अप्रतिरूप कला : (ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट). चित्रविषयाऐवजी म्हणजे त्याच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाऐवजी रंग, रेषा आणि विविध आकार यांची स्वयंपूर्ण संगती व योजनाबद्ध मांडणी असलेला कलाप्रकार. नैसर्गिक द‍ृष्य किंवा वस्तू यांचे यथातथ्य दर्शन ह्यात नसते. ही मतप्रणाली प्राचीन काळापासूनही माहीत होती. केवळ आलंकारिक वा यातु-आधारित अशा सांकेतिक प्राचीन कलेची उदाहरणे अनेक देशांत आढळतात. धार्मिक प्रतिबंधामुळे इस्लामी कलेत सामान्यत: अप्रतिरूपतेवर भर होता.  दृक्प्रत्ययवादामध्ये या प्रकाराच्या आधुनिक स्वरूपाचे मूळ आहे. छायाचित्रणामुळे प्रत्यक्ष वस्तू किंवा तिचा आकारिक बारकावा टिपणे सुलभ  झाले. त्यामुळे निमिषमात्र अनुभवास येणाऱ्या रंगांच्या व आकारांच्या दर्शनाचे महत्त्व चित्रात व शिल्पात वाढले आणि ⇨बिंदुवादासारख्या नंतरच्या अनेक चित्रणपद्धतींत प्रत्यक्ष वस्तू व तिचे चित्ररूप यांत फारकत दिसू लागली. ⇨घनवादापासून अशी फारकत अधिकच स्पष्ट झाली.  

प्रत्यक्षावर आधारित परंतु स्वतंत्र रचनेच्या अप्रतिरूप कलेस ‘अमूर्त’,‘अप्रातिनिधिक’,‘अवस्तुनिष्ठ’ किंवा ‘केवल कला’ असे नामपर्याय आले. प्रत्यक्षाची जाणीव व ओळख असणारी घनवादी व तत्सदृश चित्रणपद्धती केवळ सुघटित भौमितिक आकारांवर आधारलेली प्राथमिक रंगांतील पीतर माँद्रीआन (१८७२–१९४४) व तत्पंथीयांची रचनावादी  पद्धती आणि रंगांचा स्वैर व स्वयंचलित वापर असलेली अप्रतिरूप अभिव्यक्त्तिवादी पद्धती असे ह्या मतप्रणालीचे तीन प्रमुख प्रवाह आहेत.

पहिल्या प्रकारात निसर्ग, मानवाकृती किंवा इतर वस्तू हीच स्फूर्तिस्थाने असतात. सेझानने (१८३९ –१९०६) प्रचारात आणलेल्या वस्तुतलविश्लेषणाच्या क्रांतिकारी तत्वानुसार पिकासो (१८८१–१९७३) आणि ब्राक (१८८२–     ) यांनी १९०९च्या सुमारास स्थिरवस्तुचित्रणात अवकाश आणि विविध तलाकार यांचा उपयोग केला. मार्सेल द्यूशांची (१८८७–१९६८) नवकालवादी चित्रे व ग्रीस, लेझे (१८८१–१९५५), दलोने (१८८५–१९४१) आणि दरँ (१८८०–१९५४) ह्यांची चित्रेही याच प्रकारात मोडतात.

दुसऱ्या प्रकारात निसर्गाचे दर्शन अजिबात नसते. चित्रविषय निसर्गाशी कोठल्याही तऱ्हेने संबंधित नसतो. चित्रनिर्मितीसाठी केवळ प्राथमिक रंग, रेषा व भौमितिक आकार यांचीच योजना केलेली असते. विशेषत: पीतर माँद्रीआन आणि थीओ व्हान डूसबर्क (१८८३–१९३१) ह्यांचे नेतृत्व असलेल्या ‘द स्टील’ (डॅनिश : de Stijl, १९१७) ह्या डच संप्रदायातील चित्रकारांची चित्रे ह्या प्रकाराची उत्कृष्ट उदाहरणे होत.

तिसऱ्या प्रकारात रंग विखरून किंवा यदृच्छया वापरून रंगसंगती, आकार व पोत निर्माण करण्यावर भर असतो. चित्राविष्कारातील अपारंपरिक मांडणी, बदललेला नवा सौंदर्यविषयक दृष्टिकोन, रंग व आकार ह्यांवरील भर ही ह्या प्रकारामागील सामान्य वैचारिक भूमिका असते. तिची पूर्वपीठिका प्लेटोच्या ‘कलावस्तूंचे सौंदर्य सापेक्ष नसून ते सदैव, स्वाभाविक, संपूर्णतया स्वतंत्र असते’, -(फिलेबस) या उक्तीमध्ये दिसते.

ह्या कलाप्रकाराचे प्रमाणभूत मानण्यात आलेले विश्लेषण व प्रगतीची रूपरेषा ॲल्‌फ्रेड बारने १९३६ मध्येच जगापुढे ठेवली.

कंड्यीन्‌स्कईचे (१८६६–१९४४) काँपोझिशन (१९१०) व आर्थर डव्ह (१८८०–१९४६) याचे राइझ ऑफ द फुल-मून  या चित्रापासून अप्रतिरूप कलेची सुरुवात मानतात. रशियन चित्रकार कझ्यीम्यीर मल्येव्हिचने (१८७८–१९३५) त्याच्याच अधिघनवादी पद्धतीने रंगविलेले व्हाइट ऑन व्हाइट  हे चित्र प्रारंभिक अप्रतिरूप प्रकाराचे उदाहरण आहे.

मूर्तिकलेतील अप्रतिरूपण सर्वथा मौलिक आणि कलापूर्ण ठरणे काहीसे कठीण असल्याने, या कलेच्या इतिहासात अप्रतिरूपता क्वचितच आढळते. मात्र प्राचीन ईजिप्तमधील अवशिष्ट असलेल्या शंकु-स्तंभांवरून अप्रतिरूपतेची अभिज्ञता किती जुनी आह, हे लक्षात येते. सूर्यदेवतेच्या प्रतीकाचे अप्रतिरूप सारदर्शन म्हणजे हे स्तंभ होत. आधुनिक शिल्पकारांनी आदिम शिल्पाकृतींच्या प्रभावाने आपल्या शिल्पांमध्ये काही प्रमाणात अप्रतिरूपता साधण्याचा प्रयत्न केला आहे. अशा शिल्पज्ञांत ब्रांकुश (१८७६–१९५७), द्यूशां-व्हीयाँ (१८७६–१९१८), लॉरांस (१८८५–१९५४), बेलिंग(१८८६–    ), अक्यींप्येंकॉ (१८८७–   ), आर्प (१८८७–१९६६), गाब(१८९०–    ), लीपशीट्स (१८९१–    ), बेन निकल्सन (१८९४–    ) हेन्री मुर (१८९८–  ), कॉल्डर (१८९८–), जाकोमात्ती (१९०१–६६), बार्बारा हेप्‌वर्थ (१९०३– ) इत्यादींचा समावेश होतो. अप्रतिरूपतेचा प्रभाव वास्तुकलेवर व वाणिज्यकलेवरही पडला. जे. जे. पी. आउट (१८९०–  ) आणि रेटफेल्ट (१८८८–१९६४) ह्यांची वास्तुनिर्मिती या प्रकारची आहे. नृत्यकला ही मूलत: नृत्यविषयाच्या अप्रतिरूप म्हणजे सारभूत स्वरूपाचा प्रतीकात्मक आविष्कार करणारी कला असली, तरी एका विशिष्ट ‘बॅले’ प्रकारात वेशभूषेच्या साहाय्याने भौमितिक आकृतिबंध साधताना तिची अप्रतिरूपता विशेषत्वाने जाणवते. छायाचित्रण व चित्रपट या क्षेत्रांतही आंशिक अप्रतिरूपणाचे प्रयोग करण्यात आले आहेत. या संदर्भात मॅन रे, मोहॉइनॉड्य, लेझे, रिख्टर (१८८८–     ) इ. कलावंतांचा उल्लेख करता येईल.

पाश्चात्त्य कलेच्या प्रभावाने हा कलाप्रकार भारतात पोहोचला. हुसेन (१९१५–    ), रझा (१९२२–    ), गायतोंडे (१९२४–    ), लक्ष्मण पै (१९२६–    ), शांती दवे (१९३१–    ) वगैरे चित्रकारांनी त्याचा पुरस्कारही केला.

पहा : अभिव्यक्तिवाद.

संदर्भ : Brooks, Leonard, Painting and Understanding Abstract Art, New York, 1965.

चांदवडकर, गो. वि.