रोमन कला : रोमन साम्राज्याचा अफाट विस्तार, सत्तेचा प्रदीर्घ कालावधी व रोमच्या सीमाप्रदेशांत नांदणाऱ्या विविध संस्कृती यांमुळे रोमन कलेचे स्वरूप गुंतागुंतीचे व बहुजिनसी झाले आहे. रोमन या संज्ञेखाली विपुल कलाकृतींचा अंतर्भाव होत होत असला, तरी त्यांतील अस्सल रोमन कलाघटकांविषयी अभ्यासकांत मतभेद आहेत. रोमन कलेतील ‘रोमनत्वा’विषयीच्या कल्पनाही वेगवेगळ्या स्थळकाळांत बदलत गेल्या आहेत. तथापि सांकेतिक दृष्ट्या रोमन ही संज्ञा पुढील संदर्भात रूढ आहे : (१) रोम येथे व इटलीमध्ये इ.स.पू. सु. २०० ते इ.स.सु. ४०० या कालावधीत निर्माण झालेली कला (२) रोमनांनी जिकून घेतलेल्या व वसाहती स्थापलेल्या पश्चिम यूरोपीय व उत्तर आफ्रिकन प्रदेशांतील कला. हे प्रदेश रोमन आधिपत्याखाली होते तोवर-म्हणजे साधारण चौथ्या शतकापर्यंत-ही कलानिर्मिती टिकून होती.

रोमन दृक्‌कला प्रामुख्याने इटलीच्या भूप्रदेशात दृढमूल झाल्या व त्यांचा विस्तार पश्चिमेकडील प्रदेशांत होत गेला. त्यांच्याद्वारा तेथे आद्य यूरोपीय कलेचा पाया घातला गेला व त्यांतून शैली, मूर्तिप्रतिमा, वास्तुप्रकार यांचा समृद्ध वारसा निर्माण होऊन तो पुढील मध्ययुगीन, प्रबोधनकालीन व उत्तरकालीन कलेतही प्रभावी ठरला. रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील प्रदेशांनी-जरी ते अनेक शतके रोमच्या नियंत्रणाखाली असले तरी-प्रमुख्याने ग्रीक कलेचा वारसा जोपासला. मात्र त्यात प्रदेशपरत्वे स्थानिक कलापरंपरा व रोमन अतिक्रमणे यांच्या परिणामी काही परिवर्तने घडून आलेली दिसतात. वास्तुकलेत हा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. रोमन वास्तुस्मारके खुद्द ग्रीसमध्ये, अनेक ग्रीक शहरांमध्येही आढळतात, तसेच आशिया मायनर, सिरिया येथेही आढळतात या वास्तूंमध्ये स्थानिक बांधकामपद्धतींमुळे काही बदल दिसून आले, तरी अनेक वास्तुप्रकार-उदा., रंगमंडले, जलवाहिन्या, विजयकमानी, स्‍नानगृहे तसेच अन्यही सार्वजनिक वास्तूंचे आकार-प्रकार-यांचा वारसा पश्चिमेकडून आला आहे.

ग्रीक व रोमन कलेमधले संबंध प्रतिरोधी स्वरूपाचे नाहीत, तसेच ग्रीक प्रभाव फक्त रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील प्रदेशांपुरताच मर्यादित नाही. ग्रीस जरी रोमनांनी जिंकून घेतला, तरी ग्रीकांनी आपल्या उच्च प्रतीच्या बौद्धिक व कलात्मक संस्कृतीच्या प्रभावाने जेत्यांनाही जिंकून घेतले होते, असे म्हणले जाते. तथापि रोमनांनी ग्रीस जिंकून घेण्यापूर्वीच इटलीमध्ये ग्रीकांचा शिरकाव झाला होता. ग्रीकांश संस्कृतीचा विकास व विस्तार संपूर्ण भूमध्य सागरी प्रदेशात पसरला होता (इ. स. पू. तिसरे-दुसरे शतक). त्यातूनच ग्रेको-रोमन वा अभिजात संस्कृती उदयास आली. रोममध्ये अनेक ग्रीक कलापरंपरांचे जतन, जोपासना व भरभराट झाली. मात्र त्यांना रोमन गरजांनुरूप इष्ट ते वळण देण्यात आले. मूळ ग्रीक कलासिद्धांतांचा व प्रतिमानांचा स्वीकार व अनुकरण करून घडवलेल्या कलाकृती रोमन आश्रयदात्यांच्या गरजांनुरूप बदललेले त्यांचे उपयुक्ततावादी रचनाबंध, तसेच निर्मितीच्या नव्या दिशांचा, आकारांचा व प्रतिमांचा सातत्याने घेतलेला वेध या साऱ्या घटकांचा अंतर्भाव व्यापकपणे रोमन या संज्ञेने सूचित होणाऱ्या कलाकृतींमध्ये केला जातो.

रोमन लोकांनी ग्रीकांच्या तत्त्वज्ञान, शास्त्र, कला-चित्र, शिल्प, वास्तू तसेच आलंकारिक कलाकुसरीच्या वस्तू – इ. क्षेत्रांतील मूलभूत कल्पना उचलल्या. मात्र त्यांचे नुसते अनुकरण न करता आपल्या कल्पनांनुसार त्यांत उपयुक्तता, शिस्तबद्धता व भव्यता यांचा मिलाफ केला. सामाजिक व राजकीय उत्कर्षामुळे रोमन लोकांच्या वास्तुकलेला राजशाही  भव्यता प्राप्त झाली, असे म्हणता येईल. चित्र, शिल्पादी कला व अलंकरणात्मक कलाकुसरीच्या वस्तू यांतही शिस्त व उपयुक्ततावादी दृष्टिकोण ह्यांबरोबरच त्यांच्या कर्तृत्वाचा ठसाही उमटलेला दिसतो. कलाकुसरीत शक्य तितकी अलंकरणाची रेलचेल व उंची साहित्य वापरून जेतेपणाला साजेशी भव्यता व वैभवसंपन्नता आणलेली दिसते. तसेच उपयुक्ततेला प्राधान्य दिलेले दिसून येते.

रोमला पूर्वेकडील जी कला, विद्या प्राप्त झाली, ती मुख्यत्वे इट्रुस्कन लोकांकडून. कारण त्यांचा पौर्वात्यांशी व्यापार व दळणवळण होते. कलेतील अनेक ज्ञापके त्यांनी पौर्वात्यांकडून घेतली. इट्रुस्कन कला इ. स. पू. सातव्या ते तिसऱ्या शतकांत मध्य इटलीमध्ये-लेशियम व रोम या प्रदेशात-भरभराटीला आली. पूर्वकालीन ग्रीक कलेचा तिच्यावर जबरदस्त पगडा होता. पौर्वात्य विद्येला ग्रीक कलाकल्पनांची जोड देऊन इट्रुस्कनांनी आपली संस्कृती समृद्ध केली. हा इट्रुस्कन कला-संस्कृतीचा वारसा रोमलाही लाभला. नगररचनेचा आराखडा, शिल्पांकनातील वास्तवता इ. गोष्टी रोमनांनी इट्रुस्कनांकडून घेतल्या. इट्रुस्कन तसेच ईजिप्त व नैर्ऋत्य आशियाई देश (तुर्कस्तान, सिरिया इ.) येथील कलाप्रभावांतून रोमन कलेला संमिश्र व बहुजिनसी  रूप प्राप्त झाले.

रोमनाच्या स्वाऱ्यांपूर्वी ग्रीसमध्ये ज्या कलाकृती निर्माण झाल्या, त्यांहून शैली व प्रतिमाविद्या दृष्ट्या रोमन कलाकृतींमध्ये जे वेगळेपण दिसून येते, त्या वेगळेपणातच स्वतंत्र रोमन अभिरुची व उद्दिष्टे अभिव्यक्त झाली आहेत. रोमन कला ही प्राचीन अभिजात कला व मध्ययुगीन ख्रिस्ती कला या दोन कालखंडांचे विभाजन दर्शविणारी, संक्रमणसूचक, सीमावर्ती कला आहे. इ. स. दुसऱ्या ते चौथ्या शतकांच्या दरम्यानच्या उत्तर-पुरातन (लेट अ‍ँटिक) कालखंडात अभिजाततेकडून ख्रिस्ती कलेकडे होत गेलेली रूपांतर-प्रक्रिया ही रोमन कलेच्या संक्रामणावस्थेची निदर्शक आहे. या अवस्थांतरकालीन रोमन कलेचे ठळक गुणधर्म म्हणजे अमूर्त आकार व नक्षी प्रकार यांकडे विशेष कल धार्मिक प्रतिमांकनावर भर वास्तूच्या उग्रकठोर बाह्यांगाआड दडलेली समृद्ध, वैभवशाली आंतरसजावट साध्या, लयबद्ध रचनाबंधांची पुनरावृत्ती होत. ग्रीक कलेला अपरिचित असलेली पण रोमन कलेत प्रजासत्ताकाच्या प्रारंभापासूनच ठळकपणे जाणवणारी कलात्मक प्रवृत्तींची परिपक्वता उत्तर-पुरानात कालखंडाची निदर्शक आहे.

रोमन कलेमध्ये ग्रीक व इट्रुस्कन प्रभाव ठळक व लक्षणीय असले, तरी वास्तुकला व व्यक्तिशिल्पे या क्षेत्रांत मात्र रोमनांनी स्वतंत्र ठसा उमटवला व अभिजात अशी कलानिर्मिती केली.

वास्तुकला : भूमध्य समुद्राभोवतीच्या स्पेन, इटली, ग्रीस, सायप्रस, सिरिया, ईजिप्त या देशांत व उत्तर आफ्रिका, आशिया मायनर, गॉल या प्रदेशांत, तद्वतच इंग्‍लंड व जर्मनीच्या काही  भागांवर रोमन अधिसत्ता होती. रोमनांनी पादाक्रांत केलेल्या अनेक देशांतील वास्तुप्रकारांचा तसेच वास्तुशैलींचा समन्वय साधून त्यांनी रोमन वास्तुशैली प्रचारात आणली. या वास्तुशैलीवर ग्रीक वास्तुकलेचा सर्वाधिक ठसा होता. या वास्तुशैलीची वैशिष्ट्ये व रचनातत्वे फार नावीन्यपूर्ण नसली, तरी  रोमनांच्या प्रचंड प्रमाणात सर्वत्र झालेल्या बांधकामांमुळे सर्वांत जास्त वास्तू ह्याच शैलीमध्ये सापडतात. नंतरच्या पाश्चात्त्य वास्तुशैलींवर आणि विशेषकरून स्थापत्यतंत्रावर रोमन बांधकामाचा दूरगामी परिणाम यामुळेच झाला असावा.

लोखंड, तांबे, कथील, सोने, चांदी, अनेक प्रकारचे संगमरवरी दगड, सीडर, पाइन वगैरे वृक्षांची लाकडे, ‘ट्रॅव्हर्टीन’ (पिवळसर, सच्छिद्र इमारती दगड), चुनखडीचा दगड, ‘पॉत्स्वलॉन’ (ज्वालामुखीजन्य राख आणि चुना यांच्या मिश्रणातून बनलेले सिमेंटवजा बांधकाम-साहित्य) इ. वास्तुसामग्रीचा कौशल्यपूर्ण वापर रोमन वास्तुशिल्पज्ञ करीत. काँक्रीटच्या उपयोगामुळे घुमट, चापछते (व्हॉल्ट), कमानी यांचा बांधकामाला जास्त मजबुती व आकारिक विविधता प्राप्त झाली. भिंतीच्या बांधकामात ओबडधोबड दगड व काँक्रीट यांचा गाभा असे व त्यावर स्फटिक, पृष (पोराफिरी) खनिज इ. मूल्यवान दगडांच्या लाद्या ब्राँझ, तांबे यांच्या मेखा व शिसे ओतून बसविण्यात येत. ऑगस्टसच्या कारकीर्दीत (इ.स. पू. २७-इ. स. १४) व नंतरच्या काळातही रोमन लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले. नीरो, व्हेस्पेझ्यन, ट्रेजन, हेड्रिअन, कॅराकॅला वगैरे रोमन सम्राटांनी साम्राज्यातील बहुसंख्य प्रजाजनांच्या सोयीसुविधा व रंजन या उद्दीष्टांनी सार्वजनिक स्नानगृहे, अश्वरथांच्या शर्यतीसाठी ‘सर्कशी’, तसेच क्रीडागारे बांधली मैदानी खेळ, गुलामांच्या व हिंस्त्र पशूंच्या झुंजी, साठमारी इत्यादीसाठी मोठमोठी क्रीडागारे व नाटकांसाठी रंगमंडले (ॲम्फिथिएटर), कचेऱ्या, न्यायालये, मंदिरे, राजवाडे, रंगमंदिरे इ. सार्वजनिक वास्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली.

रोमन बांधकामाची ख्याती वास्तूचा प्रचंड आकार, नियोजनबद्ध कार्यानुकूल रेखीव रचना आदी गुणांमुळे वृद्धिंगत झाली. डोरिक, आयोनिक, कॉरिंथियन या ग्रीक, तस्कन आणि संमिश्र स्तंभप्रकारांचा उपयोग रोमन वास्तूंमध्ये विशेषत्वाने आढळतो. वास्तूमध्ये कमनीय वेलबुट्टी, नक्षीकाम, शिल्पे, चबुतरे व कोनाड्यांतील शिल्पे, तसेच रंगीबेरंगी दगडांची कुट्टिमचित्रे आदींची संयोजनपूर्वक रचना साधून उत्सेधात (एलिव्हेशन) विविध पोत व आभास निर्माण केले जात. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठेमोठे जलसेतू बांधण्यात आले. नीमजवळील पाँ द्यू गार जलवाहिनी व तिच्याखालील जलसेतू विशेष प्रसिद्ध आहे. हा जलसेतू मार्कस आग्रिपाने इ. स. १९ पूर्वी बांधला. कमानी व चापछते, घुमट, अर्धघुमट वगैरेची योजना करून प्रचंड आकारांच्या वास्तू निर्माण केल्या गेल्या. ⇨ व्हिट्रूव्हिअस, आपॉलोडोरस इ. वास्तुशिल्पज्ञांनी वास्तुशिल्पांचे अनेक नवीन प्रकार वापरात आणले. पडभिंती जाड्या भरीव चापछतांचा उपयोग करुन मार्सेलसचे रंगमंदिर, जेरासाचे अश्वशर्यतीचे रिंगण, पोतत्स्वॉली येथील क्रीडागार व रोम येथील ⇨ कॉलॉसिअम (इ. स. ७०-८०) यांसारख्या वास्तू निर्माण करण्यात आल्या.

रोमन वास्तुशिल्पाचा अवकाशयोजनेशी घनिष्ठ संबंध आहे. अवकाशाचे आयोजन वास्तूच्या अक्षीय स्वरुपाची किंवा दृष्यात्मकतेची वाढ व्हावी, या दृष्टिकोनातूनच करण्यात येई. तसेच अंतर्भागाची परिणामकारकता जास्त प्रभावी करण्यासाठी रंग, पोत, खिडक्या व दरवाजे, चौक तसेच प्रकाश वरून यावा अशी योजना असलेले घुमट यांचा उपयोग योग्य तेथे करण्यात येई. प्रमाणबद्धतेपेक्षा भव्य आकारावर भर देण्यात रोमनांची स्वतःच्या कर्तृत्वाबद्दलची अहंता दिसते, असा अनेक वास्तुसमीक्षकांचा दावा आहे. दिशा, सूर्यप्रकाश व वारे यांचा विचार करून प्रत्येक वास्तूची मांडणी करण्यात येई. नगररचनेतही दिशांचा विचार होत असल्यामुळे, रोमन बांधकामात दिशांचा विचार करणे सोपे जात असे. वास्तूमध्ये सुसंवादीपणा आणण्यासाठी ग्रीक व इट्रुस्कन स्तंभप्रकारांचा नियमबद्ध स्वरुपात उपयोग करण्यात येई. रोमन वास्तू नेहमी जड व अंतर्बाह्य अलंकृत-अर्थात वेलबुट्टी, नक्षी, पुतळे, रंगकाम, अनेक प्रकारचे दगड यांनी प्रमाणाबाहेर सजविलेली-असे. वास्तुशिल्पाचे सौष्ठव किंवा अभिकल्पातील ग्रीक विचारांसारखा सखोलपणा रोमन वास्तुशिल्पात नाही किंबहुना रोमन वास्तुशिल्पज्ञाला ग्रीक वास्तुशिल्पज्ञाप्रमाणे आविष्काराचे स्वातंत्र्य नसून, त्याला राजाज्ञेप्रमाणेच बांधकाम करावे लागे. रोमन वास्तुकलेत कृत्रिमता आढळते, ती यामुळेच. उद्यानप्रासादांची (व्हिला) मांडणी उद्यानाच्या सुनियोजनाने नयनरम्य केली जाई. सार्वजनिक सभाचौक (फोरम), देवालये, विजयकमानी व स्तंभ, कचेऱ्या यांची मांडणी हेतूपूर्वक योजनाबद्ध व परस्परांना पूरक अशी केली जाई.

इट्रुस्कन धर्तीच्या वास्तुशैलीतील ऑगस्टसची  कमान, रोम येथील ज्युपिटर कॅपिटोलिनियसचे मंदिर ही लक्षणीय उदाहरणे होते. ट्रेजन व रोमॅन यांचे सभाचौक हे नागरी वास्तुशिल्पांनी गजबजलेले होते. रोम येथील व्हीनस मंदिर व व्हेस्पेझ्यनची मंदिरे, बालबेक येथील ज्युपिटर व बॅकस यांची चौकोनी वास्तुकल्पाची देवालये आणि गोलाकार वास्तुविधान असलेल्या मंदिरांपैकी रोम येथील ‘व्हेस्टा’ हे अग्निदेवतेचे मंदिर (इ.स. २०५), पँथीऑन मंदिर (१२०-२४) आणि बालबेक (हेलिऑपलिस) येथील गोलाकार मंदिर (दुसरे-तिसरे शतक) ही उल्लेखनीय मंदिर हे रोमन देवालय वास्तूंचे मुख्य प्रकार होत. यांपैकी पँथीऑन या देवालयाचा अर्धगोलाकार घुमट फार मोठा असून तो काँक्रीट व विटा यांनी बाधलेला आहे. रोमन ‘बॅसिलिका’ (न्यायालये) वास्तूच्या रचनाकल्पाचा नंतरच्या ख्रिस्ती वास्तुकलेवर प्रभाव पडला. ट्रेजन, कॉन्स्टंटीन या सम्राटांच्या कारकीर्दीतील रोम येथील बॅसिलिकांत अनेक स्तंभावली व चापछते वापरून प्रेक्षणीय वास्तू निर्मिल्या गेल्या. यांमध्ये विटांच्या कमार्नीचा वापर जोरविजोरांचा परामर्ष घेण्यासाठी केला आहे. ⇨ रोमन स्नानगृहे (थर्मी) फार मोठी असत. तसेच मार्सेलस, ओडिऑन यांसारख्या रंगमंदिरांत ६ ते १० हजार लोकांना एका वेळेला बसता येई. रोम येथील कॉलॉसिअम हे भव्य रंगमंडल साठमारी, मर्दानी व मैदानी खेळ, गुलामांची हिस्त्र पशूंबरोबरची द्वंद्वयुद्धे अशा प्रकारच्या रक्तरंजित कार्यक्रमांसाठी वापरण्यात येत असे. अनेक लोकांची बसण्याची सोय, शिरोभागी तंबूसारखे कापडी छत, नौकानयनासाठी पाणी सोडण्याची व्यवस्था व एकावर एक चार मजल्यांवर बांधकाम करुन बसण्याची केलेली सोय ही या वास्तूची वैशिष्ट्ये. अशा प्रकारची क्रीडागारे व्हेरोना, पाँपेई येथेही आहेत. ‘सर्कस’ अथवा अश्वरथांच्या शर्यतीच्या जागा क्रीडाप्रेमी रोमनांनी बांधल्या. ‘सर्कस मॅग्झिम्स’ येथे २,५५,००० प्रेक्षकांची बसण्याची सोय होती. रिंगणाचा आकार चौकोनी असून, घोड्यांना वळण्यासाठी एक बाजू अर्धवर्तुळाकृती ठेवत असत. रोमनांनी थडग्यांची कल्पना इट्रुस्कन लोकांपासून घेतली असावी. थडग्यांवर चुनेगच्चीचा वापर मोठ्या प्रमाणावर करून त्यावर अनेक प्रसंग चित्रित केले जात. विजयस्तंभ व कमानी यांचा वापर दिग्विजयानंतरच्या मिरवणुकीसाठी केला जात असे. टायटस, ट्रेजन इ. अनेक सम्राटांनी अशा कमानी ठिकठिकाणी बांधल्या. या कमानीवर अर्धस्तंभाचा, शिल्पांचा वापर व इतर कोरीवकाम केलेले असे. ब्राँझचे पुतळे या कमानींवर वापरण्यात येत. राजवाड्यांच्या वास्तू बांधण्याकडे ह्या काळातील सम्राटांनी विशेष लक्ष पुरविले. राजवाड्यातील उद्यानात अनेक वन्य पशुपक्षी असत. भोजनगृहात छतामध्ये एक हस्तिदंती चोरकप्पा असून त्यामध्ये ठेवलेली फुले पंगतीवर पडून पुष्पवर्षावाचा आभास निर्माण करण्यात येई. तसेच छतात नळ्यांची योजना करून पंगतीवर सुगंधी द्रव्ये व अत्तरे शिंपण्याची व्यवस्था होती. प्रासाद-नियोजनातील ही सर्व उच्चभ्रू वैशिष्ट्ये नीरोच्या राजवाड्यात आढळतात. रोमन घरांच्या मांडणीवर अक्षीय योजनेची छाप आहे. पाँपेईसारख्या लहान शहरांत लहान वाडे, तर रोममध्ये अनेकमजली व गजबजलेली कोंदट घरे असत. संडास व गटारे यांची व्यवस्था नसल्याने अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी शहरात पसरत. रोमन साम्राज्याच्या अवनतीनंतरही रोमन वास्तुशैलीचा प्रभाव पुढे टिकून राहिला. ख्रिश्चनांनी जुन्या रोमन बॅसिलिका वास्तूंचा वापर आपल्या चर्चवास्तूंसाठी करून घेतल्याने त्यांचे जतन झाले.

शिल्पकला : जगातील पहिली व्यक्तिशिल्पशैली रोमनांनी निर्माण केली, असे मानले जाते. ग्रीकांची व्यक्तिशिल्पे ही सार्वजनिक जागी ठेवण्यासाठी घडवली असल्याने ती आदर्शवादी आढळतात पण रोमनांची व्यक्तिशिल्पे ही प्रत्येक घरात खाजगी संग्रहासाठी केली गेल्याने अधिक वास्तववादी भासतात. रोमन लोकांत, विशेषतः श्रीमंत सरदार व अधिकारी वर्गीयांच्या कुटुंबात, मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी काढलेल्या मिरवणुकीत, त्याच्यासहित सर्व पूर्वजांची व्यक्तिशिल्पे नेण्याचा प्रघात होता. याचसाठी माणूस मृत झाल्यावर त्याच्या चेहऱ्याचा मेणाचा ठसा घेऊन त्यावरून व्यक्तिशिल्प करण्याची प्रथा रूढ झाली. साहजिकच भावदर्शनाच्या बाबतीत थोडा उणेपणा असला, तरी हुबेहूब व्यक्तिशिल्प करण्याची कला त्यांना साध्य झाली. पूर्वजांच्या व्यक्तिशिल्पांचे हे सर्व पुतळे ‘ॲट्रियम’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खोलीत जतन करुन ठेवत. शिवाय प्रत्येक रोमन घरात बादशहाचा एक तरी पुतळा ठेवला जाई. याखेरीज सभाचौक (फोरम), बागा, राजप्रसाद, स्नानगृहे इ. सार्वजनिक ठिकाणीही महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे बसविले जात. हे पुतळे जेतेपणाचे निदर्शक अशा भारदस्त आविर्भावाचे व रुबाबदार असत.

रोमनांनी ग्रीक शिल्पाकृतींच्या अगणित प्रतिकृती तयार केल्या. आज आपल्याला ग्रीकांच्या शिल्पांची माहिती या संगमरवरी रोमन प्रतिकृतींमुळेच मुख्यतः होते. कारण मूळ ग्रीक शिल्पाकृती अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच उपलब्ध आहेत. त्यामुळे एकाच शिल्पाच्या अनेक प्रतिकृती थोडाफार फरक करुनही केलेल्या आढळतात. तद्वतच अनेक रोमन सम्राटांचे पुतळे विपुल प्रमाणात केले गेले. त्यांत सम्राट ऑगस्टसचा पूर्णाकृती पुतळा उल्लेखनीय आहे. आपल्या सैनिकांसमोर हात उंचावून आदेश देणाऱ्या आविर्भावातील हा पुतळा रुबाबदार आहे. घरात ठेवण्यासाठी केलेल्या स्त्रीपुरुषांच्या पुतळ्यांत ऐटदार ढब, पायघोळ वस्त्रांच्या सुंदर चुण्या व प्रमाणबद्धता हे विशेष आढळतात. काही स्त्रियांच्या शिल्पाकृतींत केशभूषा बदलण्याची सोयही केलेली असे.

उत्थित शिल्पप्रकारात रोमनांची वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र शैली दिसून येते. यथादर्शनाचे नियम रोमनांना अवगत नव्हते परंतु आपल्या कल्पनेनुसार त्यांनी शिल्प घडवताना त्यातील आकारांचे खोदकाम कमी-अधिक प्रमाणात उथळ आणि खोल घडवून त्रिमितीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात पुढच्या बाजूस  असलेल्या व्यक्ती अधिक उंच उठाव असलेल्या, तर त्या पाठीमागच्या कमी उठावाच्या व अगदी लांबच्या व्यक्ती केवळ रेखाटनाने दाखवून त्रिमितीसारख्या परिणाम साधल्याने या शैलीला ‘आभासमय रोमन शैली’ (रोमन इल्यूजनिस्टिक स्टाइल) असे संबोधले  गेले. अशा उत्थित शिल्पांकनाचा अवलंब सार्वजनिक इमारती सुशोभित करण्यासाठी केला गेला. आरा पॅसी (अल्टार ऑफ पीस, इ.स. पू. १३ ते ९) आणि कॉलम ऑफ ट्रेजन (इ.स. ११७) यांवरील उत्थित शिल्पे हे या आविष्काराचे उत्कृष्ट नमुने आहेत. ट्रेजनच्या विजयस्तंभावरील उत्थित शिल्प हे तळापासून वरच्या टोकापर्यंत चक्राकार जाणाऱ्या पट्टी खोदून, ट्रेजन बादशहाच्या विजय मोहिमेतील युद्धाचे प्रसंग त्यात दाखविले आहेत.

चित्रकला : ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीत गाडल्या गेलेल्या पाँपेई व हर्क्युलॅनिअम या प्राचीन शहरांचे उत्खनन झाल्यानंतर त्यांतील घरांत आढळणाऱ्या चित्रांवरून रोमन चित्रशैलीची काहीशी कल्पना येते. या घरांत सापडलेल्या भिंतींवरील व जमिनींवरील चित्रांतून रोमन चित्रकारांच्या चित्रणकौशल्याची साक्ष पटते. ही चित्रे ज्या तऱ्हेने व ज्या ठिकाणी अवशिष्ट आहेत, त्यावरून असे दिसते, की अंतर्भागाची सजावट करण्याचे शास्त्र पद्धतशीरपणे प्रथम रोमनांनीच वापरले. गृहसजावटीसाठी चित्रे काढताना त्यांनी औचित्य व सौंदर्य यांचा मिलाफ साधला. उदा., दिवाणखान्यात रोमन इतिहास व ग्रीक पुराणे यांतील देशभक्ती जागविणारे रोमहर्षक युद्धप्रसंग तसेच वीरचरित्रांवरील अद्‌भुत प्रसंग तर भोजनगृहात फळांच्या थाळ्या व स्वच्छ  पारदर्शक जलपात्रे, पुष्पगुच्छ ठेवलेल्या फुलदाण्या, मसालेदार मासे व तत्सम खाद्यपदार्थ यांनी भरलेल्या थाळ्या यांची चित्रे तर शयनगृहात अंधाऱ्या रात्रीच्या वातावरणात वीज चमकल्याने तिच्या उजेडात दिसणारे दृश्य किंवा अद्‌भुत स्वप्नदृश्य, तसेच अंधाऱ्या खोलीत मोकळ्या हवेतील उद्यानातील दृश्ये इ. चित्रे रंगवून त्यांनी गृहांच्या अंतर्भागांत अनुरूप व सुसंवादी वातावरणनिर्मिती साधली. काही ठिकाणी शयनगृहांत रतिक्रीडेचीही भित्तिचित्रे आहेत.

रोमन चित्रकारांनी भित्तिचित्रांच्या चार विविध शैली सजावटीदाखल वापरल्या : (१) पटलावेष्टन शैली : (इन्क्रस्टेशन स्टाइल). यात निव्वळ वास्तुशिल्पाच्या विविध भागांचा वापर करून भिंतीवर अनेकरंगी सुंदर रंगनियोजन करून रचना केल्या गेल्या. त्यांत मानवाकृतींचा अजिबात वापर नव्हता मात्र संगमरवर व इतर पृष्ठपोतांचा आभास दर्शविला होता. (२) यांनतर वास्तुशिल्पाचे भाग उठावात दाखवून त्रिमितीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. सपाट भिंतीवर पलीकडे आणखी दालने असल्याचाही आभास निर्माण केला गेला. तसेच खिडकीतून दिसणारी दृश्ये दाखवून अधिक प्रकाशाचा भास सूचित केला गेला. (३) पुन्हा भिंत सपाट दाखवून फिक्या रंगांच्या साहाय्याने दोन खांबांमधून पलीकडे असणारे प्रकाशमय भाग दाखवून अधिक प्रकाशाचा आभास सूचित केला गेला. (४) खांब, त्यावरून सोडलेले नक्षीदार अलंकरणाचे भारी पडदे, वास्तुशिल्पातील कलाकुसरीचे सोनेरी मुलाम्याचे स्तंभ, भव्य प्रासादासारखे अंतर्भाग व सजावट यांचा निव्वळ आभास भित्तिचित्रात दाखवून त्रिमितीचा आभास व वैभवशाली अंतर्भागाचे वातावरण सूचित करण्यात आले.

जमिनीवर संगमरवरी रंगीत तुकड्यांचा वापर करून, रंगीत अगर कृष्णधवल कुट्टिमचित्रे निर्माण करण्यात आली. त्यांत पशुपक्षी, प्राणी, ऐतिहासिक दृश्ये, निसर्गदृश्ये, स्थिरचित्रे, सामाजिक विषय, विवाहसोहळे इ. विषयांचे चित्रण, तसेच व्यक्तिचित्रेही आढळतात. त्यांत अलेक्झांडर व डरायस यांचे युद्धदृश्य चितारणारे कुट्टिमचित्र विशेष प्रसिद्ध आहे. भित्तिचित्रांत बारकाव्याने तपशील भरून चितारलेल्या व्यक्तिचित्रांपासून ते कुंचल्यांच्या मोजक्याच फटकाऱ्यांत व छायाप्रकाशाला प्राधान्य देऊन रंगविलेल्या प्रकाशप्रभावी चित्रांपर्यंत सर्व प्रकार दिसतात.

नीरो बादशहाच्या ‘गोल्डन हाउस’ या प्रासादातील चित्रे त्याच्या चंचल स्वभावाची व भपकेबाजपणाची द्योतक आहेत. त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच रोमन चित्रशैलीत मानवाकृति-चित्रणात आणि अन्य रचनेत भारदस्तपणा आला. पाँपेई शहरातील वाड्यांतील भित्तिचित्रांत तेजस्वी झळझळीत रंगाचा वापर आढळतो. विशेषतः या भित्तिचित्रांतील लाल रंग क्कचितच इतर ठिकाणच्या भित्तिचित्रांत आढळतो.

आलंकारिक कला: प्रामुखाने ग्रीक नमुन्यांवर आधारलेल्या, परंतु अधिक समृद्ध, भरीव अलंकरणाच्या वस्तू या काळात आढळतात. फर्निचरमध्ये सुरुवातीच्या काळात मोजकेच नवे प्रकार दिसतात. लाकूड, ब्राँझ तसेच अन्य धातु-माध्यमांत घडवलेल्या वस्तूंत कारागिरी अतिशय परिश्रमपूर्वक आणि सफाईदार रीत्या केलेली आढळते. आलंकारिक संगमरवरी मेज, विश्रांती घेण्याच्या दृष्टीने सोयीचे असे एका बाजूस उंच पाठ व हात असलेले पलंग आढळतात तसेच टेबलाच्या पायांसाठी पशुंच्या पंजांच्या आकारांचा वापर केलेला आढळतो. तर कित्येकदा टेबलांना आधार देणाऱ्या पायांसाठी मानवाकृति-संकल्पना योजलेल्या आढळतात. निद्रेसाठी ऐसपैस पलंग घडवले जात. त्यावरच आरामशीरपणे, रेलून भोजनही घेतले जात असे. खुर्च्या ग्रीक खुर्च्यांप्रमाणेच पण हात नसलेल्या व हातांसह अशा दोन्ही प्रकारच्या आढळतात. घडीच्या खुर्च्याही वापरात होत्या. वस्तू ठेवण्यासाठी लहानमोठ्या आकारांच्या पेट्या तयार करण्यात येत. एका थडग्यातील शवपेटिकेत बंद दाराचे व उघडे असे कपाटाचे दोन नमुनेही आढळले. पेट्यांवर नक्षीकामही कोरले जाई. तसेच नक्षीदार मृत्पात्रीही विपुल प्रमाणात वापरात असावी. श्रीमंत लोक बहुधा चांदीची पात्रे व थाळ्या वापरीत. ऑगस्टस बादशहाच्या काळात काचपात्रे तयार होऊ लागली व त्यानंतर त्याचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला. या सर्व कारागिरीच्या वस्तूंत अलंकरणाचा सोस प्रामुख्याने दिसून येतो.

पहा : अभिजाततावाद; इट्रुस्कन संस्कृति; ग्रीक कला; ग्रीकांश संस्कृति; रोमन संस्कृति.

संदर्भ : 1. Brown, Frank E. Roman Architecture, London, 1961.

2. Maiuri, Amedeo Trans. Gilbert, S. Roman Painting, London, 1953.

3. Strong, Donald, Roman Art, London, 1976.

4. Wheeler, Mortimer, Roman Art and Architecture, London, 1964.

भागवत, नलिनी; कान्हेरे, गो. कृ.

सम्राट ऑगस्टसचा संगमरवरी पुतळा (प्राइम पोर्टा ऑगस्टस), रोम, इ.स. पहिले शतक. पॅल्मायरा, सिरिया येथील स्मारक-कमान व भव्य स्तंभावली, तिसरे शतक. ऑगस्टसच्या कुटुंबियांची व धर्मगुरुंची मिरवणूक : ‘आरा पॅसी’ शांतिवेदिकेवरील संगमरवरी शिल्पपट्ट, रोम, इ.स.पू. १३ ते ९.
बालबेक (हेलिऑपलिस) येथील गोलाकर मंदिर, इ.स. दुसरे-तिसरे शतक. प्राचीन अरीशीयम (सध्याचे आरेत्से, इटली) नगरातील ‘अरटाइन’ पक्वमृदाकलश व त्यावरील उत्थित शिल्पांकन, इ.स.पू. पहिले शतक. पाँपेई येथील व्हेट्टीच्या घरातील भित्तिचित्र : अंशदृश्य; इ.स. ५० ते ७९.