षवेधक आहे. पश्चिमी वास्तववादी कलेच्या प्रभावाचे हे चित्र द्योतक मानता येईल. शाहजहानच्या काळातील चित्रकलेत अकबरकालीन उदात्तता, राजवैभव व जहांगीरकालीन निसर्गसौंदर्य यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. शाहजहानने स्वतःची अशी खास चित्रे काढून घेतली होती. ही चित्रे शाहजहानचे सार्वभौमत्व व प्रगल्भता प्रदर्शित होईल, अशा प्रकारे काढलेली दिसून येतात. ती काहीशी प्रतीकात्मक आहेत. जहांगीरच्या काही चित्रांत व शाहजहानच्या जवळजवळ सर्वच चित्रांत त्यांच्या चेहऱ्यांमागे तेजोवलय दाखवलेले आढळते. एका चित्रात मत्स्य आणि नाग यांवर तोललेली पृथ्वी दाखविली असून पृथ्वीला भूषविणारा असा शाहजहान त्यावर दाखविला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रीक धर्तीच्या पंखयुक्त आकृत्या दाखविल्या आहेत. ही चित्रे प्रतीकात्मक असल्याने फारशी प्रभावी वाटत नाहीत.


‘तरुणी व हरिण’, १८ वे शतक.शाहजहाननंतर जे राजे आले, ते फारसे कलाप्रेमी नसल्याने मोगल कलेची अवनती सुरू झाली. औरंगजेबाच्या काळात (कार. १६५८– १७०७) सुरुवातीला कलावंत मोठ्या हिरिरीने त्याच्यासाठी काम करीत. मनगटावर ससाणा बसलेल्या स्थितीत त्याची अनेक चित्रे आहेत. परंतु नंतर सर्वत्र कलांच्या विरुद्ध त्याने दंड थोपटले. त्यानंतरच्या राजांमध्ये म्हणजे अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात एकच एक राजा विलक्षण कलाप्रेमी व दर्दी असा होऊन गेला. तो मुहम्मदशाह ‘रंगीला’. हा संगीताचा दर्दी व जाणकार होता. त्याच्या नावाने काही चीजाही प्रसिद्ध आहेत. त्याच्या काळात दर्जेदार चित्रनिर्मिती झाली. त्या चित्रांवर थोडा ⇨ किशनगढ चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. कारण त्याच दरम्यान किशनगढ शैलीला बहर आला होता. किशनगढमध्ये दिसणारे निसर्गद्दश्याचे खास वैशिष्ट्य तत्कालीन चित्रांतून दिसून येते. चित्रातील घटना ज्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर घडतात, त्या निसर्गाला घटनेबरोबरच प्राधान्य दिलेले दिसते. संपूर्ण निसर्गाचित्राच्या संदर्भात मानवाकृतींची कमी प्रमाणात अशी मांडणी केलेली दिसते. उदा., राजपुत्र गावातल्या विहिरीवर पाणी पीत असतानाचे चित्र. या चित्रातील विहिरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया, घोड्यावर बसलेला राजपुत्र व त्याचे साथीदार घोडेस्वार यांची मांडणी, मागे दूरवर पसरलेला निसर्गदृश्यांच्या संदर्भात सुयोग्य ठरेल अशी केली आहे. या काळातील चित्रांमध्ये थोडासा पश्चिमी वास्तववादाचा प्रभाव पडलेला दिसतो. पश्चिमी चित्रांतील नग्नाकृतींचे अनुकरण केलेले दिसते. याशिवाय अकबर, जहांगीर व शाहजहान यांच्या काळातील अनेक वैभवशाली प्रसंगांतील चित्रांच्या चित्रांच्या अनुकृती केल्या गेल्या. नादिरशाहच्या हल्ल्यानंतर मुहम्मदशाहचे कलावंत परागंदा झाले व थोडीबहुत टिकलेली मोगल कलेची मुळे पार नष्ट झाली. नंतरच्या काळातील मोगल सरदार ब्रिटिशांकडूनच चित्र काढून घेऊ लागले. अशा प्रकारे मोगल कलेचा अस्त झाला.

औरंगजेबाने कलेविरुद्ध मोहीम उघडल्यावर त्याच्या राज्यातील चित्रकार परागंदा झाले. ते पंजाब व राजस्थान येथील सरदारांकडे आश्रयाला गेले. तेथील मोकळ्या पहाडी प्रदेशात या चित्रकारांनी चित्रकलेचे अंकुर फुलवले व त्यातून पहाडी व राजपूत शैलींचा जन्म झाला. पुढे मुहम्मदशाहचे चित्रकारही त्यांना जाऊन मिळाले.

कनिष्ठ कला: मोगल चित्रकलेप्रमाणे कनिष्ठ कलाही मोगल सम्राटांच्या कारकीर्दीत संपन्न झाली. सोने, चांदी, जडजवाहीर हे वैभव पाहूनच मोगल सम्राटाने भारतावर स्वाऱ्या केल्या व नंतर आपले साम्राज्य स्थापन केले. अकबर, जहांगीर व शाहजहान या सम्राटांच्या काळात धातुकाम विपुलप्रमाणात झाले. वस्त्रकाम अकबर व जहांगीर यांच्या काळात अधिक झाले.

मध्य आशियात सापडणाऱ्या, विविध रंगांच्या छटा असलेल्या, प्रामुख्याने पांढऱ्या व गडद हिरव्या पारदर्शक हरितमण्याच्या दगडांतून जडावकामाच्या साहाय्याने विविध वस्तू निर्माण करण्यात आल्या. हा दगड कठीण असला, तरी त्यामानाने कोरण्यास सुलभ असतो. त्याचा पृष्ठभाग घोटून गुळागुळीत करून त्यावर कोरीवकाम केले जाई. तसेच थोडे अधिक कोरून त्यात सोने. मौल्यवान खडे विशिष्ट पद्धतीने जडवून अलंकरण केले जाई. हुक्कापात्र, मद्यपात्र, झुंबर, हत्यारांच्या मुठी, गुहोपयोगी वस्तू इ. ह्या प्रकारातील खास कलावस्तू होत. त्या वस्तूंचे आकार आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण असत. पिंपळपान, गुलाबपुष्प आदी आकारांत घडवलेली जहांगीरकालीन मद्यपात्रे अतिशय मनोहारी आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांची शीर्षे त्याकाळच्या हत्यारांच्या मुठीवर कोरलेली आढळतात. त्यांत हत्ती, घोडा, वाघ, बोकड इ. प्राण्यांचा समावेश आहे. दिल्ली व हैदराबाद येथील वस्तुसंग्रहालयांत या जडावकामातील महत्त्वाच्या वस्तू, तसेच ⇨ मीनाकारीतील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू ठेवलेल्या आहेत. मीनाकारी सोने, चांदी व पितळ या धातूंवर जास्त प्रमाणात केली जाई. हैदराबादजवळील बीदर जिल्ह्यात बीदरीकाम म्हणून नावारूपाला आलेली या तंत्राची खास अशी पद्धती विशेष उल्लेखनीय आहे. [→ बीदरचे कलाकाम]. बीदरीकामाचा वापर करून सुरया, फुलदाण्या, दागिन्यांच्या पेट्या, अत्तरदाण्या, पानसुपारीची तबके, अशा विविध वस्तू घडविल्या जात. या वस्तूंना मोर, बदक, गुलाबपुष्प असे विविध मोहक आकार देत. गोलाकार, वाटोळ्या, घंटाकृती इ. विविध आकारांतही काही वस्तू बनवल्या जात. लघुचित्रणाच्या कामात जसे तीनचार चित्रकार एकाच चित्रावर काम करीत, तसेच या कामातही एकाच वस्तूवर तीनचार कारागीर काम करीत.

वस्त्रकला : मोगल वस्त्रकलेत गालिचा ह्या प्रकाराला जास्त महत्त्व होते. राजे व त्यांचे सरदार यांच्या मोठमोठ्या दरबारांत या गालिच्याने विशेष सौंदर्य आणले. अकबराच्या काळात गालिचे विणण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. गालिचा हा प्रकार खास पर्शियन असून तो मोगलांनी भारतात रूढ केला. लाहोर, फतेपुर सीक्री व दिल्ली येथे गालिचे विणण्याचे माग विपुल प्रमाणात होते. अकबरकालीन गालिच्यांत पर्शियन वळणाचे अलंकरण जास्त होते. नंतर जहांगीरच्या काळात पर्शियन पद्धतीचे अलंकरण मागे पडून खास मोगल अलंकरण रूढ झाले. निसर्गातील वेगवेगळ्या पानाफुलांचे आकार, त्यांचे मूळ वैशिष्ट्य अबाधित ठेवून, मग त्यांचे अलंकरणात रूपांतर करून, त्यांचा उपयोग गालिच्यात केला जाई. शिवाय वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या आकृत्यांचाही वापर अलंकरणात केला जाई. जहांगीरच्या काळात गालिच्यावरची अलंकरणाची मांडणीही वेगवेगळ्या प्रकारांनी केली गेली. जहांगीरने आधीची पर्शियन रंगसंगती काढून आकर्षक, उबदार रंगसंगती गालिच्यात आणली. जयपूरच्या वस्तुसंग्रहालयात काही उत्कृष्ट गालिच्यांचे नमुने पहायला मिळतात. [→ गालिचे].

कदम, ज्योत्स्ना

वास्तुकला : मोगल वास्तुकलेचे आद्य सुंदर उदाहरण म्हणजे अकबराने बांधलेली दिल्लीतील हुमायूनची कबर. यानंतर एकापेक्षा एक अशी भव्य वास्तुनिर्मिती अकबराच्या काळात ⇨ आग्रा व ⇨ फतेपुर सीक्री येथे झाली. जहांगीरने वास्तुनिर्मितीत संगमरवरी दगडांचा वापर केला. शाहजहानने त्यात अत्यंत सुबकता आणली व ⇨ ताजमहाल सारखी वास्तुनिर्मिती करून या शैलीला कळसावर पोहोचविले. औरंगजेबाच्या काळात मोगल वास्तुशैलीला उतरती कळा लागली. औरंगजेबानंतर दिल्लीतील सफदरजंगची कबर (१७५३) ही या शैलीतील शेवटची भव्य वास्तू म्हणता येईल. तशी मोगल शैलीतच, पण काहीशी वेगळ्या ढंगात प्रचंड वास्तुनिर्मिती लखनौला अवधच्या नबाबाने केली. १८५६ च्या सुमारास मोगल वास्तुशैलीचा अस्त झाला.


मोगलांपूर्वी इस्लामी वास्तुनिर्मिती होतच होती. त्यात दगडी भक्कम भिंती, कमानरचना, बसके घुमट व मीनार होते. त्यात कोरीवकामाचा व शिल्पाचा पूर्ण अभाव होता. हिंदू कारागिरांच्या कौशल्यांना वाव दिला जात नव्हता. हुमायूनपर्यंतचा मोगलांचा काळ धामधुमीत गेला. यामुळे बाबर, हुमायून यांच्या कारकीर्दीत उल्लेखनीय अशी वास्तुनिर्मिती झाली नाही. अकबराच्या काळापासून मोगलांना स्थैर्य लाभले, साम्राज्याचा विस्तार होऊन मोगलांचे वैभव वाढले, तसा मोगल वास्तुनिर्मितीला प्रारंभ झाला. पहिली उल्लेखनीय वास्तू म्हणजे दिल्लीमधील हुमायूनची कबर होय. हाजी बेगमने बांधलेल्या (१५६५–६६) हुमायूनच्या कबरीचा वास्तुकार मिराक मिर्झा गियास हा होता.

हुमायूनची कबर संपूर्ण पर्शियन पद्धतीची आहे. इमारतीचा भक्कमपणा, भव्य घुमट व बाग पर्शियन पद्धतीची आहे. विस्तीर्ण परिसर, त्यांमधील हिरवळीत मध्यभागी उंच चौथरा, त्यावर मूळ कबरीची अत्यंत बांधेसूद अशी दुमजली इमारत ही या कबरीची वैशिष्ट्ये होत. तिच्या दर्शनी भागावर लहानमोठ्या कमानी ठळकपणे योजल्या आहेत. या कमानीभोवती लाल व पांढरे दगड वापरून भिंतींवर रंगीत पट्टे काढल्याचा भास प्रथमच निर्माण केला आहे. एकंदर चौथरा, इमारत आणि घुमट यांत खूपच प्रमाणबद्धता आहे. यामुळे ही कबर मनोवेधक वाटते. 

अकबराच्या काळात बरीच स्थित्यंतरे झाली. त्याने हिंदू शैली हेतुपुरस्सर व विनासंकोच उचलली. त्यातूनच मोगल शैलीची बीजे रोवली गेली. अकबराने आग्रा येथे किल्ला (१५६४) आणि फतेपुर सीक्री येथे नवीन, राजधानी बांधली (१५७४).

आग्रा व फतेपुर सीक्री येथे हिंदू शैलीला भरपूर वाव मिळाला. बांधकामात पर्शियन कमानीचे तंत्र व हिंदूंचे स्तंभ-तुळईचे तंत्र या दोन्हींचाही वापर होऊ लागला.

१). पर्शियन कमान, २). स्तंभ-तुळई.

हिंदू वास्तुशैलीतले अनेक घटक मोगल वास्तुकलेत समाविष्ट झाले. कोरांव नक्षीदार जाळी, झरोके, छत्री, तीर (तिरपे आधार), छप्परखाट, कमानीतील कंगोरे, अपोत्थित शिल्प इ. वास्तुघटकांचा भरपूर व योग्य उपयोग केला गेला. आग्रा व फतेपुर सीक्री येथील संपूर्ण वास्तुनिर्मिती लाल रेतीचा दगड वापरून केलेली आहे. त्यातील पहिली वास्तू म्हणजे आग्र्याच्या किल्ल्यातील दिल्ली दरवाजा (१५६६). त्यात मोगल वास्तुशैलीत हिंदू वास्तुशैलीचे घटक मिसळून घडलेले परिवर्तन स्पष्ट दिसून येते. यांनंतर फतेपुर सीक्रीला विपुल वास्तुनिर्मिती झाली. त्यात मशीद, कबर, प्रशासकीय व खाजगी अशा सर्व प्रकारच्या वास्तू आहेत. परंतु सर्वांत लक्षवेधक म्हणजे जामी मशीदीचे ‘बुलंद दरवाजा’ नामक प्रवेशद्वार. हा दरवाजा नावाप्रमाणेच विलक्षण भारदस्त आहे.

जामी मशीदीचा घाट अत्यंत सरळ व सुबक आहे. या मशीदीवर प्रथमच उपयोगात आणलेली छोट्या छोट्या छत्र्यांची माळ तिचे सौंदर्य वाढविते. मशीदीच्या विस्तीर्ण प्रांगणात मधोमध सलीम चिश्तीची कबर आहे. ही कबर आडव्या घाटाची असून, छोटीशी पण अत्यंत मनोवेधक आहे. कबरीला रुंद छज्जे असून त्याचे नागमोडी तीर हिंदू-गुजराती शैलीचे आहेत. संपूर्ण कबरीला भिंतीऐवजी जाळ्या आहेत. लाल पार्श्वभूमीवर ही संगमरवरी पांढरीशुभ्र वास्तू विलोमनीय दिसते.

१). छप्परखाट, २). छत्रीजोधाबाई महालात हिंदू पद्धतीचे नक्षीकाम भरपूर आहे. चोधाबाई आणि बीरबल महालांच्या शिरोभागी छप्परखाट आहेत. ‘पंचमहाल’ ‘दिवाण-इ-खास’, ‘दिवाण-इ-आम’ या सर्व वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या वास्तू व त्यांच्यामधील मोकळी जागा यांचा अजोड मेळ साधून एक प्रकारचे अवकाश-शिल्प फतेपूर सीक्री येथे निर्माण केले गेले. अशा सर्वांगपरिपूर्ण वास्तुनिर्मितीतून मोगल शैलीची परिणतावस्था दिसून येते.

जहांगीरने आग्र्याच्या किल्ल्यात, फतेपुर सीक्रीच्या धर्तीवर जहांगीर महाल बांधला. जहांगीरच्या कारकीर्दीत बांधकामात अधिक सुबकता आली. संगमरवरी दगडांच्या वापरात लक्षणीय वाढ झाली. तरीही अकबरकालीन वास्तूंमधला जोम व चैतन्य जहांगीरच्या काळात आढळत नाही. सिकंदरा येथील अकबराची कबर (१६१२–१३) व आग्रा येथील इतमाद-उद्दौलाची कबर (१६२६) या जहांगीरकालीन वास्तूंमध्ये नावीन्य आहे. अकबराच्या कबरीच्या परिसरातील बगीचाला चारही दिशांना सुंदर प्रवेशद्वारे आहेत. मूळ कबरीची वास्तू काहीशी आगळी आहे. उंच चौथऱ्यावर तीनमजली मंडप सूचीप्रमाणे वर लहान होत गेलेले आहेत. त्यांच्यावर घुमट नसल्यामुळे ही वास्तू उघडी वाटते. या सर्वांतून कसलाही परिणाम साधण्यास ही वास्तू असमर्थ ठरली आहे. तिचा बाह्याकार विस्कळित असून, इथे नावीन्याचा प्रयोग फसला आहे. दक्षिणेकडील प्रवेशद्वार सुंदर असूनही, त्यावरील चार मीनार प्रवेशद्वाराशी सुसंगत वाटत नाहीत.


हिंदू शिल्प व हिंदू तीर, जोधाबाई महाल, फत्तेपुर सीक्री.याउलट इतमाद-उद्दौलाची कबर ही तिच्या नावीन्यामुळे उठून दिसते. तिच्यातले नावीन्य म्हणजे घुमटाऐवजी छप्परखाट, बसकी आडवी आयताकार वास्तू आणि तिच्या चार कोपऱ्यांवरील जाड बसके पण अतिशय बांधेसुद मीनार, हे आहे. तिचा बाह्याकार ठाम व सरळ आहे. त्यातील नक्षीकाम रंगीत खडे बसवून केलेले आहे. तिचे आकारसौंदर्य व रंगीत नक्षीकाम इतके अप्रतिम आहे, की तिला मोगल शैलीचे सर्वांगसुंदर उदाहरण म्हणता येईल. १६२६ मध्ये जहांगीरची बेगम नूरजहान हिने आपल्या वडिलांची ही कबर बांधली. संपूर्ण संगमरवरी दगडातील तिच्या बांधकामातील सुबकता व रंगीत नक्षीकाम या गुणांनी त्यावेळी कलात्मकतेचे शिखर गाठले. या कबरीत वापरलेल्या अतिसूक्ष्म जाळ्यांमुळे ही अतिशय नाजूक भासते. तसेच भोवतालच्या सुंदर हिरवळीतून ती आपल्या पांढऱ्याशुभ्र स्वरूपामुळे मन मोहून टाकते. ह्या वास्तूला अकबराच्या जोरकस व शाहजहानच्या तरल शैलींमधला दुवा मानता येईल.

शाहजहानचा काळ मोगल वास्तुकलेला ललामभूत ठरेल असाच आहे. त्याने मोगल साम्राज्याची राजधानी आग्र्यावरून ⇨ दिल्ली येथे नेली (१६३८). साम्राज्याला शोभेल असा भव्य व नितांत सुंदर किल्ला बांधला (१६४५). त्यामध्ये संगमरवरातून वैभवशाली स्वर्गीय वातावरणाचा आभास निर्माण केला. संगमरवरा दगडात मौल्यवान रत्ने, पाचू, माणके वापरून मोगल ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवले. उत्थित शिल्पकामाऐवजी किमती खड्यांच्या जडावकामामुळे पृष्ठभागात गुळगुळीपणा, मुलायमपणा आला. हे या काळातील वैशिष्ट्य होय. वास्तूच्या आकारसौंदर्यात कमालीचा रेखीवपणा आला. घुमटाचा कांद्यासारखा मध्यभागी फुगीर आकार हे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणता येईल. उदा., ताजमहालचा घुमट.

आग्र्याच्या किल्ल्यात ‘दिवाण-इ-खास’ (१६३७) या वास्तूमध्ये जोडखांबाचा प्रथम प्रयोग केला आहे. कमानीला कंगोरे आहेत. ‘मोती मशीदी’ तील (१६५५) प्रमाणबद्ध रेखीवता मोगल शैलीचा परमोत्कर्ष दर्शवते. दिल्लीची जामा मशीद (१६४४–५८) जमिनीवर भर घालून उंचावर बांधल्यामुळे तिची भव्यता वाढली आहे. मशिदीच्या कमानपंक्तीतल्या मधल्या कमानीच्या उंचावण्याने तिचे तीन घुमट व दोन मीनार यांच्यात सुंदर मेळ साधला जाऊन वास्तुरचनेत कमालीचा रेखीवपणा आला आहे. (पहा : मराठी विश्वकोश :७ चित्रपत्र २३).

घुमटाचे प्रकार : हुमायूनची कबर, दिल्ली ताजमहाल, आग्रा सफदरजंग कबर, दिल्ली. ताजमहाल यमुनेकाठी बांधल्यामुळे त्याला अनायासे सुंदर परिसर लाभला आहे. त्यामुळे ताजमहालच्या पार्श्वभूमीचे आकाश ताजमहालच्या पायथ्याशी येऊन टेकल्यासारखे भासते. ताजमहालाची बाग जाणीवपूर्वक खोलगट ठेवल्यामुळे प्रवेशद्वारापासून कबरीपर्यंतचा संपूर्ण बगीचा ताजमहालाबरोबरच दृष्टिक्षेपात येतो. कबर उंच चौथऱ्यावर असून त्याच्या कोपऱ्यावर चार उंच मनोरे आहेत. मूळ इमारत व मनोरे शुभ्र संगमरवरात असल्यामुळे ही वास्तू जणू मागच्या आकाशात विलीन पावल्यासारखी स्वर्गीय वाटते. तसेच बागेतील वाटा, त्यांच्या दुतर्फा असलेली झाडे, कालवे आणि त्यांत पडलेले ताजमहालाचे प्रतिबिंब हे सर्व घटक ताजमहालाच्या वास्तुसौंदर्याला अलौकिकत्व प्राप्त करून देतात.

संगमरवरावर रंगीत खड्यांचे जडावकाम, ताजमहाल ताजमहालाच्या प्रवेशद्वाराकडे येणारा रस्ता समोरून न येता बाजूने येतो. त्यामुळेप्रवेश केल्याबरोबर पहिल्याच दृष्टिक्षेपात संपूर्ण परिसरासह ताजमहाल दिसतो. ताजमहालाचे हे प्रथमदर्शन अविस्मरणीय ठरते, ते यामुळेच. (पहा : मराठी विश्वकोश : ७, चित्रपत्रः ३९). मोगल वास्तुकलेमध्ये स्वर्गीय वातावरण निर्माण करण्याचा जसा प्रयत्न झाला तसाच भोवतालच्या निसर्गातूनदेखील असेच वातावरण साधण्याचा प्रयत्न केला गेला. ह्याचा प्रत्यय काश्मीरमधील शालीमार बाग व निशात बाग आणि लाहोर नजीकच्या शालीमार बगीच्यातून येतो. हा परिणाम साधण्यासाठी मोगल उद्यानात वैशिष्ट्यपूर्ण रीत्या पाणी खेळवले जाते. जसे तिरप्या शिळांवरून पाण्याचे खळखळत खाली येणे, शिळेच्या आडव्या अखंड कडे वरून पाण्याच्या चादरीचे धारेप्रमाणे खाली पडणे, कारंज्यांतून पाणी फवारणे, तळ्यातल्या पाण्यावरून चालल्याचा भास व्हावा, म्हणून त्यावरील पुलाचे पाण्याच्या पातळीपेक्षा किंचित वर असणे इत्यादी. मोगल उद्यानवास्तूची ही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.

रेखीव तीर, लाल किल्ला, आग्रा शोभिवंत कमान, दिवाण-इ-खास, दिल्लीऔरंगजेब गादीवर आल्यावर मोगल शैलीला उतरती कळा लागली. याही काळात नाव घेण्यासारखी वास्तू म्हणजे लाल किल्ल्यातील ‘मोती मशीद’ होय (१६५९–६०) या मशीदीच्या तीन कमानीपैकी मधली जरा उंच असून, कमानीवरील छज्जा तिच्यावर वक्राकार होतो. तिचे तीन घुमट जास्तच गोलाकार असून त्यांच्यावरील कळस उंच आहेत. प्रत्येक खांबाच्या कठड्यावरच्या जागी छोट्या शोभेच्या छत्र्या आहेत. ही मशीद खूप लहानशा जागेत असूनही तिच्या शुभ्रतेमुळे व रेखीवपणामुळे हे एक अखंड पांढरे शिल्पच वाटते. औरंगाबादला ‘बिबीका मकबरा’ या नावाने ओळखली जाणारी वास्तू म्हणजे औरंगजेबाच्या बेगमची कबर होय (१६६१). ही वास्तू मोगल कलेच्या अवनतावस्थेची द्योतक म्हणता येईल. ताजमहालाची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न येथे पूर्णपणे फसलेला आहे. कमी प्रतीच्या दगडांचे बांधकाम, अयोग्य परिसर आणि योजकतेतील प्रतिभेचा अभाव ही त्याची वैगुण्ये होत.


औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य खिळखिळे झाले. त्यामुळे दिल्ली परिसरातील वास्तुनिर्मिती थंडावली. दिल्लीबाहेर काही नबाब सत्तारूढ झाले. अशा परिस्थितीतही अवधच्या नबाबाने लखनौला बरीच वास्तुनिर्मिती केली. त्यानेच दिल्लीला सफदरजंगची कबर बांधली (१७५३). लखनौला ‘बडा इमामवाडा’ (१७८४) ही वैभवशाली वास्तू आहे पण बांधकामात दगडाऐवजी विटांचा वापर आणि संगमरवराऐवजी गिलावा असल्यामुळे वास्तू मोगल असूनही तिच्यातले सौंदर्य हरपले आहे.

इतर वास्तूंत छोटा हमामवाडा, जामी मशीद (१८३७–४२), छत्तरमंजील यांचा समावेश होतो. नंतरच्या काळात वाजिद अली शहा या शेवटच्या राजाने शिकंदर बाग व कैसर बाग यांच्या प्रवेशद्वारांमध्ये मोगल व पाश्चात्त्य वास्तुशैलींचे मिश्रण केले आणि तदनंतर खऱ्याखुऱ्या अर्थाने मोगल वास्तुकला संपुष्टात आली. 

मुळीक, शं. ह.

पहा : इराणी कला इस्लामी कला इस्लामी वास्तुकला भारतीय कला भारतीय वास्तुकला लघुचित्रण हस्तलिखिते.

संदर्भ : 1. Brown, Percy, Indian Architecture (The Islamic Period), Bombay, 1959.  

             2. Desai, Ziauddin A. Indo-Islamic  Architecture, New Delhi, 1970.

             3. Gascoigne, Bamber, The Great Moghuls, London, 1976.

            4. Hajek, T. Indian Miniatures of the Moghul School, London, 1960.

            5. Nath, R. History of Decorative Art in Mughal Architecture, Delhi, 1976.

            6. Soundara Rajan, K.V. Islam Builds in India.

            7. Terry, John, The Charm of Indo-Islamic Architecture, Bombay, 1955.

            8. Welch, Stuart C. The Art of Mughal India, New York, 1963.

            9. Wilkinson, J.V. S. Gray, Basil, Ed. Mughal Painting, London, 1948.

 

 

सुलेमानी मशीद, इस्तंबूल हुमायूनची कबर, दिल्ली
कॉर्दोव्हा येथील मशिदीचा अंतर्भाग
 अल् हम्ब्रा येथील राजप्रासादाचा एक भाग जेरूसलेमचा गिरिघुमट
 
इतिहासप्रसिद्ध लाल किल्ला उत्तुंग कुतुबमीनार
जामा मशीद लक्ष्मीनारायण मंदिर (बिर्ला मंदिर)
पारंपरिक हस्तिदंती कोरीवकाम रामलीला मैदानावरील रावणदहन
इंडिया गेट, दिल्ली. भारतीय संसदभवन
मोगल गार्डन्स, राष्ट्रपतिभवन. अशोक हॉटेल
म. गांधींची समाधी, राजघाट. कॉनॉट प्लेस
राष्ट्रीय भौतिकीय प्रयोगशाळा, दिल्ली.

ताजमहालाचे प्रवेशद्वार ताजमहाल व त्याचा रम्य परिसर
ताजमहाल : बिंब आणि प्रतिबिंब. स्वप्नील धूसर ताजमहाल
ताजमहालाच्या मुख्य घुमटाभोवतीची एक छत्री दर्शनी कबरीभोवतीच्या वेलबुट्टीयुक्त कठड्याची अंगदृश्ये
दर्शनी कबरीभोवतीच्या वेलबुट्टीयुक्त कठड्याची अंगदृश्ये कबरीभोवतीची कोरीव संगमरवरी जाळी
दर्शनी कबरी
 
नूरजहानचे मानले जाणारे एक व्यक्तिचित्र, अठरावे शतक.  सोन्याचा रत्नजडित सरपेच, अठराव्या शतकाचा प्रारंभ.
शेख सलीम चिश्तीच्या दर्ग्यातून दिसणारे मशिदीचे प्रवेशद्वार, फतेपुर सीक्री, सोळावे शतक. मृत्युशय्येवरील इनायतखान, जहांगीरकालीन चित्र, सु. १६१८.
आंब्याच्या आकाराची हरितमण्याची पेटी, सतरावे शतक. रात्रपुत्र शाहजहानचे व्यक्तिचित्र (सु. १६१६-१७)-- अबुल हसन.
पानाच्या आकाराचे हरितमण्याचे मद्यपात्र, सतराव्या शतकाचा पूर्वाध.
विहिरीवर पाणी पिणाऱ्या राजपुत्राचे चित्र (अंशदृश्य), अठराव्या शतकाचा पूर्वार्ध. उंटांची झुंज :जहांगीरकालीन चित्र, सु. १६१५.

पानेफुले व कीटक : दारा शकीहच्या संग्रहिकेतील चित्र, सु. १६३५.

बयाक पक्षी : दारा शकीहच्या संग्रहिकेतील चित्र, १६३५.

याझ बहादूर व रूपमती : शाहजहानकालीन चित्र (अंशदृश्य), सु. १६५०.

सिंहाची शिकार करणारा शाहजहान (अंशदृश्य), ‘शाहजहान-नामा’ या ग्रंथातील चित्रसजावट १६५७.

शाहजहानचे नाव खोदलेले, हरितमण्याचे पात्र, सु. १६४७.

कोरीव पितळी पानदान, उत्तर भारत, सतरावे-अठरावे शतक.

औरंगजेबकालीन हुक्कापात्र, अठराव्या शतकाचा प्रारंभ.