नाव्हेरा (थेरॅपॉन जर्बुआ)

नाव्हेरा : या माशाचे नाव्हेरी असेही नाव आहे. त्याचा समावेश पर्सिफॉर्मीस गणाच्या थेरॅपॉनिडी कुलात करतात. याचे शास्त्रीय नाव थेरपॉन जर्बुआ असे आहे. तो खाड्यांच्या मचूळ पाण्यात आढळतो. तो मध्यम किंवा लहानसर आकाराचा (लांबी १५–२० सेंमी.) असून त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे थोडेसे वर्तुळाकार पट्टे आणि पृष्ठभागावर (पाठीवरील परावर) एक वाटोळा काळा ठिपका असतो. यामुळे त्याला इंग्रजीमध्ये सॉल्टवॉटर झीब्राफिश किंवा टार्गेट पर्च असेही म्हणतात. त्याच्या शोभिवंत रंगामुळे व चपळ हालचालींमुळे मोठ्या मत्स्यालयात (जलजीवालयात) तो एक आकर्षक असा मासा गणला जातो. त्यांचे प्रजनन पावासाळ्याच्या सुरुवातीस होते. त्याच्या लहानमोठ्या पिलांचे थवे समुद्राच्या भरतीच्या पाण्यात आणि गोड्या पाण्याच्या सान्निध्यात, ओहोळात, उथळ पाण्यातही सापडतात. साधारणतः परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करण्याच्या) प्रवृत्तीमुळे ते मचूळ पाण्यातील निरनिराळ्या जीवांचा फडशा पाडतात. त्यांत थोड्या मचूळ पाण्यात वाढणाऱ्या कीटकांच्या अळ्यांचाही समावेश असल्यामुळे डासांच्या नाशासाठीही त्याची थोडीफार मदत होते.

खाण्याच्या दृष्टीने ते चविष्ट असतात आणि किनारपट्टीलगत सर्व ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात मिळत असल्यामुळे हातात फेकजाळे घेऊन चरितार्थासाठी एकएकट्या फिरणाऱ्या छोट्या मच्छिमारांना त्यांचा एक आधार वाटतो तरीही एकंदर उत्पन्न फारसे नसते.

दडदडा ही त्याची दुसरी एक जाती आहे. तिचे शास्त्रीय नाव थेरपॉन थीरॅप्स आहे. त्याचे पट्टे वर्तुळाकार नसून सरळ समांतर असतात. इतर बाबतींत दोन्ही जातींच्या सवयी सारख्याच असतात. नाव्हेऱ्याच्या आणखी दोन जाती (थे. पुटा व  थे. कॉड्रिलीनिटस किंवा ट्रंपेचर पर्च) महाराष्ट्रात आढळतात पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे.

कुलकर्णी, चं. वि.