अरबी कला: अरबी कलेच्या परिसरात सामान्यपणे इतिहासकालीन अरबस्तान, पर्शिया, मेसोपोटेमिया, सिरिया, पॅलेस्टाइन, उत्तर आफ्रिका व अँडलूझीया (मुस्लिम स्पेन) या प्रदेशांचा समावेश होतो. ख्रिस्तपूर्व नवव्या शतकाच्या मध्यापासून अरबांच्या उदयाचा पुरावा मिळतो. ईजिप्त, बॅबिलोनिया, ॲनातोलिया व क्रीट या संस्कृतींतील प्राचीन कलांशी अरबी कलेचा दुवा असावा असे दिसते. इस्लामच्या उदयानंतर (७ वे शतक) धर्मप्रणीत कल्पनांनुसार मूर्तिकला व चित्रकला या उघडपणे आणि संगीत व नृत्यादी कला अप्रत्यक्षपणे निषिद्ध मानण्यात आल्या. त्यामुळे अरबी कलेत इस्लामपूर्व व इस्लामोत्तर असे दोन ठळक प्रवाह आढळतात.

इस्लामपूर्व काळातील अरबी कलानिर्मिती नाबाता, लिह्यान व हिम्यर यांसारख्या अनेक सत्ताधारी अरबी जमातींनी केली. प्राचीन अरबस्तानच्या वायव्य, दक्षिण, मध्य आणि पूर्व भागांत अरबी कलानिर्मितीची अनेक केंद्रे होती.

इस्लामपूर्व काळातील अरब लोक चंद्रोपासक, अग्निपूजक व मूर्तिपूजक होते. त्यामुळे सर्वच ललित कला त्या काळात निर्माण झाल्या. त्यांपैकी वास्तुकला व शिल्पकला यांचे अवशेष उपलब्ध आहेत. त्यांवर ग्रीक कलांचा प्रभाव होता. ख्रिस्तपूर्व ५०० च्या सुमाराची दोन मंदिरे सापडली आहेत, ती म्हणजे मरिब येथील ‘अवाम’ हे मंदिर  व मा-इन येथील ‘अथर’ देवतेचे मंदिर. पेत्रा (अरबी बात्रा) या नवातएन अरबांच्या राजधानीत इस्लामपूर्व वास्तुकलेचे दर्शन घडते. ‘अल् खजाना’ (सु. २ रे शतक) ही डोंगरात कोरलेली वास्तू क्रॉस अल् बिंत (सु. २ रे शतक) हा किल्ला, डोंगरातील थडगी, समाधिस्तंभ व त्यावरील कोरीव शिल्पांकन, घरांचे अवशेष व कुंभारकामाचे नमुने इ. गोष्टी पेत्रा येथे आढळतात. शिल्पकलेच्या अवशेषांपैकी ‘मअदील’ या राजाचा पस्तीस इंची पुतळा (इ.स.पू.सु. ५००), डायोनिशिअसची ब्राँझची मूर्ती (इ.स.पू. २ रे शतक), सिंहारूढ बालकाची मूर्ती (इ.स.पू. १ ले शतक), पेत्रा, मरिब, जरॉश व तिम्ना येथील वास्तू, थडगी व समाधिस्तंभ यांवरील उत्थित शिल्पाकृती, पूर्वजांच्या छोट्या मूर्ती, मानवी चेहऱ्याच्या शिल्पाकृती इ. उल्लेखनीय आहेत.

इस्लामच्या उदयानंतर अरबी चित्रकला व शिल्पकला यांची क्षेत्रे संकुचित झाली. अल्लाचे व सर्व जिवंत प्राणिमात्रांचे चित्रण धार्मिक दृष्टीने निषिद्ध मानल्याने अरबी चित्रकलेत भौमितिक आकृती, पाने, फुले, डहाळ्या व तारका यांच्या आधारे केलेल्या अलंकरणाला महत्व प्राप्त झाले. ‘अरेबस्क’ या संज्ञेने त्या कल्पनारम्य अलंकरणप्रधान कलाशैलीचा निर्देश करण्यात येतो. अरबी अलंकार, शस्त्रे व मशिदीसारख्या धार्मिक वास्तू यांवर वेलपत्तीचे नानाविध नमुने चित्रित केलेले आढळतात. सुलेखन व हस्तलिखितांची सजावट याही दिशांनी अरबी चित्रकला प्रगत झाली. समारा येथील भित्तिचित्रे उल्लेखनीय आहेत.

मशीद ही अरबी वास्तुकलेची नावीन्यपूर्ण निर्मिती होय. विस्तृत क्षेत्रावरील स्तंभांच्या रांगा व त्यांवरील सपाट छप्पर अशा प्राथमिक अवस्थेतून मशिदीची वास्तू उत्क्रांत होत गेली. मनोरा, स्तंभांच्याऐवजी कमानी, द्विकेंद्रीय टोकदार कमानी व त्यांवरील अलंकरण, त्यांस लागलेले गोलाकार व ‘मनफुख’चे (‘हॉर्स शू’) वळण आणि चतुष्केंद्रीय कमानी असे वास्तुविशेष मशिदीच्या रचनेत क्रमाक्रमाने योजण्यात आले. मशिदींवरील व थडग्यांवरील घुमटांसाठी दगड किंवा विटा वापरीत. कैरोतील घुमटांवर उत्थित शिल्पाकृती आढळतात. पर्शियात उजळ रंगांची चमकदार मृत्पात्रे किंवा धातूंची सजावट केलेली पात्रे दिसून येतात. जेरूसलेमचा ‘गिरिघुमट’ (‘डोम ऑफ द रॉक’, ६८५–९१), दमास्कसची मशीद (७०६–१५), कॉर्डोव्हाची मशीद (७८६ नंतर), कैरो येथील इब्‍न तुलुनची मशीद (८७६–७९), ग्रानाडा येथील ‘अल् हम्ब्रा’ ही लाल किल्ल्याची वास्तू (१३३४–९१), समरकंदचे गुर अमीरचे थडगे (१३४८–१४०४), ताब्रीझ येथील निळी मशीद (१४३७–६७). कैरोतील ‘क्वाएतबे’ची मशीद (१४६८–९६), कैरोतील जमालउद्दीन अल् झहाबीची वास्तू (१६३७) व इस्तंबूलची ‘सुलेमानी’ ही इमारत या सर्व वास्तू अरबी वास्तुकलेच्या वैशिष्ट्यांच्या निदर्शक आहेत. इस्लामपूर्व वास्तुकलेचा आणि ग्रीकांश, बायझंटिन इ. पूर्वकालीन शैलीविशेषांचा ठसा अरबी वास्तूंवर उमटलेला आहे.

इस्लामोत्तर अरबी शिल्पकला वास्तुकलेइतकी विकसित झाली नाही. अरबी शिल्पकलेत धातूंचा उपयोग प्रामुख्याने करण्यात आला. ग्रानाडा येथील अल् हम्ब्राच्या किल्ल्यातील सिंहाच्या मूर्ती व तेहरानमधील ‘गुलिस्तान’ राजवाड्यातील दगडी सिंहासन यांतून अरबी शिल्पकला दिसून येते. सजावटीचे पृष्ठभागीय कोरीव शिल्पांकन हेही अरबी शिल्पकलेचे एक वैशिष्ट्य होय. इस्फाहानच्या ‘चिल सुतून’ राजवाड्यात अप्सरांसारख्या देवतांच्या कोरीव शिल्पाकृती आढळतात.

कारागिरी : अरबी सुवर्णकार प्रसिद्ध होते. एडनच्या कैकी मंचरजी संग्रहालयातील रत्‍नजडित बैलाचे डोके, त्याखालील सिंह व रानबकरा यांचे चित्रण करणारी सुवर्णपट्टी आणि बर्लिनच्या वस्तुसंग्रहालयातील भारतीय वळणाच्या सुवर्णपट्ट्या यांवरून अरबी कारागिरीचा प्रत्यय येतो. १८९९ मध्ये दक्षिण अरबी उत्खनन-मंडळाने केलेल्या उत्खननात ब्राँझच्या दोन लहान कलावस्तू सापडल्या आहेत. इ.स.पू. ७०० मधील लुरिस्तानब्राँझशी त्यांचे साम्य असल्याचे तज्ञ मानतात. त्या दोन कलावस्तूंचा काळ मात्र निश्चित झालेला नाही. शाबरा येथील तेरा इंच उंचीचा ब्राँझचा सुंदर दिवा सध्या व्हिएन्ना येथील ‘कुन्स्थिस्तोरिशिस’ वस्तुसंग्रहालयात आहे. याखेरीज शिरविहीन असा एक मी. उंचीचा पुतळा व उंटाचे शिर यांसारख्या उपलब्ध झालेल्या प्राचीन अवशेषांत अरबी कारागिरीचे दर्शन घडते.

अरबी कारागिरी इतरही गोष्टींत दिसून येते. त्यांत ग्रंथबांधणी, संगमरवरी जलपात्रे, लाकडी दरवाजे, शवपेट्या, हस्तिदंती उत्कीर्णन, विविध प्रकारचे अलंकार, कुंभारकाम, मृत्स्‍नाशिल्प, वीणकाम व भरतकाम, गालिचे, लोकरी प्रावरणे व रग इ. कलाकुसरीच्या गोष्टींचा अंतर्भाव होतो.

नृत्य: शेतकरी आणि मेंढपाळ या अरबी वर्गांची नृत्ये त्यांच्या व्यवसायांशी निगडित होती. लग्नाच्या व अन्य सोहळ्यांच्या मिरवणुकीतील खंजिरीच्या तालावरील नृत्ये ही प्रातिनिधिक अरबी नृत्ये होत. अरबी नृत्य व संगीत या कला एकाच वेळी जन्माला आल्या असाव्यात. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकातील एका शिलालेखात, काही अरबी कैद्यांनी आपली संगीतप्रधान गीते नृत्याची साथ देऊन तुरुंगाधिकाऱ्‍यांना गाऊन दाखविल्याचा निर्देश आढळतो. आरंभापासूनच अरबी स्त्रिया नृत्यात उघडपणे भाग घेत. नृत्य हा अरबी स्त्रिपुरुषांच्या नित्य मनोरंजनाचा प्रकार असे. इस्लामपूर्व काळात नर्तक आपल्या गळ्यात व कमरेभोवती घंटिका बांधत. पुरुषांच्या नृत्यगायनाला अरबी स्त्रिया डफ व बासरीची साथ करीत. इस्लामोत्तर काळात धार्मिक निषेधामुळे अरबी नृत्यकला फारशी प्रगत होऊ शकली नाही.

 संगीत : ग्रीक संगीतकलेच्या प्रभावातून अरबी संगीतकलेचा विकास झाला. अरबी संगीतकलेला कुराणाचा नसला, तरी सनातनी इस्लाम धर्ममार्तंडांचा विरोध होता, तरीही धार्मिक प्रार्थना व कुराणपठण यांतून अरबी संगीत टिकून होते. हारून-अल्-रशीदच्या कारकीर्दीत (७८६–८०९) व विशेषतः इस्लाम सत्ताधाऱ्‍यांच्या उदार आश्रयाने अरबी संगीत सर्वांगांनी विकसित झाले. उत्तरकाळात पर्शियन संगीताचा अरबी संगीतावर परिणाम झाला.

मदीना येथील तुवाइस हा पहिला प्रसिद्ध अरबी गायक होय. इब्राहिम अल् मौसिली (८ वे शतक) हा अरबी संगीताचा प्रमुख आचार्य मानला जातो. सुरुवातीच्या सुप्रसिद्ध अरबी गायकांत सुलेमान, झुबैर इब्‍न दाहमान, अल्-गारिद, इब्‍न-सोरिद स्कूमा व मुकारेक यांचा समावेश होतो. अबू ऐषा, इस्‌हाक, ओरिअल ही कवयित्री व सर्जाब हे अरबी संगीत-रचनाकार होत.

अरबी संगीतशास्त्रीय लेखनात सातत्य व समृद्धी ही आढळतात. खलील व उबैदुल्लाह बिन अब्दुल्लाह (८ वे शतक), अल्-किंदी, त्याचा शिष्य अहमद बिन मुहंमद व सर्जाल (९ वे शतक), अल्-फाराबी व अल्-इस्फहानी (१० वे शतक), ॲव्हिसेना (११ वे शतक) सैफुद्दीन (१४ वे शतक) व अब्देल कद्र (१५ वे शतक) यांचे संगीतशास्त्रीय लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. अल्-इस्फहानीच्या किताब अल्अघानी अल्कबीरया एकवीस खंडांच्या बृहत्-ग्रंथात दहाव्या शतकापर्यंतच्या अरबी संगीताचा इतिहास असून त्यात शंभर सुसंवादी संगीतरचनांची चर्चा आढळते. अल्-फाराबीने ग्रीक सिद्धांतानुसार अरबी स्वरसप्तकपद्धतीत सुधारणा घडवून आणल्या. सर्जाल या प्रतिभावंत संगीतकाराने अरबी संगीतात सुलभता व सोपेपणा आणला. अबू बकर इब्‍न बाजीह याने ॲरिस्टॉटलच्या ध्वनिविषयक सिद्धांतावरील भाष्य लिहिले. चौदाव्या शतकात सैफुद्दीन अब्देल मोनिम याने अरबी संगीताचे पुनरुज्जीवन केले. त्याचा स्किरिफिग हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

अरबी संगीतात लय व ताल यांची उच्च दर्जाची परिपूर्णता आढळते. अरबी संगीतशास्त्रात संवादी व विवादी असा फरक नाही, परंतु संवादी स्वरांचा अवरोहक्रम त्यात आढळतो. अरबी स्वरलिपी मुळात पुढीलप्रमाणे होती :

पर्शियन संगीतकारांनी वरील स्वरलिपीत फेरफार करून, त्यांची बारा स्वरांत विभागणी केली. तेराव्या शतकात सा, ३ रे, ३ ग, म, ३ प, ३ ध, ३ नी, असे सतरा स्वर रूढ झाले.

सुसंवादी संगीतरचना हेही अरबी संगीताचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. ‘मिसिल’ म्हणजे स्वरसप्तकपद्धती त्या रचनेस आधारभूत आहे. वर सांगितल्याप्रमाणे अरबी ‘मिसिल’मध्ये सतरा स्वर आढळतात. सुसंवादी रचनेचा आविष्कार करणाऱ्‍या मुख्य बारा ‘मकामात’ रचना आहेत. त्यांत रहावी, हुसेनी, इराकी, रस्त, कूचिक, बुसालिक, उशाक, जंगला, बुजुर्ग, नव, इस्फहानी व हेजॅझ यांचा समावेश होतो. त्यांखेरीज दुसऱ्‍या सहा ‘मकामात’ रचनाही रूढ आहेत. प्रत्येक ‘मकामात’ रचना ठराविक समयीच गावयाचा दंडक आहे. भारतीय संगीतातील रागपद्धती व समयानुसारी गायन यांच्याशी ‘मकामात’ रचनेचे साम्य आहे.

अरबी वाद्यांत छेडवाद्यांना प्राधान्य असून त्यांपैकी ‘ऊद’ हे लहान व ‘तंबूर’ हे मोठे ही वीणावाद्ये प्रमुख होत. त्यांशिवाय ‘तब्‍ल’ (डफ व त्याचे अनेक प्रकार), ‘नाई’ (बासरी), ‘अल् औद’ (चार तारांची वीणा), ‘कानून’ (डल्सिमर), ‘केमांघ ए ग्राऊझ’ (व्हायोलिनसारखे तीन-तारी वाद्य, ‘रबाब’ (एक वीणाप्रकार) ही अरबी वाद्ये नृत्यगायनांत वापरली जातात. ‘केनात’ म्हणजे गाणाऱ्‍या मुली, ‘रावी’ म्हणजे कथाकाव्यांचा गायक आणि ‘रबाबी’ म्हणजे अरबी वीणावादक यांनी अरबी संगीताचा प्रसार करण्यास हातभार लावला. सूफी व ‘दरवेश’ पंथाच्या अरबी लोकांना संगीतकला ही धर्मसाधन म्हणून महत्त्वाची वाटे. काफिलागीतांसारख्या अरबी लोकगीतांतील सहा मात्रांचा ‘रजाझ’ हा ताल उंटाच्या चालीवरून बनलेला असावा. कसीदा, गझल यांसारख्या अभिजात काव्यप्रकारांचे गायन करण्याची अरबी परंपरा होती. अरबी संगीताची लोकप्रियता व प्रसार यांचा पुरावा अरेबियन नाइट्समधील संगीतविषयक विपुल निर्देशांवरून मिळू शकतो. अँडलूझीयामधून अरबी संगीताचा प्रभाव पाश्चात्त्य संगीतावरही झाल्याचे दिसून येते.

पहा : इराणी कला इस्लामी कला इस्लामी वास्तुकला.

संदर्भ : 1. Berque, Jacques Trans. Stewart, Jean, The Arabs : Their History and Future, London, 1964.

           2. Fyzee-Rahaman, Atiya Begum, The Music of India, London, 1925.

           3. Hitti, Philip K. History of The Arabs, London, 1960.

           4. Ingrams, Harold, Arabia and the Isles, London, 1966.

जाधव, रा. ग., महाम्बरे, गंगाधर