पिक्‍नोगोनिडा : समुद्री आर्थ्रोपॉड (संधिपाद) प्राण्यांचा एक उपसंघ. या उपसंघाला पँटोपोडा असेही नाव दिलेले आहे. सामान्यत: या प्राण्यांना समुद्र कोळी म्हणतात. यांच्या सु. ५०० जाती असून उष्ण कटिबंधापासून दोन्ही ध्रुवांपर्यंतच्या प्रदेशातील उथळ व खोल पाण्यात ते सगळीकडे आढळतात. पिक्‍नोगोनिड बहुधा स्थान बद्ध सीलेंटेरेस (आंतरगुही) प्राण्यांच्या शरीरावर परजीवी (दुसर्‍या जीवावर उपजीविका करणारे) म्हणून राहतात. निफॉन हे पिक्‍नोगोनिडाचे एक चांगले उदाहरण होय.

आ. 1. निफान स्ट्रोमिआय : अंडयांचे गोळे अंडवाहकांना चिकटवून आपल्याबरोबर घेऊन जाणारा नरया प्राण्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शरीराचे झालेले प्रर्‍हसन (र्‍हास पावून कमी होणे) हे होय. शिरोवक्ष (डोके व छाती यांच्या एकीकरणाने बनलेला भाग), वक्ष आणि उदर असे शरीराचे तीन भाग असतात. शिरोवक्षामध्ये एक अग्र शुंड (सोंड), तीन शीर्ष खंड (भाग) आणि एक वक्ष खंड यांचा समावेश होतो. याच्या मागे तीन रंभाकार वक्ष खंड असतात व त्यांच्या मागे अल्पविकसित उदर असते. शिरोवक्षावर सामान्यतत: चार साधे डोळे आणि उपांगांच्या (शरीराला जोडलेल्या अवयवांच्या) चार जोड्या असतात. पहिल्या जोडीतील उपांगावर नखर (नखे) असणे शक्य असते म्हणून त्यांना ‘कीलोफर’ म्हणतात. दुसरी जोडी स्पर्शग्राही स्पर्शकांची (स्पर्शाची संवेदना ग्रहण करणार्‍या लांब, सडपातळ व लवचिव इंद्रियांची) असते तिसरी जोडी अंडवादी पादांची असते आणि नर त्यांचा उपयोग अंड्यांचे गोळे शरीराच्या खाली धरून ठेवण्याकरिता करतो, म्हणून यांना अंडवाहक म्हणतात चौथी जोडी गमन पादांची (पायांची) असते. वक्षाच्या तिन्ही खंडांच्या बाजूंवरून पार्श्व प्रवर्ध (वाढी) निघालेले असून त्यांना पायांच्या तीन जोड्या जोडलेल्या असतात. काही वंशांतील प्रौढांत कीलोफोर व स्पर्शक नसतात. माद्यांमध्ये अंडवाहक केव्हाही नसतात पण नरांमध्ये ते नेहमी असतात. कित्येक दक्षिण ध्रुवीय जातींमध्ये गमन पादांच्या पाच किंवा सहा जोड्या असतात. अल्पवर्धित उदर अगदी लहान पिशवीसारखे असून त्यावर उपांगे नसतात.

आ. 2. निफानाची बाह्य लक्षणे : (1) कीलोफोर, (2) शुंड, (3) स्पर्शक, (4) डोळे, (5) अंडवाहक, (6) शीर्ष खंड, (7) उदर, (8) पायाच्या टोकावरचा नखर, (9) पार्श्र्व प्रवर्ध, (10) ऊर्विकाशरीराच्या प्रर्‍हसनाबरोबर पायांच्या लांबीत बरीच वाढ होते, त्यामुळे नमुनेदार पिक्‍नोगोडिया प्राणी एखाद्या लांब पायांच्या जुडग्यासारखा दिसतो. मध्यांत्रापासून (अन्नमार्गाच्या मधल्या भागापासून) निघालेल्या अंधवर्ध (एका टोकाला बंद असलेले पिशवीसारखे भाग) पायांच्या बरेच आत गेलेले असतात. शुंड ही एक ताठ, त्रिभागीय संरचना असून वक्षापेक्षा लांब असते. त्याच्या टोकावर त्रिकोनी मुख असून त्यात गाळणे असते या अवयवाच्या साहाय्याने हे प्राणी मृदुकाय प्राण्यांच्या शरीरातील रस व मऊ भाग यांवर उदरनिर्वाह करू शकतात. हृदय नलिकाकार असून त्यावर पार्श्व रंध्रांच्या २-३ जोड्या असतात. श्वसनेंद्रिये आणि उत्सर्जनांगे (निरूपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणारी इंद्रिये) नसतात. तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) आर्थ्रोपॉड नमुन्याचे असून ते अधिग्रसिका (घशापासून जठरापर्यंतच्या अन्नमार्गाच्या वरच्या बाजूस असणारी) गुच्छिका (ज्यांपासून मज्जातंतू निघतात असा मज्जा पेशींचा समूह) अथवा मेंदू, परिग्रसिका-वलय (ग्रसिकेभोवतालचे तंत्रिका वलय), युग्मित (जोडीने असणार्‍या) अधर गुच्छिका आणि अधर तंत्रिकारज्जू यांचे बनलेले असते.

लिंगे भिन्न असतात पण ब्राझीलमधील एक जाती उभयलिंगी (नर व मादी यांची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारी) हे. नरामध्ये वृषणांची (पुं-जनन ग्रंथींची) एक जोडी व मादीमध्ये अंडाशयांची  (स्त्रि-जनन ग्रंथींची) एक जोडी असते. जनन ग्रंथी आंत्राच्या (आतड्याच्या) वर आणि हृदयाच्या दोन्ही बाजूंना एकेक याप्रमाणे असतात. प्रौढांमध्ये जनन ग्रंथींचे मागच्या टोकाकडे, उदराच्या बुडाशी, सायुज्यन्य (एकीकरण) झालेले असते आणि त्यांच्यापासून लांब पार्श्व अंधर्वर्ध निघून गमन पादांच्या आत गेलेले असतात. अंडी मुख्यत: पार्श्व अंधवर्धांच्या आत वाढून पक्व होतात, त्यामुळे मादीच्या पायांच्या ऊर्विका (मांड्यांसारखे भाग) फुगून मोठ्या होतात. शुक्राणू वृषणांच्या अंधवर्धात आणि वक्षीय भागात पक्व होतात. जननरंध्रे पायांच्या बुडाशी असतात. मादी अंडी घालत असताना नर त्यांचे निषेचन (फलन) करतो. नराच्या ऊर्विकांमध्ये असलेल्या विशेषित संश्लेष (सिमेंट) ग्रंथींपासून एक प्रकारचा चिकट स्त्राव उत्पन्न होतो. त्याचा उपयोग करून तो निषेचित अंड्यांचे गोळे बनवून अंडवाहकांना चिकटवितो आणि ते घट्ट धरून आपल्याबरोबर नेतो.

अंडी फुटून त्यांतून साधे, अखंड शरीराचे डिंभ (भ्रुणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणार्‍या आणि प्रौढाशी साम्य नसणार्‍या सामान्यत: क्रियाशील पूर्व अवस्थेतील प्राणी) बाहेर पडतात. यांना आखूड शुंड व उपांगांच्या पहिल्या तीन जोड्या असतात. डिंभांच्या रूपांतरणाने प्रौढ तयार होतात.

पिक्‍नोगोनिड प्राणी समुद्रात अंतरवेलीय (भरती-ओहोटीच्या) क्षेत्रापासून ते ६,५०० मी. खोलीपर्यंत आढळतात. दोन्ही ध्रुवांजवळच्या समुद्रात ते विपुल आहेत. या प्राण्यांच्या हालचाली मंद पण विचारपूर्वक केलेल्या असतात. ते पोहू शकतात. अंतरवेलीय क्षेत्रातील बहुतेक जातींचे पिक्‍नोगोनिड एखाद्या सीलेंटेरेट प्राण्याच्या सहवासात जगत असतात. या प्राण्यांचे डिंभ किंवा बाल्यावस्था पुटीभूत होऊन सिलेंटेरेटांच्या शरीरात परजीवी म्हणून राहतात व प्रौढ त्यांच्या शरीरावर बाह्य परजीवी म्हणून राहतात. काही आपल्या नखरांनी व शुंडांनी समुद्रपुष्पांना व हायड्राइडांना घट्ट चिकटतात, तर काही कालवांच्या प्रावारगुहेत (त्वचेची मऊ घडी-प्रावार-व शरीर यांच्या मधल्या पोकळीत) अथवा न्यूडिब्रँकांच्या आणि समुद्रकाकडीच्या शरीरावर आढळतात. खोल समुद्रात राहणार्‍या जातींच्या राहणीविषयी अगर सवयींविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. 

पिक्‍नोगोनिडांच्या लांब पायांना सहज इजा होते किंवा ते तुटून जातात. इजा झालेले पाय सहज बरे  होतात व तुटलेल्या पायांच्या जागी नवे उत्पन्न होतात. 

संदर्भ : Harmer, S.F. Shipley, A.E., Ed. The Cambridge  Natural History, Vol.4, New Delhi, 1968.

जामदाडे, ज.वि.