आलंकारिक कला : अलंकरण सर्वच दृश्य कलांत कमीअधिक प्रमाणात आढळत असले, तरी आलंकारिक कला या व्यापक संज्ञेने अलंकरणाचे सर्व प्रकार दिग्दर्शित केले जातात. त्यांत वास्तुकलेतील सजावटीची तंत्रे, गृहशोभन, वस्त्रकलेतील आकृतिबंध, ग्रंथसजावट, धातू, लाकूड, हस्तिदंत, हाडे, मृत्पात्रे इत्यादींवरील कारागिरी, इतर हस्तव्यवसाय, औद्योगिक कलांतील सजावट व मुख्यतः नित्योपयोगी वस्तूंवरील कलाकुसर इत्यादींचा समावेश होतो. पुष्कळदा ðउपयोजित कला व कनिष्ठ कला म्हणूनही आलंकारिक कलांचा निर्देश केला जातो. आलंकारिक कलांच्या मुळाशी मानवाची नैसर्गिक सौंदर्याभिरुची असते. जे जे पदार्थ उपयुक्त आहेत, ते ते पदार्थ सुंदरही असावेत अशी मानवी प्रवृत्ती आहे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टीने एखाद्या वास्तूतील भिंतींची उपयुक्तता फार मोठी असते हे खरे, परंतु त्या भिंतीवर चित्रे रेखाटण्यामागे कोणतीच उपयुक्तता असू शकत नाही. उपयुक्तता व कलात्मकता यांचा असा मेळ घालण्याचा प्रयत्‍न आलंकारिक कला करतात. ज्या काळात चित्रकला, मूर्तिकला इत्यादींचा स्वतंत्रपणे विकास झाला नव्हता, अशा अतिप्राचीन काळापासून आलंकारिक कलांची परंपरा चालत आलेली आहे. अलीकडे अलंकरणाची विविध प्रकारची तंत्रे व यांत्रिक साधने उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे अलंकरणाचे क्षेत्रही विस्तारत आहे.

पहा : कला (कनिष्ठ कला).

जाधव, रा. ग.