कलावस्तु व अवशेष-संरक्षण : वारा, ऊन, पाऊस, धूळ, आग, महापूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तसेच युद्धासारख्या मानवनिर्मित आपतींमुळे विविध प्रकारची चित्रे, धातूंचे व मातीचे पुतळे, स्मारके, मंदिर इ. कलावस्तूंचा नाश होतो. संग्रहालयीन कलावस्तूंचाही ओल, प्रकाश, कृमिकीटक, सूक्ष्म जंतू इत्यादींमुळे थोडाफार नाश होतो. कलाकृतींचे व प्राचीन अवशेषांचे संरक्षण, जीर्णोद्धार व संग्रह करण्याचे कार्य मानव फार पूर्वीपासून करीत आला आहे. परंपरागत संस्कृतीची जोपासना करणे, ऐतिहासिक अभ्यासासाठी तसेच कलात्मक रसग्रहणासाठी पुरातन कलाकृती मूळ स्वरुपामध्ये उपलब्ध करुन देणे इ. उद्देशांनी कलावस्तूंचे संरक्षण (काँझर्व्हेशन), परिरक्षण (प्रिझर्व्हेशन) व पुनःस्थापन (रेस्टोरेशन) केले जाते. काही वेळा भावनात्मक दृष्टिकोनातून, तर काही वेळा कायद्याने वा सक्तीनेही हे कार्य झालेले आहे. कलावस्तू तयार करतानाच ती चिरकाल टिकावी, म्हणून काही कलाकारांनी काळजी घेतली होती, असे आढळते. नवीन कलावस्तू निर्माण करीत असतानाच जुन्यांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांची डागडुजी करणे. इ. कार्येही मानवाने पूर्वीपासून केली आहेत. पण कलावस्तूंचा नाश व मोडतोड ज्या परमाणात झाली, त्या मानाने त्यांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न अपुरे व मंद गतीने झाले.

प्राचीन काळी सांधपट्टीच्या साहाय्याने केलेल्या पुन:स्थापनाच्या नमुना : समारा येथील वाडगा (इ. स. पू. सु. ४००० वर्षे).

ऐतिहासिक आढावा: नैसर्गिक व मानवनिर्मित आपतींमुळे ईजिप्शियन, बॅबिलोनियन, ग्रीक, रोमन वगैरे संस्कृती त्यांच्या उत्तरकाळात नष्ट झाल्या. नैसर्गिक आपती व मानवी संहार यांची झळ त्यांना लागत गेली त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या जतनवस्तूंवरही झाला. इ.स.पू. १७९२ ते १७५० च्या दरम्यान बॅबिलोनियन सम्राट हामुराबी याने पुरातन कलावस्तू जतन करण्याच्या त्यावेळच्या रुढीस कायद्याचे स्वरुप दिले होते. बायबलच्या जुन्या करारामधील उल्लेखावरुन कलावस्तूंचे संरक्षण करण्याची पद्दत हिब्रू लोकांत होती, असे दिसून येते. हीच प्रवृत्ती ईजिस्शियन, ग्रीक, रोमन इ, संस्कृतींत आढळते. इराकमधील अर येथे केलेल्या उत्खननात (१९२२-३४) सर लेनर्ड वुली यांना, तेथे इ. स. पू. ५५० च्या सुमारास होऊन गेलेल्या बेलशॅझर नावाच्या बॅबिलोनियन राजाने पुरातन अवशेषांसाठी बांधलेले एक खास दालन आढळले. या दालनात इ. स. पू. २०५०, इ. स. पू. १७०० व इ. स. पू. १४०० या काळांतील कलावस्तू जतन केलेल्या अवस्थेत सापडल्या. तेथेच पक्कमृदेवरील कोरीव लेखांच्या प्रती मिळाल्या. त्यांतील एक लेख इ. स. पू. ६५० चा होता. बेलशॅझर राजाने अर येथील एका मंदिराची दुरुस्ती केलेलीही आढळून येते.

ईजिप्तमध्येही पुरातन वस्तूंचे संरक्षण करण्याचे प्रयत्न तेथील राजांनी केल्याचे आढळून येते. इ. स. पू. ७०० च्या सुमारास शॅबाका या राजाने त्याच्या संग्रहातील दोन हजार वर्षांपूर्वीच्या जीर्वावस्थेतील लेखाच्या प्रती पुन्हा तयार कराव्यात, अशी आज्ञा दिलीहोती. इ. स. पू. ६०० च्या सुमारास समेतिकस ह्या राजाने जुन्या शिल्पांप्रमाणे नवीन शिल्पे तयार करवून घेतली होती.हीरॉडोटस या प्राचीन ग्रीक इतिहासकाराने ग्रीस, सिरीया, ईजिप्त, इराक, काळ्या समुद्राचा उत्तर किनारा, बॅबिलोनिया इ. प्रदेशांमध्ये प्रवास करुन तेथील कलावस्तूंसंबंधीचे तपशील, जीर्णोद्धारपद्धती, बांधकाम इत्यादींची माहिती लिहिलेली आढळते.

सेंट मारिया, रोम येथील घंटाघर (सु. १२००) : पुन:स्थापनापूर्व (१९५८)               सेंट मारिया, रोम येथील घंटाघर (सु. १२००) : पुन:स्थापनोत्तर अवस्था (१९५८)

 

ॲलेक्झांड्रिया ह्या प्राचीन नगरात ग्रंथालय व संग्रहालये होती. विशेषतः रोमन सम्राट अ‍ँटोनी याने त्यांचे संगोपन व संवर्धन केल्याचा उल्लेख आढळतो. रोमन साम्राज्य नष्ट झाल्यावर तत्कालीन इमारतींचे संरक्षण करण्याचे प्रयत्न झाल्याचे आढळून येते. पाचव्या-सहाव्या शतकांनंतर यूरोपात जुने ग्रंथ, वस्तू व वास्तू यांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न झालेले आढळून येतात. धर्मयुद्धांच्या काळात यूरोपामधील धार्मिक स्थानांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती मिळते. चौदाव्या-पंधराव्या शतकांत कलावस्तूंचे जतन करण्याच्या कामास अधिक महत्त्व आले होते. फ्लॉरेन्स (इटली) येथील मेदीची घराण्याने कलावस्तूंच्या जतनासाठी फार प्रयत्न केले. कॉझ्मो देई मेदीची (१३८९-१४६४) ह्याच्या प्रासादात ग्रीक-रोमन मूर्ती व वस्तू जतन करुन ठेवलेल्या होत्या. फेर्दीनां दे मेदीची (१५४९-१६०९) ह्याने आपल्या प्रासादात अशा जुन्या वस्तूंचे प्रदर्शन भरविले व त्यासाठी कलावस्तूंच्या संरक्षणाचे महत्त्व लोकांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. ह्यामुळे त्याला यूरोपातील आधुनिक संग्रहालयाचा आद्य प्रणेता मानले जाते.

यूरोपातील राजेशाही व सरंजामशाही यांचा प्रभाव कमी झाल्यावर चर्चसारख्या धार्मिक वास्तू वगळता इतर बर्‍याच कलावस्तूंची व स्मारकांची आबाळ झाली. पण लवकरच त्यांच्या सुरक्षिततेकडे लोकांचे लक्ष वेधले. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, वगैरे राष्ट्रांतील संग्रहालयांत जगातील विविध कलावस्तूंचा संग्रह होऊ लागला. त्यासाठी जुने राजवाडे वापरण्यात आले, त्यामुळे त्या वाड्यांचाही जीर्णोद्धार झाला. तसेच संग्रहालयातील वस्तूंच्या संरक्षणाचा पश्न उपस्थित झाला. १८२५ ते १८३० च्या दरम्यान यूरोपात जुनाट व मोडकळीस आलेल्या कलापूर्ण वास्तूंच्या संरक्षणासाठी शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होऊ लागली. फ्रान्समध्ये आर्सीस द कोमाँ (१८०२-१८७३) या पुरातत्त्वज्ञाने प्रथम अशी मागणी केली व त्यानुसार फ्रेंच शासनाने जुन्या स्मारकांच्या रक्षणासाठी १८३० मध्ये एक यंत्रणा स्थापन केली. यानंतर बेल्जियम (१८३५), ऑस्ट्रिया (१८५३), इंग्लंड (१८८२), इटली (१९०९), स्पेन (१९२८) इ. देशांतून अशा यंत्रणा स्थापना करण्यात आल्या. यामुळे कायदेशीर मार्गाने स्मारके व अवशेषस्थाने यांचे रक्षण होण्याची व्यवस्था झाली.

कलावस्तूंचे संरक्षण करण्याच्या एकोणिसाव्या शतकापूर्वीच्या पारंपारिक पद्धतीविषयी फारसे लेखी पुरावे उपलब्ध नाहीत. पण त्या शतकाच्या मध्यास कलावस्तूंच्या संरक्षणाची विशेष जाणीव निर्माण झाली. इंग्लंडमध्ये संसदेने त्याकरिता नेमलेल्या एका खास समितीने राष्ट्रीय कलाविथींची पाहणी करुन तयार केलेल्या अहवालाचे कागदपत्र आजही उपलब्ध आहेत. त्या काळी चित्रकार, कारागीर व काही तज्ञ संरक्षणाचे काम करीत. तथापि संग्रहालयांतून हे कार्य समाधानकारकपणे चालत नसे. संरक्षणव्यवस्था धंदेवाईक पद्धतीने होत असल्याने त्यासंबंधीचीमाहिती गुप्त ठेवली जात असे. राष्ट्रीय कलाविथींमध्ये चित्रे स्वच्छ करणे व त्यावर व्हार्निशाचा थर देणे एवढेच काम होत असे. शास्त्रोक्त पद्धतीने चित्रावरील मुळचे व्हार्निश काढून घेऊन त्या जागी नवीन व्हार्निशाचा थर देण्याची पद्धत ज्ञात नव्हती. त्यामुळे चित्रे जास्तच खराब होत. खाजगी संग्रहालयातील चित्रे व वस्तू यांची निगा संग्राहक स्वतः ठेवी, पण सार्वजनिक संग्रहालयातील चित्रे व वस्तू यांची मात्र जास्त खराबी होऊ लागली होती. हवेतील धुळीचा विपरीत परिणाम वस्तूंवर होतो. संरक्षणासाठी वातानुकूलनव्यवस्था असणे आवश्यक आहे, याची जाणीव १८४४ च्या सुमारास होऊ लागली. त्यानंतर सु. १०० वर्षांनी ही व्यवस्था प्रत्यक्षात येऊ लागली.

संग्रहालयातील चित्रांच्या संरक्षणासाठी काचेचा उपयोग केल्यास त्यांचे संरक्षण चांगल्या रीतीने होते, असे १८५० मध्ये आढळून आले. पण काचेवरील प्रकाशाच्या परावर्तनामुळे ती पाहताना अडथळा निर्माण होतो. १८५१ मध्ये इंग्लंडमध्ये भरलेल्या कलाप्रदर्शनात परावर्तनरहित काच मांडण्यात आली होती. तिची चमक मात्र कमी करता आली नाही. कोरड्या साधनांनी चित्रे पुसणे, ओल्या स्पंजाच्या साहाय्याने चित्राचा पूष्ठभाग टिपणे इ. प्रकारांनी चित्रे स्वच्छ करण्यात येत. हे कार्य विविध लोक आपापल्या विशिष्ट पद्धतींनी करीत व ती पद्धत गुप्त ठेवीत. त्या विषयीचे लिखाण १८५० पर्यंत फारसे झाल्याचे आढळून येत नाही. तैलचित्रांच्या पृष्ठावर प्रथम व्हार्निशचा हात देत. नंतर हे व्हार्निश प्रकाशामुळे पांधरे होते, असे आढळून आले. हे होऊ नेये म्हणून त्यावेळी मानवी मूत्राचा उपयोग चित्रे धुण्यासाठी करण्यात आला व तो परिणामकारक ठरला. इटलीमध्ये त्यासाठी शुद्ध पाणी व बदामाचे तेल वापरीत. चित्रे साफ करण्यासाठी यूरोपात अक्लोहॉलचाही उपयोग केलाजात असे. यूरोपातील धंदेवाईक लोकांच्या जतनीकरणाच्या पद्धती शासकीय व सार्वजनिक संस्थांपेक्षा जास्त जालीम असत. नायट्रिक अम्लाने चित्रे धुणे, चित्राचा पृष्ठभाग भिजवून ते रात्रीच्या वेळी उघडे ठेवणे व नंतर जाड कपड्याने ते टिपणे, खास प्रक्रियेने पोटॅशियम कार्बोनेटाचा उपयोग करणे, अल्कोहॉल व व्हिट्रिऑल यांचे मिश्रण पितळी तारेच्या ब्रशाने लावणे, कांद्याच्या रशाचा उपयोग करणे इ. पद्धती त्यावेळी वापरात होत्या.

सार्वजनिक संग्रहालयापेक्षा खाजगी संग्रहालयात संरक्षणाचे उपाय जास्त प्रमाणात वापरण्यात येत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास इंग्लंडमध्ये यूरोपातील प्रमुख राष्ट्रांतील संग्रहालयांतून संरक्षणाचे कार्य जास्त प्रमाणात होऊ लागले, असे आढळते. विशेषत: इटलीमधील जुन्या इमारतींचे अवशेष, चित्रे व इतर कलात्मक वस्तू यांचे जतन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. तेथे कलावस्तूंचा व्यापारही मोठ्या प्रमाणावर चाले. फ्लॉरेन्स व व्हेनिस ही कलावस्तूंचा संरक्षणाची केंद्रे होती. फ्लॉरेन्समधील कारागीर अशा वस्तूंची डागडुजी करताना फार काळजीघेत. व्हेनिसमध्ये तो एक धंदाच झाला होता. रोममध्ये कमीत कमी साधनांच्या साहाय्याने चित्राचे संरक्षण करण्यात येत असे, तर जर्मनीत चित्राचा पृष्ठभाग पूर्वीप्रमाणेच ठेवून त्याचे संरक्षण करण्यात येत असे.

मॅस्टिक व्हार्निश आणि डमर व्हार्निश ह्यांचा चित्रसंरक्षणासाठी एकोणिसाव्या शतकात यूरोपात वापर करीत असत व आजही केला जातो. उकळलेले तेल व मॅस्टिक व्हार्निश यांचे मिश्रण चित्रपृष्ठ चमकदार व स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात यई. वापरण्यात येणारी व्हार्निशे विविध पद्धतींनी तयार करीत, पण ही कृती गुप्त राखली जात असे. मंद उजेडाने काही व्हार्निशे पिवळी होत. अशा खराब झालेल्या व्हार्निशांचा थर काढण्यासाठी साबण व पाणीयांचा उपयोग करीत. अर्थात त्यासाठी फार काळजी घ्यावी लागे. अशा वेळी मूळ चित्रावरील व्हार्निशाचा थर टिकविला जाई. तथापि तेल व्हार्निशाचा वापर हानिकारक मानण्यात यई. धंदेवाईक कारागीर मॅस्टिकऐवजी डामर व्हार्निशच वापरीत. जर्मनीत बरीच वर्षे डामर तैलचित्रांच्या संरक्षणासाठी वापरीत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास त्यावेळच्या पद्धतींनी पुनर्लेपन व आधारपृष्ठ-बदल हे दोन प्रकार जास्त खराब झालेल्या चित्रांच्या संरक्षणासाठी वापरत असत. जुन्या खराब झालेल्या कॅन्‌व्हासवरील चित्रे नव्या कॅन्‌व्हासवर घेण्याचे तंत्र १७२९ च्या सुमारास वापरात आले. पण हे कार्य काळजीपूर्वक न केल्यास चित्र नष्ट होण्याची वा खराब होण्याची शक्यता असते म्हणून ते तंत्र फारसे वापरले गेले नाही. ह्या तंत्रात नंतर झालेल्या प्रगतीमुळे ते सध्या अगदीच वाया गेलेली किंवा जाण्याची शक्यता असलेली चित्रे यांच्या बाबतीतच जास्त प्रमाणात वापरण्यात येते. एकोणिसाव्या शतकात यासाठी सरस व मेण वापरले जाई. मेण-रेझिन मिश्रणाचा वापर त्या शतकाच्या मध्यास यूरोपात करण्यात आला. या तंत्राचा उपयोग करुन १८७२ मध्ये पुनर्लेपित केलेली ॲम्स्टरडॅम येथील संग्रहालयातील काही चित्रे अजूनही सुस्थितीत आहेत. जुन्या भिंतीवरील वा लाकडावरील रंगीत चित्रे नव्या कॅनव्हासवर बदलून घेण्याचेतंत्र आता चांगलेच प्रगत झालेले असून भारतातही ते वापरण्यात येऊ लागले आहे.

यूरोपात अठराव्या शतकात कलावस्तूंचे संरक्षण करणारी काही विशिष्ट घराणी होती. ती धंदेवाईक वचित्रकलेचे साधारण ज्ञान असणारी होती. रसायनांचा वापर कसा करावा,याचे त्यांना फारसे ज्ञान नसे. काही संग्रहालयांत या कामासाठी पगारी नोकर ठेवण्यात येत. अशी प्रथा प्रथम फ्लॉरेन्स येथे अंमलात आली. रासायनिक पद्धतींनी कलावस्तू व चित्रे यांचे संरक्षण करण्याचे तंत्र व त्यासाठी तज्ञ नेमण्याची प्रथा दुसर्‍या महायुद्धानंतर, विशेषत: १९४८ नंतर, प्रचारात येऊ लागली.

अठराव्या शतकापासूनचयूरोपात पुरातन वस्तूंचा संग्रह व त्यांचे संरक्षण यांविषयी विशेष आवड निर्माण झाली. अशा वस्तू नीट सुरक्षित राखण्यासाठी संग्रहालये स्थापन झाली. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर पॅरिसमधील लूव्हर या पुरातन प्रासादाचे कला संग्रहालयात रुपांतर झाले. सतराव्या ते एकोणिसाव्या शतकांत इंग्लंड, फ्रान्स इ. यूरोपीय राष्ट्रांनी आपापल्या आफ्रो-आशियाई वसाहतींतून तसेच जपान, चीन, दक्षिण व उत्तर अमेरिका येथूनही मोठ्या प्रमणावर कलावस्तू आणून त्यांचा संग्रह यूरोप-अमेरिकेत केला. याच सुमारास टिकाऊ वस्तूंखेरीज प्राचीन व नाशिवंत वस्तूंच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. उत्खननांतून वस्तू गोळा करणे व काही वेळा जमेल तसे त्यांचे संरक्षण करणे, अशी तेव्हाप्रथा होती. तथापि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस यूरोपात आधुनिक व शास्त्रीय पद्धतींचा या कार्यासाठी वापर सुरु झाला. पुरातन अवशेषांच्या स्थळी पद्धतीशीर उत्खनने होऊ लागली, त्यांतमिळणार्‍या वस्तूकाळजीपूर्वक हाताळून त्या शास्त्रोक्त पद्धतीने जतन करण्यात येऊ लागल्या. प्रयोगशाळेत त्या तपासून घेऊन त्यांसाठी संरक्षक उपाय शोधण्यात येऊ लागले. नाशिवंत वस्तूंसाठी (उदा. वास्तूंचे भाग, बांधकाम इ.) त्यांचे नकाशे तयार करुन व छायाचित्रे घेऊन त्यांची नोंद करण्यात येऊ लागली. हाडांचे अवशेष, त्यांचे ठसे, जळलेल्या धान्यांचे अवशेष इ. जतन करण्यात आले. दगडाच्या, पक्कमृदेच्या व धातूंच्या मूर्ती, मणी इ. स्वच्छ करुन त्यांचे संरक्षण करण्यात आले. पिरॅमिडसारख्या भव्य वास्तूंच्या संरक्षणाचे प्रयत्न या शतकाच्या पूर्वार्धात सुरु झाले.

यूरोपीय तज्ञांनी १८४६ नंतर ग्रीस, इटली इ. देशांत पुरातत्त्वीय उत्खनने करुन अनेक अवशेषांचा शोध लावला व त्यांच्या संग्रहाचे कार्य केले. त्यानंतर गेल्या शतकाच्या अखेरीस पश्चिम आशिया, भारत, चीन, जपान, आग्नेय आशिया इ. भागांतील कलावस्तूंचा व अवशेषांचा शोध व संरक्षण करण्याच्या कार्यास महत्त्व प्राप्त झाले. विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर आधुनिक पद्धतींनी कलावस्तूंचे संरक्षण करण्यास यूरोपात व अमेरिकेत जास्त चालना मिळाली. दुसर्‍या महायुद्धानंतर या प्रश्नास जागतिक महत्त्व प्राप्त झाले.


संरक्षणविषयक जागतिक प्रयत्न : कलावस्तूंच्या संरक्षणासंबंधीच्या पद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने १९३० साली राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या कार्यालयामार्फत रोम येथे एक परिषद भरविण्यात आली. या परिषदेत कलावस्तूंच्या संरक्षणासाठी शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करावा व त्यासंबंधीची मूलभूत तत्त्वे प्रस्थापित करावीत, यांसाठी मोठा प्रयत्न करण्यात आला. दुसर्‍या महायुद्धनंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या यूनेस्को संघटनेमार्फत कलावस्तू, अवशेष व स्मारके यांच्या संरक्षणासाठी आर्थिक मदत व तज्ञांचे सहकार्य देण्याची योजना आखण्यात आली. यूनेस्कोतर्फे कलाव्स्तू व अवशेष यांच्या संरक्षणासाठी तज्ञ शिकवून तयार करणे, त्यांच्या ज्ञानाचा लाभ विविध देशांना उपलब्ध करुन देणे, संरक्षणकार्यासाठी लागणारी साधन साम्रगी पुरविणे तसेच आर्थिक मदत देणे ही कार्ये करण्यात येतात. युद्धकाळात संग्रहालये, अवशेषस्थाने, स्मारके इत्यादींवर हल्ले करु नयेत, असा ठराव यूनेस्कोने संमत केलेला आहे.

ईजिप्तमधील नाईल नदीवर बांधलेल्या आस्वान या प्रचंड धरणाच्या पाण्याखाली अबू सिंबेल ह्या पुरातन स्मारकाचे अवशेष बुडून नष्ट होऊ नयेत, म्हणून यूनेस्कोतर्फे ते मूळच्या ठिकाणाहून खंडशः कापून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले (१९६०-६६). या प्रकल्पास जगातील तेवीस राष्ट्रांतील तज्ञांनी सहकार्य केले. याचप्रमाणे इंडोनेशियाच्या मध्य जावा भागातील बोरोबूदुर या बुद्धमंदिराच्या संरक्षणाचे व दुरुस्तीचे कार्य यूनेस्कोतर्फे हाती घेण्यात आले आहे. भारतात आंध्र प्रदेशातील नागार्जूनकोंडा येथे कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणाच्या पाण्यात तेथील प्राचीन नगराचे अवशेष बुडू नयेत, म्हणून ते युनेस्को व भारत सरकार यांच्या सहकार्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. तमिळनाडू राज्यातील श्रीरंगम् बेटावरील श्री रंगनाथ स्वामींच्या पडझड झालेल्या प्रसिद्ध मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम यूनेस्कोतर्फे हाती घेण्यात आले आहे. याकरिता यूनेस्कोच्या दोन तज्ञांनी जीर्णोद्धराचा आराखडा तयार केलेला असून या कामात तमिळनाडू शासनातर्फेही सहकार्य केले जात आहे. हे कार्य १९६८ साली सुरु करण्यात आले असून ते पूर्ण होण्यास सु. २० वर्षे लागतील असा अंदाज आहे.

युनेस्कोच्या प्रोत्साहनाने कलावस्तूंच्या संरक्षणासाठी आणि संग्रहालयांच्या विकासासाठी ‘द इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्यूझीयम्स’ (आयकॉम) ही स्वयंपूर्ण संस्था १९४८ मध्ये स्थापन करण्यात आली. त्यानंतर १९६४ मध्ये ‘द इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॉन्युमेंटस अँड साइटस’ (आयकोमॉस) या नावाची जागतिक संस्था स्मारकांच्या व अवशेषस्थानांच्या संरक्षणासाठी स्थापन झाली.

आयकॉम या संस्थेची मुख्य कचेरी पॅरिस येथे आहे. जगातील विविध ठिकाणी या संस्थेतर्फे सभा, बैठका व शिबिरे भरविली जातात. भारतातील या संस्थेची शाखा ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर आयकॉम’ या नावाने ओळखली जाते. आयकॉम या संस्थेच्या प्रयोगशाळेमार्फत विविध संग्रहालयांतील कलावस्तूंच्या संरक्षणाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. संग्रहालयातील कर्मचार्‍यांना या विषयांचे प्रशिक्षण देणे व तज्ञ तयार करणे यांसारखी कार्येही ही संस्था करते. दक्षिण व आग्नेय आशियातील कलावस्तूंच्या संरक्षणासाठी या संस्थेने खास विभाग स्थापन केलेला असून या विभागाच्या प्रमुखपदावर श्रीमती ग्रेस मोर्ले यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या सहकार्याने भारतात ‘नॅशनल म्यूझियम’ ही संस्था स्थापन झालेली आहे. भारतीय शिक्षण खात्यातर्फे अभिरक्षकांकरिता शिबिरे भरवून, प्रशिक्षणाद्वारे संग्रहालयतज्ञ निर्माण करण्यासाठी श्रीमती मोर्ले यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. इतर आशियाई राष्ट्रांमध्येही या संस्थेतर्फे अशाच स्वरुपाचे प्रयत्न केले जात आहेत.

आयकोमॉस ही संस्था व्हेनिस येथे स्थापन करण्यात आली. ही संस्था जगातील विविध राष्ट्रांतील शासने, संबंधित संस्था व व्यक्ती यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने स्मारके व अवशेषस्थाने यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. ही संस्थेची भारतातही शाखा आहे.

आयकॉम व आयकोमॉस ह्या आंतरराष्ट्रीय संस्थांखेरीज रोम येथील ‘द रोम सेंटर’ आणि ‘द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कँझर्व्हेशन ऑफ हिस्टॉरिक अँड आर्टिस्टिक वर्क्स’ या संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कलावस्तू-संरक्षणाचे कार्य करीत आहेत.

अमेरिकेतून तसेच प्रगत यूरोपीय राष्ट्रांतून पुरातन कलावस्तू, अवशेष व स्मारके यांच्या संरक्षणासंबंधी मोठ्या प्रमाणावर संघटित व शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न होत आहेत. आशिया व आफ्रिका येथील विकसनशील राष्ट्रांतूनही या प्रश्नांसंबंधी जाणीव निर्माण झाली असून राष्ट्राराष्ट्रांतून तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर या दृष्टीने प्रयत्न होत आहेत.

भारतातील संरक्षणविषयक प्रयत्न : पुरातन कलावस्तू, स्मारके, पूजास्थाने इत्यादींच्या संरक्षणाची भारतीय परंपरा हडप्पा किंवा सिंधू या नगरी संस्कृतीपासून अजमावता येते. २८०० ते ३०० इ. स. पू. या कालखंडातही जतनाचे व जीर्णोद्धाराचे कार्य होत असावे, असे दिसते. इ. स. पू, ३०० नंतर सौंदर्यस्थळे निर्माण करण्याची व ती टिकविण्याची परंपरा वाढीस लागली. सम्राट अशोकाच्या काळापासून ते इ. स. १३०० पर्यंत भारतात असंख्य मंदिरे, चैत्य, स्तूप, इतर वास्तू इत्यादींची निर्मिती झाली व त्यांच्या जतनात व जीर्णोद्धारात तत्कालीन शासनसंस्था, दानशूर श्रीमंत लोक इत्यादींनी महत्त्वाचा भाग घेतलेला आढळतो. पूर्वीच्या काळी जीर्णोद्धाराचे हे कार्य पुण्यप्रद व मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून मानले जात असे. जतनाच्या या कार्यास भारतीय शिलालेखांतून ‘खंड स्फुट संस्कार’ असे नामाभिधान आढळते. जतन व जीर्णोद्धार या द्दष्टीने इ. स. ६००ते १४०० या काळात जास्त प्रयत्न झालेले दिसतात. विशेषत: ‘दोष, विनाश व अववृद्धी’ हे त्रिदोष ज्या वस्तूंच्या ठिकाणी निर्माण होतात, त्या दुरुस्त करुन जतन करणे, ह्यासच रक्षण ही संज्ञा होती. या कार्याकरिता शासनातर्फे वसूल करण्यात येणार्‍या करास ‘दानादाय’ व मोठ्या प्रमाणावर दान देणार्‍यास ‘दानपती’ संबोधल्याचे आढळून येते. सम्राट अशोकाने भगवान बुद्धाचे जन्मग्राम लुंबिनी यास भेट दिली आणि ते स्थान संरक्षणीय ठरविले, असा उल्लेख आढळतो.

भारतावर झालेल्या परकीय स्वार्‍यांमध्ये अनेक ठिकाणच्या कलावस्तूंची व अवशेषस्थानांची फार मोठी हानी झाली. तथापि त्या काळातील अडचणीस तोंड देऊन ठिकठिकाणी सतत जीर्णोद्धारांची कार्ये झालेली आढळतात. मध्ययुगात अनेक राजे लोकांनी मंदिरांचे जीर्णोद्धार करण्याकरिता तसेच त्यांची योग्य प्रकारे देखभाल व्हावी, म्हणून काही उत्पन्न दान दिल्याचे उल्लेख तत्कालीन कोरीव लेखांतून आढळतात. उदा., महाराष्ट्रामध्ये मार्डी (जि. सोलापूर) येथे मिळालेल्या यादवकालीन शिलालेखावरुन (इ.स. १२१२) यादव नरेश भिल्लम राजाने मार्डीनजीकच्या योगेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धरासाठी दान दिल्याचा उल्लेख आढळतो. याशिवाय विजयानगरचा सम्राट कृष्णदेवराय (कार. १५०९-१५२९) याने मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठीएक निधी उभारला होता. यास पुढे मोठे स्वरुप प्राप्त झाले, असे उल्लेख विविध लेखांतून आढळतात.


सतराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतचा काळ हा भारतीय कलास्थाने, मंदिरे व स्मारके यांच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतंत्र राज्य स्थापून हिंदूंची मंदिरे, मुसलमानांच्या मशिदी, प्रार्थनास्थाने व इमारती यांच्या संरक्षणाचे व जीर्णोद्धाराचे धोरण कार्यवाहीत आणले. मराठी राज्यकर्त्यांमुळे सतराव्या-अठराव्या शतकांत महाराष्ट्रातीलच नव्हे, तर दक्षिण व उत्तर भारतातील बर्‍याच मंदिरांचा व इमारतींचा जीर्णोद्धार झाला. तसेच उत्तरेतील राजपूत राजे व दक्षिणेतील नायक वगैरे राजांनी या काळात पुरातन मंदिरे व कलाकृती यांच्या जीर्णोद्धांराचे कार्य केल्याचे आढळून येते.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाने भारतील कला व अवशेषस्थानांच्या रक्षणासाठी काही उपाय योजिलेले आढळत नाहीत. उलट या काळात अशा स्थानांची आबाळ वाढतच गेली. राजवाडे, मंदिरे, मशिदी इ. वास्तूंना १८०० ते १८६० या काळात अवकळा आली. बर्‍याच वेळा स्मारकांच्या इमारती लष्कराच्या उपयोगासाठी वापरल्या जात होत्या. काही इमारतीचे भाग काढून ते इंग्लंडला पाठविण्यात आले. खाजगी मालकीची स्मारके व कलावशेष यांचीही बरीच हानी झालेली आढळते. कला व अवशेषस्थानांचा शासनाचा आश्रयही संपुष्टात आला होता. या काळात लाल किल्ला, ताजमहाल, विजापूरचा गोलघुमट इ. सुंदर वास्तू मोडकळीस आल्या होत्या. १८३२ ते १८४० या दरम्यान कंपनीचा कलकत्ता येथील एक अधिकारी जेम्स प्रिन्सेप याने भारतीय पुरातन शिलालेख, नाणी, इमारती व अवशेषस्थाने यांचा अभ्यास करुन त्यांच्या संरक्षणाकडे कंपनी सरकारचे लक्ष वेधविले. कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटीच्या संग्रहालयातील कलावस्तूंचे संरक्षण करण्याकरिता त्याने कंपनी सरकारकडून मदत मिळविली. त्यानंतर अलेक्झांडर कनिंगहॅम, एड्वर्ड, टॉमस, वॉल्टर एलियट, जे. स्टीव्हन्सन, जेम्स फर्ग्युसन, मेडोझ टेलर, भाऊ दाजी इत्यादींनी भारतीय पुरातन अवशेष व स्मारके यांच्या अभ्यासास व संरक्षणास अधिक चालना दिली. १८४४ मध्ये इंग्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीने कंपनी सरकारला संरक्षणासंबंधी काही उपाय सुचविले. त्यानुसार अजिंठा, वेरुळ यांसारख्या लेण्यांच्या दुरुस्तीची योजना तयार करण्यात आली पण कंपनी शासनाने ती नापसंत केली. त्यानंतर लॉर्ड हेंरी हार्डिग याने तयार केलेली एक योजना मंजूर करण्यात येऊन पाहणीचे कार्य सुरु झाले. १८५८ मध्ये इंग्रजी अंमल प्रस्थापित झाल्यावर अशा स्थानांच्या संरक्षणाचा ब्रिटिश सरकारला विचार करणे भाग पडले. त्यावेळी भारतीय कला व पुरातन स्थाने यांचा अभ्यास करुन यूरोपीय तज्ञांनी त्यासंबंधी महत्त्वाचे ग्रंथ लिहीण्यास सुरुवात केली होती. भारतातही अशा तज्ञांची परंपरा वाढू लागली होती.

सरकारने अशा स्थानांच्या संरक्षणाची नैतिक जबाबदारी १८६१ साली स्वीकारली व त्यासाठी पाहणी, अभ्यास व प्रत्यक्ष संरक्षणाचे कार्य हाती घेतले. १८६१ मध्ये कनिंगहॅम याने कंपनी सरकारच्या काळात भारतीय कलावशेष व स्मारके यांच्याकडे झालेले दुर्लक्ष व त्यांच्या संरक्षणाचे महत्त्व यांचा खुलासा करणारा एक प्रस्ताव लॉर्ड कॅनिंग याला सादर केला. लॉर्ड कॅनिंगने उत्तर भारतातील स्मारकांच्या पाहणीची योजना मंजूर करुन हे काम कनिंगहॅम याच्याकडे सोपविले. तथापि या योजनेत स्मारकांच्या संरक्षणाचा समावेश नव्हता. लॉर्ड कॅनिंग याच्या कारकीर्दीत ऐतिहासिक स्मारकांची हानी होऊ नये, या दृष्टीने एक कायदा करण्यात आला. लॉर्ड कॅनिंगहॅम याने कलावशेषांच्या संरक्षणाच्या कार्यास चालना देण्याकरिता १८६१ मध्ये पुरातत्त्व विभाग स्थापन केला. तथापि १८६६  मध्ये लॉर्ड लॉरेन्स याने हा विभाग बंद केला. त्यानंतर सर नॉर्थकट याच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारने भारतातील स्मारके व अवशेष यांची यादी करणे, छायाचित्रे घेणे इ. सूचना स्थानिक अधिकार्‍यांना दिल्या. तथापि संरक्षणाच्या दृष्टीने मात्र काही कार्य झाले नाही. १८६९ नंतर ड्यूक ऑफ आर्गाइल याने त्यावेळचे ग्व्हर्नर जनरल लॉर्ड मेयो याला कलावस्तू व अवशेषांच्या संरक्षणाच्या प्रश्नाचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार ‘आर्किऑलॉजिकल सव्हें ऑफ इंडिया’ या स्वतंत्र खात्याची १८७१ मध्ये स्थापना करण्यात आली. त्याच वर्षी मध्यवर्ती शासनाचा पुरातत्त्व विभाग पुन्हा सुरु झाला. पण स्मारकांच्या संरक्षण योजनेचे कार्य या खात्याकडे सोपविले नव्हते. १८७३ साली ऐतिहासिक इमारती व स्मारके यांच्या  संरक्षणाची जबाबदारी स्थानिक शासनाकडे सोपविण्यात आली. गुप्तधन-शोधकांकडून अवशेषस्थानांची हानी होऊ नये, याकरिता १८७८ साली लॉर्ड लिटन याने एका कायदा केला व त्यानुसार जमिनीत सापडलेल्या दहा रुपयांहून अधिक किंमतीच्या धनाची मालकी शासनाकडे आली. ऐतिहासिक इमारती व स्मारके यांच्या संरक्षणाची जबाबदारी १८८० साली स्थानिक अधिकार्‍यांकडून काढून घेण्यात येऊन त्यासाठी ‘क्यूरेटर ऑफ एन्शंट मॉन्युमेंटस’ हे अधिकारपद निर्माण करण्यात आले व त्यावर १८८१ साली मेजर कोल याची नेमणूक करण्यात आली. या अधिकार्‍याने मध्यवर्ती व स्थानिक शासनांस अवशेषांच्या व स्मारकांच्या संरक्षणासाठी व्यावहारिक सल्ला द्यावा, असे ठरविण्यात आले. कोल याच्या कारकीर्दीत (१८८१-८३) सांची, आग्रा, फतेपुर, सीक्री, मथुरा, वृंदावन वगैरे ठिकाणच्या इमारती व स्मारके यांची दुरुस्ती करण्यात आली. पुढे हे अधिकारपद रद्द करण्यात येऊन पुन्हा संरक्षणाची जबाबदारी स्थानिक अधिकर्‍यांकडे सोपविण्यात आली. परंतु कोलने वापरलेली संरक्षणपद्धत सर्वमान्य झाली. ऐतिहासिक महत्त्व व स्थिती लक्षात घेऊन अवशेषस्थानांचे, सतत सुस्थितीत ठेवण्याची स्थाने, किरकोळ दुरुस्ती करुन दुरवस्था वाढू न देण्याची स्थाने व इतर स्थाने असे तीन विभाग करण्यात आले. संरक्षणाचा खर्च प्रांताने करावा व विशेष महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी मध्यवर्ती शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, असे ठरले. १८९९ पर्यंत पुरातत्त्व विभागाच्या रचनेत थोडेफार फेरबदल करण्यात आले. तथापि संरक्षणाचे कार्य स्थानिक शासनाकडेच राहिले व हे कार्य फारसे समाधानकारकपणे झाले नाही. लॉर्ड कर्झनच्या कारकीर्दीत (१८९९-१९०५) पुरातत्त्व खात्याची पुर्नरचना करावी व संरक्षणासह सर्व कार्य महासंचालकाकडे सोपवावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला व तो मंजूरही झाला. त्यानुसार जॉन मार्शल यांची १९०२ मध्ये महासंचालक पदावर नेमणूक झाली. ज्यांचे नूतनीकरण करता येणार नाही, अशा इमारती आहे त्या स्थितीत ठेवणे, अपरिहार्य असेल तरच इमारती पाडणे व दुरुस्त करणे, शिल्पे व नक्षीच्या लाकडी कामाची दुरुस्ती जुन्या पद्धतीनेच करणे, तसेच धार्मिक वा सांस्कृतिक मूर्ती वा देखावे यांचे पूर्णपणे पुनरुज्जीवन न करणे अशी तत्त्वे संरक्षणाच्या दृष्टीने १९०३ साली ठरविण्यात आली. १९०४ साली ‘एन्शंट मॉन्युमॅट प्रिझर्व्हेशन ऍक्ट’ अंमलात आला व त्यानुसार धार्मिक स्थानांखेरीज इतर पुरातन इमारती, ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तू व स्मारके शासनाने ताब्यात घेणे, यासारख्या संरक्षणोपयोगी बाबीस प्राधान्य देण्यात आले.

वरील तत्त्वांनुसार आग्रा येथील किल्ला, ताजमहाल, कुतुबमीनार, मोगल बादशहांनी बांधलेले राजमहाल, कोनारकचे सूर्यमंदिर, अजमेर येथील मशीद, अबू येथील दिलवाडा मंदिर, चितोडचा विजयस्तंभ, धार व मांडू येथील स्मारके, विजापूरचा गोलघुमट इ. प्रमुख स्थानांची दुरुस्ती करण्यात आली. १९०६ मध्ये ब्रिटिश सरकारने पूर्वी स्थापलेला पुरातत्त्व विभाग ही शासनाची कायमची व्यवस्था म्हणून मान्य करण्यात आली. १९१९ मध्ये १९०४ च्या कायद्यानुसार संरक्षण्योग्य म्हणून जाहीर झालेली भारतातील सर्व स्मारके कायदेशीर रीत्या मध्यवर्ती शासनाच्या संरक्षणव्यवस्थेखाली आली. मार्शलने खुल्या स्मारकांच्या संरक्षणाची पद्धती स्पष्ट केली, तसेच संग्रहालयातील वस्तूंच्या संरक्षणावरही भर दिला. याच काळात तक्षशिला, मोहें-जो-दडो, हडप्पा, सारनाथ, खजुराहो, नालंदा इ. ठिकाणच्या वास्तू व अवशेष यांच्या संरक्षणासाठी संग्रहालये स्थापन झाली. भारतीय संस्थानिकांनी संग्रहालयांतील कलावस्तू व संस्थानांतील ऐतिहासिक स्मारके यांच्या संरक्षणाविषयी महत्त्वाची कामगिरी केली. १९३७ पासून ऐतिहासिक वस्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णतया मध्यवर्ती शासनाकडे सोपविण्यात आली. त्या सुमारास बर्‍याच ठिकाणी उत्खनने होऊन पुरातन भारतीय अवशेष काळजीपूर्वक संगृहीत आणि संरक्षित होऊ लागले. १९४४ नंतर वस्तुसंरक्षणाच्या पद्धतीत अधिकाधिक प्रगती होऊ लागली. संरक्षणव्यवस्थेसाठी नवीन सरकारी व्यवस्था करण्यात आली. विभागवार संरक्षणव्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंत्याची नेमणूक करण्यात आली. १९४७ मध्येसग्रहालयांच्या मदतीस साहाय्यक पुरातात्विक रसायनशास्त्रज्ञाची नेमणूक करण्यात आली. त्यावेळचे महासंचालक मॉर्टिमर व्हीलर यांनी कलावस्तूंच्या संरक्षणपद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी वर्ग सुरु केले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर १०० वर्षांपूर्वीच्या कोणत्याही भारतीय अवशेषांची शासनाच्या परवान्यावाचून निर्यात करणे, हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा ठरविण्यात आला. भारतीय संविधानानुसार कलावस्तू व अवशेष यांच्या संरक्षणाची जबाबदारी मध्यवर्ती शासन व राज्य शासन यांच्यावर सोपविण्यात आली. भारतीय संसदेने राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून जाहीर केलेली स्मारके मध्यवर्ती पुरातत्त्व विभागाने सुरक्षित ठेवावीत व बाकीच्या स्मारकांचे संरक्षण त्या त्या राज्य शासनाने करावे, असे ठरविण्यात आले.


स्वातंत्र्योत्तर काळात कलावस्तू व अवशेषस्थानांच्या सरंक्षणासाठी आधुनिक शास्त्रीय पद्धतींचा अधिकाधिक अवलंब करण्यात येत आहे. भारतातील पुरातन अवशेष निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशांत विखुरलेले असल्यामुळे संरक्षणाचा प्रश्न काहीसा अवघड आहे. हे कार्य मध्यवर्ती शासन, राज्य शासन, यूनेस्को व इतर आंतररष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने होत आहे. आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेतर्फे सु. ३,५०० महत्त्वाच्या कलास्थानांच्या व पुरातन राष्ट्रीय स्मारकांच्या संरक्षणाची काळजी घेतली जाते. सुमारे तितकीच स्मारके राज्य शासनांतर्फे जतन केली जात आहेत. भारतीय संग्रहालयातील कलावस्तूंचे संरक्षण करण्याकरिता मध्यर्ती शासनाच्या शिक्षण विभागाकडून भारतीय तज्ञ शिकवून तयार केले जात आहेत. या कार्याचे मध्यवर्ती केंद्र नॅशनल म्यूझीयममधील अद्ययावत प्रयोगशाळेमध्ये असून बडोदा, कलकत्ता, बनारस इ. विद्यापीठातून कलावस्तू-संरक्षणांचे अभ्यासक्रम ठेवलेले आहेत.

मध्यवर्ती शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे अनेक पुरातन स्थानांचा आधुनिक पद्धतीनीं जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. ताजमहालाच्या जार्णोद्धारासाठी व इमारतीलील दोष नष्ट करण्यासाठी १९४६-६१ या काळात सु. १६ लाख रुपये खर्च करण्यात आले. इमारतीमध्ये पावसाळ्यात गळणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीच्या पृष्ठभागावर जागोजागी निसटलेले मौल्यवान रंगीत खडे पुन्हा बसविण्यात आले आहेत. अजिंठा, वेरुळ येथील लेण्यांतील शिल्पांच्या व भित्तिचित्रांच्या संरक्षणाचा प्रश्न पुरातत्त्व विभागाने हाती घेतलेला आहे. भिजलेल्या व तूटफूट झालेल्या भागांची पूर्वीच्या पद्धतीनेच जागजागी दुरुस्ती करण्यात आली. दगडी शिल्पे, मूर्ती वगैरे भाग मात्र सिमेंट काँक्रीटने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भित्तिचित्रांच्या संरक्षणासाठी रासायनिक पद्धतींचा उपयोग करण्यात येत आहे. अजिंठ्यातील छातावरील चित्रांचा ढिला झालेला चुन्याचा गिलावा पक्का व स्वच्छ करण्यात आला. वेरुळ येथील भित्तिचित्रांवरील तेलाचे थर काढण्यात आलेले असून चित्रांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. विजापूर येथील गोलघुमटाची इमारत, घुमटाच्या आतील भागाच्या गिलाव्यास चिरा पडल्यामुळे पावसाळ्यात गळत असे. त्याकरिता १९४९ मध्ये सर्व गिलाव्याची दुरुस्ती करण्यात आली. ओरिसातील कोनारक येथील सूर्यमंदिरावर पाऊस, ऊन व वारा यांमुळे मोठा अनिष्ट परिणाम झालेला आहे. या मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम पुरातत्त्व विभागातर्फे चालू आहे. आसामातील शिवसागर येथील शिवादोल हे प्रख्यात मंदिर १९४७ ते १९५० मध्ये झालेल्या भूकंपांत बरेचसे कोसळले. ते पुन्हा पूर्वस्थितीत आणण्याचे कार्य करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा येथील राजवाड्यातील भित्तिचित्रांपैकी सु. १०० चित्रे व ३४ चित्रपट्टया नॅशनल म्यूझीयमच्या शास्त्रीय संरक्षणविभागाने आधुनिक पद्धतीने काढून संरक्षित केलेल्या आहेत. यूनेस्कोच्या सहकार्याने नागार्जुनकोंडा व एलेवरम् येथील पुरातन अवशेष सुरक्षित स्थळी हलविणे व श्रीरंगम् बेटातील मंदिराचा जीर्णोद्धार करणे ही कार्ये करण्यात आलेली आहेत. यांशिवाय अनेक किल्ले, मंदिरे, स्तूप, राजवाडे, शिल्पे, लेणी इत्यादींच्या संरक्षणाची पुरातत्त्व विभागामार्फत काळजी घेतली जात आहे.

संग्रहालयातील कलावस्तूंचे संरक्षरण : संग्रहालयांत तसेच मोठ्या पूजास्थानांत वा देवस्थानांत उत्तमोत्तम दगडी मूर्ती, लाकडी कोरीव कामे, दागदागिने, भरजरी वस्त्रे चित्रे, हस्तलिखिते, काचेच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू इ. अनेक प्रकारच्या कलावस्तू संगृहीत करण्यात आलेल्या आहेत. ह्या वस्तू हवामान, प्रकाश, उष्णता, कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), सूक्ष्म जंतू इ. नैसर्गिक कारणांनी तसेच हाताळण्याने व वाहतुकीस खराब होण्याची शक्यता असते. मुळातच काही वस्तू तुटल्याफुटलेल्या असतात. अशा वस्तूंची योग्य प्रकारे मांडणी करण्याबरोबरच त्यांची सतत निगा राखणेही आवश्यक असते.

संगृहीत वस्तूंच्या संरक्षणासाठी त्यांची रसायनशास्त्रज्ञांकडून तपासणी करुन घेऊन व त्या खराब होण्याची कारणे शोधून काढून योग्य ते इलाज करणे आवश्यक असते. यासाठी तज्ञांची गरज असते. अंदाजाने वा अल्प माहितीच्या आधारे उपाययोजना केल्यामुळे मूळ वस्तू खराब होण्याची अगर नष्ट होणाची भीती असते. वस्तूंची निगा ठेवण्याचे दोन प्रकार आहेत : वस्तूंची स्वच्छता व किरकोळ प्रथमोपचार संग्रहालयातील जाणकार कर्मचारी करु शकतात. तथापि वस्तूंची दुरुस्ती किंवा काही कारणांनी खराब झालेल्या भागांचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता असल्यास तज्ञांमार्फतच इलाज करणे जरुर असते. संग्रहालयातील वस्तूंबरोबरच त्यातील प्रवेशद्वारे, खिडक्या व खालची जमीन किंवा फरशी ही सर्व, विविध रासायनिक द्रव्ये वापरुन,  स्वच्छ ठेवावी लागतात.

संग्रहालयातील वस्तूंच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचे अकार्बनी व कार्बनी असे वर्गीकरण करावे लागते. दगडी शिल्पे, धातूंच्या, काचेच्या, चिनी मातीच्या वस्तू, मातीची भांडी, पक्कमृदेच्या मूर्ती इ. अकार्बनी प्रकारात मोडतात तर लाकूड, कागद, कापड, कातडी, हाडे, हस्तिदंत इ. कार्बनी प्रकारात येतात. काही वस्तू मिश्र प्रकारातही मोडतात. चित्रे हा स्वतंत्र प्रकार असला, तरी ती जलरंगात, तैलरंगात किंवा पारंपारिक रंगात रंगविली व कॅनव्हास, कापड, कागद किंवा लाकडाची फळी इत्यादींच्या पृष्ठांवर काढलेली असतात. त्यामुळे ती बहुश: कार्बनी प्रकारात मोडतात. तथापि त्यांत रंगाचे माध्यम मिश्र स्वरुपाचे असते. कार्बनी वस्तू अकार्बनी वस्तूंपेक्षा अधिक लवकर नाश पावू लागतात. त्यांचे संरक्षण केले, तरी त्यांच्यात संरचनात्मक बदल होऊन किंवा रासायनिक अपघटन होऊन त्या नष्ट होतात. त्यामुळे कार्बनी वस्तूंची सातत्याने काळजी घ्यावी लागते. संग्रहालयातील वस्तू कपाटात किंवा उघड्या स्थितीत प्रदर्शित करण्यात येतात व कित्येक भांडारात ठेवल्या जातात. दोन्ही ठिकाणी त्यांची नियमित निगा ठेवणे जरुर असते. मुख्य काळजी हवामानासंबंधी घ्यावी लागते. वेगवेगळ्या हवामानांत तपमान व आर्द्रता यांत फरक पडत असल्यामुळे वस्तूवर विपरीत परिणाम होत राहतो. त्यामुळे हवामानाचा विशेष परिणाम होण्याची शक्यता असणार्‍या वस्तू २१ से. ला ५०-६०% ही सापेक्ष आर्द्रता असणार्‍या वातानुकूलित खोलीत ठेवणे आवश्यक असते. तथापि अशी व्यवस्था सर्वत्र करणे शक्य नसल्याने तंज्ञांच्या सल्ल्यानुसार आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी योग्य ते पर्यायी उपाय योजले जातात. हवेत सल्फर डाय-ऑक्साइड हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डाय-ऑक्साइड व धूळ हे घटक कमीअधिक प्रमाणात असतात. सल्फर डाय-ऑक्साइड व हवेतील बाष्प मिळून सल्फ्यूरस अम्ल तयार होऊन त्याचा परिणाम विशेषत: कातडे, कागद, वस्त्र व धातूंच्या वस्तू यांवर होतो. याकरिता वातानुकूलनाची व्यवस्था हाच एक उपाय असतो. तथापि पर्यायी उपाय म्हणून धातूंच्या वस्तू विशेषत: चांदीच्या वस्तू, स्वच्छ करुन त्यांवर पॉलिमिथिल मेथॅक्रायलेट किंवा पॉलिव्हिनिल ऍसिटेट व टोल्यूइन यांच्या मिश्रणाचा संरक्षक लेप देतात. स्वच्छता करताना उडणारी धूळ टाळण्यासाठी खालची फारशी ओल्या फडक्याने पुसतात किंवा निर्वात स्वच्छक वापरतात.

संग्रहालयातील बाहेरुन येणारा दिवसाचा प्रकाश त्यातील मुख्यत्वे करुन कार्बनी वस्तूंना  जास्त हानिकारक असतो. प्रकाशातील जंबुपार (जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य किरण), अवरक्त (तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य किरण) व दृश्य किरणे यांचा परिणाम होतो. रंगीत चित्रे व वस्तू फिक्या होतात. यासाठी सूर्यप्रकाश व विद्युतप्रकाश यांचे सुयोग्य नियोजन करावे लागते. नाजूक कलावस्तू आलटून पालटून प्रदर्शित कराव्या लागतात. तसेच प्रदर्शनकक्षातील प्रकाशयोजना अप्रत्यक्ष पद्धतीची असावी लागते व वस्तूंवर पडणारा प्रकाश एकविध असणे जरुर असते. प्रदर्शन-चौकटीतून किंवा कपाटांतून जंबूपार किरण-प्रतिबंधके बसवितात.


कसर, वाळवी, कवक, सूक्ष्मजंतू इत्यादींचा लाकूड, कापड, कागद, कातडी इ. कार्बनी वस्तूंवर परिणाम होतो. ह्या जीवांची वाढ होऊ नये, म्हणून संग्रहालयातील कक्ष व भांडारे यांतील हवा खेळती व स्वच्छ ठेवण्यात येते. आवश्यक त्या कवकनाशकांचा व कीटकनाशकांचा उपयोग करण्यात येतो. कीटकनाशके कपाटांच्या आत ठेवण्यात येतात. याकरिता थायमॉल स्फटिकांचा उपयोग चांगला होतो. लाकडी वस्तूंसाठी सोडियम फ्ल्युओराइड, सिलिको फ्ल्युओराइड व मर्क्यूरिक क्लोराइड यांचा पाण्यातील विद्राव वापरतात. चित्रांच्या पाठीमागील बाजूस थायमॉल व अल्कोहॉल यांचे मिश्रण लावतात. भांडारास अशाच द्रव्यांची धुरी देतात. संग्रहालयात येणार्‍या नव्या वस्तू स्वच्छ व निर्जंतुक करुन घेतात. धुरी देण्यासाठी कार्बन डाय-सल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड, मिथिल ब्रोमाइड व गॅमेक्झिन यांचा उपयोग करतात. लाकडी कपाटांसाठी डी. डी. टी. चा फवारा मारतात. डी. डी. टी. ची पूड भांडारातील कपाटांच्या खाली ठेवतात. नॅप्थाच्या गोळया किंवा पॅरा-डाय-क्लोरोबेंझीन याचाही वापर करतात.

वस्तूंची निगा व स्वच्छता ठेवताना योग्य ती साधने काळजीपूर्वक वापरतात. स्वच्छतेसाठी नेहमी ब्रश मऊ वापरतात. वस्तू हलविताना अतिशय काळजी घेण्यात येते.

प्रदर्शन कक्षाप्रमाणेच भांडारातील हवा मोकळी, धूळरहित असावी लागते व प्रकाश प्रमाणित ठेवावा लागतो. त्यात अग्निशामकाची व्यवस्था करावी लागते. कपाटे लोखंडी व पोलादी असल्यास आतील वस्तूंचे आगीपासून रक्षण होते तथापि धातू ही उषणतेची  सुसंवाहक असल्यामुळे अशा कपाटातील कार्बनी वस्तूंवर त्वरेने विपरीत परिणाम होतो. तसेच त्यात आर्द्रताही शिरण्याची शक्यता असते. लाकूड आर्द्रता शोषून घेते पण त्यास आगीचा धोका असतो. याकरिता योग्य त्या कलावस्तूंसाठी लाकडाचे वा लोखंडाचे कपाट वापरण्यात येते. धातूंच्या वस्तूंवर गंज व दगडी शिल्पांवर लवणयुक्त थर चढू नये म्हणून काळजी घेतात. चांदीची व बिडाची भांडी मलिन होऊ नयेत म्हणून विशिष्ट प्रकारच्या कागदात गुंडाळून ठेवतात. विशेष काळजीसाठी दगडी वस्तूंवर पॉलिथीनचा थर देतात. काचेच्या वस्तू लाकडी कपाटात कोरड्या वातावरणात ठेवतात.

वस्त्रे : वस्त्रे ठेवावयाच्या विभागात हवामान खेळते ठेवतात. प्रकाशाचा उपयोग आवश्यक तरच करतात. लहान वस्त्रे दुसर्‍या कापडावर शिवून काचेच्या कपाटात ठेवतात. कापडाला घड्या घालण्याचे टाळतात व घालावयाच्या असल्यास त्यावर टिश्यू कागदाचा वापर करतात. भांडारात वस्त्रे पुठ्ठयांच्या नळीवर किंवा पॉलिथीन लावलेल्या ऍल्युमिनियमच्या दंडगोलावर गुंडाळून ठेवतात.

लाकडी वस्तू : लाकडी वस्तूंच्या संरक्षणासाठी भांडारातील सापेक्ष आर्द्रता ५५% असावी लागते व त्यांचे वार्‍याच्या सरळ झोतापासून संरक्षण करावे लागते. लाकडाचा प्रकार अभ्यासून संबधित वस्तूंचे आकारमान कायम ठेवण्यासाठी व धुळीपासून रक्षण करण्यासाठी धुरी देणे, विशिष्ट रसायने वापरणे, पॉलिथीन, मेण, रेझिन यांचा थर देणे इ. उपाय योजितात.

चित्र : संग्रहालयामध्ये सर्वांत अधिक काळजी चित्रांची घ्यावी लागते. कागद व कॅनव्हास यांवर असलेल्या चित्रांच्या घड्या घालता येत नाहीत. ती मोकळीच ठेवावी लागतात. तैलचित्रे नेहमी चौकटीत ताणून बसवितात. भांडारात चित्रे ठेवताना त्यांच्या चौकटी, काचा वगैरे काढून ठेवतात. चित्रांच्या रंगांच्या बाजू एकमेकांवर घासणार नाहीत अशा तर्‍हेने ठेवतात. चित्रे ठेवताना त्याखाली रबराचा किंवा लोकरीचा तुकडा ठेवतात. मोठ्या आकाराची चित्रे भिंतीस टेकून न ठेवता एकाआड एक फट असलेल्या खास कपाटात ठेवतात किंवा धातूच्या उभ्या चौकटी एकमेकांना समांतर ठेवून त्यांत चित्रे आकड्यांना टांगून ठेवतात. कागदांवरील चित्रांसाठी देवदार, मेसोनाइट इत्यादींच्या खास निर्जंतुक केलेल्या पेट्या वापरतात. चित्रे एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविताना व्यवस्थित आवेष्टन घालून काळजीपूर्वक हलवितात. संग्रहालयातील चित्रांची नित्य निगा राखण्याच्या कामात व त्यांचे सूर्यप्रकाश, धूळ आर्द्रता, काजळी इत्यादींपासून रक्षण करण्यासाठी वातानुकूलित वास्तूची व कृत्रिम प्रकाशयोजनेची मदत होते.

इनामदार, म. रा.

चित्रांच्या स्वरुपात किंवा रचनेत अनेक कारणांनी निर्माण होणार्‍या दोषांचे व विकृतीचे योग्य निदान करुन, त्यांचे योग्य उपायांनी निराकरण करुन चित्रे त्यांच्या मूळच्या निकोप स्थितीला आणणे, हा चित्रसंरक्षणाचा उद्देश आहे. जुने खराब झालेले चित्र नव्यासारखे करणे म्हणजेच चित्रसंरक्षण, असे या शतकाच्या सुरुवातीपर्यंत समजले जात असे. अशा चित्रनूतनीकरणात अनेक मौल्यवान चित्रांचे मूळ स्वरुप व त्यातील कलाकौशल्य झाकले जात असे. आधुनिक संरक्षणपद्धतींत मूळ चित्राचे स्वरुप व त्यातील कलाकौशल्य राखून तसेच चित्रातील दोष काढून, चित्र निकोप करण्यावर भर आहे.

पूर्वीच्या चित्रकारांच्या हातून, निवडक टिकाऊ सामग्री व निर्दोष कलातंत्र यांच्या वापरामुळे, चित्र रंगवितानाच, त्याच्या निकोप दीर्घायूची किंवा पर्यायाने संरक्षणाची पूर्वतयारी होत असे. चित्रसंरक्षणाच्या जुन्या पद्धती व्यक्तिगत, परंपरागत व म्हणूनच गुप्त असत आणि त्यामुळे पूर्वीच्या लिखाणात याविषयी आलेले उल्लेख तुटपुंजे, संदिग्ध व अस्पष्ट आहेत. याविषयी शास्त्रीय संशोधन या शतकाच्या सुरुवातीपासून होऊ लागले आहे आणि या नव्या दृष्टिकोनातून पुष्कळशा जुन्या पद्धती टाकाऊ ठरल्या आहेत. जगातील सुप्रसिद्ध चित्रसंग्रहालयांना जोडून चित्रसंरक्षणाच्या प्रयोगासाठी व संशोधनासाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळा आज अस्तिवात आहेत. यूनेस्कोतर्फेही याविषयीच्या ज्ञानात भर टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. याबाबतीत पूर्वीची गुप्तता जाऊन त्याऐवजी, नव्या संशोधनाने उपलब्ध झालेले ज्ञान सर्वांसाठी खुले झाले आहे. सर्वसामान्यपणे चित्रांचे घटक असे असतात : (१) चित्रासाठी वापरलेला आधार- जसे कागद, लाकूड, कापड, भिंत वगैरे (२) रंगकामासाठी आधारस्तर, यावर रंगकाम केले जाते (३) रंगाचे थर (४) रंगकणांना बांधण्यासाठी वापरलेले माध्यम. जसे बेलतेल, अक्रोडाचे तेल, मेण, अंड्याचा बलक, नासलेले दूध, डिंक, सरस वगैरे (५) रंगकामाच्या संरक्षणासाठी व तजेल्यासाठी वापरलेले रोगणजसे मेण, राळ, विविध बहुवारिके इ. आणि (६) चित्राची चौकट, काच, मागील तक्ते वगैरे. या प्रत्येकात किंवा सर्वांत हवेतील फेरबदलामुळे, आगीसारख्या नैसर्गिक आपत्त्तींमुळे, रासायनिक प्रतिक्रियेमुळे किंवा घटकांच्या आकुंचन-प्रसरणामुळे निरनिराळे दोष उत्पन्न होतात, चित्रांचे स्वरुप पालटते व त्यांचा निकोपपणा नष्ट होतो. उदा., आधाराच्या लाकडी फळीला बाक येतो, ती कीड लागून पोखरली जाते कापड फाटते, जीर्ण होते, आगीने जळते किंवा त्यावर बुरशी येते रंगाचा आधारथर खालच्या आधारापासून सुटतो, त्याचे पोपडे निघतात किंवा त्याला चिरा पडतात रंग काळे पडतात, विटतात, त्यांना चिरा पडतात किंवा त्यांत रासायनिक फेरफार होतात माध्यमाची शक्ती कमी होते तैलरंगातील चित्रात झाकलेले खालचे रंग वर दिसू लागतात, तेल पिवळे होते, माध्यमाला बुरशी येते संरक्षक रोगण पिवळे पडते, अपारदर्शक होते, त्याला तडे पडतात व बुरशीही येते चौकटीत व मागे धूळ साठते, कृमी होतात किंवा हवेतील ओलाव्याचा परिणाम होतो. अशा दोषांचे अचूक निदान करणे, हा आधूनिक संरक्षणपद्धतीचा खंबीर पाया आहे. अशा निदानासाठी आधुनिक शास्त्रीय शोधांचा व साधनांचा वापर केला जातो. छायाचित्रामध्ये क्ष-किरण, जंबुपार किरण, अवरक्त किरण, सूक्ष्मदर्शक, विद्युत् विश्लेषण, सूक्ष्मविश्लेषण या सर्वांचा योग्य वापर केला जातो.


चित्रदोषांच्या निदानानंतर त्यांच्या निराकरणाचे उपाय निश्चित केले जातात. वाकलेली फळी मागे आडव्या-उभ्या पट्टया मारुन परत सपाट करतात. तिचा किड्यांनी पोखरलेला भाग मेणाने भरुन काढतात. लवचिकपणा परत आणण्यासाठी मेण व राळ वापरतात. फाटलेल्या कापडास ठिगळे लावतात. आधाराला जोडआधार देतात व फारच खराब झालेल्या आधारापासून चित्र वेगळे करुन दुसर्‍या नव्या आधारावर डकवितात. सुटलेल्या रंगकामाचे किंवा त्यांच्या आधारथराचे पोपडे परत दाबून बसवितात आणि नष्ट झालेले रंगकाम पुन्हा करतात मात्र असे नवीन रंगकाम जुन्या रंगाशी मिळतेजुळते ठेवूनही ते कटाक्षाने जुन्यापेक्षा वेगळे ठेवतात. रंगाची बुरशी काढून टाकतात, रंगाचा मूळचा लवचिकपणा परत आणतात. जुने रोगण घर्षणाने किंवा रासायनिक विद्रावाने काढून टाकतात. घर्षणाची पद्धत आता मगे पडली आहे. काही वेळेस रोगण काढून न टाकता काही विशिष्ट पद्धतीने ते पूर्ववत करतात. कागदाचा ठिसूळपणा व पिवळेपणा काढून जलरंगातील चित्रे पूर्ववत करतात. जुने रोगण काढून टाकल्यास, इतर दोष दूर केल्यावर पुन्हा नवे रोगण लावतात. आधुनिक चित्रसंरक्षणाच्या कामात चित्रघटकांचा व त्यांच्या दोषांचा खास अभ्यास करणारे संशोधक, कलेतिहासतज्ञ आणि प्रत्यक्ष दुरुस्ती करणारे अशा अनेकांचे साहाय्य लागते. चित्रांची प्रत्यक्ष दुरुस्ती अगदी अपरिहार्य असेल तरच करतात. चित्रांची दुरुस्तीपूर्व, काम चालू असतानाची व त्यानंतरच्या अशा सर्व अवस्थांची छायचित्रे घेतात चित्रदोषांचे निदान व त्यांवरील उपाययोजना यांचे संपूर्ण टाचण ठेवतात, अशा या चित्रांच्या टाचणांचा उपयोग पुढील संरक्षणकार्यासाठी होतो. संरक्षणकार्यात कलेच्या इतिहासज्ञानाची, निरनिराळ्या रंगपद्धतींची, भौतिकी व रसायशास्त्राची माहिती आवश्यक आहे. नव्या शोधांमुळे चित्रांचा काल व कर्ता यांचा निर्णय करणे शक्य झाले आहे शिवाय चित्राचा खरेखोटेपणाही अजमावता येतो. संरक्षणाच्या खास उपायांबरोबरच प्रकाश, आर्द्रता, धूळ व काजळी यांपासून रक्षण करण्यासाठी आधूनिक वातानुकूल वास्तूची व कृत्रिक प्रकाशयोजनेची मदत होते.

भारतातील प्राचीन चित्रे प्राय: कागदावरील किंवा भिंतीवरील आहेत. तैलरंगातील चित्रे एकोणिसाव्या शतकापासून प्रचारात आली. कागदावरील चित्रे ग्रंथाचा भाग म्हणूनच होती आणि ग्रंथाच्या संरक्षणाबरोबरच त्यांचेही संरक्षण आपोआप होत असे. भिंतीवरील चित्रे बहुधा अंधार्‍या गुहांतून आहेत. त्यामुळे त्यांतील रंगकामाचे सूर्यप्रकाशापासून आपोआप रक्षण झाले. मोजके पण टिकाऊ रंग आणि निर्दोष रंगपद्धती यांच्यामुळे भारतीय चित्रे मूलत: निकोप असत. चित्रसंग्रहालये इंग्रजी अंमलातच अस्तित्वात आली आणि तीही मोजकीच आहेत. चित्रसंरक्षणविषयक संशोधनासाठी त्यांना जोडून सुसज्ज अशा प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत परंतु पुरातत्व विभागातर्फे मात्र याविषयी थोडीफार व्यवस्था केली गेली आहे. भित्तिचित्रांच्या संरक्षणाचे येथील संशोधन बाकी उल्लेखनीय आहे. संरक्षणाच्या कार्यासाठी व संशोधनासाठी शास्त्रीय प्रयोगशाळांची अत्यंत गरज आहे. भारतातील विशिष्ट चित्रपद्धतीच्या संरक्षणाबद्दल अधिक अभ्यासाची आणि संशोधनाची जरुरी आहे.

गोंधळेकर, ज.द.

धातुशिल्प : शिल्पे, नाणी, पात्रे यांसारख्या धातुवस्तूंसाठी त्या त्या धातुप्रकारांनुसार वेगवेगळ्या प्रक्रिया वापरण्यात येतात. तथापि विद्युत् प्रवाहाने, त्यांवरील गंज काढणे, पाण्याच्या झोताने त्यावरील घाण साफ करणे, कठीण ब्रशाने नंतर त्या स्वच्छ करणे, त्या वाळवून त्यांवर ऍसिटीन व ऍमिल  ऍसिटेटमधील सेल्युलॉइडाच्या विद्रावाचा थर देणे या सर्वसाधारण प्रक्रिया आहेत. सामान्यत: धातुशिल्पांच्या संरक्षणासाठी रासायनिक आणि विद्युत् रासायनिक पद्धतींचा वापर केला जातो. तांब्याच्या वस्तूंसाठी रोशेलचे लवण, दाहक सोडा, पाणी व हायड्रोजन पेरॉक्साइड यांचे मिश्रण वापरतात. चांदीच्या वस्तूंसाठी विद्युत् रासायनिक पद्धतींचा वापर करतात. सोन्याच्या वस्तूंसाठी रोशेलच्या लवणाचा क्षारकीय विद्राव वापरतात. लोखंडी व शिशाच्या वस्तूंसाठी पॅराफीन मेणाचा वापर करतात. ताम्रमिश्रित धातूंपासून तयार केलेल्या कलाकृतींचे संरक्षण करण्याबाबत बरेच संशोधन  झालेले असून लेमन तेल, गवती चहाचे तेल इ. ठराविक द्रव्ये विशिष्ट कालावधीनंतर वापरल्यास या कलाकृतींचे चांगले संरक्षण होते तथापि या तेलांच्या उपयोगांमुळे कलाकृतीची चमक लवकर नाहीशी होऊन पृष्ठभाग नीरस दिसू लागतो. द्रवरुप मेण किंवा मेणाचा थर तसेच मेण व टर्पॆटाइन यांचे मिश्रण लावल्यास सूक्ष्म धूळ, हातांचे ठसे इत्यादींपासून धातूंच्या कलाकृतींचे काही काळ संरक्षण करता येते. कलाकृतींवरील पक्के डाग काढण्यासाठी ऑक्झॅलिक अम्ल व ब्युटिल सेलोझाल्व्ह यांचा उपयोग करतात. धातूवरील लाख काढून टाकण्य़ासाठी मिथिलीन क्लोराइडचा उपयोग करतात. स्वच्छ केलेल्या कलाकृतींवर सिलिकोन व ऍक्रिलिक प्रकारच्या सयुगांचा सूक्ष्म थर फवारे मारुन दिल्यास त्यांवर हवेचा अनिष्ट परिणाम होत नाही.

प्राचीन हस्तलिखिते : प्राचीन हस्तलिखिते मातीच्या विटा, दगड ताम्रपट, चर्मपट, भूर्जपत्रे, पपायरस, हाडे व कागद यांसारख्या माध्यमांवर कोरलेली वा लिहिलेली आढळतात. हस्तलिखितांच्या माध्यमांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या संरक्षकप्रक्रिया कराव्या लागतात. काही वेळा चर्मपत्रे अत्यंत ठिसूळ झालेली आढळतात. उदा., ऱ्‍हिंड मॅथेमॅटिकल पपायरस. अशी चर्मपत्रे सरळ करणे अवघड असते, त्यासाठी नायट्रो-सेल्युलोजाचा उपयोग केलेला आढळतो. भारतीय भूर्जपत्रे शुष्क, कडक पण ठिसूळ असतात. अशा भूर्जपत्रांचे तसेच विटांवरील कोरीव लेखांचे संरक्षण करणे बरेच कठीण असते.

मृतसमुद्रलेखपट : मृतसमुद्राजवळच्या टेकड्यांमधील गुहेत १९४७ मध्ये हे लेखपट सापडले. शुष्क, ठिसूळ, खंडित झालेले व कीटकांनी खाल्लेले असे त्यांचे स्वरुप होते. त्या भागातील कोरड्या हवामानामुळे हे लेखपट शेकडो वर्षे सुरक्षित राहिले. तेथील टोळीवाल्यांनी त्यांचे महत्त्व ओळखून पुढे या लेखपटांची विक्री केली. हे लेखपट मऊ करण्यासाठी प्रथम दमट हवामानात ठेवण्यात आले व नंतर ते अलग अलग करण्यात आले. ते पुन्हा कठीण करुन त्यांचे तुकडे जोडण्यात आले. टॉलेमीच्या जिऑग्राफी या पुस्तकाचा तर सिमेंटसारखा एक कठीण ठोकळाच झालेला होता. रशियन शास्त्रज्ञांनी त्याचे संरक्षण करण्याचे अवघड काम पार पाडले.

कागदपत्रे : अनेक ऐतिहासिक अस्सल कागदपत्रे जगातील संग्रहालयांतून, ग्रंथालयांतून व खाजगी संग्रहांतून जतन करुन ठेवण्यात आलेली आहेत. जास्तीत जास्त सु. हजार वर्षांपूर्वीपासूनचे कागदावरील लिखाण सध्या उपलब्ध आहे. कालमानानुसार कागदपत्र टिकण्याची क्षमता कमी होते. कागदातील अम्लतेचे प्रमाण, वापरलेली शाई व प्रत्यक्ष कागदाची क्षमता यांचा अभ्यास करुन त्यांच्या संरक्षणाचे उपाय योजावे लागतात. ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक कागदपत्रे व जुने ग्रंथ विविध ठिकाणी संग्रहीत करण्यात आलेले आहेत. असे संग्रह ब्रिटिश म्यूझीयम, लंडन येथील इंडिया ऑफिस ग्रंथालय, भारतातील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय आदी संग्रहात आढळतात.

कागदपत्रांच्या नाशास हवामान, कीड व कसर ही मुख्यत्वे कारणीभूत होतात. यांशिवाय चोरी, हल्ले, युद्धजन्य परिस्थिती, आग, पूर इ. कारणांनी कागदपत्रांचा नाश होतो. मध्ययुगीन काळात युद्धांमध्ये उभयपक्ष आपापल्या मुलुखातील कागदपत्रे जाळून टाकीत. भारतातील सतराव्या-अठराव्या शतकांतील मोंगल-मराठे लढायांत असेच दप्तरखाने जाळण्यात आले.


बहुतेक ठिकाणी जुन्या कागदपत्रांचे व ग्रंथांचे रक्षण करण्यासाठी पारंपरिक पद्धतीनुसार ते लाकडी शिड्यांवर किंवा कपाटात व साध्या किंवा रेशमाच्या कापडात गुंडाळून पेट्यांत ठेवले जात. अलीकडे कागदपत्रांच्या संरक्षणासाठी लाकडी शिड्यांना व कपाटांना क्रिओसोट व्हार्निश लावतात व डी. डी. टी. चा फवारा मारतात. तसेच कागदपत्रांच्या कपाटातही नॅप्थ्याच्या गोळ्या किंवा तुकडे ठेवतात. ह्याशिवाय धूळ व कसर यांपासून रक्षण करण्यासाठी धुरी देणे, भिंतीच्या ओलाव्याचा परिणाम होऊ नये म्हणून भिंतीपासून कपाटे थोडीशी दूर ठेवणे, इमारतीच्या भिती व जमीन निर्जतुक ठेवणे, इमारतीच्या पायातून वाळवी व कसर येऊ न देणे इ. उपाय योजण्यात येतात. ह्याशिवाय काही नित्य व नैमित्तिक उपाययोजना कराव्या लागतात. कागदपत्रे संग्रहालयात दाखल करण्यापूर्वी त्यांची शास्त्रीय पाहणी करुन जरुर ते उपाय योजतात. अतिजीर्ण कागदांच्या जतनासाठी टिश्यू कागद किंवा शिफॉन कापडाचा उपयोग केला जातो. ह्यासाठी अलीकडे विद्रावकस्तरीकरण हा उपाय केला जातो. या पद्धतीने जाड, पातळ वा जीर्ण अशा प्रकारचे कागद सुरक्षित राहतात. ही पद्धत भारतीय तज्ञ वाय्. पी. कथपालिया यांनी शोधून काढली व त्याकरिता फ्रेंच तज्ञांच्या मदतीने एक यंत्रही बनविले आहे. या पद्धतीने मूळ कागद सेल्यूलोज ऍसिटेट थर व टिश्यू कागद यांमध्ये बसविला जातो.

संग्रहालयाबाहेरील कलावस्तूंचे व अवशेषांचे संरक्षण : संग्रहालयामध्ये ज्या वस्तूसंग्रहीत करणे शक्य नसते, अशा बर्‍याच कलावस्तू व अवशेष जगामध्ये सर्वत्र विखुरलेले असून त्यांच्यावर नैसर्गिक घटकांचा सतत विपरीत परिणाम होत असतो. त्यांच्या संरक्षणाच्या समस्येचे विवरण पुढे केले आहे :

दगडी वास्तूंचे जतन : खडकात कोरलेली लेणी, मंदिरे, स्मारके, पूजास्थाने, किल्ले इ. प्रकारच्या दगडी वास्तूंच्या जतनीकरणाच्या बाबतीत विश्वसनीय अशी उपाययोजना अद्याप उपलब्ध नाही. अशा प्रकारच्या वास्तू विविध प्रकारच्या हवामानात उघड्यावर विखुरलेल्या असल्याने त्या त्या हवामानानुसार उपाययोजना कराव्या लागतात. प्रत्यक्ष ऊन, वारा, पाऊस इत्यादींचा परिणाम व दगडाचा प्रकार समक्ष पाहूनच त्यांवर उपाययोजना करण्यात येते. जुनी दगडी स्मारके बाधकाम बिघडल्यामुळे पावसाळ्यात गळतात. तसेच त्यांच्यावर जमिनीतील ओलाव्याचाही परिणाम होतो. यासाठी वास्तूच्या पायात पाणी मुरु नये, अशी काळजी घ्यावी लागते व त्यासाठी पारंपरिक उपाय योजतात. वास्तू पाझरु नये, म्हणून त्या पक्क्या रंगाने रंगविल्या जातात. भारतीय दगडी स्मारकांना असे पक्के रंग देण्यात आलेले नाहीत. क्वचित चुन्याने मंदिरे रंगविली जातात पण चुन्याच्या पुटांमुळे दगडी शिल्प बुजून जाते. यासाठी पॅराफीन मेण वापरतात, पण त्यामुळे दगडी पृष्ठभाग फारच काळपट पडतो. मूलत:च काळ्या रंगाच्या दगडाच्या पृष्ठभागावर पॅराफीन मेणाचा थर संरक्षणासाठी परिणामकारकपणे वापरता येतो. तथापि हा उपाय हवामान लक्षात घेऊन करावा लागतो.

पॅलिमिथिल मेथॅक्रायलेट, पॅलिव्हिमिल ऍसिटेट यांसारखी सश्र्लेषित (कृत्रिम) रेझिने आणि सिलिकोने ही संयुगे सावलीत असणार्‍या दगडी वास्तूंच्या संरक्षणास विशेषत्वाने उपयुक्त ठरली आहेत. मात्र या द्रव्यांचा वरचेवर उपयोग करावा लागतो. या प्रकारचे थर दिलेल्या दगडी वास्तू आर्द्रतेच्या परिणामापासून सुरक्षित ठेवता येतात. कागदलगदा पद्धतीनेही दगडी मूर्ती सुरक्षित ठेवता येतात.

जुन्या दगडी बांधकामात शेवाळ, गवत इ. वनस्पती उगवल्यास व सतत वाढत राहिल्यास बांधकामाला बर्‍याच वेळा धोका उत्पन्न होतो. यासाठी अमोनिया व झिंक सिलिको फ्ल्युओराइड यांच्या मिश्रणाचा उपयोग करतात.

काही वेळा दगडी शिल्पाच्या काही उपांगांची मोडतोड झाली असल्यास, ती मूळ शिल्पाच्या स्वरुपाप्रमाणे दुरुस्त करण्यासाठी सिमेंटादी द्रव्यांचा अवलंब करण्यात येतो.

भित्तिचित्रे : पुरातन  काळापासून, विशेषत: गेल्या २,००० वर्षांच्या काळात, डोंगरातील गुहा, नागरी वस्तींतील मंदिरे, स्मारके, प्रासाद वगैरे इमारतींच्या भिंतीच्या गिलाव्यावर चित्रे रंगविण्याची परंपरा आढळते. भिंतीवर चुन्याचा जाड अथवा पातळ गिलावा करुन पृष्ठभाग मऊ व एकसारखा करुन भित्तिचित्रे रंगविली जात. कालांतराने हवामान, पाऊस इ. नैसर्गिक कारणांनी ही भित्तिचित्रे बिघडतात. अंधार्‍या गृहांतील चित्रांबाबत मात्र त्यांतील रंगकामाचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण झाल्यामुळे त्यांचे रंग बर्‍याच प्रमाणात टिकलेले आहेत. काही चित्रे मात्र ओलीमुळे खराब झालेली आहेत. भिंतींपासून गिलावा सुटल्यामुळे पोपडे येऊन व चिरा पडून अनेक चित्रे नष्ट झाली आहेत. कालमानानुसार अनेक चित्रांतील रंगही फिके पडले आहेत.

गुहांमधील भित्तिचित्रे भिंतीवर पाणी ओघळून खराब झालेली आढळतात. भिंतीवर अंग घासण्याच्या काही प्राण्यांच्या सवयीमुळेही अशी चित्रे खराब झालेली आहेत. खडकांची कालांतराने झीज होऊन व पोपडे निखळून चित्रे नष्ट झालेली आहेत. खडूंनी अगर तीक्ष्ण धारेच्या वस्तूंनी चित्रांवर लिहिणे, मोटारीचे वंगण फासणे यांसारख्या प्रवाशांच्या वाईट खोडींमुळे चित्रे खराब झालेली दिसून येतात.

अजिंठा, वेरुळ यांसारखी लेणी किंवा मोठमोठ्या प्रासादांतील भिंतीवर रंगविलेली चित्रे पाहण्यासाठी शेकडो लोक येतात. अशा ठिकाणची आर्द्रता सामान्यत: कमी प्रमाणात असते. चित्रे पाहण्यासाठी येणार्‍या लोकांद्वारे निर्माण झालेला कार्बन डाय-ऑक्साइड हवेत मिसळतो. भितींच्या गिलाव्यातील कॅल्शियम कार्बोनेटावर परिणाम होऊन चित्रासह गिलाव्याची खराबी होते. याखेरीज वातावरणीय परिणामाने भिंती दमट होतात. यासाठी भित्तिचित्रे असलेल्या दालनाच्या हवेतील आर्द्रता जवळजवळ संतृप्त ठेवावी लागते. याकरिता एका वेळी चित्रे पाहण्यासाठी दालनात कमीत कमी प्रेक्षकांना प्रवेश दिला जातो. तसेच चित्रांवर ऍक्रिलिक रेझिनाचा थर दिल्यास विशेष उपयुक्त ठरतो. हे रेझिन वापरल्यामुळे चित्राचा पृष्ठभाग अधिक सुरक्षित बनतो. अर्थात प्रत्येक भित्तिचित्राची स्थिती वेगळी असल्याने अगोदर तज्ञांच्या सल्ल्याने अभ्यास करुन आवश्यकतेप्रमाणे असे उपाय योजितात. भित्तिचित्रांच्या रक्षणासाठी प्रथम त्याची अभ्यासपूर्वक पाहणी करावी लागते. जास्त सुरक्षित असलेली चित्रे आहेत तेथेच जतन करतात. ज्या चित्रांच्या बाबतीत भिंत बळकट असून गिलावा निसटला असेल, तेथे तो पुन्हा भिंतीस काळजीपूर्वक चिकटवतात. जेथे भिंत व गिलावा दोन्ही खराब झाली असतील, तेथे गिलाव्यावरील चित्राची फक्त रंगसंगती काढून घेऊन नव्या पृष्ठभागावर चित्र बदलून घेण्यात येते.

काही चित्रांच्या बाबतीत त्यांच्यालगत त्यापूर्वीच्या काळातील आणखी दुसरे चित्र असलेले आढळते. वेरुळच्या लेण्यात एकाच गिलाव्याच्या पृष्ठभागावर इ.स. दुसर्‍या-तिसर्‍या शतकांतील एक चित्र व नवव्या-दहाव्या शतकांतील दुसरे चित्र आहे. अशा भित्तिचित्रांच्या अभ्यासासाठी काटच्छेद पद्धतीने पाहणी करतात. भित्तिचित्रातील दृश्याचे नुकसान होणार नाही, असा सु. ०.५ चौ. सेंमी. चा तुकडा घेतात. त्यावर विशिष्ट प्रक्रिया करुन व सूक्ष्म अभ्यास करुन चित्राची स्थिती ठरवितात व त्यानुसार उपाय योजतात.


भित्तिचित्रे आहेत त्या जागीच सुरक्षित नसल्यास हलविली जातात. त्याकरिता भिंतीची व गिलाव्याची जाडी पाहून प्रथम गिलाव्यासह चित्र हलवून प्रयोगशाळेत आणतात व नव्या कॅनव्हासवर घेतात. हे शक्य नसल्यास मूळ जागीच पातळ गिलाव्यावरील चित्राच्या रंगाचा पृष्ठभाग काढून घेऊन तो नवीन कॅनव्हासवर आणला जातो. शक्य तो मूळ ठिकाणीच चित्र जतन करणे सोयीचे असते. तथापि भिंत व गिलावा दोहोंचा नाश होत असल्यास चित्र मूळ स्थानावरुन हलविणे भाग पडते. ह्यासाठी विविध शास्त्रीय पद्धती आता उपलब्ध झालेल्या आहेत.

चोरीपासून संरक्षण : कलावस्तू व अवशेष यांचे चोरीपासून संरक्षण करणे, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जगातील अनेक देशांतून संघटित टोळ्यांमार्फत अशा वस्तूंच्या चोरीचे धाडसी प्रयत्न होत आहेत. अनेक संग्रहालये, पुरातन स्थाने, मंदिरे इ. ठिकाणच्या विविध वस्तू पळविण्यात आलेल्या आहेत. अशा वस्तूंची चोरी करण्यात दोन उद्देश असतात : एक म्हणजे मौल्यवान पुरातन वस्तूंची चोरी करुन त्या आहेत त्याच स्वरुपात इतरत्र निर्यात करुन पैसा मिळविणे व दुसरा म्हणजे मूळ कलाकृतीतील सोने, रत्ने वगैरे वेगळी करुन त्यांद्वारे पैसा मिळविणे. सुधारलेल्या पश्चिमी राष्ट्रांत कलावस्तूंचा व्यापार पुष्कळच वाढलेला असून त्यात काही चोरीच्या वस्तूही विकण्यात येतात, असे आढळून आले आहे.

भारताच्या बाबतीत कलावस्तूंच्या चोरीचा प्रश्न अलीकडे फारच गंभीर होऊ लागला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात यूरोपात व अमेरिकेत भारतीय कलेचे वैशिष्ट्य व्यक्त करणारी प्रदर्शने भरविण्यात आली. त्यामुळे कलावस्तूंच्या बाजारात भारतीय कलावस्तूंची मागणी बर्‍याच मोठया प्रमाणात वाढली. भारतातील कलावस्तू आणि पुरातन अवशेष संग्रहालयांमध्ये तसेच खेडोपाडी उघड्यावर विखुरलेले आहेत. संग्रहालयांमधील वस्तूंचा थोडेफार संरक्षण आहे. परंतु इतरत्र उघड्यावरील वस्तूंचे चोरांपासून संरक्षण करणे अवघड असून त्यांची चोरट्या मार्गाने निर्यात वाढतच आहे. विशेषत: बौद्धधर्मीय अवशेष, शिल्पे तसेच मौर्य, सातवाहन काळातील मूर्ती इ. कलावस्तूंना अधिक मागणी आहे.

कलावस्तूंची गैरमार्गाने निर्यात होऊ नये, म्हणून विविध देशांतील शासनांचे प्रयत्न चालू आहेत व तसे संरक्षण कायदेही करण्यात आलेले आहेत. राष्ट्रसंघाने १९३३ साली या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केला होता. दुसर्‍या महायुद्धानंतर यूनेस्कोने हा प्रश्न विचारात घेऊन १९६० च्या सुमारास गैरमार्ग कलावस्तूंची निर्यात होऊ नये असा ठराव केला. त्यापूर्वी १९४८ पासून आयकॉम या संस्थेने कलावस्तूंच्या संरक्षणाच्या अभ्यासास सुरुवात केली व काही उपायही सुचविले. ज्या त्या राष्ट्राने आपापली कला व अवशेषस्थाने यांच्या संरक्षणावर व जतनावर भर द्यावा, तसेच कलावस्तूंची व अवशेषस्थानांची पाहणी करुन त्यांची विभागावार नोंद करावी असेही सुचविण्यात आले. संग्रहालयातील सर्व वस्तूंची नोंद करणे, त्यांची छायाचित्रे घेणे, वारंवार तपासणी करणे, चोरीपासून सावधानतेचा इषारा मिळविण्यासाठी विद्युत व इतर प्रकारची यंत्रणा बसविणे इ. उपाय बर्‍याच संग्रहालयांमध्ये प्रचारात आलेले आहेत.

पहा : संग्रहालये.

इनामदार, म. रा.

संदर्भ : 1. Agarwal, O. P. Ed. Conservation of Cultural Properties in India, New Delhi, 1967-68.

2. Borroughs, Alan, Art Criticism from a Laboratory, Boston, 1938.

3. Bradley, M. C. Jr. The Treatment of Pictures, 1950.

4. Doerner, Max Trans. Neuhaus, Eugen, Materials of the Artist and Their Use in Painting with Notes on the Techniques of the Old Masters, London, 1949.

5. Gairola, T. R. “International Co-operation in Conservation of Cultural Property”, Journal of Indian Museums, Vol. XXI-XXIV, New Delhi, 1965-68.

6. International Museum Office, Manual on the Conservation and Restoration of Paintings, Paris, 1940.

7. Jessup, Ronald, Puzzle of the Past, London, 1956.

8. Lal, B. B. Indian Archaeology Since Independence, New Delhi, 1964.

9. Roy, Sourindranath, The Story of Indian Archaeology, 1784-1947, New Delhi, 1961.

10. Sircar, D. C. Indian Epigraphical Glossary, Delhi, 1966.

11. Stout, G. L. The Care of Pictures, London, 1948.

12. Thomson, G. Ed. Recent Advances in conservation, London, 1963.

१३. उपाध्याय, वासुदेव, प्राचीन भारतीय अभिलेखों का अध्ययन, दिल्ली, 1961.


गाला गेलेले तडे यांमुले खराब झालेले अलग झालेले रंगाचे पोपडे व रंएक प्रख्यात चित्र  पुन: स्थापनापूर्व दृश्य...आणि मूर्तीच्या स्थानांतराची तयारी.
श्री रंगनाथ स्वामीचे मंदीर,श्रीरंगम् :'बेळ्ळँ गोपुरम्' ह्या सर्वोच्च भागाचे परांचीच्या साहाय्याने  पुन: स्थापन...आणि त्यातील शिल्पाची साफसफाई.
अबू सिंबेल : दुसन्या रॅमसीझच्या मंदीराचे आणि चित्राच्या दुरुस्तीनंतरचे रेंखाकिंत भागाचे विस्तारदृश्य.