रीतिलाघववाद: (मॅनरिझम) . सोळाव्या शतकातील यूरोपातील एक कलासंप्रदाय. उच्च प्रबोधनकालीन (हाय रेनेसान्स) कला व बरोक कला ह्यांदरम्यानच्या काळात (सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध) तो प्रचलित होता. इटलीतील तस्कनी ह्या शहरी हा संप्रदाय उगम पावला तथापि त्याचे प्रमुख निर्मितिकेंद्र फ्लॉरेन्स हेच होते. ‘मॅनर’ (इटालियन ‘Maniera’) म्हणजे रीत वा शैली ह्या अर्थी, ‘मॅनरिझम’ ही संज्ञा प्रख्यात वास्तुशिल्पज्ञ आणि चित्रकार व्हाझारी ह्याने प्रथम उपयोगात आणली.

उच्च प्रबोधनकाळातील सौंदर्यविषयक कलातत्त्वे त्याज्य ठरवून काही नवीन कलातत्त्वांचा हिरिरीने पुरस्कार ह्या कालखंडातील चित्रकारांनी केला. उच्च प्रबोधनकाळात कलेचा सर्वांगीण विकास झाला असला, तरी ह्या कलवंतांचा निसर्गातील वस्तुमात्रांच्या अभ्यासातून योजनाबद्ध चित्ररचना करण्यावर विशेष भर होता रीतिलाघववादी कलाशैलीत केवळ वस्तुनिष्ठतेवर भर न देता, वैयक्तिक कलाविष्कारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

झेर्मँ बाझँ या पश्चिमी कलेतिहासकाराच्या मतानुसार रीतिलाघववाद हा पूर्वकालीन अभिजाततावाद आणि उत्तरकालीन बरोक कला यांच्यामधील संदिग्ध अवस्थेचा निदर्शक आहे. प्रबोधनकलीन श्रेष्ठ कलानिर्मितीने भारलेल्या सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीतील दुय्यम दर्जाच्या कलावंतांनी, रीतिलाघववादाच्या रूपाने काही कृत्रिम आणि विसंवाद असे शैलीविशेष निर्माण केले. उदा., उभट लंबाकर व पिळवटलेल्या मानवी आकृत्या, भावनांचे आणि हालचालींचे अतिरेकी प्रदर्शन, प्रमाणबाह्य दीर्घीकरण इत्यादी.

रीतिलाघववादाचा कालखंड हा यूरोपीय कलेतील एका महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भावी काळातील बरोक कलाशैलीच्या काही खुणा ह्या शैलीत आढळतात. म्हणूनच रीतिलाघववादाचा निर्देश उच्च प्रबोधन व बरोक या शैलीतील एका दुवा म्हणूनही केला जातो.

ह्या शैलीची बीजे उच्च प्रबोधनकाळातील शेवटच्या कालखंडातच आढळून येतात. उच्च प्रबोधनकालीन चित्रकार ⇨रॅफेएलचे ट्रान्सफिगरेशन हे चित्र (१५१७−२०), तद्वतच मायकेलअँजेलोच्या सिस्टाइन-चॅपेलच्या छतचित्रांतून ह्या कलासंप्रदायाची काही आद्य लक्षणे आढळून येतात. रॅफेएलचा एक शिष्य जूल्यो रोमानो हा चित्रकार व वास्तुकार ह्या कलाशैलीचा जनक म्हणून ओळखला जातो.

प्रबोधनकाळात चित्रकलेतील रचनाशास्त्राचा जो विचार दृढ झाला होता, त्याला रीतिलाघववादी शैलीत नवा साज चढविण्याच्या ईर्षेने कलावंतांनी वैयक्तिक आधिष्कारसंहिता निर्माण केली, असे म्हणता येईल.

या शैलीतील कलाकारांनी उच्च प्रबोधनकालीन कलासौंदर्याविष्काराच्या नियमपालनाबरोबरच व्यक्तिगत स्वातंत्र्यही घेतले, त्याचप्रमाणे अभिजात कलेतील अतिनियमीतता, सुस्पष्टता व सुसंगती हया वैशिष्ट्यांना छेद देऊन आत्मनिष्ठेवर व सूचकतेवर अधिक भर दिला. वैयक्तिक कलाशैलीचा विशेष विचार याच संप्रदायात प्रथम झाला. शैलीवर अतिरिक्त भर देणारा हा संप्रदाय होता. शैलीचा नवखेपणा व अतिपरिष्करण हे प्रमुख सांप्रदायिक गुणधर्म होत. आकारबंधांतील असांकेतिकता व नावीन्य यांतूनच पुढे विक्षिप्त आकारांची ओढ निर्माण झाली. म्हणूनच पुढे कृत्रिम, अनैसर्गिक व बाह्य अलंकारणावर भर देणारी शैली या कलावंतांनी अंगीकारली.

चित्रकला : प्रबोधनकालीन कलावंतांनी दृश्याची एकात्म जाणीव, सुबोध आकार व चित्रक्षेत्र−विभाजनाचे ठराविक संकेत हे तीन नियम विशिष्ट दृश्य परिणाम साधण्याकरिता शास्त्रशुद्धतेने विचार करून अंगीकारले होते. रीतिलाघववादी चित्रकारांनी हे नियम काही प्रमाणात धुडकावून देऊन चित्रक्षेत्रातील अवकाशयोजनेचे स्वातंत्र्य घेतले. चित्रक्षेत्राचे काहीसे कृत्रिम व तर्कविसंगत विभाजन केलेले त्यांच्या कलाकृतीत आढळून येते. चित्रदृश्यातील घटाकांमध्ये परस्पर-विसंगती त्यांच्या चित्रां त बऱ्याच प्रमाणात दिसून येते. सुबोध, सरल व कथात्मक अशा प्रबोधनकालीन शैलीपेक्षा विस्कळित, विसंगत व मुक्तपणे केलेली चित्ररचना ह्या शैलीतील चित्रांतून दिसते.

या चित्रशैलीतील प्रमुख लक्षणांपैकी मानवाकृतीचे वैशिष्ट्यपूर्ण रेखाटन हे एक आहे. प्रबोधनाकाळातील दृश्य कलेतील मानवकृतीत योजनापूर्वक साधलेली काहीशी शिल्पसदृश स्थितिशीलता व हालचालींतील संयमित नाट्यमयता रीतीलाघववादी कलावंताच्या आंतरिक ऊर्मीस मानवण्यासारखी नव्हती, म्हणून रीतिलाघववादी शैलीतील चित्रांमधील मानवाकृती अनेकविध क्रियांमध्ये गुंतलेल्या व अनैसर्गिक अंगविक्षेपांत चितारलेल्या दिसतात. या चित्रकारांनी स्नायूंचे विकृतीकरण करून काहीशा लांबोळक्या आकृती रेखाटल्या, त्यांत नैसर्गिक प्रमाणबद्धतेचा आणि आदर्शवत रेखाटनाचा अभाव दिसतो. यथादर्शनाचा उपयोग केवळ चित्रातील नाट्यपूर्णता वाढविण्याकरिता केलेला दिसतो. चित्रक्षेत्राच्या अवकाशातील वैविध्यपूर्ण रंगसंगती व मानवकृतींच्या विवध अवस्थांमधील गतिशील हालचाली ह्या दोहोंच्या साहाय्याने निर्माण केलेली काहीशी अतर्क्य, नाट्यपूर्ण, आभासमय जाणीव त्यांच्या चित्राकृतींतून पहावयास मिळते. चित्रविषय स्पष्ट न ठेवता तो सूचित करण्याकडे त्यांचा प्रयत्न दिसतो. एका आगळ्या दृश्य परिणामाने प्रेक्षकास चकित करण्याचा आविर्भाव या शैलीत आढळतो.

रीतिलाघववादी शैलीतील चित्रांमधील रंगसंगती वैविध्यपूर्ण व काहीशा अतिरंजित होती. भावनात्मकतेला आव्हान देणारी, चेतवणारी व प्रक्षोभक अशी रंगसंगती बव्हंशी चित्राकृतींतून दिसते. त्यामुळे एक प्रकारचा बेबंद कल्पनाविलास त्यांत जाणवतो. ईल पार्मीजानीनो (१५०३−४०), याकोपो दा पोन्तोर्मो (१४९४−१५५६), दोमेनीको बेक्काफूमी, जोव्हान्नी बात्तीस्ता दे रोस्सी हे ह्या शैलीतील प्रमुख चित्रकार मानले जातात.

ईल पार्मीजानीनो हा अतिशय संवेदनशील व बंडखोर चित्रकार होता. पार्मा या गावी तो जन्मला. पुढे १५२३ मध्ये तो रोममध्ये आला. कोररेद्‌जो आणि रॅफेएल ह्या चित्रकारांचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. मॅडोना विथ द लाँग नेक (सु. १५३४) हे त्याचे चित्र विशेष प्रसिद्ध आहे. रीतिलाघववादी शैलीची लक्षणे ह्या चित्रात प्रकर्षाने दिसतात. मॅडोनाची आकृती प्रमाणबाह्य लंबाकार असून तिला एक विशिष्ट लय आहे. इतर सर्व आकृत्या प्रमाणबाह्य लंबाकार असून तिला एक विशिष्ट लय आहे. इतर सर्व आकृत्या विशेषतःमांडीवरचे मूल व पाठीमागे असलेला उभा खांब चित्राचा तोल बरोबर सांभाळतात. दर्शनी पातळी व पार्श्वभूमी ह्यांमधील यथादर्शनाचे व्यस्त प्रमाण, लांबोळक्या मानवकृतींचे लयबद्घ रेखाटन ही ह्या चित्रांची वैशिष्ट्ये होत. हा चित्रकार व्यक्तिचित्रणासाठीही प्रसिद्ध होता. विशेषतः त्याचे बहिर्गोल आरशातील स्वप्रतिमाचित्र (सेल्फ पोर्ट्रेट) नावीन्यपूर्ण आहे. त्याने अम्लरेखन, उत्कीर्ण (धातुपत्र्यावरील खोदकाम), काष्ठशिल्प इ. माध्यमांतही वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली.


जोव्हान्नी बात्तीस्ता दे रोस्सी याचे डिसेन्ट फ्रॉम द क्रॉस (१५२१) हे चित्रही या संप्रदायात महत्त्वाचे मानले जाते. ख्रिस्ताला क्रुसावरून खाली उतरवून, त्याचे दफन करण्याचा प्रसंग ह्या चित्रांत रंगवला आहे. त्याच्यावर मायकेल अँजेलोच्या प्येता ह्या शिल्पाचा प्रभाव दिसतो. मात्र या चित्रातील रंग अतिशय उत्तेजक व प्रक्षोभक आहेत. याकोपेा दा पोन्तोर्मोचे डिपोझिशन हे चित्र तसेच ईल ब्रोनझीनो (१५०२−७२) ह्य चित्रकाराचे काहीसे बीभत्स असे व्हीनस, क्यूपिड, फॉली अँड टाइम हे चित्र दोमेनीको बेक्वाफूमीचे द वर्थ ऑफ व्हर्जिन इ. चित्रदेखील उल्लेखनीय होत.

इटलीबाहेरच्या ⇨एल ग्रेको (१५४१−१६१४) या ग्रीसमध्ये जन्मलेल्या स्पॅनिश चित्रकाराने ही शैली परिपूर्णत्वाला नेली. तो या संप्रदायाचा श्रेष्ठ चित्रकार मानला जातो. त्याने प्रामुख्याने धार्मिक विषयावर चित्रे रंगवली. छायाप्रकाशाचा करकरीतपणा, मानवकृतींचे प्रमाणबाह्य लांब, अनैसर्गिक रेखाटन ही त्याच्या चित्रांची वैशिष्ट्ये होती. एस्पोलिओ किंवा डिस्‌रोबिंग ऑफ खाइस्ट (१५७७−७९), लोकून इ. त्याची चित्रे प्रसिद्ध आहेत. ह्यांशिवाय त्याने काही व्यक्तिचित्रेही रंगवली.

शिल्पकला : रीतिलाघववादी शिल्पाकृतींमध्ये उच्च प्रबोधनकाळातील सन्मुखता (वा सामोरिकता), तसेच साधेपणा हे गुणधर्म लुप्त होऊन शिल्पाची घडण चोहोबाजूंनी करण्याबद्दलचा विचार पुढे आला. म्हणजेच शिल्पाचे वैशिष्ट्य केवळ समोरूनच पाहण्यापुरते मर्यादित न राहता, शिल्पासभोवती फिरून व त्याच्या सर्व बाजूंनी मिळून एकसंध व एकात्म अशी दृश्य अनुभवात्मक प्रतीत देण्याला विशेष महत्त्व देण्यात आले. या संप्रदायातील बेनव्हेनुतो चेल्लीनी (१५००−७१), बार्तोलोमेओ आग्मानाती (१५११−९२) व जोव्हान्नी दा बोलोन्या (१५२९−१६०८) हे विशेष उल्लेखनीय शिल्पकार होत. द रेप ऑफ द सविना विमेन हे बोलोन्याचे शिल्प रीतिलाघववादी शैलीच्या संदर्भात महत्त्वाचे मानले जाते. या शिल्पात स्त्री, पुरूष व वृद्ध ह्या तीन मानवाकृती गुंफून त्यांच्या रचनाबंधात एक वक्राकार गतिशीलता खालपासून वरपर्यंत प्रतीत होते. अनेक कोनांतून या शिल्पाची घडण केली असून, शिल्प चोहोबाजूंनी पाहिले असतानाही प्रेक्षणी वाटते. चेल्लीनीचे परस्युईस हे मायकेलअँजेलोच्या डेव्हिड ह्या शिल्पाचा प्रभाव असेलेले शिल्प, तसेच आम्मानाती ह्याचे नेपच्यून फाऊंटन ही महत्त्वाची शिल्पे म्हणून गणली जातात.

वास्तुकला : आलंकारिक आकारांची तऱ्हेवाईक व विक्षिप्त रचना रीतिलाघववादी वास्तुरचेनेत आढळते. वास्तूच्या दर्शनी भागावर कोनाडे, उत्थित शिल्प ह्यांचा वापर दिसतो. खडबडीत पोतांचा उपयोगही काही ठिकाणी केलेला दिसतो. क्लिष्टपणा, अप्रमाणबद्धता व बाहेरील वातावरणाशी सुसंगती साधण्याचा प्रयत्न ह्या वास्तूंमध्ये दिसतो. मायकेलअँजेलोच्या ‘लॉरेन्शन लायब्ररी’ ह्या वास्तूत ह्या शैलीच्या आरंभीच्या खुणा आढळतात. व्हाझारी ह्यांच्या ‘पोर्टिको ऑफ यूफिझी’ तसेच ज्यूल्यो रोमानोच्या ‘पॅलाझो डेल टी’ ह्या समारंभाकरिता बांधलेल्या वास्तुरचनांमध्ये ह्या शैलीचे दर्शन घडते.

थोडक्यात म्हणजे, अतिशय समृद्ध अशा उत्तरकालीन बरोक शैलीची दिशा रीतिलाघववादाने दाखवून दिली. कलेत केवळ वस्तुनिष्ठेऐवजी व्यक्तिगत विचार, भावना व कल्पकता ह्यांना प्राधान्य देण्यात आले. अभिजात आणि उच्च प्रबोधनकाळातील आदर्शांच्या जाचक बंधनांतून कलेची मुक्तता झाली. त्या दृष्टीने रीतिलाघववाद हा यूरोपीय कलेतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (चित्रपत्र २०).

पहा : इटलीतील कला प्रबोधनकालीन कला बरोक कला.

संदर्भ : 1. Bazin, Germain, A Concise History of Art, Part II- From the Renaissance to the Present Day, London, 1968.

2. Hauser, Arnold, Mannerism, 2 Vols., London, 1965.

3. Huyghe, Rene, Ed., Larousse Encyclopaedia of Renaissance and Baroque Art, London, 1964.

4. International Committee of the History of Art, Pub, The Renaissance and Mannerism : Studies in Western Art Series, Vol. II, Princeton, 1963.

इमारते, माधव

KH - 14 - P - 20 - 1KH - 14 - P - 20 - 2KH - 14 - P - 20 - 3KH - 14 - P - 20 - 4KH - 14 - P - 20 - 5