धार्मिक कला : धार्मिक श्रद्धा व आचारविचार तसेच त्यांमागील जीव-जगत्-ईश्वरविषयक तत्त्वज्ञान किंवा अध्यात्म यांनी प्रेरित झालेली व त्यांचा आविष्कार करणारी कला म्हणजे धार्मिक कला असे सामान्यपणे म्हणता येईल. धार्मिक श्रद्धा आणि भावना, धार्मिक पारमार्थिक अनुभूती व विकास धार्मिक ध्येयवाद, धार्मिक प्रसार वा प्रचार, धार्मिक चमत्कार आणि साक्षात्कार लौकिक जीवनाचे धर्मदृष्टीतून केलेले चित्रण–वर्णन हे किंवा यांच्याशी निगडित असे अनेक विषय धार्मिक कलाविष्कारात अंतर्भूत होतात. त्यात साहित्याचाही अंतर्भाव होतो. धार्मिक कला साहित्यांना जागतिक समाजात प्रदीर्घ परंपरा आढळते. आदिम काळापासून आधुनिक काळापर्यंत धर्म आणि कलासाहित्य यांचे अत्यंत निकटचे नाते निर्माण झाल्याचे दिसते. हे नाते नेमके कशा प्रकारचे आहे. हे सांगणे सोपे नाही. विशेषतः  आधुनिक काळात उदयाबरोबर बुद्धिवाद, व्यक्तिस्वांतंत्र्य, लोकशाही यांसारखी नवीन इहवादी मूल्ये निर्माण होऊन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा व संशोधनाचा उद्‌गम होऊन धर्मांचे क्षेत्र नैतिक पारमार्थिक जीवनापुरतेच सीमित होऊ लागले. लौकिक जीवन आणि जीवनप्रणाली यांची धर्मापासून फारकत झाली. धार्मिक नीतिविचारांची जागा लौकिक नीतिविचारांनी घेतली. सामान्यपणे पश्चिमी प्रबोधनकाळापासून धर्माचे तत्पूर्वी जीवनव्यापी असलेले सर्वंकष स्वरूप मर्यादित होत गेले असे म्हणता येईल. कला साहित्य तसेच नैसर्गिक आणि सामाजिक विज्ञाने यांतून धर्मप्रामाण्य बाद झाले व अनुषंगाने ऐहिक जीवनातील धर्मप्रामाण्यही क्षीण होत गेले. म्हणूनच धर्म व कला यांचे नाते आधुनिकपूर्व प्रदीर्घ काळात जेवढे व्यापक, निकटचे व एकात्म होते, तेवढे ते आधुनिक काळात राहिले नाही.

आदिम धर्मकल्पना पाहिल्या तर त्यांत धर्म आणि कला साहित्यनिर्मिती ही एकरूपच होती. आदिम जमातीतील जादूटोणा, तंत्रमंत्र तसेच धार्मिक विधिनिषेध यांतून चित्र, नृत्य, संगीतादी कलाविष्कार साधनभूत असल्याचे दिसते. देवदेवता कल्पनांच्या उदयाबरोबर व्यक्तिगत आणि सामूहिक धर्माचरणाचे स्वरूप व्यापक होत गेले. या देवदेवता त्यांची पूजास्थाने त्यांच्या संदर्भातील कर्मकांड आणि समारंभ यांतून नाट्य, नृत्य, संगीत, वास्तू, चित्र इ. कलांचा परिपोष झाल्याचे आढळते. ख्रिस्ती, इस्लाम, त्याचप्रमाणे हिंदू, बौद्ध, जैन यांसारख्या प्रगत धर्मांच्या अनुयायांनी मानवी कलेतिहास घडविलेला आहे. या कलेतिहासात साहित्यासकट सर्वच ललित कलांचा अंतर्भाव होतो. या कलानिर्मितीची काही वैशिष्ट्ये आढळतात. श्रद्धावानाला मार्गदर्शक ठरणारी, साक्षात्काऱ्यांचे गूढगहन अनुभव व्यक्त करणारी लौकिकापलीकडील उच्च परमतत्त्वांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती साधणारी आणि प्रायः धर्मप्रसारार्थ अवतरलेली भव्य, दिव्य स्वरूपाची ही निर्मिती आहे. प्रचंड वास्तू व भित्तिचित्रे समृद्ध धर्मसाहित्य व महाकाव्ये अशा रूपाने ती कलानिर्मिती नटलेली आहे व तिचे सांस्कृतिक महत्त्व व प्ररकता अजूनही टिकून आहे. समाजधारणेत व सांस्कृतिक विकासात या धार्मिक कलाविष्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आधुनिक काळात धर्म आणि कला यांच्यातील हे परस्परपोषक, परस्परावलंबी नाते क्षीण होत गेले. धर्म हा पुरुषार्थ व्यक्तिगत पातळीवर टिकून राहिला. तरी सर्वंकष समाजाचे एक सर्वमान्य जीवनमूल्य म्हणून त्याचे महत्त्व कमी झाले. कलानिर्मितीची प्रवृत्ती आणि ध्येय ही देखील धर्मनिरपेक्ष अशा लौकिक विचारप्रणालींनी किंवा मूल्यांनी प्रभावित झाली. त्यामुळे पारंपरिक धर्मकल्पनांचा सरळसाक्षात ठसा आधुनिक कलानिर्मितीत उमटेनासा झाला. तो व्यंजनात्मक भाष्यात्मक स्वरूपाचा ठरला. धर्म त्याच्या तात्त्विक-आध्यात्मिक अशा मूलभूत स्वरूपात जाणून घेऊन त्या जाणिवेचा लौकिक जीवनाच्या व जीवनार्थाच्या संदर्भात संभवणारा अर्थ हाच आधुनिक कलानिर्मितीत एक प्रकारे टिकून राहिला असे मानता येईल. असे असले तरी धर्म आणि कला ही दोन्हीही तत्त्वतः जीवनाच्या ज्या एका परम अर्थाच्या व आदर्श अवस्थेच्या श्रेयसासाठी धडपडत असतात आणि त्यासाठी ही दोघेही जीवनाला जो आकार देऊ पाहतात. ते श्रेयस आणि तो आकार यांच्या पातळीवर धर्म व कला यांचे नाते शाश्वत काळापर्यंत अतूटच राहील असे वाटते.

जाधव, रा. ग.

धार्मिक कलेचा आढावा : आधुनिकपूर्व प्रदीर्घ कालखंडात मानवी कलाविष्कार सामान्यपणे धर्मसापेक्षच होता. विविध समाजांतील, विविध धर्मसंस्कृतींतील धर्मकल्पनांना त्यातून मूर्त स्वरूप लाभले. ⇨ अश्मयुगापासून धर्मविचारांशी कलाविष्कराचे असलेले हे नाते अव्याहतपणे दिसून येते.

मानवी संस्कृतीच्या प्रारंभकाळी जीवनसंग्रामाला सामोरे जाताना आदिमानव जीवन, धर्म आणि कला हे सर्व एकतानतेनेच जगला. व्याधसंस्कृतीत कलावंत, धर्मोप्रदेशक, तत्त्वचिंतक, वैदू अशी एकत्रित ज्ञानकेंद्रीकरण असलेली भूमिका शामानाच्या रूपाने पुढे आली. व्याधशैली ही जीवनकलहातून उद्‌भवलेल्या तत्त्वज्ञान व धर्म यांचाच परिपाक होती. तुटपुंज्या आयुधांच्या आधाराने शिकार करून व्याधमानव उदरभरण करी. त्या वेळी निसर्गशक्तींना जादूटोण्याच्या विधींनी काबूत आणण्याचा त्याने प्रयत्न केला. पशुहत्येविषयीच्या मानसिक विवंचनेतून मुक्ती मिळविण्याच्या प्रयत्नातून यातुविद्येची निर्मिती झाली. चित्रे रंगविणे हा या यातुविद्येतील एक जालीम विधी होता आणि तोच धार्मिक कलाविष्काराचा प्रारंभ होता. आपल्याला अज्ञात असलेल्या गूढाभोवती अद्‍‌भुतरम्यता उभारण्याची उत्सुकता मानवाला आदिम काळापासून होती. याचा पुरावा उ. स्पेनमधील ⇨ अल्तामिरा  गुहेतील कलाविष्कारांतून आढळतो.

जीवनसंग्रामात टिकून राहण्यासाठी शारीरिक बळाचा आत्मविश्वास हेच अमोघ अस्त्र असल्याच्या आदिम जाणिवेसोबतच स्त्रीत्वाच्या जननफलनविषयक सत्त्वाचा मूलस्रोतही त्याला गवसल्याचे दिसते. ⇨ व्हिनसच्या प्राचीन मूर्ती, मातृकामूर्ती (आदिमाता), भारतीय परंपरेतील शिवशक्तीचे वा पुरुषप्रकृतीचे द्वंद्व, ⇨ आदम व ईव्ह इ. आविष्कार त्याचेच निदर्शक होत [ → आदिम कला आदिमाता].

व्याधसंस्कृतीनंतर स्थैर्य लाभलेल्या कृषिसंस्कृतीत, मातृकामूर्ती व धरती यांमधील फलन आणि सुबत्ता या समान बंधांमुळे परस्परांचे साहचर्य प्रस्थापित झाले आणि या धरतीशी निगडित अशा अविनाशी तत्त्वाचा शोध घेण्याच्या प्रयत्नातूनच ईजिप्तमध्ये पहिल्यांदा नवी कलाशैली निर्माण झाली. ईजिप्तच्या अफाट मरूभूमीवर विस्तारलेले आणि अवकाशात झेपावणारे ⇨ पिरॅमिड हे धरती आणि आकाश यांचे साहचर्य साधून पारलौकिक तत्त्वाचाच पुरस्कार करतात, असे म्हणता येईल. ईजिप्तमधील संस्कृती, जीवन आणि धर्म हे राजाभोवती केंद्रित होते. राजाच्या मृत देहास ममीरूपाने चिरंतन राखण्याची श्रद्धा आणि मृताच्या जीवनसंदर्भातील प्रसंगांचे थडग्यातील चित्रीकरण व शिल्पीकरण हे ईजिप्तमधील कला आणि धर्म यांच्या एकात्मतेचे सूचक आहेत[ → ईजिप्त संस्कृति].


ग्रीक संस्कृतीत पारलौकिक कल्पनांना कलेतून लौकिक आदर्शाचे अभिजात वळण लाभले व ऐहिक जीवनाचे पडसाद कलाकृतीत उमटू लागले. देवत्वाची संकल्पना ही परिपूर्ण व आदर्श मानवी प्रतिमेशी जोडून ग्रीकांनी ती प्रामुख्याने शिल्पाकृतींद्वारे साकारली [ → ग्रीक कला]. पुढे यूरोपात ख्रिस्ती धर्माच्या अभ्युदयासोबत कलेला ख्रिस्ती धर्माशय प्राप्त झाला. या धर्मातील करुणेचे तत्त्व आविष्कृत करताना येशू ख्रिस्ताच्या प्रतिमा आणि त्याच्याशी संबंधित विषयांना ख्रिस्ती कलाविष्कारात मोठे स्थान मिळाले. साधनेसाठी संघटितपणे एकत्र येण्याच्या गरजेतून भव्य सभामंडपांनी युक्त अशा ⇨ चर्चची निर्मिती अपरिहार्य ठरली. पुढील काळात रंगीत ⇨ चित्रकाचांनी युक्त अशा भव्य कॅथीड्रलची निर्मिती झाली आणि अंतर्बाह्य प्रकाशाच्या झळाळीने वास्तू व्यापून दैदीप्यमानतेचा आणि उदात्ततेचा साक्षात्कार देणाऱ्या गॉथिक वास्तुशैलीने आशयासोबत कलात्मकतेची परिपूर्णता गाठली. किमया तत्त्वाचा हाच उत्कर्षबिंदू म्हणता येईल. यामध्ये धातूची झळाळी ही दैवी अंशासमान मानली जाई. अशाच प्रकारच्या झळाळीमधून ईश्वरी अंश पाहण्याची श्रद्धा ही गॉथिक चित्रकाचेच्या शैलीतूनही प्रतिबिंबित झालेली दिसते [ → गॉथिक कला].

मध्ययुगाच्या पूर्वार्धात धार्मिक रूढींच्या बंधनात जखडलेला कलाविष्कार सांस्कृतिक प्रबोधनाच्या निमित्ताने त्यातून मुक्त झाला. प्रबोधनकालीन कलावंतानी व विचारवंतांनी प्राचीन ग्रीक विद्याकलांचा वारसा स्वीकारला आणि ख्रिस्ती धर्माशयाला तात्त्विक तसेच कलात्मक अंगांची जोड दिली. ख्रिस्ती धर्मश्रद्धा आणि आशय यांच्या ग्रीक आकृतिविषयक आदर्शांशी झालेल्या समन्वयातून कलाभिव्यक्ती साधली गेली [ → प्रबोधनकालीन कला]. पुढील कालखंडात यूरोपात मान्यता पावलेल्या ख्रिस्ती धर्मातील आशयाची देशकालपरिस्थित्यनुरूप भिन्नभिन्न कलारूपे आढळतात.

पाश्चात्त्य कलेप्रमाणेच धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या पूर्वेकडील कलाविष्कार समृद्ध आहे. भारतातील प्राचीन सिंधू संस्कृतीतही कलेचा धार्मिक विधींशी संबंध असावा, हे शिल्पाकृती, शिवप्रतिमांकित मुद्रा यांच्या उपलब्ध अवशेषांवरून सूचित होते. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर हिंदू धर्मातील उपनिषदे, सूत्रे आणि विशेषतः वेद (ज्यामध्ये सुसंघटित स्वरूपाच्या संगीताची प्राथमिक अवस्था पहावयास मिळते) ही एक आगळा कलाविष्कार ठरतात तर धर्म, तत्त्वज्ञान आणि काव्य यांची अनन्यसाधारण एकरूपता साधलेली रामायण, महाभारतादी महाकाव्ये शतकानुशतके समस्त हिंदू संस्कृतीवर आपले पडसाद उमटवितात. भारतात हिंदू, बौद्ध, जैन, इ. प्रमुख धर्मांच्या आणि अनेक लहानमोठ्या धार्मिक पंथोपपंथाच्या आधारेच कलानिर्मिती होत राहिली. विशेषतः बौद्ध-जैन धर्मांचा उदय कलानिर्मितीला प्रेरक ठरला [ → जैन कला]. मौर्य राजांच्या आश्रयाखाली बौद्धधर्मप्रसारार्थ निर्मिलेले ⇨ चैत्य, ⇨ स्तूप, ⇨ विहार इ. वास्तू, शिलास्तंभ हे धर्माशयाचे द्योतक ठरतात. शुंग, कण्व, कुशाण, व गुप्त राजवटीतील गुंफामंदीरे, अलंकृत शिल्पे, तोरणशिल्पे, इ. बौद्ध कलाविष्कारातील उच्च सौंदर्यदृष्टीची साक्ष देतात. हीनयान पंथात कलेला वाव नव्हता. मात्र नेपाळ, तिबेट, ब्रम्हदेश, श्रीलंका, इ. देशांत महायान पंथाच्या प्रसारासोबत चित्र, वास्तू आणि शिल्प यांच्या निर्मितीला वेग आला. भारतातील ⇨ बादामी, ⇨ महाबलीपुर, ⇨ अजिंठा, ⇨ वेरूळ येथील चित्रशिल्पांनी समृद्ध असलेली गुंफामंदिरे ही केवळ अजोड ठरली आहेत. ⇨ कोनारकचे कालचक्रसूचक रथचक्र आणि पुरुषप्रकृतिद्वारे विश्वनिर्मितीचा वेध घेणारे ⇨ खजुराहो येथील शिल्पविधान ही धार्मिक गूढवादी आशयाचाच प्रतीकात्मक प्रत्यय देतात, तर भुवनेश्वर, पुरी आणि दक्षिणेकडील मंदिरांच्या वास्तुशिल्पांतून ब्राम्हण, जैन, शैव आदी विविध धर्मपंथीयांची तत्त्ववैशिष्ट्ये साकार होतात. किंबहुना तंत्रशैलीचा नावीन्यपूर्ण सौंदर्याविष्कार असलेली भारतीय मंदिर-वास्तुकला धार्मिक कलेचा एक चिरंतन आविष्कार ठरते  [ → मंदीर वास्तुकला].

हिंदू आणि इस्लामी वास्तुशैलीच्या समन्वयातून इतिहासकाळात कुतुबमीनार, ताजमहालादी भव्य कलात्मक वास्तुनिर्मिती झाली. भारतीय कलाप्रणालीतील ही एक आगळी व ललित्यपूर्ण शैली होती. मोगलांच्या मूर्तिभंजक प्रवृत्तीमुळे कलेत शिल्पचित्रीकरणाला वाव नव्हता. भारतीय चित्रकला मात्र या सुमारास प्रगत अवस्थेत होती. पाली, जैन हस्तलिखितांतून आविष्कृत झालेली चित्रकलाही गुणसंपन्न होती. मुख्यत्वे कृष्णभक्तीच्या प्रेरणेतून साकारलेली ⇨ राजपूत  कला रागमालादी चित्रमालिकांद्वारे काव्यात्मकतेचाही प्रत्यय देते [ → भारतीय कला].

चीनी कलेमध्ये धार्मिक तत्त्वकल्पनांचाच आविष्कार दिसतो, तर जपानमधील बौद्धांच्या झेन पंथाने चित्रलयीद्वारे संवेदनांचा उत्कट प्रत्यय देऊन कलाभिव्यक्ती साधल्याचे आढळते.

लयतत्त्वाचा हा आविष्कार चित्रकलेप्रमाणेच नृत्य-संगीतादी सर्वच कलाक्षेत्रांत मूलभूत ठरतो. सांस्कृतिक स्थिरतेसोबत संगीत-नृत्यादी कला ह्या धर्मसंस्कृतींच्या विविधतेबरोबर बहुविध छटांनी आविष्कृत झालेल्या दिसतात. वाद्यांची ही कलात्मक निर्मिती धर्मानुषंगाने उत्क्रांत झालेली आढळते. पाश्चात्य देशांत ऑर्गन हे वाद्य धार्मिक जीवनाचाच एक अविभाज्य भाग ठरते, तर हिंदू धर्मीयांत सनई-चौघडा आदी वाद्यांतून पावित्र्याची व मांगल्याची प्रतीती येते. नाट्य, संगीत, नृत्य इ. कलांचा जन्म धार्मिक विधींशीच निगडीत आहे.

चर्चवास्तू अवकाशाचा भव्योदात्त प्रत्यय देतात तर हिंदू मंदिरातील सौम्य प्रकाशाची गर्भगृहे ही भाविकास मायास्वरूपी बाह्यजीवनापासून परावृत्त करून, अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करतात. इस्लामी वास्तू ह्या छताच्या गोलाकारातून अंतर्बाह्य भव्यतेचा साक्षात्कार देतात.

धार्मिक कलाविष्कारातून ऐहिक जीवनापलीकडील मूलस्रोताचा ठाव घेण्याचाच प्रतीकात्मक प्रयत्न दिसतो. आध्यात्मिक अथवा धार्मिक श्रद्धांमध्ये गर्भित असलेले चैतन्य विविध प्रकारे त्यातून जाणवत राहते.

फेणाणी, उषा