व्यक्तिचित्रण : एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीची कलावंताने साकारलेली प्रतिमा म्हणजे ‘व्यक्तिचित्र’ (पोटर्रेट) व प्रतिमांकनाची कला म्हणजे ‘व्यक्तिचित्रण’. व्यक्तिचित्र हे चित्र वा शिल्प या कलाप्रकारांत असू शकेल. तद्वतच ते तैलरंग, जलरंग, पेन्सिल, रंगशलाका (रंगीत खडू वा कांडी) अशा कोणत्याही साधनाने चितारलेले अथवा मृत्तिका, धातू, प्लास्टर, संगमरवर यांत घडवलेले असू शकेल. हे व्यक्तिचित्र शीर्ष वा चेहरा, पूर्णाकृती वा अर्धपुतळा (बस्ट) अशा कोणत्याही रूपात असू शकते.

व्यक्तिचित्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती व शैली निर्माण होत गेल्या. व्यक्तिचित्रणातून इतिहास, तत्कालीन समाजजीवन इत्यादींसंबंधी माहिती मिळू शकते, हे महत्त्वाचे आहे.

व्यक्तिचित्रणात सुरुवातीपासूनच सर्वसाधारणपणे दोन प्रकार आढळतात : (१) व्यक्तीचे हुबेहूब साम्य दाखविणारी म्हणजे वास्तवदर्शी प्रतिमा व (२) व्यक्तीचे आदर्श रूप दाखविणारी प्रतिमा. आलटून-पालटून यांपैकी एकेक पद्धत अनेक देशांत वेगवेगळ्या काळांत स्वीकारली गेली व तिच्यामध्येही वेगवेगळे बदल होत गेले.

प्रागैतिहासिक काळात जादूटोण्याकरिता जनावरांच्या वास्तव प्रतिमा काढल्या जात पण मानवावर जादूटोणा लागू होऊ नये म्हणून मानवी प्रतिमा मात्र निर्माण झाल्याचे दिसत नाही. ज्या होत्या त्या मातृदेवतांच्या रूपात व सांकेतिक होत्या. मृताच्या कबरीतील मृताची प्रतिमा कवड्या, शिंपले तसेच निसर्गातील इतर वस्तू किंवा मृत्तिका वापरून तयार केल्याचे दिसते. त्यांत वास्तवापेक्षा सांकेतिक रूप दिसते.

प्राचीन ईजिप्त, मेसोपोटेमिया (इराक), पर्शिया (इराण) येथील व्यक्तिचित्रणांत सम्राट, नेते अगर महत्त्वाच्या व्यक्तींचे आदर्शवादी रूपच दिसून येते. ईजिप्तमधील पिरॅमिडांतून राजांचे मृतदेह जतन करून ठेवले जात व त्यांबरोबर त्यांची अनेक व्यक्तिशिल्पे मूळ प्रतिमेस इजा झाल्यास उपयोगी पडावी म्हणून ठेवली जात. केसांची विशिष्ट टोपीसारखी रचना व मोठे जडविलेले डोळे, बाजूचा चेहरा व समोरचा डोळा, समोरून दिसणारे खांदे असे मिश्रण रूपांत दाखविलेले आढळते. मात्र एरलोटॉन या सम्राटाच्या काळात वास्तव रूप व नैसर्गिक आविर्भाव दाखविले गेले. राणी हॅटशेपसूट हिचे सुंदर शीर्षशिल्प उंच मान, रेखीव चेहेरा व उंच टोप या रूपात आढळते. मात्र लवकरच पुन्हा जुन्या परंपरेनुसार व्यक्तिचित्रे व शिल्पे होऊ लागली. ॲसिरियन व्यक्तिशिल्पांत आदर्श, करारी चेहरा व बळकट शरीरयष्टी दाखविली गेली.

प्राचीन ग्रीसमध्येही सुरुवातीच्या काळात व्यक्तिचित्र-शिल्पांतून आदर्श रूप रेखाटण्यावर भर देण्यात आला. ग्रीकांनी आपले नेते, तत्त्ववेत्ते, लेखक, कवी, सेनापती यांची व्यक्तिशिल्पे निर्माण केली. इ. स. पू. तिसऱ्यार शतकानंतर यांत वास्तवता व व्यक्तिसाम्य आलेले दिसते. अंध होमर व डिमॉस्थिनीझ यांची व्यक्तिचित्रे या प्रकारची आहेत. इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून गोल नाण्यांवर उत्थित शिल्पांकनातील व्यक्तिशिल्पे दिसू लागली.

रोमन लोकांमध्ये घरातील व्यक्ती मृत पावली की, तिच्या चेहऱ्याचचा मेणाचा ठसा घेऊन, त्यापासून तिचे व्यक्तिशिल्प करून ते घरात जतन करून ठेव्ण्याची प्रथा होती. अशी व्यक्तिशिल्पे मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत नेण्याची पद्धत होती. या प्रथेमुळे रोमन व्यक्तिशिल्पांत हुबेहूब व्यक्तिसाधर्म्य दिसू लागले. यामुळेच जगातील पहिली व्यक्तिचित्रणशैली रोमनांनी निर्माण केली, असे मानले जाते. दुसरे म्हणजे, सम्राटाशी एकनिष्ठता दाखविण्यासाठी प्रत्येक घरात सम्राटाची एकतरी शिल्पप्रतिमा असे. त्यामुळेही व्यक्तिशिल्पाची मागणी वाढली. सामान्य लोकांनीही आपापली व्यक्तिशिल्पे करून घेतली. मात्र नेते, सम्राट यांचे रूप आदर्श दाखविण्याची पद्धती होती, तर स्त्रियांची शिल्पे काहीशी आलंकारिक वेशभूषेने युक्त असत आणि सामान्यांची व्यक्तिशिल्पे काटेकोरपणे वास्तवदर्शी असत.

ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबर व्यक्तिचित्रणाच्या मूलभूत संकल्पनाच बदलत गेल्या. सम्राट कॉन्स्टंटीनच्या व्यक्तिशिल्पात वाजवीपेक्षा मोठे डोळे, उभट चेहरा यांतून आध्यात्मिक भावदर्शन सूचित होते. बायझंटिन काळात सम्राट जस्टिनिअन व राणी थिओडोरा यांच्या कुट्टिमचित्रणातून (मोझॅक) पाश्चात्त्य व पौर्वत्य शैलीविशेषांचे मिश्रण झाल्याचे दिसते. उंच व सडपातळ शरीरयष्टी, उभट चेहरा, मोठे डोळे, लयबद्ध मुखाविर्भाव, कपड्यांवरील आलंकारिक नक्षी अशी सांकेतिक रूपवैशिष्ट्ये त्यांत आढळतात. धार्मिक सुशोभित हस्तलिखितांतही चित्रकार स्वत:चे व्यक्तिचित्र हातात रंग व कुंचला घेतलेले असे दाखवी. ख्रिस्ती संतांची व्यक्तिचित्रे सांकेतिक रूप दर्शविणारी आहेत.

चौदाव्या शतकाच्या अखेरीस गॉथिक काळात ⇨ जॉत्तो दी बोंदोने (सु. १२६७–१३३७) या इटालियन चित्रकाराने छायाप्रकाशाच्या छटांद्वारे व्यक्तिचित्रांत हुबेहूब साम्य दाखवून या कलेत क्रांतिकारक बदल घडवून आणला. जॉत्तोनेच प्रथम व्यक्ती समोर ठेवून त्यावरून मानवी शरीररचनेचा अभ्यास केला, असे मानले जाते. जॉत्तोपासून प्रेरणा घेऊन पंधराव्या शतकात प्रबोधनकालीन चित्रकारांनी व शिल्पकारांनी व्यक्तींची वास्तव रूपे दाखविण्यास सुरुवात केली.

फ्लेमिश चित्रकार ⇨ यान व्हान आयिक (सु.१३९०–१४४१) याने व्यक्तिचित्रात प्रथमच तीन चतुर्थांश चेहरा बारकाव्यांसहित दाखवून या कलेला मोठीच कलाटणी दिली. तद्वतच इटलीतील शिल्पकार ⇨ दोनातेलो (१३८६–१४६६) व चित्रकार माझात्चो (१४०१–२८) यांनी व्यक्तिचित्रणाला भावदर्शनाची जोड देऊन भव्योदात्त परिणाम साधणारी व्यक्तिचित्रे व व्यक्तिशिल्पे निर्माण केली. दोनातेलो व व्हेरोक्क्यो (१४३५–८८) यांनी पूर्णाकृती अश्वारूढ व्यक्तिशिल्पांत रुबाबदार आविर्भाव व आदर्श रूपसौष्ठव प्रकट केले.

सोळाव्या शतकात प्रबोधनाच्या उत्कर्ष काळात व्यक्तीचे आदर्श रूप व अर्थपूर्ण आविर्भाव यांच्या रचनेतून सुंदर परिणाम साधण्यावर कलावंतांनी भर दिला उदा., ⇨ मायकेल अँजेलोन (१४७५–१५६४) घडवलेली मेदीची-कबरीतील लोरेन्झो व ज्यूल्यानो यांची व्यक्तिशिल्पे ही वास्तव रूपापेक्षा कल्पित आदर्श रूपावर जास्त भर देणारी आहेत. तर ⇨ लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) यांचे ⇨ मोनालिसा (१५०३–०५) हे प्रख्यात चित्र गूढरम्य स्त्री-सौंदऱ्याची चित्रकाराची आदर्श कल्पना साकार करते. याउलट व्हेनिस येथील ⇨ तिशन (सु. १४८८–१५७६), तिंतोरेत्तो (सु. १५१८–९४) व पाओलो व्हेरोनेझे (१५२८–८८) या चित्रकारांनी व्यक्तीशी हुबेहूब साम्य रेखाटून त्यातून नाजूक त्वचेचा पोतही दर्शवला.


या काळात व्यक्तित्रित्रे व रेखाटने यांचे संग्रहही प्रसिद्ध केले गेले. पाओला जोव्ह्यो याच्या व्यक्तिचित्रांचा अम्लरेखनातील प्रतिकृतींचा संग्रह सोळाव्या शतकात प्रसिद्ध झाला. दुसरा महत्त्वाचा संग्रह म्हणजे कानेरीना दे मेदीची हिच्याजवळील ३४१ व्यक्तिचित्रांचा तिच्या मृत्यूनंतर संकलित केलेला संग्रह होय. प्रबोधन काळातील आणखी एक लक्षणीय प्रवृत्ती म्हणजे प्रतिष्ठित स्त्री-पुरुष स्वत:ला देव-देवतांच्या रूपात कल्पून स्वत:चे व्यक्तिचित्र योग्य प्रतीकांसहित तयार करून घेत असत.

जर्मनीत सोळाव्या शतकात ⇨ आल्ब्रेक ड्यूरर ( १४७१–१५२८) याने व्यक्तिचित्रणात व्यक्तीचा बाजूचा, समोरचा किंवा तीन चतुर्थांश चेहरा रंगवण्याचे अनेक प्रयोग केले. त्याने स्वत:चे व्यक्तिचित्र उदात्त भावदर्शनासह रेखाटले आहे.

बरोक काळात (सतरावे शतक) स्पेनमधील व्हेलात्थ्केथ (१५९९–१६६०) हा चित्रकार इटलीमधील ⇨ बेर्नीनी (१५९८–१६८०) हा शिल्पकार फ्लँडर्समधील ⇨ पीटर पॉल रूबेन्स (१५७७–१६४०) अँथोनी व्हॅनडाइक (१५९९–१६४१) हॉलंडमधील हाल्स व ⇨ रेम्ब्रँट (१६०६–६९) असे एकापेक्षा एक सरस व्यक्तिचित्रकार होऊन गेले. यांपैकी व्हेलात्थ्केथ व अँथोनी व्हॅनडाइक यांनी सम्राटांची व प्रतिष्ठित उमरावांची रुबाबदार, वस्तुनिष्ठ व्यक्तिचित्रे रंगवली. व्हेलात्थ्केथने रंगवलेल्या सम्राट फिलीपच्या अनेक चित्रांत वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावत झालेल्या बदलांबरोबरच बदललेली मानसिकताही प्रतिबिंबित होते. रेम्ब्रँटने स्वत:वरूनच ६० आत्मचित्रे रंगवली व स्वत:च्या चेहऱ्याातील होणारा बदल बारकाव्याने टिपला. बेर्नीनीने शिल्पांत आदर्श रूप दाखविण्याबरोबर विविध पोत व उडणारी वस्त्रे दाखवून गतिमानता आणली. रूबेन्सने तर रंगलेपन, वेशभूषा, आविर्भाव, रचना या सर्वांतून व्यक्तिचित्रण वैविध्यपूर्ण, सुंदर पोत दाखविणारे, गतिमान रचनेचे व प्रभावी केले. फ्रान्सची सम्राज्ञी मेरी दी मेदीच्या हिच्या जीवनावर त्याने केलेली चित्रमालिका ही वैशिष्ट्ये दर्शविते. रेम्ब्रँटने व्यक्तिचित्रांत वरून तिरपा प्रकाश घेऊन केवळ चेहराच प्रकाशमान दाखवून व्यक्तिचित्रणात गूढता निर्माण केली. व्यक्तिचित्रणात प्रकाशाचा लालित्यपूर्ण आभास निर्माण करणारा दुसरा डच चित्रकार म्हणजे व्हरमेर (१६३२–७५). त्याच्या व्यक्तिचित्रांतील चेहऱ्यारवरच्या प्रकाशाचा नाजूक स्पर्श अक्षरश: वर्णनातीत आहे. फ्रँझ हाल्सने जलद फटकाऱ्यांत व्यक्तीच्या चेहऱ्यावरील विशिष्ट भाव अचूक पकडला. या दोघांच्या व्यक्तिचित्रांत रंगछटांचे सौंदर्य अवर्णनीय आहे. हॉलंडमध्ये त्या काळात प्रचलित असलेली समूह-व्यक्तिचित्रेसुद्धा (कॉर्पोरेट पोटर्रेट्स) हाल्सने व विशेषत: रेम्ब्रँटने कौशल्यपूर्ण रचनेत व व्यक्तींची वैशिष्ट्ये टिपून रंगविली. रेम्ब्रँटची नाइटवॉच (सु. १६४२) व ॲनॅटोमी लेसन ऑफ डॉ. टल्प (१६२२) ही चित्रे अशा प्रकारचे उत्कृष्ट नमुने आहेत.

फ्रान्समध्ये राजनिष्ठा व्यक्त करण्यासाठी सम्राट, सम्राज्ञी, प्रधान वगैरेंची व्यक्तिचित्रे प्रतिष्ठित लोक घरात लावीत, तर हॉलंडमध्ये अठराव्या शतकात सामान्य लोकही कुटुंबातील व्यक्तींची छोटी व्यक्तिचित्रे काढून घेऊन ती घरात लावू लागले. यामुळे या शतकात एकूण व्यक्तिचित्रांना अफाट मागणी होती. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ही मागणी एवढी वाढली की, जलद गतीने व्यक्तिचित्रण करण्यासाठी कॅमेरा, एन्लार्जर यांच्या साहाय्याने चित्रफलकावर बाह्याकृती वापरण्याची पद्धत सुरू झाली. अठराव्या शतकात रोझाल्बा कॅरेरा, एलिझाबेथ ली-ब्रून, अँजेलिका काऊफमन इ. स्त्री-चित्रकार प्रथमच व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात पुढे आल्या.

इंग्लंडमध्ये सर जॉश्युआ रेनल्ड्झ (१७२३–९२) व टॉमस गेन्झबर (१७२७–८८) हे चित्रकार मुख्यत्वे व्यक्तिचित्रणासाठी प्रसिद्धीस आले. रेनल्ड्झची लहान मुलांची व्यक्तिचित्रे लोकप्रिय झाली. गेन्झबरचे द ब्ल्यू बॉय (सु. १७७०) हे व्यक्तिचित्र जगप्रसिद्ध आहे. विल्यम होगार्थने (१६९७–१७६४) सामान्य लोकांची व्यक्तिचित्रणे रंगविली. त्याचे श्रिंप गर्ल हे चित्र जगप्रसिद्ध आहे. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या दरम्यानच्या काळात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत व्यक्तिचित्रण करणारे काही महत्त्वाचे चित्रकार म्हणजे जॉन सार्जंट (१८५६–१९२५), ऑगस्टस जॉन (१८७८–१९६१), जेम्स व्हिस्लर (१८३४–१९०३), ग्रॅहॅम सदरलँड (१९३०–) व फ्रेंच चित्रकार ⇨ एद्‍‌गार दगा (१८३४–१९१७) हे होत. सार्जंटच्या चित्रांतील रंगलेपन व कुंचल्याचे कसब अभ्यसनीय आहे. व्हिस्लरने चित्ररचनेमध्ये अनेक प्रयोग केले. सदरलँडची व्यक्तिचित्रे काहीशी अभिव्यक्तिवादाकडे झुकणारी असल्याने त्यांच्यावर प्रखर टीका झाली. त्याने रंगविलेले विन्स्टन चर्चिलचे व्यक्तिचित्र चर्चिलच्या वंशजांनी नष्ट करून टाकले. दगाच्या व्यक्तिचित्रांतील रचना व हाताळणी उच्च दर्जाची आहे.

आधुनिक काळात अनेक नवनवीन शैली अगर प्रणाल्या (इझम्स) कलाक्षेत्रात निर्माण झाल्या. त्यांत मुख्यत्वेकरून नव-अभिजाततावाद, स्वच्छंदतावाद, वास्तववाद, दृक्प्रत्ययवाद, उत्तर-दृक्प्रत्ययवाद, अभिव्यक्तिवाद, घनवाद हे व्यक्तिचित्रणाच्या संदर्भात विचारात घ्यावे लागतील. नव-अभिजाततावादी शैलीच्या कलाकरांनी प्राचीन ग्रीक अभिजात कलेचा आदर्श समोर ठेवून आदर्शवादी व्यक्तिचित्रे निर्माण केली. त्यांत उदात्त व गंभीर भावदर्शन, अचूक रेखाटन व काटेकोर मांडणी होती पण कानॉव्हासारख्या (१७५७–१८२२) शिल्पकाराने नेपोलियन बोनापार्टचे नग्न पूर्णाकृती शिल्प अपोलोच्या रूपातही दाखविले. स्वच्छंदतावादी चित्रकारांनी नाट्यमयता, रंगसौंदर्य यांचा वापर करून आदर्श कल्पित रूप दाखविले. नव-अभिजाततावादी चित्रकार अँग्र (१७८०–१८६७) हा त्याच्या अचूक रेखाटनामुळे व सुंदर रंगयोजना व मांडणी यांमुळे अजोड ठरला, तर स्वच्छंदतावादी फ्रेंच चित्रकार झेरीको (१७९१–१८२४) याने मनोरुग्णांची संवेदनशील अशी व्यक्तिचित्रे काढली. फ्रेंच चित्रकार ⇨ दलाक्र्‌वा (१७९८–१८६३) याने कुंचल्याच्या जलद फटकाऱ्यांत बारकावे गाळून चित्रण केले. स्पॅनिश चित्रकार ⇨ गोया (१७४६–१८२८) व फ्रेंच चित्रकार दोम्ये (१८०८–७९) यांची व्यक्तिचित्रे कित्येकदा कठोर वास्तवाचे चित्रण करतात. उत्तर-दृक्प्रत्ययवादी डच चित्रकार ⇨ व्हान गॉख (१८५३–९०) याने विरूपीकरणाचा वापर करून जाड, शुद्ध रंगांच्या फटकांऱ्यानी भावदर्शी व्यक्तिचित्रे ठळक आकारांत रंगवली. तर ⇨ पॉल गोगँ (१८४८–१९०३) याने काहीसे आलंकारिक, द्विमितीय रेखाटन करून रंगांचा प्रतीकात्मक वापर केला. फ्रेंच चित्रकार ⇨ पॉल सेझानने (१८३९-१९०६) चेहऱ्यांची घडण सपाट पातळ्यांमध्ये कल्पून व्यक्तिचित्रे रंगविली. घनवादी चित्रकारांनी मानवी देहाचे अवयव सुटे करून पुन्हा जोडल्याप्रमाणे दिसणारी व्यक्तिचित्रे, तसेच कित्येकदा व्यक्तीचा समोरून व बाजूने दिसणारा चेहरा यांची एकत्र जोडरचना करून अगर विविध कोनांतील रेखाटनांचे एकत्रीकरण करून विविध प्रकारे व्यक्तिचित्रे रंगवली. अभिव्यक्तिवादी चित्रकारांनी व्यक्तीच्या मुद्रेवरील भावदर्शनाला जास्त महत्त्व देऊन तीव्र विरूपीकरण, भडक, शुद्ध रंग यांच्या फटकाऱ्यांनी व्यक्तिचित्रे रंगवली. त्यांतही वेगवेगळ्या चित्रकारांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आढळतात. मात्र त्यांत आकृती अगर चेहरा पूर्ण नष्ट केलेला नाही. छायाचित्रणात्मक वास्तववादी (फोटो-रिॲलिझम) शैलीच्या चित्रकारांनी बारीकसारीक तपशील दाखवून पूर्ण वास्तवदर्शी व्यक्तिचित्रणेही केली.


भारत : भारतात पहिल्या शतकापासून दानशूर व्यक्तींच्या शिल्पाकृती वा उत्थित शिल्पे विविध लेण्यांमधून आढळतात पण ही शिल्पे सांकेतिक पद्धतीची आहेत. गांधार शैलीतील (इ. स. पू. पहिले ते इ. स. पाचवे शतक) कुशाण वंशातील राजा ⇨ कनिष्क व वीम कडफिसस यांचे विशीर्ष पुतळे काहीसे ओबडधोबड व वेगळ्या वेशभूषेचे आहेत पण मस्तक नसल्याने व्यक्तिसाम्याबाबत माहिती मिळत नाही.

गुप्तकाळातील (सु. ३०० ते ५५०) वाङ्‌मयात व्यक्तिचित्रणाचे अनेक उल्लेख आढळतात. विशेषत: कवी कालिदासाच्या विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल या नाटकांमध्ये चित्रफलकांवर व्यक्तिचित्रे रंगविल्याचे उल्लेख आहेत. अजिंठा भित्तिचित्रांतही चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी व इराणी (सॅसॅनिडी) राजा खुसरौ यांच्या भेटीच्या प्रसंगात वेशभूषा आगळी-वेगळी दिसते पण त्यातून व्यक्तिसाम्यापेक्षा आदर्श रूपच आढळते. कांचीपुरम् मंदिरातील दुसरा विक्रमादित्य व त्याच्या दोन राण्या आणि तिरुपती मंदिरातील कृष्णदेवराय व त्याच्या राण्या यांच्या शिल्पाकृतीही व्यक्तिसाम्यापेक्षा सांकेतिक रूपच दाखविणाऱ्यात आहेत.

सोळाव्या शतकाच्या शेवटी व सतराव्या शतकात मोगल बादशहांच्या पदरी इराणी चित्रकार होते. अकबर, जहांगीर यांच्या काळात विविध लघुचित्रशैलींचा विकास झाल्याचे दिसून येते. इराणी व भारतीय शैलींचा मिलाफ हे या काळाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. अनेक लघुचित्रांत अकबर, जहांगीर तसेच इतर दरबारी लोकांची व्यक्तिचित्रे दिसतात. त्यांत सांकेतिकता असली, तरी व्यक्तिसाम्यही जाणवते. सुरुवातीच्या काळात समोरचा चेहरा, तर सतराव्या शतकापासून बाजूचा चेहरा काढण्याची पद्धत रूढ झाल्याचे दिसते व फिकट मृदू छटा वापरून चेहऱ्याला उठावही दिलेला दिसतो. यूरोपीय प्रभावामुळे जहांगीरच्या काळात मस्तकाभोवती चितारलेले तेजोवलयही व्यक्तिचित्रणात दिसते. सम्राट शाहजहानच्या काळात एकाच रंगाच्या अनेक नाजुक छटा वापरून केलेले व्यक्तिचित्रण ‘सिया-कलम’ म्हणून ओळखले गेले. या शैलीत व्यक्तिचित्रणशैली व व्यक्तिसाम्य यांचा कळस गाठला गेला. औरंगजेबाने मात्र चित्रकारांना वाईट वागणूक दिली. त्याने त्यांचे तनखे बंद केले व व्यक्तिचित्रणाचा वापर फक्त तुरुंगातील महत्त्वाच्या राजकैद्यांची अवस्था माहीत करून घेण्यासाठी केला.

अठराव्या शतकात ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीद्वारा अनेक ब्रिटिश व इटालियन चित्रकार भारतात आले. त्यांच्यामुळे तैलरंगातील व्यक्तिचित्रण लोकप्रिय झाले. सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत पुण्यातील शनिवारवाड्यात जेम्स वेल्सने पेशव्यांच्या विनंतीवरून भारतातील पहिले कलाविद्यालय १७९० मध्ये चालू केले. त्याच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांत गंगाराम तांबट हा चित्रकार प्रसिद्धीस आला. मात्र १७९५ मध्ये जेम्स वेल्सच्या निधनामुळे हे विद्यालय बंद पडले. त्याच्या हातची पेशवे सवाई माधवराव, नाना फडणीस, महादजी शिंदे वगैरेंची व्यक्तिचित्रे गणेशखिंड येथे होती. कंपनीसरकारच्या काळात ब्रिटिश व यूरोपीय चित्रकार चिनारी, थिओडोर जेन्सन, रेनाल्डी इत्यादींनी भारतात अनेक व्यक्तिचित्रे रंगविली.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून भारतात विविध ठिकाणी कलाविद्यालये स्थापन झाली व त्यांतून ब्रिटिश चित्रकारांनी वास्तववादी शैलीच्या व्यक्तिचित्रणाचे धडे दिले. या शाळांतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी उत्कृष्ट व्यक्तिचित्रणासाठी पुढे प्रसिद्धीस आले. त्यांत पेस्तनजी बोमनजी, आबालाल रहिमान, एम. व्ही. धुरंधर, ए. एक्स. त्रिंदाद, आगासकर, ए. ए. भोंसुले, गोपाळ देऊसकर, एस. एल. हळदणकर, एम. आर. आचरेकर इत्यादींची नावे घेता येतील.

भागवत, नलिनी

 

'अ पोर्ट्रेट ',तैलरंगचित्र - गोपाळ देऊसकर 'ली चाप्यू दी पेली '(द स्ट्रॉ हॅट), १७ वे शतक - पीटर पॉल रुवेन्स
' सेल्फ - पोर्ट्रेट ' , सु. १५०० - आल्ब्रेक्त ड्युरर ' द मॉर्निंग वॉक ', १७८५ - टॉमस गेन्झवरो
' पोर्ट्रेट ऑफ क्लेमांसो ', १९११, ब्रोन्झशिल्प - रॉदे ' पोर्ट्रेट ऑफ अ यंग मॅन ', १४३२ , काष्ठ- तावदानावरील चित्र - यान व्हान आपिक
' क़्वीन हॅटशेपसूट ', इ. स. पू. सु. १४८०, चूनखडकातील शिल्प, मेट्रोपॉलिटन, न्यूयॉर्क ' कार्डीनल रीशिल्प' तीन भावमुद्रा, १६४०, कॅन्वासवरील चित्र-फिलीप दे शांपॅ
'ज्यूपिटरच्या रुपात क्लॉडियस ', पहिले शतक, संगमरवरी शिल्प, व्हॅटिकन संग्रहालय, रोम 'लुई - फ्रांस्वा बेरतँ ', १८३२, कॅन्वासवरील चित्र- जे. ए. डी. अँग्र

Close Menu
Skip to content