मानवाकृति, कलेतील : कला ही मानवाने स्वानंदासाठी अंगीकारलेली निर्मितिप्रक्रिया आहे. त्यामुळे कलाविष्कारात मानवी आशय अंतर्भूत असणे अपरिहार्य आहे. म्हणून दृश्य कलांमध्ये मानवाकृती कशी आणि कोणत्या कारणाने आली, हे या नोंदीत पहावयाचे आहे. फ्रँकोकँटेब्रिअन आदिम संस्कृतीतील मानवाचे विश्वाच्या संदर्भात आत्मभान जागे झालेले नव्हते. त्यामुळे त्याच्या चित्रांत मानवाकृतीचे चित्रण फारसे आढळत नाही तर पशुचित्रणच अधिक जोरकसपणे केलेले आढळते. कृषिसंस्कृतीबरोबर मानव स्थिर होऊ लागला. स्वतः कृती करून स्वतःचे असे जीवन घडवू लागला. तेव्हा स्वतःमध्येच त्याला वैश्विक चैतन्याचा साक्षात्कार झाला व तेव्हापासून कलेत मानवाकृतीचा प्रभाव वाढू लागला.

पाश्चिमात्य देशांत ईजिप्त, सुमेरियन, तसेच भारतात हडप्पा, मोहें−जो−दडो आदी संस्कृतींच्या कलेत प्रथमच मानवाकृतींचे ठळक चित्रण आढळते. हे चित्रण खूपच जोरकस व ओजस्वी आहे. ⇨हडप्पा व ⇨ मोहेंजोदडोयेथे जी काही मानवी शिल्पे सापडली, त्या शिल्पांच्या कबंधात शरीरशास्त्रीय घडणीचे उत्तम आकलन दिसते. ईजिप्शियन कलेतील मानवाकृतीचे वैशिष्ट्य असे की, सर्वच मानवाकृती खांद्यापासून कमरेपर्यंत समोरून पाहिल्यासारख्या, तर चेहरा व पाय एका बाजूने पाहिल्यासारखे काढलेले आहेत. (पाहा : मराठी विश्वकोश : खंड २ मधील  ईजिप्त संस्कृती कला दर्शविणारे चित्रपत्र खालीलप्रमाणे).

१. खाई राजाच्या थडग्यात सापडलेले एक रंगीत मृत्पात्र.
२. आरीनेफर राजाच्या थडग्याच्या प्रवेशद्वारावरील पक्षीरूपातील आत्मा आणि मृत माणसाची छाया यांचे चित्र.
३. नेफरतीती राणीचा शिलाशिल्पित चेहरा.
४. नख्त राजाच्या थडग्यावरील चित्रमालिकेतील एक चित्र : मेजवानीच्या प्रसंगी वादन-नर्तन करणाऱ्या युवती.
५. नख्त राजाच्या थडग्यावरील अंधवादकाचे चित्र.
६. सामाजिक बहिष्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या चुनखडी मतपत्रिकेवरील नर्तकीचे वेधक चित्र, इ.स.पू. १५७०-१३४२.
७. सिंहासनाधिष्ठित ओसायरिस देवता.

 

भारतात मूर्तिपूजेच्या धार्मिक भावनेतून मानवाकृती कलेत आली. आद्य आर्य हे मूर्तिपूजक नव्हते. त्यांची श्रद्धा सृष्टीच्या पंचमहाभूतांवरच केंद्रित झाली होती.पुढे मात्र या पंचमहाभूतांनीच मानवी शरीर बनले आहे, असा त्यांना साक्षात्कार झाला आणि तेच आर्य मूर्तिपूजक बनले. त्यातून मानवी चैतन्यमय आत्मा व जड शरीर ही दोन तत्त्वे स्पष्ट झाली. जड चैतन्याच्या द्वैत–अद्वैतातून भारतीय कला विकास पावली. जड माध्यमातून रूप घेणारी मानवाकृती कलेत चैतन्यमय होऊन आली.

पश्चिमेत ग्रीक काळात भौतिक विज्ञान व शास्त्रे यांचा भक्कम पाया घातला गेला. मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी मानवी कर्तृत्वाने मोठी झेप घेतली. त्यामुळे मानव हा या सर्व विश्वाचा केंद्रबिंदू बनला. जीवनाच्या इतर विविध अंगांप्रमाणेच मानवी शरीराचाही सांगोपांग अभ्यास सुरू झाला. शरीरशास्त्राचे उत्तम ज्ञान, प्रमाणबद्धता या वैशिष्ट्यांनी चित्रकलेत ग्रीक तसेच रोमन मानवाकृती आकारित होऊ लागल्या. त्यांच्या ‘अपोलो, ‘व्हीनस’यांसारख्या देवदेवता म्हणजे आदर्श मानवी शरीरे होती. या मानवाकृती सर्वसाधारण मानवाकृतीपेक्षा अधिक उंच दाखवल्या आहेत, हेही अर्थपूर्ण ठरते.

याउलट भारतीय कलावंताने शरीरशास्त्रीय अचूक तपशिलांना फार महत्त्व न देता चैतन्यरूप लय मानवाकृतीतून ओतली. ⇨गुप्तकालातील चित्रे–शिल्पे ही या दृष्टीने लक्षणीय आहेत.येथे दैवी चैतन्य मानवाकृतीत लयरूप होऊन आले, म्हणून या मानवाकृती केवळ सुंदर मानवी शरीर न राहता सौंदर्याकार म्हणून प्रकट झाल्या. त्यात अनावश्यक तपशील वगळून मूलभूत शरीरशास्त्रीय घडणीचा लयदृष्ट्या अतिशय चांगला उपयोग करून घेतला आहे. समूहरूपाने मानवाकृतींचा अतिशय सुंदर आविष्कार ⇨ अजिंठ्याच्या चित्रांत आढळतो. यात दृश्य प्रकाशाचे चित्रण टाळून रेषात्मक लयीतून संयत अलंकरणासह मानवाकृतींचे चित्रण केले आहे. अजिंठ्याची भव्य भित्तिचित्रे ही आपल्यापुढे जणू नाट्याचा रंगमंचच उभा करतात. या भित्तिचित्रांतील मानवाकृतींचे चित्रण अतिशय लोभसवाणे व नाट्यपूर्ण आहे. वेगवेगळ्या देवदेवतांची वेगवेगळी प्रमाणे व त्यांची प्रतिकात्मक वैशिष्ट्ये कशी व्यक्त करावी, याविषयीचे वेगळे शास्त्रच भारतात बनविले गेले. त्याला ‘लक्षणशास्त्र’म्हणतात. भारतीय चित्र−शिल्पांत मानवी अवयवांचे–म्हणजेच नाक, कान, ओठ, डोळे, खांदे, कबंध यांचे–आदर्शीकरण करण्यात आले. उदा., कमलनेत्र, कमलहस्त, वृषभस्कंध, धनुष्याकृती भिवया, पोवळ्यासारखे ओठ इत्यादी. ⇨ खजुराहोची मंदिर−शिल्पे म्हणजे स्त्रीसौंदर्याचे अजोड नमुने आहेत. उन्नत वक्षःस्थळ, पुष्ट नितंब ही स्त्रीशरीराची वैशिष्ट्ये सर्वच भारतीय चित्र−शिल्पांत आढळतात. परंतु खजुराहोच्या शिल्पांत त्यांचा परमोत्कर्ष झालेला दिसतो. राजपूत, मोगल आदी लघुचित्रशैलींत हळुवार, नाजूक रेषेतून मानवाकृती चित्रित केल्या आहेत. त्यांत ⇨किशनगढ चित्रशैलीतील मानवाकृतींचे चित्रण मनोहारी आहे. भारतीय कलेतील मानवाकृती या प्राधान्याने रेषाप्रधान आहेत. पाश्चात्त्यांप्रमाणे छाया–प्रकाशाला महत्त्व न देता रेषात्मक लयीतून शरीराची घनता पकडण्याचा प्रयत्न भारतीय कलावंतांनी केला. यातच भारतीय कलेचे वैशिष्ट्य दिसून येते. [⟶ भारतीय कला; लघुचित्रण].

मानवाकृतींचे समूहचित्रण ईजिप्शियन कलेत प्रथम दिसते. ⇨ व्यक्तिचित्रण मात्र प्रथम रोमन काळात सुरू झाले, ते मुख्यतः शिल्पामध्ये. त्यानंतर प्रबोधनकाळात हळूहळू व्यक्तिचित्रण चित्रकलेत प्रगत होऊ लागले [⟶ प्रबोधनकालीन कला]. बरोक काळातील ⇨ रेम्ब्रँट या चित्रकाराने व्यक्तिचित्रण सामान्य पातळीवरून चिंतनात्मक पातळीवर नेऊन पोहोचवले. अवाजवी तपशील, साचेबंदपणा या गोष्टी टाळून छायाप्रकाशाचे मूलभूत खंड नजरेत भरतील अशा तऱ्हेने मांडून रेम्ब्रँटने अभिव्यक्ती साधली आहे. रेम्ब्रँटच्या आधी ⇨ एल ग्रेको या चित्रकाराने विरूपीकरण करून मानवाकृतीचा अभिव्यक्तीसाठी फार चांगला उपयोग करून घेतला होता. त्याच्या चित्रांतील उंचच उंच मानवाकृती येशू ख्रिस्ताप्रमाणेच वेदनेने ग्रासलेल्या आहेत. त्या खूप काहीतरी सोसत आहेत, असे जाणवत राहते. ⇨ रॉदँ या शिल्पकाराने व्यक्तिचित्रणात अभिव्यक्तीचा तळठाव गाठला. प्रबोधनकाळात विज्ञानाच्या वाढीबरोबर सामान्य माणसाला प्राधान्य येऊ लागले व सामान्य माणसाचेही चित्रण होऊ लागले. त्यामुळे राजेमहाराजे व देवादिकांच्या चित्रणावरील भर कमी झाला.

विसाव्या शतकापूर्वीच आधुनिक काळाला सुरुवात झाली. वस्तूचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले. सेझानसारख्या आधुनिकतेच्या प्रवर्तकांनी दृश्य कलांमधील नैसर्गिक वस्तूचा आकार फोडला. त्यातून स्फूर्ती घेऊन पिकासो व त्याच्या सहकाऱ्यांनी वस्तूपासून आकार वेगळा करून नव्याने आकारांचे संघटन सुरू केले. यात मानवाकृतीचेही महत्त्व कमी झाले. रंग, रेषा आणि आकार ही दृश्यकलामाध्यमाची मूलतत्त्वे कधी नव्हे इतकी महत्त्वाची ठरली. मानवाकृतीसुद्धा अप्रतिरूप आकारातून चित्रित होऊ लागल्या. नंतर नंतर तर मानवाकृतीचा वासही चित्राला सहन होईना. शुद्ध वस्तुनिरपेक्ष आकारातच चित्र निर्माण होऊ लागले. परंतु तरीही मानवाकृतीला आपल्या कलेत महत्त्वानाचे स्थान देऊन आधुनिकतेतही मानवी आशय टिकवून ठेवणारे व त्यातूनच चिरस्थायी कलाकृती निर्माण करणारे प्रतिभावंत पाश्चात्त्य देशांत तसेच भारतातही होऊन गेले. ⇨ व्हिन्सेंट व्हागॉखच्या चित्रांतील मानवाकृती ह्या जीवनाच्या झपाटलेपणाचे कलारूप घेऊन येतात तर कोकोश्काच्या चित्रांतील मानवाकृती जीवनाच्या विदीर्णतेचे कलारूप, काही वेगळ्या प्रकारे घेऊन येतात. अलीकडच्या काळातील ⇨ हेन्री मुर या आधुनिक ब्रिटिश शिल्पकाराने आपल्या शिल्पांतून प्रामुख्याने स्त्रीतत्त्व व मातृतत्त्व पूर्णार्थाने साकार केले आहे शिवाय त्याच्या इतर शिल्पाकारांत पोकळी निर्माण करून त्याने जीवनाचे सुख−दुःखात्मक स्वरूप आकार व अवकाश या धन–ऋणात्मक तत्त्वातून समर्थपणे उभे केले आहे. कललेल्या, उभ्या, बसलेल्या अशा विविध अवस्थांतील त्याच्या मानवाकृतींतून जीवनाच्या या धन–ऋणात्मक लपंडावाचा आविष्कार मोठ्या तन्मयतेने केलेला दिसतो. ज्या शिल्पांमध्ये त्याने पोकळी वापरली आहे त्यांत जीवनाचीच रिक्तता अर्थपूर्ण केल्यासारखी वाटते. ⇨ आल्बेतों जाकोमात्तीच्या शिल्पांत रिक्त अवकाशाचा अतिशय चांगल्या रीतीने उपयोग केलेला दिसतो. त्याच्या शिल्पांतील मानवाकृती या सभोवतालच्या अमर्याद अवकाशाने आक्रसून गेलेल्या वाटतात आणि आक्रसून जाताजाता त्यांची उंची वाढल्यासारखी वाटत राहते. या भकास व सोशिक वाटणाऱ्यामानवाकृती तितक्याच ठामपणाने उभे राहण्याचा यत्न करत आहेत, असे मात्र सतत जाणवत राहते. त्यामुळेच सार्त्र या अस्तित्ववादी तत्त्वज्ञाने अस्तित्ववादी जीवनाशयाची अभिव्यक्ती म्हणून जाकोमात्तीच्या शिल्पांचा जो निर्देश केला आहे, तो सुयोग्य ठरतो. या आधुनिक कलावंतांत ⇨ पिकासोनेही आपल्या चित्रांतून मानवाकृतींचा विविध प्रकारांनी उपयोग केला आहे. प्रतीकात्मक, घनाकारी, वास्तववादी, अप्रतिरूप इ. विविध प्रकारांतून त्याने मानवाकृती चित्रित केल्या आहेत. गेर्नीका हे त्याचे गाजलेले चित्र (पहा : मराठी विश्वकोश : खंड ५ चित्रपत्र ४५) त्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. भारतातही आधुनिक कलावंतांत मानवाकृतींचा प्राधान्याने व अन्वर्थक उपयोग करणारे अनेक शिल्पकार व चित्रकार आहेत. त्यांत ⇨एम्.एफ्.हुसेन हे चित्रकार अग्रगण्य आहेत.

कदम, ज्योत्स्ना

चित्रपत्र :

१. ‘पद्मिनी’ (१९६०) – एम्. एफ्. हुसेनचे चित्र.
२. सिंधु संस्कृतीतील आदिमातेची पक्वमृदा मूर्ती, इ.स.पू. तिसरे सहस्त्रक.
३. कंदरिया महादेव मंदिरातील स्त्रीशिल्प, खजुराहो, ११वे शतक.
४. कारनॅक येथील आतेन मंदिरातील आखेनातेन राजाचा पुतळा, इ. स. पू. सु. १३५०.
५. माता व मूल, वालुकाश्म शिल्प, ओरिसा, ८वे-९वे शतक.
६. प्रियकराची प्रतीक्षा करणारी राणी, गढवाल चित्रशैली, सु. १७८५.

 

 

१. ‘लुडोव्हिसी आरिझ ‘ चे शिल्प : ग्रीक युद्धदेवतेची रोमन प्रतिकृती, इ.स. पू. ४ थे शतक.
२. ‘ ला सोर्स’ (१८५६) – जे. ए. डी. अँग्रचे चित्र.
३. स्ट्रॅसबर्ग कॅथीड्रलच्या प्रवेशद्वारावरील शिल्पाकृती, जर्मनी, १४ वे शतक.
४. ‘स्टँडिंग फिगर ‘ (१९२०), पाषाणशिल्प-ए. आर्चिपेंको.
५. ‘द स्क्वेअर’ : अंशदृश्य (१९४८-४९)–आल्बेर्तो जाकोमात्तीचे शिल्प.
६. ‘बर्गर्स ऑफ कॅले’ : अंशदृश्य (१८८४-८६)–ऑग्यूस्त रॉदँचे शिल्प.
७. लेस्प्यूग येथील व्हीनसच्या हस्तिदंती शिल्पाची प्रतिकृती, फान्स, ऑरिग्नेशियन काळ (इ. स. पू. सु. २५०००).
८. ‘द ज्यूइश ब्राइड’ : अंशदृश्य (सु.१६६५)–रेम्ब्रँटचे चित्र.