जनकला : (पॉप आर्ट). एक अत्याधुनिक कलाप्रणाली. ‘पॉप आर्ट ’ (पॉप्युलर आर्ट या संज्ञेचे संक्षिप्त रूप) ही संज्ञा लॉरेन्स ॲलोवे या इंग्रज समीक्षकाने १९५५–५६ च्या सुमारास ‘इंडिपेंडट ग्रुप’  या कलाकारसंघाच्या संदर्भात प्रथम वापरली. या संघाने लंडनमध्ये जनकलाप्रणालीची मुहूर्तमेढ रोवली. जनकलेत आधुनिक नागरी संस्कृतीतील वस्तू व प्रतिमा–विशेषतः चित्रपट, दूरचित्रवाणी, जाहिरातकला यांसारख्या लोकमाध्यमांतील–तसेच औद्योगिक आकृतिबंध यांवर भर दिलेला असतो. या अर्थाने ही ‘जनकला’ होय. याउलट लोककला ही ग्रामीण जीवनाचे व तदानुषंगिक संस्कृतीचे चित्रण करते. जनकलेला वस्तुस्थितिदर्शक कला, नववास्तववाद, नवदादावाद असेही संबोधण्यात येते.

‘जस्ट व्हॉट इज इट दॅट मेक्स टुडेज होम्स सो डिफरंट, सो अपीलिंग?’—हॅमिल्टन.

जनकलावाद्यांनी आधुनिक औद्योगिक संस्कृतीचा एक वस्तुस्थिती म्हणून स्वीकार केला. नित्याच्या वापरातील मानवर्निर्मित व उपभोग्य वस्तू वा त्यांच्या प्रतिमा (दूरचित्रवाणी, फीत मुद्रक, घड्याळे, पंखे, कोकाकोलाच्या बाटल्या, सूपचे डबे इ.) लोकप्रिय नेते, गायक, चित्रपट कलावंत, क्रीडापटू आदींच्या व्यक्तिप्रतिमा वृत्तपत्रे-मासिके यांतील छायाचित्रे, जाहिराती, व्यंगचित्रमाला, शब्दप्रतिमा यांसारख्या सामग्रीचा अवलंब करून जनकलावाद्यांनी आधुनिक जीवनातील यंत्रप्राधान्य, भोगलोलुपता, लैंगिकता आदी विशेषांचे चित्रण केले. मात्र हे चित्रण कमालीच्या तटस्थपणे व अलिप्तवृत्तीने केलेले दिसून येते. त्यात कसलेही स्तुतिनिंदापर भाष्य अभिप्रेत नसते. काही चित्रांतून क्वचित औपरोधिक विनोदनिर्मिती साधलेली असते. व्यक्तिगत कौशल्य वा कारागिरी यांविषयीचे औदासीन्य, उत्कष्ट भावनिक गुंतवणुकीच्या अगदी विरोधी टोकाची बेपर्वा वृत्ती, निर्मितीमध्ये व्यावसायिक तंत्रांचा वापर, भपकेबाज रंगसंगती, कित्येकदा अतिवास्तववादी शैलीने केलेले असंबद्ध वस्तुप्रतिमांचे संश्लेषण ही जनकलेची काही वैशिष्ट्ये. जनकलेचे  ⇨ दादावादी  प्रणालीशी साधर्म्य दिसून येते. ते ‘ललित’ कलेसंबंधीची तुच्छतेची भावना. असंबद्ध व हास्यास्पद गोष्टींविषयीचे आकर्षण, शब्दप्रतिमांचा वापर, चिक्कणितचित्रामध्ये वा जुळणीचित्रामध्ये (असेंब्लेज) केलेला प्राकृत वा तयार (रेडिमेड) वस्तूंचा अंर्तभाव इ. घटकांमध्ये दिसते. तथापि दादावाद्यांची विध्वंसनाची व सामाजिक निषेधाची भूमिका अव्हेरून जनकलावाद्यांनी सभोवतीच्या सामाजिक वास्तवाचा स्वीकार व जनरुचीचा आदर केला आहे. जनकला ही आधुनिक संस्कृतीतील ग्राम्यतेच्या निषेधार्थ अवतरली, असे काही समीक्षकांचे मत असले तरी जनकलावाद्यांनी विसाव्या शतकातील जीवनाची भौतिकता व सुखवाद यांचा, त्यातील ग्राम्यतेसह, निर्भयपणे स्वीकार केला, असेच बव्हंशी मानले जाते.

ही प्रणाली इंग्लंडमध्ये साधारणतः १९५५ नंतरच्या काळात व अमेरिकेमध्ये १९६० नंतरच्या दशकामध्ये प्रसार पावली. रिचर्ड हॅमिल्टनचे (१९२२–  ) जस्ट व्हॉट इज इट दॅट मेक्स टुडेज होम्स सो डिफरंट, सो अपीलिंग?  (१९५६) हे चिक्कणितचित्र जनकलेचे एक आद्य उदाहरण होय. हॅमिल्टन प्रमाणेच पीटर ब्लेक (१९३२– ), आर्. बी. किटाज (१९३२– ), डेव्हिड हॉकनी (१९३७– ) इ. चित्रकार व एद्वार्दो पाओलोझ्झी (१९२४– ) हा शिल्पकार हे प्रख्यात ब्रिटिश जनकलावादी होत. अमेरिकेत जनकला ही केवळ आकार व तंत्र यांवर भर देणाऱ्या व वास्तवापासून दूर असलेल्या अप्रतिरूप अभिव्यक्तिवादासारख्या प्रणालींना विरोधी प्रतिक्रिया म्हणून निर्माण झाली. अमेरिकेत जनकला ही केवळ आकार व तंत्र यांवर भर देणाऱ्या व वास्तवापासून दूर असलेल्या अप्रतिरूप अभिव्यक्तिवादासारख्या प्रणालींना विरोधी प्रतिक्रिया म्हणून निर्माण झाली. अमेरिकेन जनकलावाद्यांमध्ये रॉबर्ट राउशेनबर्ग (१९२५– ), जॅस्पर जॉन्स (१९३०– ), अँडी वॉरहोल (१९३०– ), रॉय लिख्‌टेन श्टाइन (१९२३– ), टॉम व्हेसेलमान (१९३१– ), क्लास ओल्डेनबुर्ख (१९२९–), इ. प्रख्यात आहेत.

संदर्भ :

1. Amaya, Marino, Pop as Art : A Survey of New Super Realism, London, 1962.

2. Lippard, L. R. Pop Art, New York, 1966.

इनामदार, श्री. दे.