पिंगळा : हे एक प्रकारचे ⇨घुबडच असल्यामुळे त्याचा स्ट्रायजिडी पक्षिकुलात अंतर्भाव होतो पिंगळ्याचे शास्त्रीय नाव अथीनी ब्रामा असे आहे. भारतात तो सर्वत्र आढळतो, मात्र हिमालयाच्या पायथ्याच्या डोंगरांच्या रांगांत ९०० मी. उंचीपर्यंतच सापडतो. घनदाट अरण्य सोडून बाकीच्या सर्व प्रदेशांत तो असतो. मनुष्यवस्तीच्या जवळपास तो नेहमी आढळतो. पडक्या इमारती, झाडे, घरे इ.  याची राहण्याची ठिकाणे होत. बगीच्यात राहणे याला विशेष पसंत असावे असे दिसते.

पिंगळा (अथीनी ब्रामा )पिंगळा बराच लहान म्हणजे साधारणपणे साळुंखीएवढा असतो. त्याचा बांधा बसका आणि रंग भुरकट तपकिरी असतो. डोके मोठे, वाटोळे असून त्यावर लहान पांढरे ठिपके व काही ठिकाणी आडवे पट्टे असतात. गळा व मानेच्या दोन्ही बाजू पांढर्‍या असतात. शरीराची खालची बाजू पांढरी  व तिच्यावर आडवे तपकिरी पट्टे असतात. डोळे पुढच्या बाजूला असून मोठे, पिवळ्या रंगाचे व नेहमी वटारलेले असतात चोच व पाय हिरवट पिवळ्या रंगाचे असतात पाय पिसांनी झाकलेले असतात. नर व मादी दिसायला सारखी असतात.

सगळ्या घुबडांप्रमाणे हादेखील रात्रिंचर आहे. या पक्ष्याला दिवाभीत म्हणता येणार नाही, कारण पुष्कळदा ही सकाळी चांगले उजाडल्यावरही उघड्यावर आढळतो त्याचप्रमाणे संध्याकाळी उजेड असतानाच हा नेहमी बाहेर पडतो. यांचे नेहमी जोडपे किंवा कौटुंबिक मंडळींची टोळी असते. दिवसा एखाद्या झाडाच्या ढोलीत वा आडोशाच्या जागी किंवा एकिकडे असलेल्या झाडाच्या तुटक फांदीवर खेटाखेटीने ते बसलेले असतात. त्यांच्याकडे आपण पाहतो आहोत, असे वाटल्याबरोबर मोट्या धांदलीने ते उडून थोड्या अंतरावर बसून ते वटारलेल्या डोळ्यांनी टक लावून पाहतात व मधूनमधून एखाद्या विदूषकाप्रमाणे डोके हलवतात किंवा खालीवर करतात. यांच्या ओरडण्याला किचकिचाट म्हणता येईल. लहानमोठे कीटक हे यांचे मुख्य भक्ष्य, परंतु पक्ष्यांची पिल्ले, उंदीर, सरडे वगैरेही ते खातात.

नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत यांचा विणीचा हंगाम असतो. झाडाच्या ढोलीत, भिंतीच्या भोकात किंवा घराच्या छपरात थोडेसे गवत पसरून ते घरटे तयार करतात. मादी ३-४ पांढरी अंडी घालते. अंडी उबविण्याचे व पिल्लांच्या संगोपनाचे काम नरमादी दोघेही करतात.

कर्वे, ज. नी.