शारीरप्रमाण, कलेतील : कलासाधनेसाठी केला जाणारा शरीररचनेचा व शारीरप्रमाणांचा अभ्यास. मानवाकृतीचे अचूक, यथातथ्य व प्रमाणबद्ध चित्रण-शिल्पन करण्यासाठी शरीरचनाशास्त्राचे ज्ञान कलावंताला पुरुषाचे व खांदे यांची अभ्यास - रेखाटने (१५१०) - लिओनार्दो दा व्हींची. आवश्यक आहे. ह्याची जाणीव प्रथमतः युरोपीय प्रबोधनकाळात निर्माण झाली. त्या काळात रूपण कलेत नग्नाकृति – चित्रणाला (न्यूड) जसजशी चालना मिळत गेली, तसतसे शरीररचनाशास्त्राचे महत्त्व लक्षात येऊ लागले. विशेषत्वाने आंतोन्यो पोल्लाइवॉलो (सु. १४३२–९८), ⇨ लिओनार्दो दा व्हींचीमायकेलअँजेलो या कलावंतांनी कलेतील शारीरप्रमाणाचे व शरीररचनाशास्त्राचे महत्त्व प्रथमतः ओळखले व त्याचा पद्धतशीर, शास्त्रशुद्ध अभ्यास केला. कलात्मक हेतूंसाठी शवविच्छेदन करून मानवी शरीररचना आणि त्यातील स्नायुरचना जाणून घेणारा पोल्लाइवॉलो हा आद्य कलावंत होय. तो सुवर्णकार होता व त्याने ब्राँझमध्ये शिल्पनिर्मितीही केली. गतिमान हालाचालींमध्ये, तसेच ताणतणावाच्या स्थितीत मानवी शरीररचनेत जे बदल घडतात, ते जाणून घेण्यासाठी पोल्लाइवॉलोने शरीररचनाशास्त्राचे शोधक वृत्तीने विश्लेषण केले. या दृष्टीने त्याने रेखाटलेली अनेक सजीव जोषयुक्त रेखाचित्रे, तसेच बॅटल ऑफ टेन नेकीड मेन हे उत्कीर्णचित्र उल्लेखनीय आहेत. पुढे लिओनार्दोने शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात शवविच्छेदन केले. लिओनार्दोला त्या काळातील सर्वांत निपुण शारीरविज्ञ म्हणून मान्यता लाभली. पोल्लाइवॉलोसारख्या आद्य अभ्यासकांनी शवाची केवळ बाह्य चामडी सोलून व स्नायुरचना उघड करून अभ्यास केला. पुढील अभ्यासकांनी मात्र सुट्या अवयवांचे–उदा., कवटी, वक्षभाग, उदर, हातपाय इ.–विच्छेदन करून त्यांचे निरीक्षण केले. लिओनार्दोने अशा घटकांचा सूक्ष्म चिकित्सक अभ्यास केला. त्याने डोके, हृदय, पाय इ. अवयवांचे विच्छेदन करून निष्कर्ष नोंदविले. त्यांची टिपणे व रेखाचित्रे काढली.  त्याने त्या अभ्यासासाठी प्राण्यांच्या मृतदेहांचेही विच्छेदन केले. मात्र प्राणिदेहाच्या निरीक्षणातून काढलेले काही निष्कर्ष मानवी शरीरालाही लागू केल्याने त्याच्या हातून काही गफलतीही घडल्या, उदा., गायीच्या गर्भाशयासंबंधीची निरीक्षणे स्त्रीदेहाला लावल्याने ती सदोष ठरली, लिओनार्दोने शरीररचना व अवयव यांच्या रेखांकनाच्या खास पद्धतच निर्माण केली. या पद्धतीने काढलेली रेखाचित्रे वैद्यकशास्त्राच्या अभ्यासकांनाही पुढे उपयुक्त ठरली. ‘ज्या चित्रकाराला स्नायू, कंडरा (स्नायुरज्जू) व अस्थिबंधन (सिन्यू) यांच्या आंतरिक गुणधर्मांचे सखोल व यथार्थ ज्ञान असते, तोच विशिष्ट अवयवांच्या हालचालींतील स्नायूंचे कार्य योग्य प्रकारे जाणू शकेल व त्याचे यथातथ्य चित्रण करू शकेल’, अशी लिओनार्दोची धारणा होती. लिओनार्दोच्या शारीर अभ्यासचित्रांत मानवाचे डोके व खांदे, उजवा पाय, कवटीची डावीकडील बाजू, गर्भाशयातील भ्रूणाची अवस्था, तसेच घोड्याच्या पुढच्या पायांचे रेखन इ. आकृत्यांचा अंतर्भाव होतो. अश्वशारीर (ईक्वाइन अनॅटोमी) या विषयावर सचित्र प्रबंधही त्याने लिहिला. व्हेररॉक्क्यो (सु. १४३५–८८) या शिल्पकारालाही शरीररचनाशास्त्रात विशेष रस होता. त्याने निर्मिलेल्या द कोल्लेओनी मॉन्युमेंट (१४७९–८८) या कोल्लेओनी सैनिकाच्या अश्वारूढ पुतळ्यात त्याच्या ह्या विषयातील अभिज्ञतेचे प्रत्यंतर येते. बात्वो बांदिनेल्ली (१४९३–१५६०)  या शिल्पकाराच्या तथाकथित ‘अकादमी’ मधील उत्कीर्णचित्रांत मानवी सांगाड्याच्या काही भागांचे चित्रण आढळते. रोमन अकादमीच्या एका प्रारंभकालीन (सु.१५९३) चित्रात विद्यार्थी कलाविषयाचे विच्छेदन करीत असल्याचे दर्शविले आहे. 

पॅरिसमध्ये १६४८ मध्ये ‘रॉयल अकॅडमी ऑफ पेंटर्स अँड स्कल्प्चर्स’  या कला-अकादमीची स्थापना झाली. त्यातील औपचारिक शिक्षणक्रमात शरीररचना व शरीरप्रमाण हे अभ्यासविषय होते. तसेच विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्र शिकवण्यासाठी एका खास शल्यविशारदाची नेमणूक केली होती. इटालियन चित्रकार जी. पी. लोमॅझो (१५३८–१६००) याच्या त्रात्तातो नामक प्रबंधात (१५८४) शरीरचनेचे सूक्ष्म आणि तपशीलवार विवरण आढळते. लंडनच्या ‘रॉयल अकादमी’ मध्येही शरीररचनाशास्त्र शिकवण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक नेमत असत. मानवाकाराचे अचूक, यथातथ्य, प्रमाणभूत आणि आदर्श चित्रण करण्यासाठी शरीररचनाशास्त्राचे ज्ञान अनिवार्य आहे, ही भूमिका औपचारिक कलाशिक्षक्षामध्ये शरीररचनाशास्त्राचा अंतर्भाव करण्यामागे होती.

पुढे मात्र ही भूमिका काहीशी बदलली. मानवी शरीराची रचना व प्रमाणबद्धता, अस्थिरचना,  त्वचेखाली दिसणारे स्नायू आदी शास्त्रीय ज्ञानाशीच केवळ संबद्ध असलेले ‘कलात्मक शारीर’  (आर्टिस्टिक अँनॅटोमी) प्रत्यक्ष निर्मितीच्या दृष्टीने तसे वरपांगी व उथळ असल्याची जाणीव हळूहळू कलाशिक्षणक्षेत्रात पसरत गेली. प्रात्यक्षिकाच्या अभ्यासासाठी ओतीय पुराणवस्तु-प्रतिमाने, सजीव व्यक्ती / प्राणी यांचे सांगाडे, एकोर (त्वचाविरहित आकृति-प्रतिमान) इ. साधने जास्त प्रमाणात वापरली जाऊ लागली. शरीररचनेच्या अभ्यासासाठी प्रत्यक्ष शवविच्छेदन फार क्वचित व अगदी अपवादात्मक परिस्थितीत केले जात असे. कला – अकादमींमध्ये तत्कालीन शिक्षक व विद्यार्थी या अभ्यासशाखेकडे सामान्यतः दुर्लक्ष करत.


पंधराव्या शतकापासून शवविच्छेदन हा विषय काही चित्रकारांच्या चित्रांतूनही डोकावू लागला. सतराव्या शतकातील डच चित्रकारांनी तर शरीररचनाशास्त्र हाच आपल्या चित्रांचा विषय बनवला होता. त्यात चिरफाड केलेल्या शवाभोवती उभा असलेला डॉक्टरांचा गट दाखविलेला असे. ⇨ रेम्ब्रॅंट (१६०६–६९) या श्रेष्ठ डच चित्रकाराचे द ॲनॅटोमी लेसन ऑफ डॉ. निकोलस टल्प (पाहा : मराठी विश्वकोश : खंड ११ चित्रपत्र ४७) हे १६३२ मध्ये रंगविलेले चित्र या प्रकारातले सर्वोत्कृष्ट चित्र म्हणता येईल.

बेंजामिन रॉबर्ट हेडन (१७८६–१८४६) हा आंग्ल चित्रकार मात्र शरीररचनाशास्त्राच्या शिक्षणाचा कट्टर पुरस्कर्ता होता. ग्रीक शिल्पकार मानवी शरीराचे शवविच्छेदन करीत व म्हणूनच त्यांना आपल्या शिल्पांतून मानवी देहाकाराची परिपूर्ण अभिव्यक्ती साधता आली, अशी त्याची समजूत होती. अठराव्या शतकातील जॉर्ज स्टब्ज (१७२४–१८०६) या इंग्लिश चित्रकाराने द अनॅटोमी ऑफ द हॉर्स (१७६६) हा प्रबंध लिहून त्यात उत्कीर्णचित्रे काढली. घोड्यांच्या अचूक शारीरचित्रणाबद्दल त्याची विशेष प्रसिद्धी होती. त्यासाठी त्याने प्रत्यक्ष घोड्याच्या मृत शरीराचे विच्छेदनही केले.

एकोणिसाव्या शतकात सर्वत्र कला-अकादमींतून कमी-अधिक प्रमाणात शरीररचनाशास्त्र हा विषय शिकवला जात असे. डॉ. पॉल रीशेचे फ्रेंच Anatomie Artistique (पॅरिस, १८९०) व प्रा.  आर्थरे टॉम्सनचे ॲनॅटोमी फॉर आर्ट स्टुडंट्‌स (लंडन, १८९६) ही या विषयावरची दोन क्रमिक पुस्तके अधिकृत व प्रमाणभूत मानली जात. त्यांव्यतिरिक्त लिओनार्दो, ड्यूरर, लोमॅझो, जॉंबर्ट इ. चित्रकारांनी तयार केलेली शारीरप्रमाणाची कोष्टके, तसेच व्हिसेलिअस, अँब्लिनस यांसारख्या तज्ज्ञांची वैद्यकशास्त्रावरील पुस्तके यांचाही अभ्यासासाठी उपयोग केला जाई. एकोणिसाव्या शतकात कलाविद्यालयांतून हा विषय हळुहळू लुप्तप्राय होऊ लागला. काही ठिकाणी त्याची जागा रूपशास्त्रीय शिक्षणक्रमाने घेतली. त्यात सजीव व निर्जीव अशा दोन्ही प्रकारांतील आकारिक रचनांचा अभ्यास केला जाई. जॉन रस्किनने आपल्या विद्यार्थ्यांना शारीरचनांपेक्षा भूवैज्ञानिक तसेच वनस्पतिजन्य रचनांच्या अभ्यासास अधिक प्रवृत्त केले.

भारतीय कलापरंपरेत शरीराच्या निरनिराळ्या अवयवांची मापे व त्यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण होरालक्षणशास्त्र, मूर्तिविज्ञान यांसारख्या विषयांवरील ग्रंथांतून वर्णिलेले आढळते. गुरूगृही शिक्षण घेताना या पारंपरिक शरीररचनाशास्त्राचे ज्ञान विद्यार्थ्यांना होत असे व त्याआधारे मानवी रूपातील देवदेवतांच्या मूर्ती, चित्रे निर्माण होत असत. गुंफा व मंदिरे इत्यादींतून उपलब्ध असणारी चित्रे, मूर्तिशिल्पे, तसेच आता संग्राहलयांतून दिसणाऱ्या धातूंच्या व पाषाणांच्या मूर्ती यातून शारीरप्रमाण विचारात घेतल्याचे दिसून येते. आजही महाबलीपुरम्‌सारख्या पाषाणमूर्ति – निर्मिती व प्रशिक्षण केंद्रात याच परंपरागत पद्धतींचा वापर होताना दिसून येतो.

शरीररचनाशास्त्राचे ज्ञान काही एका मर्यादेपर्यंतच मानवी आकारचित्रणात उपयुक्त ठरते तथापि शरीररचनेचे शास्त्रीय नियम धुडकावूनही श्रेष्ठ प्रतीची कलानिर्मिती साधता येते, हे मध्ययुगीन चित्रकार ⇨ एल ग्रेको, तसेच आधुनिक शिल्पकार ⇨ आल्‌बेर्तो जाकोमात्ती व इतर अनेक आधुनिक कलावंतांनी मानवी देहाकाराचे विरूपीकरण व अमूर्तीकरण करून समर्थपणे दाखवून दिले आहे.  त्यामुळे विद्यमान कलाशिक्षणात हा विषय पूर्वीइतका अनिवार्य राहिलेला नाही.

तरीही एक महत्त्वाचा टप्पा म्हणून शारीरप्रमाण व शरीररचना यांचा अभ्यास कलाशिक्षणात केला जातो. मात्र या विषयाची परीक्षा घेतली जात नाही. प्रत्यक्ष शवविच्छेदनाऐवजी हाडांचा सांगाडा, प्रतिमाने (मॉडेल्‌स), चित्रे व पुस्तके यांच्या साहाय्याने या विषयाचा अभ्यास कलाशिक्षणाचा एक भाग म्हणून आजही केला जातो.

पहा : मानवाकृती, कलेतील

संदर्भ : 1. Barasey, J. Anatomy for the Artist, 1963. 

           2. Bridgman, George B. Constructive Anatomy, New York, 1960. 

           3. Peek, Stephen R. Atlas of Human Anatamy for the Artist, New York, 1959. 

           4. Perard, Victor, Anatomy and Drawing, 1967.

इनामदार, श्री. दे.