अभीष्टचिंतनपत्रिका : आपलेपणा, सुहृदभाव, कृतज्ञता व सहानुभूती यांसारख्या भावना आणि शुभकामना गांभीर्यपूर्वक वा प्रसन्न विनोदबुद्धीने व्यक्त करण्यासाठी आप्तेष्टमित्रांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सचित्र पत्रिका. व्यापारी संस्थांच्या अभीष्टचिंतनपत्रिकांत आपल्या ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली असते तर रुग्ण आप्तमित्रांना पाठविलेल्या पत्रिका सहानुभूतीपर असतात. या पत्रिकांचे नित्य व नैमित्तिक असे दोन प्रकार मानता येतील. दिवाळी, नाताळ, ईद, पटेटी यांसारख्या धार्मिक सणांना व स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय प्रसंगी पाठविल्या जाणाऱ्या अभीष्टचिंतनपत्रिका नित्य प्रकारच्या होत. अपत्यलाभ, वाढदिवस, विवाह, परीक्षेतील सुयश व उच्च किताबाची प्राप्ती यांसारख्या प्रसंगी नैमित्तिक प्रकारातील अभीष्टचिंतनपत्रिका पाठविल्या जातात.

अभीष्टचिंतनपत्रिका सामान्यतः कडक पुठ्ठेवजा कागदापासून करतात. विविध पृष्ठभागांवर रंगीत छपाई करणारी मुद्रणयंत्रे उपलब्ध झाल्याने हल्ली काही पत्रिका कापड, चामडे, कचकडे, चर्मपत्र, लाकूड, धातू, चिकणमाती, बुचाचे लाकूड वगैरेंपासून करतात. व्यक्तिगत आवडनिवड, औचित्य व वापराचे सौकर्य यांवरून पत्रिकांचा आकार ठरविला जातो. सामान्यतः पत्रिका पाकिटात बंद करून टपालाने पाठविता येणे ही व्यावहारिक मर्यादा विचारात घेऊन, तसेच पत्रिकांचा दर्जा व किंमती यांच्या अनुषंगाने अनेकविध लहानमोठ्या, कलात्मक व सुबक आकारांच्या पत्रिका बनविल्या जातात.  यास अपवाद म्हणून इंग्‍लंडच्या

घडी -पद्धतीची विनोदी अभीष्टचिंतनपत्रिका : (अ) बाहेरील बाजू.युवराजांना नववर्षानिमित्त तांदळाच्या दाण्यावर चितारून पाठविलेले अभीष्टचिंतन (१९२९) आणि अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठविलेली ५४ x ८४ सेंमी. आकाराची नाताळ भेट-पत्रिका (१९२४) यांचा निर्देश करता येईल. पत्रिकांमधील छापील संदेश कमीत कमी एकदोन व कित्येकदा शंभरसवाशे शब्दांत आणि गद्यात वा पद्यात असतात. त्यांत धार्मिक भावना, भावपूर्ण शुभसंदेश यांखेरीज मनोरंजनासाठी विनोदी मजकूर, कूटप्रश्न, कोडी, उखाणे वगैरेंचाही समावेश होतो. पत्रिकांमध्ये रंग व प्रतीके यांना स्थान असले, तरी त्यांत साचेबंदपणाच अधिक आढळतो.

सद्भावनेचे प्रतीक म्हणून परस्परांना संदेश धाडण्याची वा भेटवस्तू देण्याची प्रथा मानवामध्ये शतकानुशतके चालत आली आहे. या भावनेची परिणती कालांतराने अभीष्टचिंतनपत्रिकांच्या देवघेवीमध्ये झाली असावी. प्राचीन काळी

(आ) वरील पत्रिकेची आतील बाजू.

ईजिप्तमध्ये नववर्षदिनानिमित्त अत्तरांच्या कुप्यांसारख्या सांकेतिक भेटवस्तू परस्परांना देण्याची प्रथा होती. रोमन लोक सोन्याचे पाणी दिलेली लॉरेल किंवा ऑलिव्ह वृक्षाची पाने, तसेच सांकेतिक मजकूर व प्रतीकात्मक चिन्हे कोरलेले तैलदीप परस्परांना भेट देत. नववर्षदिनानिमित्त शुभचिंतनाची ही प्रथा यूरोपमध्येही रूढ होती. १४ व्या शतकाच्या प्रारंभी जर्मन लोकांनी मुद्रणोपयोगी काष्ठ-ठशांपासून नववर्ष-पत्रिका मोठ्या प्रमाणात तयार केल्या. याच काळात भेटवस्तूंऐवजी कारागिरांनी बनविलेल्या छापील कागदी पत्रिका, तसेच चर्मपत्रिकाही पाठविण्यास सुरुवात झाली. ‘व्हॅलेंटाईन’ (भावप्रचुर अथवा विनोदी स्वरूपाचा प्रणयपर मजकूर असलेली, भिन्नलिंगी व्यक्तीस पाठविली जाणारी सामान्यतः निनावी पत्रे) ही अभीष्टचिंतनपत्रिकांची एक पूर्वावस्था मानता य़ेईल. यांचा उगम ख्रिस्तपूर्व रोममध्ये झाला ‘लूपरकल’ (१५ फेब्रुवारी) या सणाच्या

फीत-शोभित अभिष्टचिंतनपत्रिका.

दिवशी रोमन युवक-युवती एका पात्रात ठेवलेल्या नावांच्या चिठ्ठ्या उचलून आपल्या प्रिय व्यक्तीची निवड करीत. ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर हाच प्रकार सेंट व्हॅलेंटाईनच्या सणाच्या दिवशी (१४ फेब्रुवारी) करण्याचा प्रघात यूरोपमध्ये होता. सोळाव्या शतकामध्ये भावपूर्ण संदेश असलेल्या कागदी ‘व्हॅलेंटाईन’ प्रचारात आल्या. ए व्हॅलेंटाईन रायटर (१६६९) या पुस्तकाच्या प्रारंभीचे चित्र ही पहिली मुद्रित ‘व्हॅलेंटाईन’ मानली जाते. १८०० च्या सुमारास फ्रांचेस्को बार्तोलॉत्सीसारख्या कलावंतांनी तयार केलेल्या हस्तचित्रित ताम्रपत्रिका लोकप्रिय होत्या. त्यांच्या मागोमाग काष्ठ-ठशाच्या कोरीव पत्रिका, तसेच शिळाछपाई-पद्धतीच्या व लहान आकाराच्या पत्रिका प्रचारात आल्या.  इंग्‍लंडमध्ये जे. सी. हॉर्सलीने केलेली सचित्र ख्रिसमस-पत्रिका सर्वप्रथम मानली जाते (१८४३). व्यावसायिक दृष्टीने अभीष्टचिंतनपत्रिकांची निर्मिती १८६० च्या सुमारास सुरू झाली. सु. १८७० मध्ये पत्रिकांना रेशमी झालरी लावून त्या सुशोभित करण्याची प्रथा होती. घडी-पद्धतीच्या पत्रिकाही याच काळात वापरात होत्या. लूइस प्रँग (१८२४-१९०९) हा अमेरिकन कलावंत पत्रिकानिर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर मानला जातो. त्याने नाताळच्या भेट-पत्रिकांबरोबरच, जन्मदिनपत्रिका, ईस्टर शुभचिंतन-पत्रिका, जाहिरात-पत्रिका, ओळख-पत्रिका वगैरेंचीही निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. यांपैकी काही पत्रिका उत्कृष्ट शिळाछपाईच्या, रंगीत आणि रेशमी फितींनी व झुबकेदार गोंड्यांनी सुशोभित केलेल्या होत्या. पत्रिकांचे आकर्षक आकृतिबंध व संदेशपर मजकूर यांतील स्पर्धेला लूइस प्रँगमुळेच चालना मिळाली. लेखक व चित्रकार यांच्याकडून काव्य व रचनाकृती यांच्या योजना मागवून,त्यांतील निवडक योजनांना पारितोषिके देण्याची प्रथा त्याने सुरू केली. प्रँगने विख्यात कलाकृतींच्या प्रतिकृती पत्रिकांवर छापल्या. १९१० नंतरच्या काळात अमेरिकनांनी पत्रिकानिर्मितीच्या क्षेत्रात अनेकविध नवीन गोष्टी आणल्या. त्रिमितीचा व दृक्श्राव्य स्वरूपाचा प्रत्यय देणारे घटक आणि चैतन्यपूर्ण विविधता यांची मौलिक भर त्यांनी घातली. दुसऱ्या महायुद्धानंतर नव्या धर्तीच्या, विनोदी, अभिव्यक्तीद्वारा अभीष्टचिंतन करणाऱ्या पत्रिका लोकप्रिय झाल्या. त्यांना ‘फ्रॉलिक’, ‘स्टुडिओ’ अथवा ‘कंटेंपररी’ अशी नावे होती.  या पत्रिकांवर हास्यजनक रेखाचित्रे व मजकूर असे.

गोंड्याने सुशोभित अभीष्टचिंतनपत्रिका.

भारतामध्ये अभीष्टचिंतनपत्रिका पाठविण्याची प्रथा पाश्चात्यांच्या संपर्काने, पण बऱ्याच उशिरा सुरू झाली. जवळ-जवळ १९५० पर्यंत इंग्‍लंड, हॉलंड इ. देशांतून अभीष्टचिंतनपत्रिका आयात केल्या जात. सु. १९५८ नंतर आपल्याकडे अभीष्टचिंतनपत्रिकांचे निर्माते उदयास आले. हल्ली भारतीय संस्कृतीवर आधारलेल्या, परदेशी पत्रिकांच्या तोडीच्या प्रसंगोचित पत्रिका बाजारात उपलब्ध आहेत.

चालू शतकात माणसामाणसांमधील स्‍नेहसंबंध दृढ करण्यास व वाढविण्यास अभीष्टचिंतनपत्रिका इष्ट व उपयुक्त आहेत.

देवकुळे, ज. ग.