बालकला : ‘बालकला’या संज्ञेने जगातील सर्व बालांच्या कलात्मक कृतींचा निर्देश केला जातो आणि सर्व प्रौढांना वगळले जाते. दृश्यकलांच्या माध्यमातून होणाऱ्या बालांच्या आविष्कारांना ‘बालकला’ असे म्हणण्याची प्रथा असली, तरी संगीत, नृत्य, नाट्य इ. सर्व कलांमधील बालांच्या आविष्कारांमध्ये काही एका समान बालकवृत्तीचे प्रतिबिंब पडते त्यामुळे त्या सर्वांचा बालकलेमध्ये समावेश करावा लागतो  

चित्रनिर्मितीत तन्मय झालेली बालिका

या विश्वात नव्यानेच प्रविष्ट होणाऱ्या बालकाला अपार विश्वकुतूहल असते. बोलता येऊ लागताच ‘हे काय आहे?’, ‘ते काय आहे?’, ‘असे का?’, ‘तसे का?’ इ. अनेक प्रश्न विचारून बालक प्रौढांना भंडावून सोडते. विश्वातील अनंत वस्तूंची उपयुक्तता आणि कृतींचा हेतू यांवर लक्ष अजून खिळलेले नसल्याने त्याची कृती अहेतुक आणि म्हणून निरागस असते. अगदी अर्भकावस्थेत आपाततः घडणाऱ्या दिशाशून्य आणि असंघटित कृतींमध्ये अहेतुकपणे संघटन येऊ लागते. आणि त्या प्रक्रियेतून बालांची कला जन्म घेते. हे तत्व नृत्यकृतीतून अधिक प्रकर्षाने जाणवते. वाढत्या वयाबरोबर कुटुंब आणि समाज यांच्या प्रभावामुळे उपयुक्ततेचे भान वाढत जाते व कृती व्यावहारिक हेतूंनी बंदिस्त होत जाते, तसतशी अहेतुकता आणि निरागसता लोप पावून बालाचे प्रौढामध्ये रूपांतर होते. ही अहेतुकता आणि निरागस विश्वकुतूहल आपल्या कृतीतून अबाधित राखू शकणारे काही थोडे प्रौढच कलावंत ठरतात. उलट बालांमध्ये ही प्रवृत्ती निसर्गतःच असल्यामुळे ‘प्रत्येक बाल हा कलावंत असतो’ असे मानले जाते. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ , ही केशवसुतांची उक्ती अशा रीतीने सर्व कलावंतांबाबत सार्थ ठरते.

अर्भकावस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत होत जाणारा बालकांचा शारीरिक व मानसिक विकास त्यांच्या चित्रांतून प्रतीत होतो. चालायला लागणे, स्वतःच्याच हाताने खायला लागणे, वस्तू हातात धरणे, शब्द उच्चारणे इ. क्रिया मूल नव्यानेच शिकू लागलेले असते. या सर्वच क्रिया प्रथम अनियंत्रित असतात. पण वाढत्या वयाबरोबर त्यांच्यावर नियंत्रण येऊ लागते. हातात खडू दिल्यावर नुसतेच रेघोट्या ओढणारे मूल हळूहळू एकाच दिशेने रेघोट्या ओढू लागते. या रेघोट्या कागदावर कुठे व कशाप्रकारे मारल्या जातात, यावरून त्याच्या एकूण स्वभावाचा अंदाज घेता येतो. उदा., कोणी पूर्ण कागद सोडून अगदी एका कोपऱ्यात रेघोट्या मारतील, कोणी संपूर्ण कागदभर, तर कोणी कागदाच्या अगदी मधोमध रेघोट्या मारतील. पुढे या रेघोट्यांतून एक वर्तुळाकार लय मुलाला सापडते. रेषांची दोन टोके जुळवली की, काही एक आकार निर्माण होतो, याचे त्याला ज्ञान होते. ‘अनियंत्रित हालचालीकडून नियंत्रित हालचालीकडे जाणे’, हे बालकलेताल मूलभूत तत्व नाट्य, नृत्य, चित्र, संगीत अशा सर्वच कलांना समान असते. येथे अर्भकावस्था संपते.

शैशवावस्था सुरू होते, तेव्हा नव्यानेच काढता येऊ लागलेला आकार पुन्हा पुन्हा काढण्यात बालकाला मौज वाटू लागते. या आकारांना ‘ही माझी आई’, ‘हे माझे बाबा’ अशी नावे देऊन ते नाते जोडते. कुटुंबापासून सुरू झालेले हे नात्याचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक होत जाऊन संपूर्ण विश्वाशी नाते जुळते. साधारणपणे चौथ्या वर्षापासून मानवी आकार तरी वाटावा इतपत स्पष्ट चित्र हे बालक रेखाटू लागते. त्यामध्ये गोलाकार चेहरा, नाक, डोळे, कान व हातपाय एवढेच तपशील दाखवलेले असतात. धड नसते. साधारण सहाव्या वर्षापासून कुटुंबाचे कवच फोडून बालक बाहेर येऊ लागते. तेव्हा सभोवतालच्या वस्तुविश्वाविषयी त्याच्या मनात तीव्र कुतूहल निर्माण होते.


वरचे चित्र-पाच पायांचा घोडाः बालचित्रकाराच्या अभिनव कल्पकतेचा आविष्कार. खालचे चित्र-जिजामाता उद्यान : दक्षा एकनाथ नाखवा (वय ११ वर्षे), माध्यम-रंगशलाका, वास्तववादी चित्रणाचा नमुना.

वरचे चित्र- क्षकिरणचित्र : आशीष घिर्णीकर (वय ४ वर्षे), काळ्या पेनचे रेखांकन, चित्रातील मानवाकृतींच्या पोटातील अन्नकण दाखवले आहेत. खालचे चित्र- काठेवाडी जोडपे : झरना पारेख, घनवादी चित्रणाचा नमुना.
बालकलाप्रदर्शनातील एक दालन, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई.

हे असेच का? असे का नाही? अशा चौकस बुद्धीने ते प्रश्न विचारू लागते. मग विश्वाविषयी पडलेले हे प्रचंड कोडे उलगडण्यासाठी ते बालक प्रतीकांची एक सृष्टीच निर्माण करते. वस्तूंचा अर्थ मनात निश्चित होत नाही, तोपर्यंत हा प्रतीकांचा शोध चालूच असतो. या प्रतीकांचे आकार साधारणपणे भौमितिक असतात. घराचे चित्र काढताना एक चौरस, त्याच्या आत पायथ्याशी दार म्हणून उभा असलेला लहान आयत व छपरासाठी वरच्या बाजूला आडवा त्रिकोण अशा भौमितिक आकारांची रचना केली, की त्याचे घर उभे होते. डोंगराआडचा सूर्योदय दाखवताना नुसतेच जोडलेले आडवे दोन त्रिकोण म्हणजे डोंगर व त्यांच्यामध्ये सूर्याचे अर्धवर्तुळ, तर झाड काढताना नुसतेच एक वर्तुळ व खोड म्हणून खाली दंडगोल. मानवी आकार दाखवतानाही एक वर्तुळ, त्याच्याखाली उभा आयत व बाजूने दोन दोन सरळरेषा, अशा प्रकारच्या भौमितिक आकारांचीच रचना केलेली असते. परंतु जसे विश्वाचे अधिक ज्ञान होऊ लागते तसे या प्रतीकांतून अधिक तपशील भरले जाऊ लागतात.

कुटुंबाच्या छायेतून हे बालक बाहेरच्या जगात येते, तेव्हा स्वतःविषयीच विचार करू लागते आणि म्हणून या अवस्थेतील त्याचे चित्रविषय प्रामुख्याने स्वतःशीच निगडित असतात आणि त्यांचा आविष्कार स्वप्नील व कल्पनारम्य असतो. माझी शाळा, माझे मित्र, माझे घर व मी स्वतः अशा विषयांची चित्रे काढताना हे बालक स्वतःचे चित्र इतर वस्तूंच्या मानाने मोठे व चित्रचौकटीच्या अगदी मधोमध काढते आणि इतर वस्तूंची रचना सभोवार करते. येथेच एक व्यक्ती म्हणून बालक आपल्या अहंभावाचा ठाम प्रत्यय व्यक्त करते. कधीकधी शुद्ध भौमितिक आकारांची केंद्रानुवर्ती रचना बालकांच्या चित्रांत दिसून येते. अशा प्रकारची मंडलरचना तांत्रिक चित्रांतही दिसते. या तत्वाची उत्कृष्ट उदाहरणे ठरतील अशी काही बालचित्रे एका चित्रकला-शिक्षिकेकडून हर्बर्ट रीड या आंग्ल कलासमीक्षकाला मिळाली व त्याने ती ‘एज्युकेशन थ्रू आर्ट’ (१९४५) या आपल्या ग्रंथात समाविष्ट केली.

  बाल्यावस्थेतील हे बालक ‘जसे दिसते’ तसे काढत नाही, तर त्याला ते ‘जसे वाटते’ तसे काढते. म्हणून वाघाला मारलेली गोळी बंदुकीतून सुटून वाघापर्यंत कशी येते, हे बंदुकीपासून ते थेट वाघापर्यंत गोळ्याची माळ काढून त्याच्या चित्रात दाखवलेले असते. मोटार पारदर्शक समजून तिच्या आत बसलेली माणसे अगदी ठळक काढलेली दिसतात. अशा प्रकारच्या चित्रांची शैली ⇨क्षकिरणशैली म्हणून ओळखली जाते. बालांच्या या चित्रांत यथादर्शन नसते. त्यामुळे चित्रातील लांब गेलेला रस्ता निमुळता न होता जसाच्या तसा कागदाच्या वरच्या कडेला जाऊन संपतो. दूर असलेलेडोंगर दूर म्हणजे कागदाच्या वरच्या बाजूला अगदी कडेला जाऊन संपतो. दूर असलेले डोंगर दूर म्हणजे कागदाच्या वरच्या बाजूला अगदी कडेला दाखवलेले असतात. काही मुलांच्या चित्रांत प्रथम भूमिरेषा काढून त्यावर मानवाकृती आणि अन्य आकृती काढलेल्या असतात. अशा प्रकारची मुले तर्कशुद्ध विचार करणारी व वास्तवतेचे भान ठेवणारी असतात. या उलट काहींच्या चित्रांतील आकार हवेत तरंगल्यासारखे असतात. अशा प्रकारची मुले कल्पनाविश्वात रमणारी असतात. चित्रात उजळ व गडद रंगांचा वापर करणारी मुले उत्साही व आनंदी प्रवृत्तीची तर मंद रंगांचा वापर करणारी मुले चिंताग्रस्त व क्वचित चिंतनशील प्रवृत्तीची असतात. उत्तम मांडणी करणारी मुले समतोल व सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची असतात. अर्थातच हे सारे विवेचन स्थूल मानानेच खरे मानता येईल. ही बाल्यावस्था संपून साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षानंतर बालक किशोरावस्थेत येते आणि वास्तवाकडे अधिकाधिक ओढले जाऊ लागते. मग ते ‘जसे दिसते’ तसेच काढण्याचा प्रयत्न करू लागते. चित्राच्या द्विमितीय पृष्ठावर तिसरे परिमाण आणण्याचा प्रयत्न करते. यथादर्शनाप्रमाणे लांबच्या वस्तू लहान, जवळच्या आकाराने मोठ्या दाखवते. त्याच्या वृत्तीतील स्वप्नीलपणा, कल्पनारम्यता व निरागस उत्कटता कमी झाल्यामुळे रंगांची उत्कटताही कमी होते.

जगामध्ये सर्व बालकलेमध्ये दिसणाऱ्या या समान लक्षणांवरून बालकाची वाढ निकोप झाली आहे की नाही, हे जाणून घेता येते. त्या त्या वयानुसार ती ती लक्षणे दिसून आली नाहीत, तर मुलामध्ये काहीतरी विकृती आहे, हे मानसोपचारतज्ञांना कळून येते आणि त्याच्यावर सुयोग्य मानसोपचार करता येतात. उलट लहान वयातच पुढील वयातील लक्षणे दिसून आली, तर मुलाच्या विलक्षण कुवतीचा अंदाज येतो आणि त्याच्यापुरतेच विशेष असे मार्गदर्शन करणे तज्ञांना शक्य होते. मुलांच्या चित्रांत मोठ्या माणसांनी कोणत्याही प्रकारची सुधारणा सुचवायची नसते किंवा तत्सम मार्गदर्शनही करावयाचे नसते. मुलांना त्यांच्या मनोवृत्तीप्रमाणे चित्रे काढू द्यायची असतात. बालकांच्या विशिष्ट प्रवृत्तीप्रमाणे जलरंग, पिष्टमय जलरंग, पावडरचे रंग, खडू, कांड्या, रंगीत शाई इ. माध्यमांचा त्यांस उपयोग करू देणे इष्ट ठरते. कारण बालकांकडून माध्यमपटुत्व अपेक्षित नसते, तर त्यांना मुक्त आविष्काराचे साधन उपलब्ध करून द्यावयाचे असते.

 बालचित्रांना कलाक्षेत्रातही महत्त्व आहे. अभिजात कलेतील कलावंताचे शिस्तबद्ध रचनाकौशल्य जरी बालचित्रांत दिसत नसले, तरी भावनेचा सहजसुंदर भाबडा आविष्कार आणि रंगांची उत्कटता ओतप्रोत पाहावयास मिळते. बालकांची प्रतिमासृष्टी सामान्य माणसालाच काय, पण पिकासो, पॉल क्ले यांसारख्या श्रेष्ठ प्रतिभावंतांनाही थक्क करून सोडते. बालचित्रांतील क्षकिरणशैली, भौमितिक शैली व प्रतीकसृष्टी ही वैशिष्ट्ये आदिम कलेतही दिसून येतात. यूरोपात साधारणपणे १८५० च्या सुमारास बालकांच्या कलेचा स्वतंत्रपणे विचार सुरू झाला. व्हिएन्नातील फ्रांट्स सिझेक या कलातज्ञाने शिक्षणक्षेत्रात बालकलेचे धाडसी प्रयोग प्रथम केले. या प्रयत्नात इंग्लंडमधील मेरिअन रिचर्डसन या कलाशिक्षिकेचाही वाटा फार मोठा होता. त्यांच्यानंतर कित्येक कलासमीक्षकांनी सु. शतकभर या कार्यासाठी वाहून घेतल्यामुळे आज बालचित्रकलेचे लोण जगभर पसरू लागले आहे. बालप्रदर्शने व बालविशेषांक काढून आज बालकलेला प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्र राज्यात जिल्हापातळीवर बालकलाप्रदर्शने भरविली जातात. शंकर्स वीकली, साधना, कुमार यांसारखी नियतकालिके बालकलेला प्रोत्साहन देतात. मुंबई महानगरपालिकेने ‘अकॅडमी ऑफ फाइन आर्ट ॲड म्यूझिक’ ही संस्था स्थापन करून बालकलेच्या दृष्टीने काही नवीन उपक्रम सुरू केले आहेत. बालकाच्या व्यक्तिविकासाचे एक साधन म्हणून बालकलेला शिक्षणक्षेत्रात फार मोठे स्थान आहे. या विचारांचे पहिले बीज प्रा. प्रह्‌लाद अनंत धोंड यांनी शिक्षणक्षेत्रात पेरले. त्यामुळे महाराष्ट्रात आज सर्वसाधारण शिक्षणात बालकलेला थोडे फार स्थान असले, तरी बालकलेचा विचार त्याहून व्यापक पातळीवर होणे आवश्यक आहे.

संदर्भ : 1. Conrad, George, Art and Education, Glassboro, N. J., 1968.

            2. Dunett, Ruth, Art and Child Personality, London, 1948.

          3. Greenberg, Pearl, Children’s Experiences in Art, New York, 1966.

          4. Hellier, G. Indian Child Art, New York, 1951.

          5. Kellogg, R. O’Dell, S. The Psychology of Children’s Art. New York, 1967.

          6. Read, Herbert, Education Through Art, London, 1958.

          7. Stevens, Harold, Ways with Art: 50 Techniques for Teaching Children, New York, 1963.

 जोशी, ज्योत्स्ना